No products in the cart.
जेजेच्या इतिहासातला सोनेरी दिवस!
उद्या गुरुवार दि १९ रोजी जेजेत एक मोठा समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या समारंभाचं अध्यक्षस्थान केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान हे भूषवणार आहेत. जेजेला डिनोव्हो दर्जा देण्याबाबत अधिकृत घोषणा जरी अद्याप झाली नसली तरी उद्याच्या कार्यक्रमात ती होईल असा संबंधितांचा कयास आहे. तसं जर झालं तर जेजेच्या १६६ वर्षाच्या इतिहासातला हा सोनेरी क्षण असेल. भारतातल्या सर्वोच्च शिक्षण संस्थांमध्ये आता जे जे स्कूलचा समावेश झाला तर कुणालाच आश्चर्य वाटायला नको. सदर समारंभाच्या निमित्तानं घेतलेला हा परामर्श.
या लेखाच्या शीर्षकासोबत जे छायाचित्र वापरलं आहे किंवा या लेखात अन्यत्र जी छायाचित्रं वापरली गेली आहेत ती कालच्या दिवसात जे जे स्कूल ऑफ आर्टमध्येच काढली गेली आहेत. आश्चर्याचा धक्का बसला ना? पण विश्वास ठेवा ही सर्व छायाचित्रं कालच्या दिवसात जे जे स्कूल ऑफ आर्टच्या परिसरातच काढली गेली आहेत. परवा म्हणजे १९ ऑक्टोबर रोजी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान जेजेला भेट देणार आहेत. त्या निमित्तानं ही रंगरंगोटी झाली आहे.
श्री धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यालयातून तीन-चार दिवसापूर्वी कार्यक्रम पाठवला गेला त्या बरोबर इथं कोण धांदल उडाली सांगू! मंत्रालयातल्या उच्च व तंत्रशिक्षण खात्यातले अधिकारी आणि शिक्षणमंत्र्यांच्या सेवेतले स्वीय साहाय्यक यांच्या येरझाऱ्या जेजेत सुरु झाल्या अवघ्या तीन-चार दिवसातच जेजेचा परिसर चकाचक झाला. आता तिथं गेलात तर विश्वासदेखील बसणार नाही इतका फरक तिथं पडला आहे. नुसते फोटो पाहाल तरी हे सारं लक्षात येईल. एक-दोन फोटो पाहिले तर मला थेट अहमदाबादच्या गांधी आश्रमाची आठवण झाली.
पहिल्याच दिवशी जवळजवळ वीस ट्रक इतका कचरा आणि डबर कॅम्पसमधून बाहेर पडलं. दुसऱ्या दिवशी कॅम्पसमधून बाहेर पडणाऱ्या ट्रकची संख्या अक्षरशः दुप्पट झाली. किती तरी अनावश्यक बांधकाम या कॅम्पसमध्ये तयार झालं होतं ते सारं आता तोडून टाकलं गेलं आहे. मध्यंतरी सरकारनं काही बेंगरूळ प्रकल्प राबवण्याचा इथं प्रयत्न केला होता. त्या निमित्तानं झालेली बांधकामंदेखील या सफाई मोहिमेत रफादफा केली गेली आहेत. त्यामुळे आता संपूर्ण जेजेचा परिसर स्वच्छ आणि सुंदर दिसू लागला आहे. आखीवरेखीव रस्ते आणि सर्वत्र पसरलेली हिरवळ, त्यातली बरीचशी हिरवळ तर गेल्या दोन दिवसातच पसरण्यात आली आहे. सत्तरच्या दशकात जेजेचा परिसर जसा सुंदर दिसत होता. तसा आता दिसू लागला आहे. अर्थात हे सारं मी फोटो पाहून सांगतो आहे. स्कूल ऑफ आर्टच्या लॉनवरची एक अनावश्यक भिंत मात्र या सगळ्या पडझडीतून वाचली आहे. पण येत्या काही दिवसातच तिचीपण योग्य तो वासलात लावली जाईल अशी चिन्हं आहेत.
जेजेमध्ये गेल्या काही वर्षात जे आचरट निर्णय घेतले गेले, जे चुकीचे प्रकल्प राबवले गेले आणि संपूर्ण निसर्गरम्य परिसराची ज्या पद्धतीनं वाट लावली गेली त्या साऱ्यावरचं शिक्कामोर्तबच जणू या पडझडीने झालं असावं. जेजेत नियमितपणे येणारे माजी विद्यार्थी सरकारचं या कृतीमुळे कौतुक करत आहेत.
डिनोव्होच्या स्वागताची ही जणू तयारी असावी. अन्यथा इतक्या लगबगीने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान कशाला इथं येते? बहुदा या निमित्तानं होणाऱ्या कार्यक्रमात शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान हे जेजेला डिनोव्हा दर्जा दिल्याची घोषणा करतील अशी अपेक्षा आहे.
अतिशय काटेकोर पद्धतीने कार्यक्रमाचं नियोजन केलं जात आहे. आपल्या अडीच-तीन तासांच्या कार्यक्रमात शिक्षणमंत्री महोदय जे जे स्कूल ऑफ आर्ट, अप्लाइड आर्ट आणि आर्किटेक्चर कॉलेज अशा तिन्ही वास्तुंना भेट देणार आहेत. आजी माजी विद्यार्थ्यांच्या कलाकृती पाहणार आहेत. जमलं तर उपस्थितांशी संवाददेखील साधणार आहेत. त्यांच्या मित्र परिवारामुळे जेजेविषयी त्यांच्या मनात अतिशय वेगळ्या भावना आहेत त्यामुळेच हे सारं घडत असावं असं वाटतं. सरते शेवटी जेजेच्या लॉनवर होणाऱ्या जाहीर कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. आणि तिथेच बहुदा जेजेला डिनोव्हा दर्जा दिल्याची घोषणा होईल असा कयास आहे.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीसदेखील उपस्थित राहणार आहेत असे कळते. साहजिकच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत असेही कळते आहे. आता एक मुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री जर एवढ्या महत्वाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असतील तर दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार का नकोत? असा प्रश्न उपस्थित झाल्यामुळे बहुदा अजितदादा पवार हेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित राहतील असा कयास जातो आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर हा अनेक महत्वाच्या शासकीय कार्यक्रमांपैकी एक महत्वाचा कार्यक्रम म्हणून हा सोहळा इतिहासात नोंद झाला तर आश्चर्य वाटायला नको.
देर से आये पर दुरुस्त आये! पण आता या भव्य कार्यक्रमानंतर भविष्यात कुणीही माणूस (अगदी मातबर मंत्रीसुद्धा) जेजेच्या निसर्गरम्य परिसराकडे वाकड्या नजरेनं पाहू शकणार नाही हे निश्चित. इतकी या कार्यक्रमानं वातावरण निर्मिती केली आहे. या साऱ्यांचं श्रेय प्रामुख्यानं शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनाच द्यायला हवं. त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच एक मोठी संस्था वाचली आहे यात शंकाच नाही. हे सगळं घडवून आणण्यामागे अनेकांचा हातभार लागला आहे. विशेषतः चित्रकार आशुतोष आपटे, चित्रपट नाट्य अभिनेते मनोज जोशी (जे जेजेचे माजी विद्यार्थी होते) अशा अनेकांचा त्यात मोठा वाटा आहे. पण त्याविषयी नंतर कधीतरी लिहायचं ठरवलं आहे.
छापता छापता: हा लेख लिहून हाता वेगळा होत असतानाच जेजेमधील उद्याच्या कार्यक्रमाची निमंत्रणपत्रिकादेखील हाती आली.
तुम्ही या कार्यक्रमाला यायचं ठरवलं आहे का? असेल तर नक्की या आपण तिथं भेटूच.
सतीश नाईक
संपादक
‘चिन्ह आर्ट न्यूज’
Related
Please login to join discussion