Features

‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’चे कलेवर-४

जेजे स्कूल ऑफ आर्टचे कलेवर या लेखाच्या शेवटच्या भागात वाचा, आर्किटेक्चर कॉलेजचे तत्कालीन प्रमुख कुणीतरी लाकुळे यांनी जेजे स्कूल ऑफ आर्टचा परिसर देवनारच्या खाटीकखान्याजवळ हलवून जेजे कॅम्पसमध्ये टॉवर बांधण्यासाठी कसं प्लानिंग केलं होतं. या प्लॅनिंगमध्ये त्यांना कोणी कशी साथ दिली हे नावानिशी या लेखात वाचता येईल. २००६ साली लिहिलेला हा लेख. सोळा वर्षांनंतरही परिस्थितीत काही सुधारणा नाही झाली.

लाकुळेचे इमले कोसळले 

जेजेच्या परिसरात ज्या ज्या इमारती आहेत त्या त्या इमारतीमधील अधिकाऱ्यांच्या नेमणुका कशा वादग्रस्त ठरल्या आहेत . त्याचाच हा एक नमुना पासलकर ज्या दिवशी कलासंचालनालयात प्रवेशले त्याच दिवशी झालेल्या एका विशेष बैठकीत आर्किटेक्चरच्या राजन लाकुळे नावाच्या प्राचार्यानं जेजेच्या परिसरात टॉवर्स कसे बांधता  येतील याचा प्लॅन सादर केला होता. तो सादर करण्यासाठी त्यांना कोणी परवानगी दिली? कुणाच्या सूचनेवरून त्यानी तो बनवला ? कशासाठी बनवला याची सगळी कारणं गुलदस्त्यात आहेत . त्यांना अधिकार कोणी दिला ? जेजेची इमारत पाडून टाका हे सांगणारे हे कोण ? जेजे स्कूल ऑफ आर्टला दिलेल्या रुपये भाड्यावर ज्या संस्थेच तिथं अस्तित्व आहे , त्या संस्थेच्या प्राचार्याला जेजे स्कूल ऑफ आर्ट पाडण्याचा अधिकार दिला कोणी ? ज्या दिवशी पासलकर तिथ प्रभारी कलासंचालक म्हणून प्रवेश करतात त्या दिवशी हा इसम जेजे पाडण्याचा प्लॅन कोणाच्या आज्ञेवरून सादर करतो? यावर प्रचंड टीका करूनही कुठलाही खुलासा तंत्रशिक्षण खात्याकडून झाला नाही. मात्र लोकसत्तेतल्या या लेखाची दखल घेऊन पासलकरांना तो प्लॅन बासनात बांधून ठेवावा लागला . ज्या व्यक्तीविषयी पासलकर साहेब अगदी कौतुकान सांगत होते त्या राजन लाकुळे यांच्या नियुक्तीचे भांडेसुद्धा या लेखमालेनंतर लगेचच फुटले . 

मुंबई विद्यापीठाच्या चौकशी समितीनं  त्यांची  प्राचार्यपदावरील नेमणूक पूर्णतः नियमबाह्य असून त्यांची ऑनलाईन अभ्यासक्रमाद्वारा घेतलेली पीएचडी मान्यताप्राप्त नाही , त्यामुळे त्यांची नियुक्ती रद्द करावी असा अहवाल दिला. या अहवालाला जेजेच्या आवारातल्या प्रघाताप्रमाणे राजन लाकुळे यांच्याकडून न्यायालयात आव्हान दिलं गेलं. हा अंक छपाईला जात असताना १८ ऑक्टोबर रोजी त्याचा निकालही जाहीर झालाय. त्या निकालानुसार उच्च न्यायालयानं विद्यापीठाचा निर्णय वैध ठरवला आहे . आणि त्यामुळे तंत्रशिक्षण खात्याला लाकुळे यांची त्या पदावरून उचलबांगडी करण्याशिवाय पर्याय राहिला नाही.  या राजन लाकुळे यांनी एवढा खोटारडेपणा केला होता की उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी आदेशाला स्थगिती देण्याची त्याची विनंतीही उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

जेजे स्कूल ऑफ आर्टमधल्या कारभाराच्या चौकशीबरोबरच आर्किटेक्चर कॉलेजच्या कारभाराचीही चौकशी कारणंही आता आवश्यक बनलंय, कारण आर्किटेक्चरमध्ये चालणाऱ्या गैरकारभाराचे पडसाद जेजेमध्येही उमटतातच . याच गृहस्थानी जेजेतल्या परिसराचा पुनर्विकास करून टॉवर बांधण्याचा प्लान केला होता . याच गृहस्थाच्या कारकीर्दीत आर्किटेक्चरच्या इमारतीतील पाच हजार चौरसफुटाची जागा एका कंम्प्युटर कंपनीस देऊन टाकली गेली . याच गृहस्थानी जेजे स्कूल ऑफ आर्टला त्याच्या मूळ जागा ( ज्या सध्या आर्किटेक्चरच्या अखत्यारित आहेत पण त्या वापराअभावी रिकाम्या पडून असतानाही जेजेस परत देण्यास विरोध केला, त्यासाठी त्यानी गनिमी कावा लढवला , स्कूल ऑफ आर्टने त्या जागाची मागणी केल्यावर रातोरात तिथे बोर्ड लावण्यात आले. तसंच वर्गांना टाळी ठोकण्यात आली आणि वर मंत्रालयात जाऊन तिथल्या आपल्या गॉडफादर्सना ‘ आम्हालाच जागा कमी पडतेय , तर जेजेची जागाच आम्हाला द्या ‘ म्हणून मखलाशी केली.) तीन एप्रिलच्या बैठकीत तंत्रशिक्षण मंत्री वळसे पाटील यांच्या कानावर हा प्रकार घातला असता कम्प्युटर कंपनीस जागा देण्याविषयी आपण अनभिज्ञ असल्याचं त्यांनी सांगितलं ( हे शक्य आहे ? ) त्या खात्याच्या मंत्र्याला जर जेजेतली जागा खाजगी कंम्प्युटर कंपनीला देण्यात आल्याच माहीत नसेल , मग हे कोणाला माहीत असायला पाहिजे ? सदर कम्प्युटर संस्थेच्या कम्प्युटर हस्तांतरण कार्यक्रमास दस्तुरखुद वळसे – पाटील उपस्थित होते अशी आमची माहिती आहे . मग यातलं खरं काय ? आर्किटेक्चर कॉलेजचा प्राचार्य किंवा कलासंचालक किंवा तंत्रशिक्षण खात्याचा संचालक किंवा तंत्रशिक्षण खात्याचा सचिव यापैकी एक जण त्या कंपनीला पाच हजार स्क्वेअर फुटाची जागा देऊन टाकण्याचा असा निर्णय स्वतःच्या हिमतीवर घेऊ शकतो काय ? वर उल्लेखलेल्या सर्वांनी मिळून एकत्र येऊन ही जागा देऊन टाकण्याचा निर्णय घेतला असं  वळसे – पाटलांना म्हणायचंय का ? यातलं नेमक सत्य काय आहे ? वळसे पाटील वेळात वेळ काढून याचा खुलासा करू शकतील काय ? 

तीन एप्रिलच्या मंत्रालयातल्या बैठकीत तंत्रशिक्षण मंत्र्यांनी आर्किटेक्चर कॉलेजची जागा जेजे स्कूल ऑफ आर्टच्या प्रस्तावित म्युझियमला देऊन टाकण्याविषयी सूचना दिल्या . पण त्याविषयी कोणतीच कार्यवाही झाली नाही . त्यामुळे २२ जुलैच्या विधानसभेमधल्या बैठकीत वळसे पाटलांना त्यांचे स्मरण करून दिलं असता , वळसे पाटलांनी तत्काळ आर्किटेक्चर कॉलेजची जागा जेव्हा तंत्रशिक्षण खात्याकडे येईल तेव्हा ती जेजेच्या प्रस्तावित म्युझियमला देऊन टाकावी अशा सूचना सचिवांना दिल्या . त्यावर उपसचिव कांतिलाल उमाप यांनी आर्किटेक्चर कॉलेजलाच त्यांची जागा कमी पडतेय , तर जेजे स्कूल ऑफ आर्टने त्यांची जागा आर्किटेक्चरला द्यावी असं त्या आर्किटेक्चरच्या लोकांचं म्हणणं असल्याचं सांगितलं. उमापसाहेब हे सारे कथन करत असताना हे सांगावयास विसरले की याच आर्किटेक्चर कॉलेजमधली पाच हजार स्क्वेअर फुटाची जवळ जवळ दोन मजले इतकी जागा याच कॉलेजनं एका कम्प्युटर कंपनीच्या खाजगी कोर्सेससाठी देऊन टाकली आहे . इतकंच नव्हे तर तेथील अनेक रिकाम्या जागा जेजे स्कूलवाले परत मागतील या भीतीनं कुलूप लावून बंद करून टाकली आहेत. आता उमापसाहेबांचा वरदहस्त लाभलेले लाकुळेसाहेब तेथून गमनकर्ते झाले आहेत . आतातरी वळसे – पाटीलसाहेबानी दिलेल्या आदेशाचं उमापसाहेब पालन करतील का? का तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो हेच नाटक भविष्यात चालू ठेवणार आहेत . याच लाकुळे यांनी २००८ साल आणखी एका बातमीनं गाजवलं होत . २००६ साली आर्किटेक्चरच्या परीक्षेत सुवर्णपदक मिळवलेल्या एका विद्यार्थिनीच्या याचिकेवरून त्यांच्याविरुद्ध नोटिसा काढण्यात आल्या होत्या . तिला तोंडी परीक्षेत नापास केलं होतं . तसंच एटीकेटी देण्यात आली होती . याविरुद्ध तिनं माहितीच्या अधिकारात माहिती मागवली असता प्रत्यक्षात तिला २८० मार्क्स मिळाल्याचे दिसले.  तिच्या गुणात खाडाखोड करून ते दोनशे करण्यात आले होते या गैरप्रकारामुळे त्या मुलीला स्कॉलरशिप गमवावी लागली होती . मार्कांच्या या गैरप्रकाराबद्दल लाकुळे अँड कंपनीला हायकोर्टानं चांगलाच हिसका दाखवला होता . 

तंत्रशिक्षण खात्यानं या एवढ्या निसर्गरम्य परिसरात अशीच माणसं पाठवण्याचा विडा उचललाय की काय कळायलाच मार्ग नाही . असा रेकॉर्ड असूनही लाकुळेना दोन्ही प्रकरणात काहीच शिक्षा झाली नाही . इथली लोकं खरंच पुण्यवान म्हणायची की त्यांना काही केलं तरी शिक्षाच होत नाही . हा इथल्या जागेचा महिमा मानायचा की करून सवरून कसं सुटायचे याच तंत्रशिक्षण त्यांनी मुळापासूनच घेतलय असं मानायचं. 

म्हणे पदांचा आढावा … 

२२ ऑगस्ट १९८९ साली लोकसत्तेत प्रसिद्ध झालेली बातमी आहे . यात स्पष्ट उल्लेख केलाय की शासकीय कलामहाविद्यालयात अध्यापकांच्या वीस जागा रिकाम्या आहेत. दुसरी २००३ ची यात लिहिलं आहे. शासकीय कलामहाविद्यालयात ५४ जागा रिक्त आहेत. १९८९ च्या या बातमीनंतर एक नाही , दोन नाही तब्बल १९ वर्ष झाली रिक्त जागांची संख्या वाढतच गेली . प्रत्येकवेळी पदांच्या आढाव्याचं कारण सांगितलं गेलं. ज्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये तब्बल १९ पिढ्यांना कला विद्यालयात शिक्षकांशिवाय शिकावं लागतं याची तंत्रशिक्षण मंत्र्यांना आणि त्याच्या अधिकाऱ्यांना जरासुद्धा लाज अथवा शरम वाटत नाही याचं आश्चर्य वाटतं . 

२३ एप्रिल २००८ च्या मंत्रालयातील बैठकीत तंत्रशिक्षण मंत्री वळसे यांनी रिक्त असलेल्या एकूण पदांची संख्या एकशे चार इतकी असून प्रशासकीय कार्यपद्धतीनुसार तातडीनं भरण्यासाठी झालेला विलंब लक्षात घेऊन पुढे विलंब होणार नाही याची काळजी घेतली जाईल . येत्या दोन ते तीन महिन्यात रिक्त पदे भरली जातील, असं निःसंदिग्ध आश्वासन दिलं. त्याला आज सात महिने झाले पण कुठलीही कारवाई त्यांच्याकडून अथवा लोकसेवा आयोगाकडून झालेली नाहीये. हा लोकसेवा आयोगान मात्र राखीव जागाच प्रथम भरण्याच्या आजवरच्या धोरणाला जागून सर्व कायदे – कानू धाब्यावर बसवून सीमा गोंडाणे यांची नियुक्ती केली आहे . त्याची संपूर्ण माहिती अंकात आम्ही पुराव्यानिशी प्रसिद्ध केली आहे त्यावरून तंत्रशिक्षण खाते आणि लोकसेवा आयोग यांच्यात जे साटलोट चालतं त्यावर झगझगीत प्रकाश पडतो . सेवेत असलेल्या शिक्षकांना पंधरा पंधरा वर्ष पदोन्नती न देणे , त्यांच्या भवितव्याशी खेळणं , त्याचवेळी भ्रष्टाचाराचे सर्व मार्ग वापरून संपूर्णतः ना लायक व्यक्तींच्या नेमणुका करून त्यांना आपल्या हातातली प्यादी ( एजंट दलाल ) बनवण्याचा खेळ गेली पंधरा वीस वर्षे जेजे आणि कलासंचालनालयात अव्याहतपणे चालला आहे. परिणामी शिपाई किंवा प्युन होण्याचीसुद्धा ज्यांची लायकी नाही अशी लोक भ्रष्ट मार्गाने अधिकार पदांवर येऊन बसली आहेत . याला आता लगेचच आळा घातला गेला नाही जेजेचा सर्वनाश आता अटळ आहे . म्हणूनच जेजेमधल्या आणि कलासंचालनालयातल्या गेल्या पंचवीस वर्षातल्या नेमणुकांची चौकशी करावी अशी जाहीर सूचना ३ एप्रिलच्या बैठकीत केली गेली . ती तंत्रशिक्षण मंत्र्यांनी मान्यही केली . पण आजवरचा त्यांचा कारभार पाहता त्यानुसार कारवाई होईल याबद्दल शंकाच वाटते .

*****

– समाप्त 

https://chinha.in/features/jj-school-of-art-in-bad-condition/

‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD

‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.