Features

‘कलावेध’ का सीईटीची बेगमी ? अर्थात रोकडा व्यवहार ! भाग – ५

‘कलावेध’वरुन या लेखमालेचा रोख आता हळू हळू जेजेच्या दैनंदिन व्यवहाराकडे वळतो आहे. तसा तो कधी ना कधी वळणारच होता, कारण अक्षरशः अंधाधुंद कारभार जेजेत चालू आहे. आणि या कारभाराचे धागे थेट मंत्रालयापर्यन्त पोहचतात. कसे ? ते देखील हळूहळू स्पष्ट होईलच. आजच्या लेखात वाचा जेजेतल्या रोखीच्या व्यवहाराविषयी. 
लेखाचा सगळा रोख आता पैशाकडे वळलाय तर आता पैशाविषयीचे आणखीन काही घोळ सांगितल्या शिवाय  राहवत नाही. यावरून जेजेत कसा कारभार चालला आहे याची कल्पना येईल. नुकतीच ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’ची स्टडी टूर चंदीगड,धरमशाला, डलहौसी आणि अमृतसर इथं जाऊन आली. या स्टडी टूरसाठी थोडे थोडके नाही तर १३,७००/- इतके सहल शुल्क घेण्यात आले होते. आता एवढी मोठी रक्कम चेकनेच घेतली असेल असे तुम्हाला वाटले असेल. पण नाही ती रक्कम देखील रोखीने घेतली गेली.
थोडी थोडकी नाही तर ८० मुलं यात सहभागी झाली होती. म्हणजेच १० लाखापेक्षा जास्त रक्कम इथे जमा झाली होती. केंद्र सरकारने सुलभ अर्थकारणासाठी ज्या सूचना जाहीर केल्या आहेत. त्या साऱ्याच राज्य सरकारच्याच एका संस्थेमध्ये कशा धाब्यावर बसवल्या जात आहेत ते पहा, व्यवहारातला काळा पैसा कमी व्हावा या हेतूनं सरकारनं रोखीच्या व्यवहारांवर अनेक बंधन आणली आहेत. असंख्य नवी नवी ऍप्स व्यवहारात आणून काळ्यापैशाला आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. पण जेजे सारख्या सरकारी कला महाविद्यालयातच सरकारचे हे सारेच्या सारे कायदेकानू सातत्याने धाब्यावर बसवले जात आहेत. आपण काही चुकीचे करतो आहोत याची कुणालाही तमा नाही. व्हाट्सअपवरुन लेखी सूचना देऊन राजरोजपणे व्यवहार केले जात आहेत.
उदाहरणार्थ ; पुढील सूचना पहा

All Details about Long Tour are as follows:

1) The date of 1st instalment of rs. 5000/- has been extended to 2nd December so register your name on or before 2nd December.

2) Payment method – Only Cash.
Note:1st instalment is non-refundable.

3) Any other questions regarding tour please feel free to call us.
Tour head :
Ajinkya Hindlekar- 95612
Abhishek Pawar – 97671
Dhanashree Ghadi- 90046

4) There are only limited no. of seats available so please do registration as early as possible.
Registration will be done on first come first serve basis.

 या पुढली धक्कादायक गोष्ट म्हणजे सरकारी मान्यता नसलेल्या टूर ऑपरेटर सोबत हा इतका मोठा व्यवहार केला जातो आहे. आहे की नाही गंमत ? विद्यार्थ्यांनी जे माहिती पत्रक ‘चिन्ह’ला पाठवलं आहे त्यावर कुठेही नाव पत्ता दिलेला नाही किंवा किमानपक्षी फोन नंबर, पत्ता, ई-मेल आयडी तरी द्यावा तर ते ही नाही. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या पत्रावर कुठेही ती सरकारी मान्यता प्राप्त असल्याचा नोंदणी क्रमांक देखील नाही. समजा अशा संस्थेशी व्यवहार केला आणि जर तिथं काही अपघात वगैरे घडला किंवा अप्रिय घटना घडली तर त्याची जबाबदारी कुणाची ? त्या टूर ऑपरेटरची का हे निर्णय घेणाऱ्या अधिष्ठात्यांची ?
हे लिहीत असताना ७० च्या दशकात जेजेत शिकत असताना घडलेली एक भयंकर घटना आठवते. ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’चीच स्टडी टूर गेली होती. आणि ती देखील कुठं तर नेपाळला. आता पडली आहे तशीच प्रचंड थंडी तेव्हाही पडली होती. आणि ती टूर नेपाळमध्येच असताना अचानक एका रात्री ऍडव्हान्सच्या वर्गातल्या भाई नांदगावकर नावाच्या एका विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू झाला. कल्पना करा काय अवस्था झाली असेल सोबत गेलेल्या विद्यार्थी – विद्यार्थिनींची आणि शिक्षकांची ? अपघात वगैरे काहीही कारण नव्हतं. थोडासा आजारी होता तो आणि अचानक रात्री गेलाच. धाबी दणाणली साऱ्यांची. टूरला कायमस्वरूपी ज्येष्ठ शिक्षक गेले होते. आता सारखी हंगामी किंवा कंत्राटी शिक्षकांच्या किंवा ज्यांच्या नोकरीला चार वर्ष देखील पूर्ण झाली नाहीत अशांच्या हाती मुलं सोपवण्याची पद्धत त्या काळी अस्तित्वात नव्हती.
आपल्या सोबत हसत खेळत मुंबईवरून आलेला विद्यार्थी अचानक अशा पद्धतीने मृत्यू पावतो आणि आपण काहीही करु शकत नाही या भावनेनं विद्यार्थ्यांची काय अवस्था झाली असेल याची कल्पना देखील करणं अवघड आहे.  तशात ते भारतात नव्हते तर परदेशात होते आणि नेपाळचा कायदा असा आहे की तिथं एखाद्या परदेशी नागरिकाचा मृत्यू झाला तर त्याचं शव परत त्या देशात नेता येत नाही. तिथंच त्याच्यावर अंत्यविधी करावे लागतात. कल्पना करा किती बिकट अवस्था असेल ती. त्या काळात मोबाईल कोणाच्या स्वप्नात देखील नव्हते आणि फोन तर तासनतास लोंबकळून ट्रंक कॉल करावे लागायचे. दोन का तीन दिवसांनी ती बातमी ऐकून मुंबईतले आम्ही सारेच जेजेचे विद्यार्थी अक्षरशः थिजून गेलो होतो. त्या काळी रजिस्टर संस्थाकडेच अशी काम सोपवली जात असत. पण तरी देखील व्हायचा तो त्रास झालाच. समजा ही अशी एखादी विचित्र घटना आता घडली तर काय, याचा विचार अधिष्ठात्यांनी किंवा शिक्षकांनी केला तरी असेल का ? मला नाही वाटत केला असेल, केला असता तर असलं धाडस त्यांनी केलंच नसतं.
रजिस्ट्रेशन नंबर नसलेल्या, सरकार दरबारी कुठलीही नोंद नसलेल्या, फेसबुकवर अकाउंट उघडून चार पाच वर्षात आपल्या कार्यक्रमांच्या जेमतेम तीन चारच पोस्ट शेअर केलेल्या एखाद्या टूर ऑपरेटर कडे ८० मुलांना कंत्राटी आणि अननुभवी शिक्षकांच्या हाती दहा लाखापेक्षा जास्त ( ती देखील रोख (मोदीजींना कळलं तर ते काय म्हणतील ?) रक्कम देऊन सोपवणं याला साधा सरळ व्यवहार म्हणता येत नाही.
जेजेत हे सारं असं चालू आहे. आणि हे सर्व व्यवहार अगदी राजरोसपणे चालू आहेत. कुणाचा पायपोस कुणाच्याच पायात राहिलेला नाही. मध्यंतरी साबळेसाहेब प्रभारी कला संचालक पदी आसनस्थ झाले होते. त्यामुळं त्यांना विचारणारच कोण ? आणि विचारलंच तर ते जरी सरकारी नोकर असले तरी कोणालाही उत्तर देण्यात ते बांधील नाहीतच, विचारा हवं तर सध्याचे प्रभारी कला संचालक राजीव मिश्रा यांना.
तब्बल ४८०० शाळकरी विद्यार्थ्यांसोबत केलेल्या आर्थिक व्यवहाराबाबत आपण मागील लेखात जाणून घेतलेच होते. त्या व्यवहाराच्या देखील सुरस कहाण्या हळू हळू उजेडात येऊ लागल्या आहेत. योग्य वेळी त्या ‘चिन्ह’ मधून प्रकाशित होतीलच.
जेजे स्कूलची पावसाळी सहल गेली होती तेव्हा देखील १०००/- रुपये कुणा विद्यार्थिनीच्या बारकोडवर जमा करायला सांगितले होते. मेसेजमध्ये असंही म्हटलं होतं की या १०००/- रुपया मधूनच संपूर्ण वर्षभरात होणाऱ्या इव्हेंट्सची वर्गणी आणि जो टी शर्ट प्रिंट केला जाणार आहे त्याची किंमत देखील अंतर्भूत आहे. ५०० विद्यार्थी जेजे मध्ये शिकतात. याचाच अर्थ केव्हडी तरी मोठी रक्कम जमा झालीअसणार. एका सरकारी कला महाविद्यालयात अशी रक्कम जमा करता येते का ? ही जमा करण्याचा अधिकार विद्यार्थ्यांना आहे का ? हा पहा विद्यार्थ्यांच्या व्हाट्सअप ग्रुपवर आलेल्या मेसेजचा एक नमुना ;
“अपनी मान्सून टूर इसी महिने मे जाणे वाली हैं और मान्सून एक्सहिबिशन भी इसी महिनेमे होणे वाला हैं ।
जो भी लोग टूर को जाणे मे इंटेरेस्टेड होंगे वो नीचे दिये हुये बारकोड पे 1000 रु भेज सकते हैं ।
इस 1000 रु फीस मे पुरे साल के होणे वाले इव्हेंट्स काभी contribution और कॉलेज का जो tshirt हम लोग प्रिंट करके बनाते हैं उस्के भी पैसे include हैं ।
Already फीस भरणे की तारिक खतम् हो चुकी है लेकीन क्योकी जाडा लोगोतक मान्सून टूर की बात पोहची नही थी इसिलीये आज का फीस भरणे का एक और दिन बधा दिया हैं ।
फीस भरते समय अपणा नाम , इयर, डिपार्टमेंट और tshirt का साईझ मेंशन करे”

हे काही विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अकलेने केले नसणार कुणीतरी शिक्षकांनीच हे त्यांना सांगितले असणार. जेजे मध्ये आता हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच कायम स्वरूपी शिक्षक उरले आहेत. उरलेले सारे हंगामी आणि कंत्राटी आहेत. हंगामी आणि कंत्राटी शिक्षक हे धाडस करू शकणार नाहीत. मग हे धाडस कुणी केलं असेल असा प्रश्न उरतोच. ज्या संस्थेतर्फे वर्षभर निरनिराळे कार्यक्रम घेतले जातात त्या ‘कलादीप’च्या चेअरमननं हा निर्णय घेतला असेल का ? का दस्तूरखुद्द अधिष्ठात्यानेच हा निर्णय घेतला असेल याची चौकशी करायची वेळ लवकरच कला संचालकांवर येईल अशी लक्षणं दिसत आहेत.

– सतीश नाईक 
संपादक चिन्ह आर्ट न्यूज

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.