No products in the cart.
‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’चे कलेवर-२
सडवेलकरांच्या निवृत्तीनंतर कला संचालनालय आणि त्याच बरोबर कला संचालनालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या जेजे स्कूल ऑफ आर्टची उलटी गिनती सुरु झाली. ज्या ग्लॅडस्टन सोलोमन यांनी जेजे स्कूल ऑफ आर्टला आशियामधील एक नंबरची कला संस्था बनवले तिलाच नंतरच्या एकापेक्षा एक दिवट्या व्यक्तींनी भिकेला लावले. यात तत्कालीन शिक्षणमंत्री, तंत्र संचालनालयाचे प्रमुख यासह इतर लहान मोठ्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. सध्याचे डीन साबळे यांची नियुक्ती तर एकदम नाट्यमय पद्धतीने वळसे घेत झाली होती ती देखील खास बाब म्हणून. महाराष्ट्रात कला शिक्षणाकडे झालेल्या अक्षम्य दुर्लक्षाकडे विधानसभेत प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणारे वळसे पाटील कला संचालनालयाशी संबंधित कुठल्याही प्रश्नाला देत नव्हते. एकदम अळी मिळी गुप चिळी! त्यांची चुप्पी जेजेच्या अधोगतीला मूक संमती देत होती काय असा संशय येतो. त्याचे प्रमुख कारण हे जेजेच्या लोकेशनमध्ये दडले असावे. मुंबईतल्या प्राईम एरियातील मोठी जागा बघून कोणाही उच्चपदस्थ नेत्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या तोंडाला पाणी सुटणारच! त्यामुळे हळू हळू संस्थेला सडवून तिला शेवटचे आचके द्यायला लावायचे आणि जागा ताब्यात घ्यायची असा प्लॅन झाला असावा.
२००६ मधील हा लेख पण आजही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. हा एक मात्र झालं, जेजेचं आता डिनोव्हा दर्जा मिळतोय. त्यामुळे ही परिस्थिती बदलणार हे मात्र नक्की!
वळसे – पाटील बोलत का नव्हते ?
कदाचित हे सारे अतिशयोक्तीचं वाटेल , पण ज्या पद्धतीनं आजवर तंत्रशिक्षणमंत्री आणि त्यांच्या कार्यालयानं पावले टाकली आहेत ती पाहता हे सारं असंच होईल असं म्हणणं भाग आहे . आतापर्यंत जेजे आणि कला संचालनालयातील भ्रष्टाचाराच्या एकाहून एक अफलातून भानगडी वृत्तपत्रानी प्रसिद्ध केल्या . मग त्या भानगडी उपकला संचालक रसाळ आणि त्यांच्या मुलीच्या जातीच्या खोट्या दाखल्याच्या असोत वा परीक्षेला न बसलेला विद्यार्थी विद्यापीठात पहिला येण्याच्या असोत . अनुत्तीर्ण विद्यार्थी निकालानंतर पास केल्याच्या असोत किंवा जेजेतील प्रवेशाच्या भ्रष्टाचाराच्या असोत . तंत्रशिक्षण मंत्र्यांनी त्यावर खुलासा केल्याचं कधी नजरेला आलं नाही . मग कारवाई वगैरे करणं तर दूरच राहिलं . भ्रष्टाचारी उपकला संचालक रसाळ यांच्या जातीच्या खोट्या दाखल्यासंबंधी तर विधानसभेत भाजप आमदार कांता नलावडे आणि शिवसेनेच्या आमदारांनी प्रश्नसुद्धा विचारले , पण त्यावरही खुलासा करणं किंवा कारवाई करण तंत्रशिक्षण मंत्र्यांनी टाळलं .
याच तंत्रशिक्षण मंत्र्यांनी आपल्या अखत्यारीतल्या इतर खात्यांवरच्या टीकेला मात्र प्रत्येक वेळी उत्तर दिलं अगदी अलीकडे लोकसत्तानं पुस्तक खरेदी घोटाळ्याचं प्रकरण उघडकीला आणताच २४ तासांच्या आत कारवाई करून व्यक्तींना निलंबित करून विधान परिषदेत खुलासाही केला पण जेजे आणि कला संचालनालयाच्या प्रत्येक बातम्यांवर मात्र त्यांनी सोयिस्करपणे मौन बाळगलं . याचा अर्थ असा होतो की , या संदर्भात त्यांना काहीच करावयाचं नाही किंवा जे काही चाललं आहे ते त्यांच्या मंजुरीनचं चाललं आहे . तसं जर नसतं तर आधीचे कलासंचालक सेवानिवृत्त होणार हे आधी माहीत असूनसुद्धा नव्या कलासंचालकांची जाहिरात उशिरा का दिली गेली ? चार पैकी तीन अधिष्ठातांची पदं १६ पैकी ११ प्राध्यापकाची पदं वर्षानुवर्षे रिकामी असताना का नाही वेळीच त्याची जाहिरात काढली ?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं हसं झालं !
खुल्या प्रवर्गातील अधिष्ठात्याच्या पदासाठी एक जाहिरात लोकसेवा आयोगाद्वारे मोठ्या मिनतवारीनं , रडतखडत काही दिवसापूर्वी काढली गेली , पण त्या जागेसाठी प्राध्यापकपदाचा तीन वर्षांचा अनुभव पाहिजे अशी अट टाकली गेली . गेली सुमारे १५ ते २० वर्षे कुणाच व्याख्याते किंवा अधिव्याख्यात्यांना पदोन्नती दिली न गेल्यानं आरक्षणाचा फायदा मिळवून प्राध्यापक झालेल्या चौघानाच त्यासाठी अर्ज करता आले बाकीचे मात्र हात चोळत बसले . त्यामुळे झालं असं की अर्ज न करू शकलेले काही शिक्षक थेट नागपूरच्या कोर्टात गेले कोर्टापुढे खुलासा करता करता लोकसेवा आयोगाच्या अधिकाऱ्यांना घाम फुटला . त्यांना ती जाहिरात अक्षरशः मागं घ्यावी लागली . ( वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या या मोठमोठाल्या जाहिरातीच्या बिलाचे पैसे आता खरं तर तंत्रशिक्षण मंत्री , त्यांचे अधिकारी आणि लोकसेवा आयोगाचे अधिकारी यांच्याकडूनच महाराष्ट्र शासनानं वसूल करून घ्यायला हवेत )
जे अधिष्ठाता पदाच्या जाहिरातीचं झालं तेच कला संचालकपदाच्या जाहिरातीचं झाले . तिथंही हाच प्रकार घडला नागपूरच्याच कोर्टात लोकसेवा आयोगाच्याच अधिकाऱ्यांचं थोबाड फुटलं. आता जोपर्यंत वा १५-२० वर्षे नोकरी झालेल्या शिक्षकांच्या पदोन्नतीचं प्रकरण तंत्रशिक्षण खातं सोडवणार नाही , तोपर्यंत त्यांना अधिष्ठाता किंवा कलासंचालकांचं पद भरता येणार नाही. घिसाडघाईनं जर ते भरलं तर तो कोर्टाचा अवमान ठरेल. पुढे काय होईल ते स्वरूपसिंग नाईक प्रकरणानं संबंधितांना आता चांगलंच ठाऊक झालं असावं .
वळसे – पाटील पतीपत्नीची अनोखी गुरुदक्षिणा !
तंत्रशिक्षण मंत्र्यांच्या कर्तृत्वाचा यापुढचा किस्सा तर एकदमच अफलातून आहे . १ कला संचालक , ३ अधिष्ठाता , ११ प्राध्यापक , ३ हिस्ट्रीचे प्राध्यापक, शिक्षक आणि असंख्य अधिव्याख्यात्यांची पद भरली जात नाहीत अशी ओरड सुमारे १०-१२ वर्षे चालू असताना (आता ती संख्या १६९ वॉर पोहोचली आहे.) , तंत्रशिक्षण मंत्री आणि त्यांच्या खात्याला त्याबाबत काहीच करावंसं वाटलं नाही , पण जेजेच्या विभागप्रमुखाची एक जागा भरणं मात्र महत्त्वाचं वाटलं. ही जागा अर्थातच राखीव होती . तिथं जेजेत शिक्षक म्हणून लागून ज्यांची साडेतीन वर्ष देखील पूर्ण झाली नाहीत अशा विश्वनाथ साबळे नावाच्या अति भाग्यवान कलाशिक्षकाची वर्णी लावण्यात आली . जेजेत पदवीचा अभ्यासक्रम सुरू होऊन आता जवळजवळ २५-२६ वर्ष झाली आहेत . पण साबळे यांचं नशीब एवढं ताठ की साडेतीन वर्षापूर्वी असंख्य पदवीधारक उमेदवारांमधून जेजेच्या पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी त्यांच्यासारख्या ‘ पदविकाधारक उमेदवारांची निवड केली आणि नंतरच्या साडेतीन वर्षांत २०-२५ वर्ष नोकरी करणाऱ्या ज्येष्ठ कलाशिक्षकांना बाजूला सारून जेजे स्कूलच्या पेन्टिंग विभागाच्या विभागप्रमुख पदावर त्यांना बसवलं गेलं. या बसवण्याआधीच्या पंधरवड्यातच श्री. साबळे याना शिकवता येत नाही म्हणून जेजेचे विद्यार्थी जवळजवळ महिनाभर संपावर गेले होते. पण त्याकडे दुर्लक्ष करून जेजेच्या १५० वर्षांच्या इतिहासात जे घडलं नाही ते तंत्रशिक्षण मंत्री आणि त्यांच्या खात्यानं घडवून आणलं.
श्री साबळे यांच्या या नियुक्तीमागचं कारण मोठं मजेदार आहे . हे श्री. साबळे म्हणे तंत्रशिक्षण मंत्री श्री. दिलीप वळसे – पाटील यांच्या पत्नीला चित्रकला हा विषय शिकवत होते त्यामुळे वळसे पाटील पतीपत्नीनी म्हणे ही गुरुदक्षिणा त्यांना दिली असं जेजेच्या परिसरात उघडपण बोललं जातं . आरक्षणाचे पाठीराखेसुद्धा या प्रकरणांचं समर्थन करावयास धजू शकणार नाहीत इतंक हे सारं भयंकर प्रकरण आहे .
साबळे आता आणखीन दोन वर्षांत जेजेच्या ( तोपर्यंत जेजे वळसे – पाटलांनी ठेवलं तर अधिष्ठाता पदावर अधिकार सांगतील आणखीन दोन वर्षांनं ते कला संचालक पदावरही ( तोपर्यंत ते राहिलं तरच अर्थात ) अधिकार सांगू शकतील आणि त्यांच्या वडिलांच्या वयाचे जेजेतले ज्येष्ठ शिक्षक साहेब साहेब म्हणून त्यांच्या आज्ञा पाळत असतील . केवढं हे भयानक क्रौर्य ? हे सारं घडवताना वळसे पाटील आणि तंत्रशिक्षण विभाग व लोकसेवा आयोगाच्या अधिकाऱ्यांना मनाची नाही पण जनाची तरी वाटायला हवी होती असं कुणी म्हटलं तर त्यात त्यांचे काय चुकलं ?
धोबीपछाड खास राष्ट्रवादी काँग्रेस स्टाईल !
आता तंत्रशिक्षण मंत्री याच्याशी माझा काय संबंध ? नेमणूक लोकसेवा आयोगानं केली असं म्हणून हात झटकून मोकळे होतील पण २० ते २५ पेक्षा जास्त महत्त्वाची पद १०-१५ वर्षे रिक्त असतानाही नेमकं हेच पद निवडून त्याची शिफारस कोणाच्या आदेशावरून लोकसेवा आयोगाकडे केली गेली आणि का केली गेली या प्रश्नाचं योग्य आणि समर्पक उत्तर ते देऊ शकणार आहेत काय? तंत्रशिक्षण खात्याला श्री साबळे यांना पदोन्नती द्यायचीच होती तर विभागवार पदोन्नती देता आली असती . पण तसं हेतूपुरस्सर केलं गेलं नाही . कारण साबळे यांना पुढं अधिष्ठाता पद आणि नंतर लगेच कलासंचालक पद मिळावं यासाठी हा खास राष्ट्रवादी काँग्रेस स्टाईलचा धोबीपछाड टाकला गेला. (ताजा कंस: नंतरच्या काळात हे सगळं अगदी असंच घडलं हे आपण पाहतचं आहोत.)
आता लोकसेवा आयोगानंच नेमणूक केली असल्यानं साबळे यांच्यासारखा मराठीही धड बोलता येत नाही असा माणूस सर्व ज्येष्ठ कलाशिक्षकांच्या डोक्यावर येऊन बसला आहे . आणि भविष्यात तो इंगळे , आयवले यांच्यासारखा आचरट पद्धतीनं जेजेचा कारभार चालवणार आहे . आणि मग वळसे – पाटलांसारखे मंत्री ‘आरक्षणासमोर आम्हाला काहीच करता येत नाही’ म्हणून खोटे नक्राश्रू ढळणार.
(२००६ साली जे लिहिलं होतं अगदी तसंच्या तसं नंतर घडलं हे आपण पाहतच आहोत.)
अपूर्ण
****
‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD
‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag
Related
Please login to join discussion