Features

जेजे शनिवारी बंद का होतं?

कला संचालक राजीव मिश्रा यांनी गुरुवारच्या कार्यक्रमात प्रदर्शन आठवडाभर खुलं राहणार अशी घोषणा केली. चिन्हनं या घोषणेला प्रसिद्धीदेखील दिली. साहजिकच सुट्टीचा दिवस पाहून जेजेत शनिवारी कलारसिक आणि माजी विद्यार्थी प्रदर्शन पाहायला पोहोचले. पण फाईन आर्ट कॉलेज बंद होतं. साहजिकच ही सर्व मंडळी निराश झाली. कारण काय तर म्हणे पुरेशी सिक्युरिटी नव्हती. पण दुसऱ्या दिवशी रविवार होता तेव्हा मात्र सिक्युरिटी उपलब्ध झाली. इतकंच नाही तर मंत्रालयातल्या उच्च अधिकाऱ्यांची तिथं पार्टीदेखील झाली. त्याचीच माहिती देणारा हा विशेष लेख.

डिनोव्हो संबंधीच्या सोहळ्यात गुरुवारी प्रभारी कला संचालक राजीव मिश्रा यांनी कार्यक्रम संपता संपता अचानकपणे जेजेच्या तिन्ही महाविद्यालयांमधली आजी माजी विद्यार्थ्यांच्या कामाची प्रदर्शनं पुढला संपूर्ण आठवडाभर खुली राहणार आहेत अशी घोषणा करून आश्चर्याचा धक्काच दिला. त्याचवेळी मनात आशंकेची पाल चुकचुकली की ‘इतकी वर्ष यांनी अत्यंत आचरटपणे कारभार केला आहे. यांना हे जमणार आहे का?’ असा विचार माझ्या मनात आलाच. कारण गेली काही वर्ष जेजे आणि कला संचालनालयाचा कारभार ज्या अजागळ पद्धतीनं चालवला जातो आहे तो पाहता असे विचार मनात येणं स्वाभाविकच होतं. पण मग मनात आलं की आता जेजेला डिनोव्हो दर्जा लाभला आहे. त्यांची कदाचित मानसिक तयारी झाली असेल म्हणूनदेखील त्यांनी ही घोषणा केली असेल. त्या दिवशी तिन्ही महाविद्यालयातली प्रदर्शनं पाहणं केवळ अशक्य होतं याचं कारण कार्यक्रमासाठी प्रचंड गर्दी जमा झाली होती.

चाळीस-पंचेचाळीस वर्षांपूर्वी ज्यांनी जेजेत शिक्षण घेतलं असे माजी विद्यार्थी आवर्जून त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. दोन-तीन वेळा मी प्रदर्शनं पाहण्याचा प्रयत्न केला पण जुने मित्र, जुन्या मैत्रिणी, जुने शिक्षक वारंवार भेटतच राहिले आणि प्रदर्शन पाहण्याचा प्रयत्न मला सोडून द्यावा लागला. त्यामुळेच राजीव मिश्रा यांनी घोषणा करताच मला अतिशय आनंद झाला. शनिवारी आपण येऊ आणि शांतपणे तिन्ही कला महाविद्यालयातली प्रदर्शनं पाहू असा कार्यक्रम मी मनातल्या मनात आखला. त्या दिवशी जवळजवळ ९.०० वाजेपर्यंत मी जेजेच्याच परिसरात हिंडत होतो. विद्यार्थी दशेतले सारेच मंतरलेले दिवस आठवत होते.

दुसऱ्या दिवशी अनेकांचे अभिनंदनाचे फोन आले, मेसेजेस आले. त्यातल्या अनेकांना मी शनिवारी प्रदर्शन पाहायला येतो आहे आपण सारे नक्की भेटू असंदेखील सांगून टाकलं. अनेकांनी आपणदेखील येतो आहोत खूप दिवसांनी जेजेत भेटू आणि जुने दिवस अनुभवू यास अनुमोदन दिलं.

हल्ली मुंबईत पूर्वीसारखं फारसं जाणं होत नाही महत्वाची प्रदर्शनं आणि कार्यक्रम असले तरच मी आवर्जून मुंबईत जातो. एरवी मी मुंबईकडे फिरकतदेखील नाही. मुंबईत सर्वत्र चाललेली मेट्रोची कामं आणि भराभर उंचउंच वाढत जाऊन मुंबईची स्कायलाईनच नष्ट करणारे टॉवर्स मनात अस्वस्थता निर्माण करतात. पूर्वीची मुंबई आता आपली वाटेनाशी झाली आहे. सारं काही बदलून गेलं आहे. आणि हे होणारे बदल भीषण अनुभवाकडे मुंबईला नेत आहेत असं मला सारखं जाणवत राहतं. असो. थोडंसं विषयांतर झालं.

***

शनिवारी जहांगीरमध्ये फेरफटका मारून जेजेत पोहोचलो तर सारं काही शांत दिसत होतं. आज सुट्टी आहे की काय असंच जाणवत होतं. तितक्यात माझा जेजेमधला वर्गमित्र अनिल नाईक आला. सहा-सात वर्षांपूर्वी तो जेव्हा जेजेमधून सेवानिवृत्त झाला तेव्हा त्याला आवर्जून भेटायला गेलो होतो. त्यानंतर मात्र डिनोव्हो आंदोलन सुरु झाल्यानंतर एकदाच अप्लाइड आर्टच्या इमारतीत गेलो होतो तेव्हढाच. फाईन आर्टमध्ये मात्र मी फिरकलोच नव्हतो. कारण अनिल नाईक सेवानिवृत्त झाल्यांनतर माझ्या परिचयाचं कुणी तिथं शिल्लकच राहिलं नव्हतं. त्यामुळे गेलंच तर भेटायचं कुणाला हा मोठा प्रश्न आणि बोलायचं काय हा आणखीन मोठा प्रश्न कारण जेजेमध्ये आता, जेजेमध्ये न शिकलेले विद्यार्थी जेजेमध्ये शिक्षक म्हणून भरती झाले आहेत. त्यांच्याशी परिचय होण्याची वेळ कधी आलीच नाही. त्यामुळेच जेजेत जाणं मी टाळत होतो. मी मनाशी एक निश्चय केला होता की आता जेजेत जो प्रवेश करीन तो जेजेचं काही तरी चांगलं झाल्यावरच. तोपर्यंत कदापि नाही. आणि हा शिरस्ता मी अनेक वर्ष पाळला.

शनिवारी ठरवल्याप्रमाणे जेजेत प्रवेश केला पण जेजेचे दरवाजे बंद होते. प्रवेशद्वारावरच्या सुरक्षारक्षकाला विचारलं तर तो म्हणाला मला काही ठाऊक नाही. मी कालच कामावर रुजू झालो आहे. (आता हा सुरक्षारक्षकदेखील पर्मनंट होता का कंत्राटी हे काही मी विचारलं नाही. असो.) तितक्यात जेजेतला आमचा आणखीन एक जुना मित्र घनःश्याम भडेकर तिथं आला. तोही जेजेचाच माजी विद्यार्थी. पण तो नंतर फोटोग्राफी करू लागला आणि प्रेस फोटोग्राफीमध्ये शिरला. त्यालाही मीच बोलावलं होतं. तोही वैतागला होता. प्रदर्शन आठवडाभर खुलं राहणार असं कला संचालकानं जाहीर करून देखील आज शनिवारी प्रदर्शन बंद का? असं तो वारंवार विचारत होता. अप्लाइड आर्ट आणि आर्किटेक्चरचं प्रदर्शन सुरु आहे आणि मग फाईन आर्टचं प्रदर्शन बंद का? असा त्याचा रास्त सवाल होता.

मी थेट कला संचालक राजीव मिश्रा यांना फोन लावला. ‘तुम्ही गुरुवारी जाहीर केलंत की आठवडाभर प्रदर्शन चालू राहणार आहे. तर मग आज शनिवार असून ते बंद का?’ असा प्रश्न मी त्यांना थेट विचारला. त्यावर ते थोडंसं गोंधळले म्हणाले सिक्युरिटीचा प्रॉब्लेम आहे. आज आम्हाला सिक्युरिटीची व्यवस्था करता आली नाही आणि प्रदर्शनातली काही चित्रं आणि शिल्प यांच्या आता प्रचंड किंमती झाल्या आहेत. त्यामुळे आम्ही रिस्क घेतली नाही असं त्यांचं म्हणणं होतं. अप्लाइड आर्ट आणि आर्किटेक्चर यांना सिक्युरिटीची व्यवस्था करता आली. मग फाईन आर्टला ते का शक्य झालं नाही. या माझ्या प्रश्नावर त्यांच्याकडे काही एक उत्तर नव्हतं. फाईन आर्टचे अधिष्ठाता विश्वनाथ साबळे यांचा डिनोव्हाला प्रथमपासून विरोध असल्यामुळं बहुदा त्यांनी अशा पद्धतीनं आपला विरोध प्रकट केला असणार या बाबत माझी अगदी खात्रीच झाली.

मिश्रा मात्र मला सतत सांगत होते की तुम्ही उद्या या किंवा परवा या आम्ही तुम्हाला प्रदर्शन दाखवण्याची व्यवस्था करतो, त्यावर मी त्यांना सटकून उत्तर दिलं की मिश्रासाहेब मी जे जे स्कूल ऑफ आर्टपासून ४४ किलोमीटर लांब राहतो. आणि आज माझं वय ६८ आहे. मी पुन्हा मुंबईच्या भयंकर गर्दीत धक्केबुक्के खात हे प्रदर्शन पाहायला पुन्हा यावं अशी तुमची अपेक्षा आहे का? मिश्रा यावर चपापले. सॉरी वगैरे म्हणायला लागले. (या लोकांचं एक बरं असतं हे पटकन माफी वगैरे मागून मोकळे होतात) मी त्यांना वारंवार विचारत होतो की तुम्हाला सिक्युरिटीचा प्रॉब्लेम होता तर तुम्ही प्रदर्शन आठवडाभर खुलं राहणार असं जाहीरच का केलं. आणि आज प्रदर्शन बंद ठेवायचा निर्णय घेतलात तर तुम्ही का नाही आम्हाला कळवलत. परवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही आम्हा सर्व उपस्थितांचे  ई-मेल आयडी तर घेतले होते. एक ई-मेल नाही का सर्वांना उद्देशून पाठवता आला असता? त्यावर पुन्हा त्यांचं सॉरी, सॉरी. एकदा मनात विचार आला की यांना कला संचालनालयाच्या कार्यालयात जाऊन जाब विचारावा. पण हे बहुदा तिथं नसणारच. मंत्रालयात पडलेले असणार. असं जेव्हा मला कुणीतरी सांगितलं तेव्हा मी तो नाद सोडला.

अनेक मित्रांना मी प्रदर्शन पाहायला बोलावलं होतं. त्यातला एक तर मुंबईतला मोठा कलासंग्राहक होता. या सर्वांना निरोप देतादेता माझ्या नाकीनऊ आले. कारण बरेचसे त्यातले प्रवासात होते. वाटलं होतं डिनोव्हो झाल्याबरोबर जे जे स्कूल ऑफ आर्टच्या परिसरातल्या लोकांवर त्याचा मोठा प्रभाव होईल. आता तरी निदान ते प्रोफेशनल वागतील. पण कसलं काय त्यांनी आपली पातळी दाखवूनच दिली. असंख्य मुलं त्यादिवशी पोर्चमध्ये दिसत होती ती सारीच निराश झाली असणार. प्रदर्शन आठवडाभर खुलं राहणार आहे हे मी ‘चिन्ह’च्या वेबसाईटवर आणि फेसबुकवर जाहीर केलं होतं ते वाचून अनेकजण जेजेला पाय लावून आले होते. त्यांना काय वाटलं असेल? पण याचा विचार कोण करतो?

दुसऱ्या दिवशी म्हणजे कालच्या रविवारी मुद्दाम काही गिरगावात राहणाऱ्या मित्रांना फोन केला. त्यातला एक मित्र जेजेत गेलासुद्धा. म्हणाला, आज मात्र जेजे चालू होतं. इतकंच नाही तर तिकडे प्रचंड गाड्या लागल्या होत्या. त्या कुणाच्या असं विचारलं तर म्हणाला मंत्रालयातल्या बड्या अधिकाऱ्यांच्या. बहुसंख्य आयएएस ऑफिसर्स जेजेत जमले होते. राजीव मिश्रा यांनी पुढाकार करून त्यांना जमवलं असावं. मोठी पार्टी असणार कारण गुरुवारच्या कार्यक्रमाचं कंत्राट ज्यांना दिलं होतं त्याच कंत्राटदाराकडून सर्व व्यवस्था चोख करण्यात आली होती. संध्याकाळी खूप उशिरापर्यंत हा कार्यक्रम चालू होता असंही तो म्हणाला.

त्या पार्टीविषयी माझं काहीच म्हणणं नाही. पण शनिवारी जेजे का उघडं ठेवलं नाही हा माझा थेट प्रश्न आहे. आमच्यासारख्यांचा भावनांशी खेळण्याचा अधिकार राजीव मिश्रा यांना कुणी दिला? त्यांना हा प्रश्न त्यांचे वरचे अधिकारी तरी विचारणार आहेत का? का आतापर्यंत चालला तसाच पुढं कारभार चालू राहणार आहे. मंत्रालयातल्या बड्या अधिकाऱ्यांना बोलावलं हे योग्यच झालं. कारण विनोद तावडे यांच्या  कारकिर्दीत यांच्यातल्याच काही अधिकाऱ्यांनी डिनोव्होचा पर्याय शोधून काढला होता इतकंच नाही तर त्याचा पाठपुरावादेखील केला होता.

श्री सौरभ विजय हे यातलं महत्वाचं नाव. ते आता बहुदा सांस्कृतिक खात्याचे सचिव असावेत. त्यांनी या प्रकरणी खूप मोठी कामगिरी बजावली होती. खरंतर त्यांना गुरुवारच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित करणं अगत्याचं ठरलं असतं. पण ठीक आहे. गुरुवारी नाही आले ते रविवारी आले. आलेले मंत्रालयातले सर्वच अधिकारी जेजेचा परिसर पाहून, इमारती पाहून, वास्तू पाहून, वृक्ष पाहून, डीन बंगलो पाहून अक्षरशः थक्क झाले. मला वाटत नाही इथून पुढं भविष्यात सचिव पातळीवरचे कुणी जेजेकडे दुर्लक्ष करतील. तेवढे जरी या रविवारच्या पार्टीनं साधले तरी माझ्या मते खूप काही मिळवले असं म्हणता येईल. पण यामुळे आता श्री राजीव मिश्रा हे डिनोव्होचे व्हाईस चॅन्सलर नाही झाले म्हणजे मिळवली. नाही का?

सतीश नाईक 

संपादक ‘चिन्ह आर्ट न्यूज’

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.