No products in the cart.
कला संचालनालयाची भुई कुणी नांगरली?
‘नटसम्राट’ नाटकातलं ते गाजलेलं स्वगत आहेना ‘घर देता कुणी घर…’ त्या चालीवर ‘कला संचालक देता का कुणी कला संचालक’ असं साकडं घालायची पाळी कला संचालनालय आणि उच्च व तंत्रशिक्षण खात्यावर आली आहे. गेल्या तीस पस्तीस वर्षात उच्च व तंत्रशिक्षण खात्यातल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी जे पेरलं ते आता उगवलं आहे. कला संचालनालयातल्या असंख्य भानगडींचा पंचनामा करणारी एक विशेष लेखमाला ‘चिन्ह’चे संपादक सतीश नाईक १ सप्टेंबर पासून महिनाभर सोमवार ते शुक्रवार रोज लिहिणार आहेत. त्यातील हा दुसरा भाग.
प्रा शांतीनाथ आरवाडे १९८९ मध्ये सेवानिवृत्त झाले आणि तिथूनच कला संचालनालय पर्यायानं जे जे स्कूल ऑफ आर्ट आणि अर्थातच महाराष्ट्राच्या कोणे एके काळी सर्वोच्चपदी असलेल्या कला शिक्षणाच्या ऱ्हासाला सुरुवात झाली. शांतीनाथ आरवाडे यांच्यानंतर आले ते भा बा चोपणे नावाचे कला संचालक. त्यांचा आणि चित्रकलेचा काय संबंध होता या विषयी ज्यांनी त्यांची कला संचालक पदावर नेमणूक केली ते उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे अधिकारीच सांगू शकतील.
एखाद्या कारकुनाच्या दर्जाचा किंवा कारकुनापेक्षा मोठा हुद्दा असलेल्या व्यक्तीला महाराष्ट्राच्या कला संचालक पदावर बसवलं तर काय होईल तेच या गृहस्थांच्या कारकिर्दीत कला संचालनालयाचं झालं. तब्बल नऊ वर्ष या माणसानं त्या पदावर काढली. त्या माणसाला कलेचा काही गंध होता त्याविषयी मला कोणतीही माहिती नाही. ज्यांच्याकडे असेल त्यांनी ती मला द्यावी जेणेकरून माझ्या ज्ञानात देखील भर पडू शकेल.
या चोपणे साहेबांनी त्यापूर्वी कला संचालनालयाचा कारभार जसा चालवला जात होता त्याच पद्धतीनं चालवण्याचा प्रयत्न केला. त्यांना कला विषयाचं कुठलंही ज्ञान नसल्यामुळं कला शिक्षणात किंवा कला संचालनालयाच्या एकूण व्यवस्थेत कुठलाही बदल झाला नाही. त्यांनी आधी जे होतं ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला एवढंच त्यांच्या कारकिर्दीविषयी म्हणता येईल.
त्यानंतर नेमणूक झाली ती पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयाचे कलाशिक्षक प्रा मुरलीधर नांगरे यांची. सदर नेमणूक झाली आणि कला संचालनालयाच्या आजवर टिकवलेल्या प्रतिष्ठेला तडा जाण्यास सुरुवात झाली. खरं तर त्यांच्या नेमणुकीला कला वर्तुळात प्रचंड विरोध होता. पण श्री नांगरे हे मॅनेज करण्यात अतिशय वाकबगार होते. त्यांनी सारं काही मॅनेज करून आपली वर्णी त्या पदावर लावून घेतलीच. तो काळ युती शासनाचा होता. युती शासन हे महाराष्ट्राच्या प्रशासनिक इतिहासातला टर्निंग पॉईंट समजला जातो. हा टर्निंग पॉईंट श्री नांगरे यांच्या चांगल्याच पथ्यावर पडला. श्री नांगरे यांनी राजकारण्यांना स्वतःची पेंटिंग्ज भेट देऊन खुश करून टाकलं आणि तिथं आपले पाय घट्टपणे रोवले. (त्यांनी आपली जी चित्रं राजकारण्यांना दिली त्या चित्रांची गुणवत्ता काय हे आता कुणीतरी बघायला हवं. कारण त्यामुळे नांगरे यांची चांगलीच भरभराट झाली. पण महाराष्ट्राचं कलाशिक्षण मात्र रसातळाला गेलं. ती चित्रं आता अस्तित्वात असतील किंवा नसतील पण त्यांनी आपलं काम मात्र चोख बजावलं.)
जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टच्या इमारतीतच हे गृहस्थ राहायचे. मूळचे ते पुण्याचे. त्यामुळे मुंबईला आले का कला संचालनालयाच्या वर असलेल्या खोल्यांमध्येच त्यांनी आपला मुक्काम ठोकला होता. एक जिना उतरलं का ऑफिस. आणि आणखीन एक जिना उतरला की सरकारी गाडी. या सुविधांमुळे त्यांनी काहीही करायचं शिल्लक ठेवलं नाही. आता इतक्या वर्षानंतर त्यांच्या कर्तृत्वाचा पाढा वाचायचा तर त्या सारखी दुसरी लाजिरवाणी आणि शरमेची बाब नाही असं मी मानतो म्हणूनच त्याचा उच्चार मी करू इच्छित नाही. महाराष्ट्राच्या कला संचालक पदावर असलेला हा इसम चक्क रेघा रेघांच्या डिझाईनची चड्डी आणि बनियानमध्ये जेजेच्या रम्य परिसरात हिंडत असे. (दादा कोंडकेंची चड्डी आठवली असेल तर तुम्ही अगदी अचूक ओळखलंत यात शंकाच नाही.) याच इसमाच्या कारकिर्दीत एका वर्षात सुमारे दीडशे ते पावणेदोनशे विनाअनुदानित कला महाविद्यालयं सुरु झाली. आणि कला संचालनालयाला संपूर्ण उतरती कळा लागली.
चावडी, ओसरी, देऊळ, प्राथमिक शाळा, वडाचा पार, गुरांचा गोठा, खाटीकखाना अशा रम्य ठिकाणी ही तथाकथित विनाअनुदानित कला महाविद्यालयं काढली गेली. एकेका जिल्ह्यात दोन दोन चार चार कला महाविद्यालयांना परवानगी दिली गेली. प्रत्येक कला महाविद्यालयात आर्ट टीचर डिप्लोमा अर्थात कला प्रशिक्षणाचे वर्ग उघडले गेले. कलाशिक्षण संस्था चालवण्याची कुणाची लायकी आहे किंवा नाही हे देखील न पाहता कला महाविद्यालयांची खिरापत वाटली गेली. अट फक्त एकच होती ‘आमचा वाटा आधी टाकायचा’ बस्स ! या कला महाविद्यालयांनी महाराष्ट्राच्या कलाशिक्षणाचं अक्षरशः वाटोळं केलं. अनेक मुलांची आयुष्य या असल्या कलाशिक्षणानं अक्षरशः बरबाद केली. अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. अनेक जिल्ह्यातल्या गोरगरीब पालकांनी होतं नव्हतं ते घरातलं किडूकमिडूक विकून प्रसंगी कर्ज काढून किंवा जमिनी विकून मुलांना आर्ट टीचर होण्यासाठी या कला महाविद्यालयात पाठवलं होतं. त्यांच्या पदरी घोर निराशा पडली. कारण ज्या प्रमाणात कलाशिक्षकांच्या नोकऱ्या निघायला हव्या होत्या त्या निघाल्याच नाहीत. किंबहुना त्या निघणार नव्हत्याच. ती सारी अक्षरशः हसवाफसवी होती.
पुण्याचे भाजपचे नेते गिरीश बापट जे नंतर मंत्रीदेखील झाले, खासदारदेखील झाले. त्यांनी नांगरेच्या नेमणुकीला प्रचंड विरोध केला होता. एक मोठं आंदोलनदेखील त्यांनी उभं केलं होतं. नांगरेच्या भ्रष्टाचाराचे कागदोपत्री पुरावे असलेली सुमारे चारशे पानांची फाईल त्यावेळी त्यांनी माझ्याकडे पाठवली होती. त्यावरून मी ज्या वृत्तपत्रात काम करत होतो त्या वृत्तपत्रातून अनेक बातम्या दिल्या.
त्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे इतके भयंकर होते की त्याची दखल शासनाला घ्यावीच लागली. त्यांना अटक करण्याची ऑर्डर उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी बजावलीदेखील पण श्री नांगरे यांचे काही कलावंत विद्यार्थी आडवे आले आणि ती ऑर्डर रद्द झाली. इतकंच नाही तर लोकसत्तासारख्या प्रतिष्ठित दैनिकाच्या पहिल्या पानावर श्री नांगरे यांच्यावर कसा अन्याय होत आहे याची रसभरीत बातमी प्रसिद्ध झाली. ती बातमी प्रसिद्ध करण्यात तेव्हाचे विद्वान संपादक डॉ अरुण टिकेकर यांनी खूप मोठा पुढाकार घेतला होता. परिणामी त्यांना विरोध करणारे आम्ही अक्षरशः आडवे झालो आणि महाराष्ट्राच्या कलाशिक्षण व्यवस्थेत भ्रष्टाचाराचं साम्राज्य पसरलं. (या संदर्भात अधिक वाचू इच्छिणाऱ्या मंडळींनी कृपया पुढील लिंकवर क्लीक करून ‘कालाबाजार’ या ‘चिन्ह’च्या अंकाची पीडीएफ अवश्य वाचावी. https://chinha.in/2008_edition )
पुढं काय घडलं ते पुढल्या भागात अवश्य वाचा.
सतीश नाईक
संपादक ‘चिन्ह आर्ट न्यूज’
Related
Please login to join discussion