No products in the cart.
सीईटी सेल ने तोंडाला पाने पुसली?
ह्या सीईटी प्रकरणात एवढ्या सुरस आणि गूढकथा ऐकावयास मिळत आहेत की लवकरच आम्ही शेरलॉक होम्सची जागा घेऊ की काय असे वाटू लागले आहे. यातला विनोदाचा भाग सोडा, पण हे सीईटी प्रकरण गूढ झाले आहे हे मात्र निश्चित. सात सप्टेंबरला दिवसभरात खूप घडामोडी घडल्या. आमच्या अथक प्रयत्नाने विद्यार्थ्यांचे म्हणणे किमान सीईटी सेल पर्यंत पोहोचले. महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राने देखील आज ही बातमी दिली आहे. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. असंख्य पालकांचे फोनही सीईटी सेलला गेले. एवढं सगळं झाल्यानंतर सीईटी सेलच एवढंच म्हणणं होत की ही डेटा एन्ट्रीची चूक आहे आणि आम्ही लवकरच नवी लिस्ट लावू. यानंतर ही लिस्ट काल ७ तारखेला उशिरा सुधारित स्वरूपात मिळाली. ही लिस्ट बघून हसावे का रडावे हेच आम्हाला कळेनासे झाले.
गेले दोन दिवस आम्ही तळमळीने पुरावे सादर करून संबंधित यंत्रणेला जाब विचारत आहोत, पण कला संचालनालय आणि सीईटी सेल यांनी मात्र होतकरू विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. मूळ लिस्टमध्ये थोडे फार फेरबदल करून आणि एक नंबरच्या मुलीचे नाव हटवून लिस्ट बऱ्याच प्रमाणात तशीच लावली गेली आहे. यादीतील पहिल्या २५ नावांचा अभ्यास केला तर हटवलेली नावे फक्त तीन होती. ते तीन विद्यार्थी म्हणजे सुपरिचित अशी ख़ुशी जैन, हिनल शाह आणि कबीर हिरानी. बाकी नावे तशीच होती. नंबर्स फक्त पुढे मागे झाले. आधीच्या यादीमध्ये पहिली आलेली ख़ुशी जैन आता २३७ व्या रँकवर आहे. आहे की नाही गम्मत?
हा सगळा जो अन्याय झाला आहे त्यावर आम्ही जाणकार लोकांशी चर्चा केली. पण नाव न सांगण्याच्या अटीवर त्यांनी जी माहिती दिली ती भयंकर होती. महत्वाची गोष्ट म्हणजे डिझाईन ऑब्जेक्ट हा पेपरच चुकीचा छापला गेला होता. विद्यार्थ्यांना सात बाय सातचा त्रिकोण काढा असा प्रश्न होता. आता त्रिकोण सात बाय सातचा कसा असू शकतो? मग आम्ही एक उत्तरपत्रिका पाहिली त्यात गार्गी पांडे या मुलीने चौकोनात डिझाईन केले आहे. तिची रँक १८३ आहे. गार्गीची उत्तरपत्रिका बरोबर असेल तर मग बाकीचे विद्यार्थी चुकले आहेत का? हा घोळ खूप मोठा आहे. म्हणूनच इथे पूर्ण पेपरच नव्याने सेट करून पुन्हा परीक्षा घेणे महत्वाचे आहे.
रात्री आम्ही २५ विद्यार्थ्यांच्या कामाचा अभ्यास केला आणि पुन्हा या अभ्यासावरून आम्ही हेच म्हणू की चांगली कामे खाली फेकली गेली आहेत. यात विक्रम अय्यंगार, तेजस उजगावकर आणि सुमित परब या विद्यार्थ्यांची कामे उत्तम दिसली.
ही कामे उत्तम होती विशेष म्हणजे सुमित परब याच. काम कितीतरी चांगल्या दर्जाचं असताना हा विद्यार्थी २५ व्या नंबरवर आहे.
आता आम्ही वर जी शेरलॉक होम्स ही पदवी स्वतः ला दिली ते कशासाठी याचा खुलासा इथे होईल. या २५ जणांच्या मेरिट लिस्ट मधील विक्रम अय्यंगार, निधी चिल्का आणि चैतन्य देशमुख यांचा मेमरी ड्रॉईंगचा पेपर पहा. विशेषतः निधी चिल्का आणि विक्रम अय्यंगार यांच्या मेमरी ड्रॉईंगमधील उभ्या शेतकऱ्याची पोझ सेम आहे. हे असं क. होऊ शकत. असा आम्हाला प्रश्न पडतो. शिवाय ऑब्जेक्ट ड्रॉईंगचा पेपर बघा उत्तरपत्रिकेचा पॅटर्न सेम आहे. तेच डिझाईनच्या बाबतीतही आहे. आम्ही इथे उत्तरपत्रिका जोडली आहे. निष्कर्ष वाचकांनीच काढावा.
या दोघांच्या पेपर मधील उभा शेतकरी बघा पोझ सेम, ड्रॉईंग पॅटर्न सेम.
हे तीन पेपर बघून उत्तरपत्रिकेचा पॅटर्न किती सारखा आहे हे दिसून येते. आता निष्कर्ष वाचकांनी काढावा.
दुसरी एक केस अशी की ऑब्जेक्ट ड्रॉईंग पेपरमध्ये जे वांगे काढायचे होते, ते वांगे रोहित जिंजोटे आणि साहिल इंगळे यांच्याउत्तरपत्रिकेत सेम पॅटर्नमध्ये काढले आहे. स्ट्रोक्सची शैली अशी आहे की ती एका माणसाने काढली आहे की काय असे वाटावे.
अर्थात हा योगयोग की आणखी काही हे संबंधित विभागांनी तपासावे. आम्ही फक्त आमच्या शंका मांडत आहोत. आता खाली जोडलेल्या यादीत ३९वा नंबर असलेल्या वेदांत खामकर या मुलाचे काम बघा. आणि त्याची गुणवत्ता तुम्हीच ठरवा.
आम्ही जो उत्तरपत्रिकांचा अभ्यास केला त्यातून असे दिसून आले की बहुतांश मुलांचा कुठला ना कुठला विषय कच्चा आहे..उदाहरणार्थ एखाद्याचं मेमरी ड्रॉईंग चांगलं असेल पण बाकी दोन विषय कमकुवत असतील तर बाकीच्या विषयातही त्याला मार्क्स वाढून दिले आहेत. काही विद्यार्थ्यांनी मेमरी ड्रॉईंग वाईट केलं आहे तर ऑब्जेक्ट ड्रॉईंग हा पेपर मात्र तुलनेने उत्तम सोडवलेला आहे. हे असे कसे होऊ शकते असा प्रश्न आम्हाला पडला आहे. त्यांना कोणी पेपर सोडवायला मदत करत होतं का? ही आमची शंका आहे.
ही मोजकी उदाहरणे आम्ही इथे दिली आहेत. पूर्ण लिस्टचा अभ्यास केला तर अशी बरीच उदाहरणे सापडतील.
सीईटी परीक्षेतील आणखी एक त्रुटी अशी की प्रॅक्टिकलचे जे तीन पेपर आहेत त्यांची प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिकेच्या मागच्या बाजूला छापली जाते. या मागच्या बाजूलाच पेपर चेकिंग करणारे शिक्षक मार्किंग देत असतात. पण मागची बाजू स्कॅन करून वेबसाईटला जोडली जात नाही. असे का? इथे संशयाला जागा निर्माण होते. तेव्हा आमची मागणी अशी आहे की उत्तरपत्रिकेच्या मागची बाजूही वेबसाईटला विद्यार्थ्यांच्या रिझल्टबरोबर जोडली जावी.
जाणकारांना आम्ही माहिती विचारली तेव्हा असे कळले की २०१७-१८ मध्ये अशीच परिस्थिती उद्भवली होती. तेव्हा जागरूक पालकांनी कोर्टातून या प्रवेश प्रक्रियेवर स्थगिती आणली. आणि सीईटी सेलला ही परीक्षा नव्याने घ्यावी लागली. आमचा हा लेख वाचकांपर्यंत पोहोचेपर्यंत प्रवेश प्रक्रिया (कॅप राउंड) सुरु झाले असतील. ज्यांची लॉटरी लागली (गुणवत्तेऐवजी लॉटरी शब्द वापरताना आम्हाला अतीव दुःख होत आहे) ती मुले एव्हाना फॉर्म भरतही असतील. मग हा जो अन्याय गुणवंत विद्यार्थ्यांवर झाला आहे तो दूर कसा होणार? शेवटी एवढी उरस्फोड होऊन झालं काय तर तीन नावे वगळून लिस्ट थोड्या फार फरकाने आहे तशीच लागली. पुरोगामी महाराष्ट्रात न्याय मिळण्याची जी आशा आम्हाला होती ती धुळीस मिळाली. हे लिहिताना आम्हाला अतीव दुःख होत आहे. जर कला संचालनालय, सीईटी सेल आणि उच्च शिक्षण मंत्रालय यांच्यात थोडी जरी माणूसकी शिल्लक असेल तर त्यांनी त्वरित ही प्रवेश प्रक्रिया थांबवावी. सध्याच्या कालबाह्य परीक्षापद्धतीत बदल करून परीक्षाच सुधारित पद्धतीने पुन्हा घ्याव्या, नाहीतर पुरोगामी महाराष्ट्रातील प्रशासन हे ढिम्म आहे हे सिद्ध होईल.
****
या लेखावरील आपल्या प्रतिक्रिया आम्हाला 90040 34903 या व्हाट्सअप नंबरवर जरूर कळवा. त्या आम्ही पुढच्या लेखात जरूर प्रकाशित करू. लक्षात ठेवा आपल्या प्रतिक्रिया येणे महत्वाचे आहे तेव्हाच एक चळवळ उभी राहील आणि भविष्यात होतकरू विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही.
‘चिन्ह’चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा
https://chat.whatsapp.com/J3E5Y5hTzDXEEWD4cQW2rP
‘चिन्ह’चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
(लेखात वापरलेला जेजे इन्स्टिट्यूटचा फोटो इंटरनेटवरून साभार )
Related
Please login to join discussion