No products in the cart.
जेजेच्या बातम्या कोण देतो?
जेजेला डिनोव्हो दर्जा प्रदान करण्याचा समारंभ झाल्यानंतर वाटलं होतं की आता जेजेचे प्रश्न मार्गी लागले. पण तो आमचा गैरसमज होता कारण त्या कार्यक्रमाच्या कालावधीतच ‘ डिनोव्हो‘ ज्यांच्या अभ्यासामुळे किंवा कर्तृत्वामुळे साकार होऊ शकलं त्या डॉ संतोष क्षीरसागर यांचीच प्रभारी अधिष्ठाता पदावरून उचलबांगडी करण्याचा कट कला संचालनालय आणि उच्च व तंत्रशिक्षण खात्यात शिजत होता. त्या कटकारस्थानाचा उलगडा करुन दाखवणारी विशेष लेखमाला.
———-
या प्रश्नाचं उत्तर आहे – मी सतीश काशिनाथ नाईक, मीच त्या देतो. अगदी ऐंशीच्या दशकापासून मीच त्या देत आलो आहे. झाली त्याला आता तब्बल चाळीस वर्षं, म्हणजे थोडीथोडकी नाही तर उणीपुरी चार दशकं मी हा उद्योग करतो आहे. ऐशी नव्वदच्या दशकात मी मेनस्ट्रीम पत्रकारितेत कार्यरत होतो. साहजिकच मला ते बातम्या वगैरे देणं सोप्पं गेलं. अर्थातच सुरुवातीच्या बातम्या माझ्या लोकसत्तेतील पत्रकार मित्र, स्नेही किंवा सहकाऱ्यांनी दिल्या. अजित गोगटे (ज्यानं लिहिलेलं कोर्टातल्या अनुभवावरचं पुस्तक अलीकडेच खूप चर्चेत आलं होतं) धनंजय कर्णिक, विनायक परब, दत्ता पंचवाघ, विजयकुमार काळे, दिवंगत पत्रकार मित्र हेमंत कुळकर्णी आणि मुख्य म्हणजे आमचे संपादक माधव गडकरी यांच्यासारख्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे मी जेजे आणि कला संचालनालयासंदर्भातल्या बातम्या देऊ लागलो. ज्या बातम्या त्या काळात कला क्षेत्रात अतिशय गाजल्या. खरं तर मी साप्ताहिकात कार्यरत होतो, पण आमच्या कार्यालयाशेजारीच लोकसत्तेचं कार्यालय असल्यामुळे (खरं तर लोकसत्तेच्या भल्याथोरल्या कार्यालयात आमचं चारपाच टेबल खुर्च्याचं छोटं कार्यालय होतं.) हळूहळू बातम्या देण्याच्या प्रांतात देखील मी हातपाय मारू लागलो.
त्या बातम्यांनी कलाक्षेत्रात किंवा शासकीय स्तरावर जे पडसाद उमटत होते, जे बदल होत होते, ते अतिशय लक्षणीय होते आणि म्हणूनच सुखावणारे देखील होते. त्यामुळे एखादं ‘बिट’ असल्यासारखा मी सातत्यानं बातम्या देऊ लागलो. खरं तर त्यामधून मला कुठलीही अर्थप्राप्ती वगैरे होत नव्हती. केवळ आणि केवळ जेजे आणि त्या परिसराविषयी असलेलं प्रेम यामुळेच मी त्या बातम्या देत होतो. नव्वदच्याच दशकात एका आचरट संपादकाने जेजे आणि कला संचालनालयासंदर्भात एक सरळसरळ खोटी बातमी प्रसिद्ध केल्यानं निषेध म्हणून त्या बातम्या देणं बंद केलं आणि तिथूनच जेजेच्या विनाशाला सुरुवात झाली. सरळसरळ भ्रष्ट अधिकाऱ्याची बाजू घेऊन ती खोटी बातमी देण्यात आली होती आणि त्या एकाच बातमीमुळे कला संचालनालयातला तो अधिकारी अटक होताहोता वाचला होता आणि नंतर त्याच्या राहिलेल्या सेवाकाळात त्यानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तब्बल दोनशे विनाअनुदानित कलामहाविद्यालयांची पैदास केली आणि कला संचालनालयाची संपूर्ण वाताहत करुनच तो अधिकारी आपल्या मूळगावी म्हणजे पुण्यात निघून गेला. तिथूनच महाराष्ट्राच्या गौरवशाली कलाशिक्षण परंपरेची पुरती दुर्दशा होण्यास सुरुवात झाली. या क्षेत्राला आज जी संपूर्ण मृतावस्था प्राप्त झाली आहे तिचा हा असा इतिहास आहे.
२००० सालानंतर पूर्णवेळ पत्रकारिता सोडल्यावरदेखील माझ्याकडे बातम्या येऊ लागल्या पण त्या वृत्तपत्रातील मित्रांकडे किंवा परिचित पत्रकारांकडे पोहोचवण्यापलिकड़े मी काहीएक करू शकत नव्हतो. कारण आता माझ्या हातात माध्यम नव्हतं. मी पाठवलेल्या त्या बातम्या द्यायच्या किंवा नाही हा निर्णय सर्वस्वी त्यांचा किंवा ते ज्या वृत्तपत्रात काम करीत होते त्या वृत्तपत्राचा होता. त्याचा परिणाम असा झाला की जेजेत अराजक माजलं. एकेक भयानक गोष्टी घडू लागल्या. कधी नव्हे ती प्रवेश घेताना विद्यार्थ्यांकडून एक एक लाखाची मागणी केली गेली. भ्रष्टाचार हाच जेजेचा स्थायीभाव बनून गेला. त्याचा समाजात मोठ्या प्रमाणावर गवगवादेखील झाला. आणि त्याच वेळी एक अत्यंत अनपेक्षित घटना घडली. एके दिवशी अचानक ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचा मला फोन आला. ते तेव्हा दै लोकसत्ताचं संपादकपद भूषवत होते. त्यांनी मला जेजेच्या आजच्या अवस्थेबद्दल लेख लिहिण्याची विनंती केली. जी मी सरळसरळ धुडकावून लावली. ज्या वृत्तपत्राचं तुम्ही संपादकपद भूषवता आहात त्या वृत्तपत्रातील एका खोट्या बातमीमुळे हे सारं घडलं आहे हेदेखील मी त्यांना सांगून टाकलं. पण त्यांनी माझी समजूत काढणं काही थांबवलं नाही. अखेरीस तेच जिंकले.
‘मुंबई विद्यापीठात परीक्षेला न बसलेला विद्यार्थीच एमएफएला पाहिला आला’ ही माझी पहिलीच बातमी अतिशय गाजली. जेजे, कला संचालनालय आणि मुंबई विद्यापीठाची अक्षरशः नाचक्कीच झाली. केतकर नंतर सांगत होते ‘माझ्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत एवढे फोन कधी कुठल्याच बातमीला आले नाहीत’. इतकी ती बातमी गाजली. आणि त्यानंतर रविवार लोकसत्तेत माझे लेख प्रसिद्ध होऊ लागले. आणि त्यानंतर जेजेला दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं संपूर्ण आठवडाभर माझी जी लेखमाला प्रसिद्ध झाली ती इतकी स्फोटक ठरली की लोकसत्तेच्या जवळजवळ प्रत्येक वाचकांपर्यंत ती पोहोचली. ती वाचलेला कुणीना कुणी वाचक आजही मला भेटत असतोच. आत्मप्रौढी म्हणून मी सांगत नाही या साऱ्याच लेखांचा किंवा नंतरही अनेक वृत्तपत्रांसाठी केलेल्या जेजेविषयक लेखनाचं मी कधीही मानधन घेतलं घेतलं नाही. मला ते घेणं योग्य वाटलं नाही. अनेक वेळा आलेले चेकदेखील मी परत पाठवले. जेजेविषयी त्या परिसराविषयी माझ्या भावना किंवा माझ्या निष्ठा किती घट्ट प्रामाणिक होत्या हे दर्शवण्यासाठीच केवळ मी याचा उल्लेख करतो आहे.
‘डॉ संतोष क्षीरसागर हे जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टचे प्रभारी अधिष्ठाता सतीश नाईक याना बातम्या पुरवतात आणि त्यामुळे शासनाची बदनामी होते’. म्हणून म्हणे डॉ क्षीरसागर यांच्यावर कारवाई केली गेली असे एक कारण कलाशिक्षण क्षेत्रात अफवेच्या स्वरूपात फिरते आहे ते किती पोकळ आणि बिनबुडाचं आहे याचा समाचार घेणं मला भाग होतं. गेली पंचवीस तीस वर्षं माझ्या या परखड लेखनामुळे ज्यांची ज्यांची ‘दुकानं’ बंद झाली किंवा बंद होण्याच्या मार्गावर आहेत अशांच्या टीकेलादेखील मला एकदाच सणसणीत उत्तर द्यायचं होतं, ती संधी मी या निमित्तानं साधली आहे. मी का लिहितो हे या लेखात सांगितलं आता पुढील लेखात वाचा मला या बातम्या कशा मिळतात? कोण कोण मला त्या पुरवतं? वगैरे वगैरे
सतीश नाईक
संपादक, ‘चिन्ह आर्ट न्यूज’