No products in the cart.
लढा अस्मितेचा.. अस्तित्वाचा !
जेजे अनन्य अभिमत विद्यापीठाची आमची चळवळ सुरु झाली, त्यासंदर्भात लेख प्रसिद्ध होऊ लागले आणि मोठ्या प्रमाणावर जेजेच्या माजी विद्यार्थ्यांचे मेसेजेस येऊ लागले. त्यातला एक मेसेज होता एका जेजेत शिक्षण घेतलेल्या तरुणीचा की, ‘या आंदोलनासाठी काही काम असेल तर सांगा मला नक्की यायला आवडेल !’ त्या मेसेजला उत्तर दिलं आणि पुढल्या सभेचं निमंत्रण देखील पाठवलं. त्या सभेला ती उपस्थित देखील राहिली. नंतर कळलं की ती चक्क कर्जतवरून ठाण्याला आली होती ! तिचं नाव स्मिता गीध. ती जेजेचीच माजी विद्यार्थिनी आहे. हे असे माजी विद्यार्थी या आंदोलनात सहभागी होत आहेत त्यामुळे अनन्य अभिमत विद्यापीठ होणार यात शंकाच नाही. तिनंच तिहिलेला हा अनन्य अभिमत विद्यापीठाची संकल्पना विशद करून सांगणारा लेख.
‘जे जे स्कूल ऑफ आर्ट’…नावच किती भारदस्त वाटतं ! लहानपणी शाळेत असतानाच ब्रिटीश काळात स्थापन झालेल्या या आर्ट स्कूल विषयी आकर्षण निर्माण झालं होतं..
त्यात भर पडली ती १९८६ साली सहावीत असताना डोंबिवलीतील आंबेडकर हॉलमध्ये इनामदार सरांनी आयोजित केलेल्या कलाप्रदर्शनातील अजित वैद्य व प्रतिमा दलाल-वैद्य यांच्या पॉटरी व सिरॅमिक कलाकृतींनी व त्यांच्या प्रात्यक्षिकांनी..
नंतर एक-दोन महिन्यातच इनामदार सरांबरोबर प्रथमच जेजेची वारी झाली.. तिथलं प्रशस्त आवार, कमर्शियल आर्ट, आर्किटेक्चर, फाईन आर्टमधले पेंटिंग. शिल्पकला, मेटल क्राफ्ट, सिरॅमिक असे सगळे विभाग बघतांना भारावून गेले आणि मनाशी पक्क ठरलं शिकायचं तर या आर्ट स्कूलमध्येच तेही पॉटरी आणि सिरॅमिक…
इनामदार सरांच्या सहवासात आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला जेजेबद्दल कुतूहल होते. कारण विनय मंदिराच्या परिवारातील ९८ % विद्यार्थी जेजेमधून शिकले होते, शिकत होते.. मग मी कशी मागे राहणार होते ?
त्याकाळी विद्यार्थी जेजेमध्ये प्रवेश मिळावा म्हणून मिळेपर्यंत ३-३-४-४ वर्ष प्रवेश परीक्षा देत असत.. जरी दुसरीकडे शिकत असतील तरीही.. कारण जेजेचा महिमा अगाध आहे.. या आवारातून किती महान कलाकार शिक्षण घेऊन बाहेर पडले त्याची गणतीच नाही..
तुम्ही म्हणत असाल, मी इतक्या लहानपणीच्या आठवणी अचानक का सांगतेय.. कारणही तसंच आहे… आज या जेजेच्या अस्तित्वाचा प्रश्नच ऐरणीवर आला आहे.. आयुष्यातली थोडी-थोडकी नाही तब्बल पाच-पाच, आठ–आठ वर्ष या आवारात शिक्षणासाठी आपण घालवली आहेत. वयाच्या १६ ते ३० या वयोगटात असताना इथं शिकणाऱ्या प्रत्येकाची या वास्तूतच व्यक्ती म्हणून घडण झाली.. स्वतंत्र चित्रकार, शिल्पकार, कला शिक्षक, आर्ट डिरेक्टर, लेखक, राजकारणी, फोटोग्राफर, ॲड मेकर, नाटककार, अभिनेते, व्यंगचित्रकार, आर्किटेक्ट, इंटेरियर डिझाईनर, पुरातत्त्वज्ञ अशा अनेक क्षेत्रात आपल्यापैकी असंख्य भारतातच नव्हे तर जगभरात कार्यरत आहेत… साहजिकच त्यामुळे इथे शिकलेल्या प्रत्येकाला जेजेच्या आवारातील प्रत्येक वास्तूविषयी, जागेविषयी प्रेम, आस्था, आदर आहे.
गेल्या काही दिवसांत समाजमाध्यमांवर, विविध व्हॉट्सअप ग्रुपवर, वर्तमानपत्रांतून जेजेच्या अस्तित्वावरच चर्चा चालू आहे. वर उल्लेख केलेल्या सर्वच क्षेत्रांतील जेजेच्या माजी विद्यार्थ्यांनी मात्र मनाशी गाठ बांधलीये… आत्ता नाही तर कधीच नाही.. जेजेला DEEMED TO BE UNIVERSITY UNDER DE NOVO CATEGORY हा स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा मिळवून द्यायचाच !
एका मंत्र्याच्या विधानाने चालू झालेल्या संघर्षाचा पूर्ण इतिहास व संबंधित माहिती घेतल्याशिवाय आणि त्याचा अभ्यास केल्याशिवाय या विषयावर माझ्यासारख्या लहानानं बोलणं योग्य नव्हतं.. त्यामुळे इतका काळ काहीच व्यक्त केलं नाही.. (अर्थात आजही व्यक्त व्हायला मी काही कोणी फार मोठी व्यक्ती नाही.) पण आता हे सहनशक्तीच्या पलीकडे जायला लागलं म्हणून या लेखातून हा प्रयत्न..
जेजेमध्ये शिक्षणासाठी अनेक वर्ष घालवलेल्या प्रत्येकानेच हा विषय समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. प्रश्न परिवाराच्या अस्मितेचा आहे कारण आपल्या सगळ्यांचे दुसरे आई-बाबा, पालक, जे काही जवळचं नातं म्हणाल ते जेजे आहे…
मुळात Deemed To Be University Under De Novo Category अर्थात ‘अनन्य (अभिनव) अभिमत विद्यापीठ’ (डिनोव्हो दर्जा) म्हणजे काय हे प्रत्येकाने समजून घेणे गरजेचे आहे. विद्यापीठाची ही संकल्पना पूर्णतः आधुनिक आहे. अशा अनन्य/ अभिनव संस्थांमध्ये एकमेवाद्वितीय आणि उदयोन्मुख ज्ञानशाखांमध्ये, शैक्षणिक व संशोधनदृष्ट्या नाविन्यता राखण्यासाठी समर्पित असलेल्या संस्थांचा समावेश होतो व हे त्या संस्थेतून शिकलेल्या व समकालीन जगतात कीर्तिवान विद्यार्थ्यांवरुन निर्धारित करता येते. केन्द्रीय सरकारतर्फे UGC (युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन)च्या सल्ल्यानुसार (https://deemed.ugc.ac.in/ ), विद्यापिठाव्यतिरक्त विशेष ज्ञानशाखांमध्ये खूपच अत्युच्च दर्जाचे शैक्षणिक कार्य असणाऱ्या नाविन्यपूर्ण व अद्वितीय उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थेलाच, डिनोव्हो – ‘अनन्य अभिमत विद्यापीठ’ म्हणून जाहीर करता येते.
भारतात अशा सहा ते सातच शिक्षणसंस्था आहेत. यातील एखादं उदाहरण घ्यायचं झालं तर प.बंगाल मधील जाधवपूर, कलकत्ता येथील IACS – इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स. (http://iacs.res.in/about-us.
आता जेव्हा आपण जेजेच्या इतिहासात डोकावून बघतो तेव्हा लक्षात येतं, १८५७ साली जमशेटजी जीजीभॉय यांनी दिलेल्या देणगीतून स्थापन झालेली ही संस्था एकेकाळी पूर्ण आशियात अग्रगण्य होती. आता या आर्ट स्कूलला १६५ पेक्षा अधिक वर्षे झाली आहेत. सुरुवातीला या आर्ट स्कूलमध्ये आर्ट, आर्किटेक्चर, अप्लाइड हे तिन्ही विभाग एकत्रच होते. नंतरच्या काळात या तीनही शाखा वेगळ्या झाल्या त्या आजपर्यंत तशाच आहेत. इतक्या वर्षांत इथल्या विद्यार्थ्यांनी अनन्य क्षेत्रांत अतुलनीय असं योगदान दिलेले आहे, जसे दादासाहेब फाळके, एम. व्ही. धुरंधर, सूझा, के.के. हेब्बर, भानू अथैया, प्रल्हाद धोंड, प्रमिला दंडवते, प्रफुल्ला डहाणूकर, गायतोंडे, प्रभाकर बर्वे, नाना पाटेकर, रेमो फर्नांडीस, सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (ही यादी न संपणारी आहे). आज जेजेच्या या ब्रिटीश कालीन शिक्षणसंस्थेला येथील परिसर, वास्तू यांना हेरिटेज दर्जा मिळालेला आहे. अशा हेरिटेज संस्थेतील तीनही कॉलेजांना परत एकत्रित करून नवीन प्रस्तावित महाराष्ट्र शासन पुरस्कृत ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर व डिझाईन अनन्य अभिमत विद्यापीठ दर्जा मिळणे नक्कीच गरजेचे आहे. असे झाल्यास इथे येणाऱ्या प्रत्येक कला विद्यार्थ्यास अनन्यसाधारण असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळू शकेल. पेटिंग, शिल्पकला, मुद्रणकला, धातुकला, विणकाम व वस्त्ररंग कला, इंटेरियर डिझाईन, पॉटरी आणि सिरॅमिक, कलाशिक्षक प्रशिक्षण, वास्तुकला, अभिकल्प व जाहिरात कला हे सर्व विभाग परत (All under one roof) एका छताखाली एकत्रित येऊन आधुनिक तंत्रज्ञानासह नाविन्यपूर्ण व अद्वितीय अभ्यासक्रम राबवू शकतील व जे.जे. ही अशा प्रकारची भारतातीलच नाही तर जगातील एकमेवाद्वितीय हेरिटेज शिक्षणसंस्था ठरेल..
भारत सरकारने UGCच्या सोबतीने नाविन्यपूर्ण व अद्वितीय उच्च शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्थांसाठी इतके चांगले विद्यापीठ स्तरांवरील पर्याय दिले आहेत.. जेजे तर त्यात सहज समाविष्ट होऊ शकतं..
आता तुम्ही म्हणाल मग अडलं कुठं ??
थोडसं २०१७पर्यंत मागे जाऊयात..
जेजेला डिनोव्हो दर्जा मिळण्यासाठीचा मार्ग तत्कालीन शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांनी मोकळा करून दिला होता व जेजेच्या स्वायत्ततेसाठी पुढील प्रस्तावाची प्रकिया सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचाच GR (शासन निर्णय) काढण्यात आला होता. मग शासनाचे विभाग, मुंबई विद्यापीठाच्या परवानग्या, बैठका, तांत्रिक मुद्दे अशा सर्व आवश्यक सोपस्कार करुन ६ सप्टेंबर २०१९ ला सदर लेखी अर्ज UGC ला केला.
- २६ फेब्रुवारी २०२० ला सध्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री श्री. उदय सामंत यांनी ही प्रक्रिया लवकर व्हावी म्हणून स्वतःच्या सही शिक्क्यासह पत्र पाठवलं.
- १७ मार्च २०२० ला महाराष्ट्र शासनानं UGC ला १५ लाख रुपये प्रोसेसिंग फी म्हणूनही भरले.
- १५ जुलै २०२१ला UGC ने या जे.जे. डिनोव्हो प्रस्तावास मान्यता देऊन तो प्रस्ताव पुढील मान्यतेसाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयात पाठवला.
- ७ ऑक्टोबर २०२१ रोजी या शिक्षणमंत्री श्री. उदय सामंत यांनी स्वतः केंद्रीय शिक्षणखात्याला हे लवकर व्हावे म्हणून पत्र पाठवले. या सर्व प्रक्रियेत जेजेच्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पदाधिकारी तसेच शिक्षणमंत्री व शिक्षण सचिव यांनीही २०१७ पासून प्रचंड मेहनत घेतली आहे. आणि या सगळ्याचे चांगले फलित म्हणजे २७ ऑक्टोबर २०२१ ला केंद्रीय शिक्षण मंत्रालयातून LOI (Letter of Intent) म्हणजे तद्अनुषंगिक पुढील कार्यवाहीसाठीचं पत्र मिळालं.
- २ नोव्हेंबर २०२१ ला जेजेची डिनोव्हो डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी होण्यासाठी कृती योजना (plan of action) ठरविण्यासाठी शासकीय पातळीवर अधिकृत बैठकही झाली. Wow.. Bravo.. ७०% काम झालं.. पण सध्याच्या शिक्षणमंत्र्यांचे कोणी कान भरले कुणास ठाऊक शासनाच्याच इतक्या चांगल्या निर्णयाला गालबोट लागलं ! आणि जेजेच्या माजी विद्यार्थ्यांना हे आंदोलन चालू करावं लागलं.. पिटीशनही तयार केलं गेलं.. https://www.change.org/…/
officeofut-make-sir-jj-art- and… परिस्थिती आलीच तर..अगदी उपोषणाला बसण्याच्या तयारीनिशी.. हेतू फक्त एकच #SaveJJ #jjdenovo कारण आहेही तसंच…
आता हा आपल्या आख्या महाराष्ट्राला कलासंस्कृती देणाऱ्या भविष्यातील जेजेच्या अस्तित्वाचा व अस्मितेचा प्रश्न झालाय. इतकं सगळं झाल्यावर स्वतः शिक्षणमंत्र्यांनीच जेजेचं राज्यस्तरीय विद्यापीठ करायचं असं ठरवलं व तशा अहवालासाठी त्वरित समिती नेमून कार्यही सुरू केलं. म्हणजे जेजेची इतर सर्व कला महाविद्यालयांना झेलण्याची क्षमता नाही हे माहित असूनही शिक्षणमंत्र्यांनी गेल्या चार-पाच वर्षांत सर्वांनी घेतलेल्या मेहनतीवर पाणी फिरवलं.
मुळात जेजेची निर्मिती तिथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तम कलाशिक्षण देण्यासाठी झाली आहे, संपूर्ण महाराष्ट्रातल्या कला महाविद्यालयांची शैक्षणिक आणि व्यवस्थापकीय जबाबदारी पेलण्यासाठी नाही हे विसरून चालणार नाही.
आज फक्त जेजेच नाही तर प्रत्येक सुज्ञ व्यक्तीनं या लढ्यात सहभागी होण्याची गरज आहे. जेजेची गेलेली रया, उर्जा परत आणण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षक आणि नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांची गरज आहे आणि हे सारं किंवा आवश्यक त्या सर्व गरजा आता फक्त स्वायत्त अनन्य अभिमत विद्यापीठच पूर्ण करू शकते हे नक्की.
स्मिता सु. गीध
Related
Please login to join discussion