No products in the cart.
जेजेच्या बातम्या कशा फुटतात?
जेजे, कला संचालनालय आणि मुंबई विद्यापीठ यांची अक्षरशः अब्रू घालवणारी बातमी आपल्याकडे कशी आली त्या संबंधीच्या गंमतीदार आठवणी सांगतायत ‘चिन्ह‘चे संपादक सतीश नाईक. उद्याच्या शेवटच्या लेखात ते सांगणार आहेत जेजे आणि कला संचालनालयाची वाताहत ज्यांनी केली तेच आता महाराष्ट्राचं कला शिक्षण वाचवण्यासाठी कशा बातम्या देण्याचा प्रयत्न करतात याचे चक्रावून टाकणारे किस्से.
———-
एका वाचकाचा फोन आला. ‘आम्हाला खरोखरच वाटत होतं की यावेळी तुम्ही तुम्हाला बातम्या देणाऱ्यांची नावं जाहीर करणार म्हणून, पण शेवटी तुम्ही आम्हाला चकवलंतच. सगळं काही लिहिलंत, पण शेवटपर्यंत नावं काही सांगितलीत नाहीतच. हसत हसत तो वाचक सांगत होता. त्यावर मी त्याला म्हटलं. “अहो नावं सांगून टाकायला मला तरी ती ठाऊक असायला हवीत ना? नावं सांगून किंवा ओळख दाखवून कोण कशाला आपला जीव धोक्यात घालील? तुम्हाला ठाऊक आहे ना! पोलिसांना असेच विविध क्षेत्रातले लोक बातम्या पुरवीत असतात, त्यांना पोलिसांचे खबरे असं म्हटलं जातं. त्यांच्या खबरांनंतरच पोलीस छापे टाकतात, धाडी टाकतात, अटका करतात! तसंच काहीसं हे आहे. मलादेखील हस्ते परहस्ते अशाच खबरा मिळतात. सांगणारे या क्षेत्रातले असतात आणि परिचित असतात त्यामुळे त्यांच्यावर विश्वास न ठेवण्याचा प्रश्नच नसतो. पण ती खबर मिळाल्यानंतरच माझं खरं काम सुरु होतं. कारण विविध व्यक्तींकडून त्या खबरीची सत्यता पडताळून घ्यायची असते. हे काम मात्र मोठं जिकिरीचं असतं.
दोनच उदाहरणं सांगतो. त्या माझ्या बातम्या विलक्षण गाजल्या. त्यातली पहिली म्हणजे जेजेच्या एमएफएच्या परीक्षांची. एके दिवशी सकाळीच एक फोन आला. बहुदा एखादा विद्यार्थी असणार. म्हणाला, सर मी जेजेचा आजी म्हणा किंवा माजी म्हणा विद्यार्थी आहे. मी मुंबई विद्यापीठातर्फे एमएफएच्या ज्या परीक्षा घेतल्या जातात त्या परीक्षेला बसलो होतो. त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. आणि गंमत म्हणजे त्या परीक्षेला जो विद्यार्थीं बसलाच नव्हता तो विद्यार्थीच चक्क परीक्षेत पहिला आला आहे. त्याचं ते बोलणं ऐकूनच मी अक्षरशः चक्रावलो. म्हटलं, काहीतरी काय सांगतोस? असं कसं होईल? वेडा आहेस का? ते मुंबई विद्यापीठ आहे. कला संचालनालय नव्हे. तिथं हे घडू शकतं. पण विद्यापीठात नाही. माझा विश्वास बसत नाही या गोष्टीवर. त्यावर तो विद्यार्थीं म्हणाला, सर, तुमचा ईमेल आयडी द्या. मी तुम्हाला पुरावेच पाठवतो. त्यावेळी बहुदा व्हाट्सअप अस्तित्वात नव्हतं.
मेल पाहिला आणि मी अक्षरश: चक्रावून गेलो. त्या विद्यार्थ्यानं नोटीस बोर्डावर लावलेल्या निकालाच्या प्रतीचा फोटोच पाठवला होता. मी त्याला म्हटलं की अरे यावरून कसं सिद्ध होणार की तो परीक्षेला बसला नव्हता? तर तो विद्यार्थी म्हणाला. ‘आणखी एक मेल पाठवला आहे त्यात मस्टरचा फोटो आहे त्या विद्यार्थ्यांची अनुपस्थिती दर्शवणारा.’ तो फोटो मी पाहिला खरा, पण तरीदेखील माझा विश्वास बसत नव्हता. इतकं मोठं कॉलेज, इतकी मोठी युनीव्हर्सीटी. अशी चूक कशी होईल? माझा तर विश्वासच बसत नव्हता. मी फोनाफोनी सुरु केली. काही वेळानं त्या मुलाचा पुन्हा फोन आला की ‘तुम्ही काही चौकशी सुरु केली का? याची विचारणा करणारा! तर मी म्हटलं हो, का रे? तर तो मुलगा म्हणाला. बहुदा तुमच्या फोनची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली असावी, आता निकालाचं परिपत्रक नोटीस बोर्डावरुन काढलं गेलं आहे. तोपर्यंत ‘बातमी कन्फर्म’ करणारे माझ्या ‘तथाकथित खबऱ्यांचे’ फोन मला आले होते. मी म्हटलं, काळजी करू नकोस. आता फोटोंचा पुरावा आपल्यापाशी आहे की.
मग मी थेट ‘लोकसत्ता’चे संपादक कुमार केतकर याना फोन लावला. बातमी ऐकून तेही थक्क झाले. त्यांचा विश्वासच बसेना. पण कसा कुणास ठाऊक त्यांचा माझ्यावर मात्र विश्वास होता. त्यांनी बातमी दिली. आणि नंतर मात्र भयंकर गदारोळ झाला. जेजे स्कूल, कला संचालनालय आणि त्यांच्याबरोबर मुंबई विद्यापीठाची अक्षरशः अब्रू गेली. एखादी बातमी प्रसिद्ध झाल्यावर आयुष्यात आले नाहीत इतके फोन मला आणि लोकसत्तेच्या कार्यालयाला त्यादिवशी आले असं केतकर यांनी मला नंतर सांगितलं. त्या बातमीला कारणीभूत ठरलेला जेजेचा प्रभारी अधिष्ठाता नंतर निलंबित झाला. (पण आता छानपैकी भरपूर निवृत्तीवेतन घेत मजेत जगतोय.) ज्या मुलानं ती बातमी दिली होती त्या मुलाचं नावदेखील मी आता विसरलो आहे. पण ती बातमी मात्र अगदी आजतागायत स्मरणात राहिली आहे.
दुसरी बातमी आहे रहेजा स्कूल ऑफ आर्टची. ते बंद करण्याचा निर्णय झाल्याझाल्या मला एक फोन आला की आताच काही वेळापूर्वी एक मिटींग झाली आणि त्यात निर्णय झालाय की लवकरच रहेजा स्कूल बंद करायचं वगैरे. दोनचार ठिकाणी फोन केले पण बातमी कन्फर्म होईना. ज्यानं फोन केला होता तो अत्यंत विश्वासातील होता. त्यामुळे बातमी द्यायचा निर्णय घेतला आणि फेसबुकवर बातमी दिलीदेखील. आणि अक्षरशः क्षणार्धात तिला प्रतिसाद मिळावयास सुरुवात झाली. लाईक्स आणि कमेंट्सचा नुसता पाऊस पडू लागला . तीन किंवा चार वाजता बातमी दिली होती. पण सायंकाळी सात वाजेपर्यंत जवळजवळ पंचावन्न हजार लोकांनी ती पाहिल्याची नोंद झाली होती. नंतर ती बातमी अक्षरशः व्हायरल झाली पण रहेजाच्या दोन विद्यार्थ्यांनी मात्र मला अतिशय वाईट पद्धतीनं ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.
तो प्रकार इतका हिडीस होता की त्यांना मला अखेरीस ब्लॉक करावं लागलं. पण त्यानंतर चार सहा महिन्यातच रहेजा स्कूल बंद झालंच. बातमी प्रसिद्ध झाल्यावर संबंधितांनी काहीतरी हालचाल केली असती तर रहेजा कदाचित वाचलं असतं. ती देण्यामागचा माझा उद्देश सफल झाला असता. पण तेव्हडी पोचच संबंधितांकडे नसल्यानं ते काही झालं नाही. पण नंतर ते कॉलेज दुसऱ्या एका संस्थेनं चालवायला घेतलं. ती सारीच प्रक्रिया संशयास्पद होती पण मी अखेरीस त्या बातम्यांकडे दुर्लक्ष करणं पसंत केलं कारण अनेक विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आणि अनेक शिक्षकांच्या पोटापाण्याचा प्रश्न त्याच्याशी निगडित होता. पण त्याही संस्थेत आता खूप मोठे वाद सुरु झाले आहेत अशा बातम्या आहेत. (हीदेखील अगदी पक्की खबर आहे)
लिहितालिहिता शब्दमर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे आज इथंच थांबतो. उद्याच्या शेवटच्या लेखात कोण मला या बातम्या देतो या संदर्भात आणखी थोड्या गमती सांगतो आणि हा विषय थांबवीन म्हणतो.
सतीश नाईक
संपादक, चिन्ह आर्ट न्यूज
———-
सध्या गाजत असलेला चिन्हतर्फे आयोजित ‘जे जे डिनोव्हो: एक स्फोटक चर्चा!’ विडियो पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
जे जे डिनोव्हो: एक स्फोटक चर्चा!
https://www.youtube.com/watch?v=dB2anH4kIcE
———-
———-
चिन्ह तर्फे आयोजित कलाशिक्षण महाचर्चा पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
कलाशिक्षण महाचर्चा | Panel Discussion About Art Education
https://www.youtube.com/watch?v=wn16ME4hHtc
———-