No products in the cart.
ग्रामरक्षक देवता !
काल मी मदुराई सोडून तंजावूरच्या दिशेनं निघालो होतो. सायकल चालवत असतानाच दुपार झाली होती आणि दुपारी आराम करण्यासाठी ही एक चांगली जागा मिळाली होती. पण तिथं थांबल्यावर कळलं की ही तर जुनी दगडी वास्तू आहे. अनेक कोरीव खांब आहेत, छतावरले जुन्या चित्राचे अवशेष या वास्तूचा भव्य भूतकाळ सांगत होते. खांबावर नक्षीकाम भारी होतं. पण आजची अवस्था बिकट होती. छतावर मोठं झाड वाढलंय, खांब म्हाताऱ्यासारखे झुकायला लागलेत. जनावरं फिरत आहेत आणि तरीही या वास्तूचा गारवा एवढा की गावातली माणसं दुपारी इथंच जमतात. कोणी झोपलंय, कोणी बसलंय, कोणी गप्पा मारतय. एकूण निवांत दिसली माणसं सगळी.
आता मी तमिळनाडूमधील चेट्टिनाड शहराच्या जवळपासच्या गावांमध्ये होतो. मी ही येऊन थांबलो या वास्तूच्या सावलीत. इथं माझी भेट झाली या सिल्वा सोबत. नाव तर भारी आहेच, पण माणूस पण जाम भारी. कामगार माणूस. हमालीची कामं करतो. मी आलो तेव्हा नुकताच येऊन बसला होता. त्याला हिंदी इंग्लिश बोलता येत नव्हतं. पण बोलायचा भारी प्रयत्न करत होता. एक एक तोडका मोडका शब्द बोलून कसा तरी तो संवाद साधण्याचा प्रयत्न करीत होता. शब्द आठवायचा नाही तेव्हा लहान मुलासारखा डोकं खाजवायचा आणि स्वतःच्याच कपाळावर मारून घ्यायचा. नाहीतर मग सुसाट तमिळमध्येच बोलायचा. आणि समजल्याचा आव आणून मीही स्मित करायचो.
चौथी शिकलेला सिल्वा फूड, गॉड, व्हेअर, नेम, सिटी, फॉलो मी. असं काही काही विचारायचा आणि सांगायचा. आमचं संभाषण चालू होतं. त्याचे इतर सोबती तो माझ्याशी इंग्लिश शब्द वापरून बोलतोय म्हणून त्याची थट्टा करू लागले होते. थोड्या वेळाने खिशातून बाटली काढली, लगेच तिथेच पेग मारला त्यानं. एन्जॉय एन्जॉय म्हणत होता.
तिथंच जमिनीवर गावातला नेहमीचा खेळ आखला होता. त्यानं लगेच मला खेळायला बसवलं. सिल्वाने अनोळखी मला, लगेच खेळायला बसवलं, यांचं कौतुक वाटलं मला.
मी या भागात तमिळनाडूच्या पारंपरिक टेराकोटाच्या घोड्यांच्या शोधात भटकत आहे. त्याला फोटो दाखवला घोड्याचा तर लगेच तो मला ते बनवणाऱ्या कलाकारांकडे घेऊन गेला. सगळं काम सोप्प झालं माझं.
आय्यनार हा पूर्व वैदिक काळातील देवता आहे. तामिळनाडूमधील एक ग्रामदेवता. सर्रास गावाच्या सीमेवर यांचं देऊळ असतं. ग्रामरक्षक देवता म्हणून याला ओळखतात. यालाच सष्टी सुध्दा म्हणतात. प्रचंड मोठे दोन घोडे दिसले की समजायचं आय्यानारचं देऊळ आहे. देवळात देवाला वाहिलेल्या टेराकोटाचे घोडे, हत्ती, बैल असतात. सहसा त्यांची उंची सहा सात फूट असते. कधी कधी क्वचित पंधरा फुटापर्यंत सुध्दा करतात. आता ज्यांना टेराकोटा हे मातीच्या मूर्ती भाजून करण्याचे तंत्र माहीत आहे त्याला कळेल की हे किती अवघड काम आहे ते.
या देवाला घोडे वाहण्याची परंपरा इथली भारी आहे. आणि विशेष म्हणजे अय्यनारचा पुजारी कुंभारच असतो जो या मुर्त्या बनवतो.
आधी मला थोडी कल्पना होती या शिल्प परंपरेची, पण इथे आल्यावर मला अजून काही गमतीदार चालीरीती समजून घेता आल्या.
जर कोणाला मूल-बाळ होत नसेल तर ही लोकं टेराकोटाच्या लहान बाळाच्या मुर्त्या देवाला वाहतात. एवढंच नाही, जर त्यांच्या घरात ढेकूण त्रास देत असतील, उंदीर त्रास देत असतील, विंचू निघत असतील तर त्यावर सुध्दा उपाय म्हणून टेराकोटाचा ढेकूण, उंदीर, विंचू, पाली अशा मुर्त्या देवाला वाहतात. कोणाला सर्पदोष असेल तर त्यावर सुध्दा देवाला नाग वाहतात. भडक मातीच्या पांढऱ्या, पिवळ्या, निळ्या रंगात रंगवलेल्या या मुर्त्या भारी वेगळ्या आकर्षक वाटतात. घरातील महिला पुरुष दोघेही या कामात हातभार लावतात.
घोड्याचा पोटाचा भाग वेगळा, मग चार पाय वेगळे, शेपटी वेगळी आणि मस्तक वेगळं करून, शेवटी जोडून ते भाजलं जातं. आणि शेवटी त्याची रंग रंगोटी करून भारी उत्साहात सगळे गावकरी मूर्तीला खांद्यावर घेऊन नाचत देवळात जातात.
छोट्या गावात छोटी मंदिरे आहेत, पण एखादं मोठं मंदिर असेल तर तिथे ही एवढी मोठी रांग असते या वाहिलेल्या घोड्यांची की जणू एखादी सेना युध्दाला आल्याचा भास होतो. हे तिथे जाऊन पाहणे म्हणजे जबरदस्त भन्नाट अनुभव होता.
टेराकोटाचे घोडे देवाला वाहण्याची एक परंपरा मध्यप्रदेश मधल्या कट्टिवाडा या आदिवासी भागात पण आहे. पण त्यांची उंची तेवढी नसते आणि संख्याही कमी आहे. इथे तमिळनाडूत या चालीरीतीमध्ये टेराकोटा कलेचा मोठा वाटा आहे. कधी आलात चेट्टीनाडजवळ तर इथे एक सोलाई आंदावर मंदिर आहे. तिथे हा शिल्पकलेचा खजिना पाहूनच या. हे सगळं प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन बघणं हे किती समाधानकारक आहे हे शब्दात सांगणं कठीण आहे.
प्रतीक
कलाप्रवास.
तामिळनाडू
S.S.Kottai
Related
Please login to join discussion