No products in the cart.
जे जे दिसले ते ते…
गेल्या अनेक वर्षांपासून चित्रकला रसिकांना ज्या ग्रंथाची प्रतीक्षा होती तो ‘जे जे जगी जगले’ हा ग्रंथ यंदाच्या दिवाळीच्या सुमारास प्रसिद्ध करायचं निश्चित झालं आहे. A 4 आकाराच्या सुमारे तीनशे पेक्षा अधिक पानांच्या या ग्रंथात जेजेच्या निसर्गरम्य परिसरातल्या मंतरलेल्या आठवणी संकलित केल्या गेल्या आहेत. याविषयी अधिक माहिती फेसबुकच्या ‘जे जे जगी जगले’ या पेजवर उपलब्ध आहे. जिज्ञासूंनी ती अवश्य वाचावी. त्या संदर्भातली एक नवी कोरी कॅम्पेन देखील आम्ही लवकरच सुरु करणार आहोत.
हे सारं आताच लिहिण्याचं कारण असं की गेल्याच आठवड्यात महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने आपल्या कॅबिनेट मीटिंगमध्ये जेजेच्या तिन्ही महाविद्यालयांना डिनोव्हो दर्जा देण्या विषयीचा ठराव मंजूर केला आहे. त्या संबंधीचा जीआर देखील नुकताच जारी केला गेला आहे.
आता इथून पुढं कुणीही राज्यकर्ता जे जे स्कूल ऑफ आर्टच्या इमारतींकडे अथवा परिसराकडे वाकड्या नजरेनं पाहू शकणार नाही हे निश्चित झालं आहे. गेली सुमारे २५ – ३० किंवा त्याही पेक्षा जास्त वर्ष जे जे स्कूल ऑफ आर्ट गुंडाळून टाकण्याची प्रक्रिया आकार घेत होती. ऐंशीच्या दशकापर्यंत जेजेच्या दोन्ही कला महाविद्यालयात एकूण १६० शिक्षक होते.
वयोमानपरत्वे त्यातले ज्येष्ठ शिक्षक सेवानिवृत्त झाल्यावर त्यांच्या जागाच भरल्या गेल्या नाहीत. हंगामी किंवा तात्पुरत्या शिक्षकांच्या नेमणूका करुन वर्षानुवर्षे कारभार चालवला गेला. शेवटी शेवटी तर १६० पैकी फक्त एका हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच कायम स्वरूपी अध्यापक जेजेच्या दोन्ही महाविद्यालयात शिल्लक राहिले होते. त्यांना देखील भूतसंवर्गात टाकून देण्याची तयारी जवळ जवळ पूर्णत्वाला आलेली असतानाच नेमकी डिनोव्होची घोषणा सरकारकडून झाली. यावरुन जे जे स्कूल ऑफ आर्ट सारख्या जागतिक महत्वाच्या कला शिक्षणसंस्थेची काय अवस्था राज्यकर्त्यांनी केली होती ते स्पष्ट व्हावे. सुमारे आठ दहा वर्षांपूर्वी तर जे जे स्कूल ऑफ आर्ट इथून उचलायचे आणि देवनारच्या खाटीकखान्या शेजारी नेऊन टाकायचे. जेजेमध्ये भले थोरले टॉवर बांधायचे वगैरे सर्व तयारी राज्यकर्त्यांनी भ्रष्ट नोकरशहांच्या साहाय्यानं पूर्णत्वाकडे नेण्याची जय्यत तयारी केली होती. पण कुमार केतकर यांच्या सारख्या ज्येष्ठ पत्रकारांनी दैनिक लोकसत्तामध्ये खळबळ जनक बातम्या देताच ती योजना राज्यकर्त्यांना नाईलाजास्तव गुंडाळावी लागली. याकामी ‘चिन्ह’चा खारीचा वाटा होता.
‘चिन्ह’नं २००८ साली ‘कालाबाजार’ विशेष अंक काढून जे जे कॅम्पस, कला संचालनालय आणि उच्च व तंत्रशिक्षण खात्यातला भ्रष्टाचार अक्षरशः चव्हाट्यावर आणला. या अंकाची एक प्रत दिवंगत पत्रकार सुहास फडके यांनी तेव्हाचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांच्याकडे सुपूर्द केली.श्री तावडे यांनी या अंकाचं वाचन तर केलंच पण अभ्यास देखील केला आणि पुढं कर्मधर्म संयोगानं शिक्षणमंत्री पदी रुजू होताच आयएस अधिकाऱ्यांच्या साहाय्यानं जेजेच्या पुनरुज्जीवनाची योजना आखली. केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला. आणि अखेरीस जेजेचं पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय झाला. जेजेला मिळालेला डिनोव्हो दर्जा हा त्याच प्रयत्नांना मिळालेलं यश आहे.
खरं तर ही मोठी लढाई होती. जेजेशी संबंधित अनेकजणं ती लढले. जे जे कॅम्पस मधील पाच शिक्षकांचा या मध्ये मोठा वाटा होता. रात्रंदिवस प्रयत्न करून त्यांनी या डिनोव्हाच्या प्रस्तावाला दृश्यरुप दिलं. अनेकांनी या कामी अडथळे आणले. गैरसमज करुन देण्याचे प्रयत्न केले. पण अखेरीस जेजेची पुण्याई फळाला आली.
हा सर्वच घटनाक्रम मी १९८१ सालापासून अगदी जवळून पाहत आलो आहे. पत्रकारितेत रुजू होताच या संदर्भात मी जी १९८२ सालापासून बातम्या द्यायला सुरुवात केली ती थेट आजपर्यंत. वृत्तपत्र ते समाजमाध्यमं वा डिजिटल मीडिया असा हा तब्बल चाळीस वर्षाचा प्रवास होता. हा सारा प्रवास या ग्रंथासोबत दिल्या जाणाऱ्या एका विशेष पुरवणीमध्ये मी समग्रपणे मांडणार आहे.
खरं तर मला हे सारं लिहायचं नव्हतं. कदाचित त्यामुळे जेजेच्या रम्य आठवणींना धक्का लागला असता. केवळ म्हणूनच मी ते टाळत होतो. पण ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी मी ते सारंच सारं लिहावं यासाठी आग्रह धरला. हवं तर ग्रंथात त्याचा समावेश करु नकोस. ग्रंथा सोबत वेगळी पुरवणी दे हे कुमार केतकर यांनीच सुचवलं. पण हे लिखाण माझ्याकडून होत नव्हतं कारण डिनोव्होचा प्रस्ताव पुढे रेटला जावा यासाठीच जे लिखाण करावं लागतं ते करण्यातच माझा वेळ खर्चिला जात होता.
आता मात्र राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर तो सारा संघर्ष थांबला आहे. मलाही त्याविषयी लिहावंसं वाटू लागलं आहे. लिखाणाला मी सुरुवात देखील केली आहे. येत्या पंधरा वीस दिवसात फारफार तर महिनाभरात ते संपेल याची मला खात्री आहे. हा सारा प्रवास दिवाळीच्या आसपास प्रसिद्ध होणाऱ्या ‘जे जे जगी जगले’ ग्रंथा सोबत तुम्हाला वाचावयास मिळेल. तोपर्यंत या ग्रंथाच्या जाहिराती आणि यु ट्यूबवरचे आमचे नवे व्हिडीओ पाहायला विसरु नका.
******
सतीश नाईक
संपादक ‘चिन्ह आर्ट न्यूज’
Related
Please login to join discussion