No products in the cart.
‘कलावेध’ : मुलांना उत्तेजन का ‘सीईटी’ची तजवीज ? भाग – २
‘कलावेध’ स्पर्धेचे प्रवेशशुल्क तेही थोडे थोडके नव्हे तर तब्बल अकरा लाखापेक्षा जास्त रक्कम ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’ मध्ये रोखपालाचे पद अस्तित्वात असताना देखील जेजेच्याच एक विद्यार्थी आणि चार विद्यार्थिनींच्या नावे घेण्यात आली, या घटनेतील गांभीर्य सरकारी अधिकाऱ्यांच्या लक्षात येऊ नये याचे आश्चर्य वाटते. ते कळावे म्हणूनच हा लेखन प्रपंच.
गेल्या अनेक वर्षात किंबहुना मी तर असे म्हणेन की , गेल्या दोन तपात कला संचालनालय आणि अर्थातच ‘जे जे स्कूल ऑफ आर्ट’, ‘जेजे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट’ आणि ‘शासकीय कला महाविद्यालय’ नागपूर आणि औरंगाबाद यांची सरकारनं अक्षरशः दशादशा करुन टाकली आहे. या सरकारी संस्थांची जर ही अवस्था झाली असेल तर नांगरेसाहेबाच्या काळात गावागावात सुलभ शौचालयाप्रमाणे उघडलेल्या टिनपाट कला महाविद्यालयांची काय दुर्दशा झाली असेल याची कल्पना देखील करवत नाही. या काळात झालेल्या बहुसंख्य मंत्री महोदयांनी या विभागाकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळं त्यांचे स्वीय साहाय्यक आणि उच्च व तंत्र शिक्षण खात्यातले भ्रष्ट अधिकारी उन्मादले आणि त्यांनी कला संचालनालयातल्या गुंड अधिकाऱ्यांना हाताशी धरुन अक्षरशः नंगा नाच करुन सर्वश्री आडारकर, धोंड,सातवळेकर,सडवेलकर यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण रीतीने घातलेली संचालनालयाची घडी अक्षरशः विस्कटून टाकली.
त्याचा परिणाम असा झाला की कुणीच कुणाला जुमानेसे झाले आणि या क्षेत्रामध्ये प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला. प्रत्यक्ष मंत्रालयातले अधिकारी यात सहभागी असल्यामुळं आपले कोण काय वाकडे करणार असा आत्मविश्वास अंगी आल्यामुळं दर्जाहीन अधिकारी आपला अजेंडा राबवू लागले, परस्पर निर्णय घेऊ लागले. ‘कलावेध’ स्पर्धा हे याचं ज्वलन्त उदाहरण आहे. दोन चार वर्षांपूर्वी एका विद्यार्थी प्रतिनिधींच्या डोक्यात अशा स्वरुपाची स्पर्धा भरवण्याची कल्पना आली, पण त्यावर कुठलाही विचार विनिमय न करता ती प्रत्यक्षात आणली गेली. जेजेसारख्या १६६ वर्षच्या संस्थेला आपली प्रसिद्धी करण्यासाठी अशा उपक्रमाची खरोखरच गरज आहे का,
याचा देखील तारतम्याने विचार केला गेला नाही. ( विचार करणारे शिक्षकच तेथे आता उरलेले नाहीत असे म्हणायचे का ? )
पहिल्या दोन वर्षी मिळालेला प्रतिसाद पाहून काही शिक्षकांच्या लक्षात या स्पर्धेचं व्यावसायिक गणित आलं असावं आणि म्हणूनच कोरोना नंतर या स्पर्धेचं पुनरुज्जीवन केलं गेलं काही चाणाक्ष मंडळींच्या हे देखील लक्षात आलं असावं की, सीइटीचं मार्केटिंग करण्यासाठी देखील या स्पर्धेचा छान उपयोग होऊ शकतो. आणि मग कोरोना पूर्व काळात तीस ते पन्नास रुपये असलेली फी कोरोनोत्तर काळात धाडदिशी दोनशे पन्नास रुपयांपर्यंत पोहोचली.
स्पर्धेचं मार्केटिंग करण्यासाठी विद्यार्थी आयते हातात होतेच. त्यांना शाळा शाळांमध्ये पिटाळलं गेलं. सोशल मीडियाचा वापर करुन पोस्टर काढली गेली. ( भले ती ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’च्या लौकिकाला साजेशी नसेनात का ?) पण या साऱ्यांनी त्यांची काम चोख बजावली. परिणामी ८ तारखेला सकाळी विदयार्थी आणि त्यांच्या पालकांचा लोंढा जेजेवर चाल करुन आला. हे सारे कशामुळे झाले तर व्यवस्थापन विषयक कोणतीही काळजी न घेता अत्यंत बेफिकीरीनं हे प्रकरण हाताळल्यामुळं हा अनवस्था प्रसंग जेजेवर ओढवला.
पोस्टर मध्ये या निमित्ताने प्रसारित करण्यात आलेल्या मजकूरामध्ये संपर्कासाठी पाच फोन नंबर्स देण्यात आले होते. विद्यार्थी किंवा त्यांचे पालक मोट्या उत्सुकतेने माहिती मिळवण्यासाठी या नंबरवर फोन करीत, पण तो फक्त वाजत राही. उचलला जातच नसे. साहजिकच विद्यार्थीं आणि पालक मंडळी पॅनिक होत आणि जेजेच्या ओळखी पाळखीच्या विद्यार्थ्यांकडून माहिती काढू पाहत. काही पालक परिचयातल्या जेजेच्या शिक्षकांना फोन करीत तर काही पालक आजी माजी विद्यार्थ्यांना फोन करीत. पण तिथंही त्यांच्या पदरी निराशाच येई कारण कुणालाच या स्पर्धेविषयी माहिती नसे. वाचन बरे असलेले पालक ‘चिन्ह’च्या फोन वर देखील थेट फोन करीत आणि स्पर्धेची माहिती विचारीत. पण जेजेशी संबंधित लोकांनाच ते माहीत नसेल तर आम्ही तरी काय कपाळ उत्तर देणार ? अशा पालकांनी अखेरीस सोशल मीडियाकडे आपला मोहरा वळवला. ‘चिन्ह’च्या स्पर्धे संदर्भातल्या पोस्ट वर अनेकांनी कंमेंट्स बॉक्स मध्ये आपल्या तक्रारी मांडल्या, पण त्याला देखील उत्तर द्यायला स्पर्धेशी संबंधित कुणीही पुढे आला नाही. परिणामी ८ तारखेला जेजेच्या प्रवेशद्वारावर मोठा गोंधळ उडाला. हे सारे कशामुळे झाले ? या विषयी चौकशी केली असता जी माहिती हाती आली ती अक्षरशः हादरवून टाकणारी होती.
प्रथम ते फोन नंबर कुणाचे होते ते आधी पाहू. चौकशीचे खूपच फोन ‘चिन्ह’कडे येऊ लागले तेव्हा आम्ही पोस्टरवर छापलेले फोन कुणाचे आहेत हे पाहण्यासाठी ट्रूकॉलरवर टाकले, तेव्हा असं लक्षात आलं की हे फोन
जेजेच्या विद्यार्थ्यांचे आहेत. आता त्या फोनवर जेजेच्या विद्यार्थ्यांची नावे लिहिलेली नव्हती. मग तिथंही आमच्या मदतीला सोशल मीडिया कामी आला. ‘चिन्ह’च्या इन्स्टाग्रामच्या अकाउंटवर एका मुलीनं अत्यंत असभ्य भाषेत ‘चिन्ह’ला गालीप्रदान केलेलं आढळलं. उत्सुकतेने इन्स्टावरच माहिती घेतली असता असे कळले जेजेच्या टेक्सटाईल विभागाची ती विद्यार्थीनी असल्याचे कळले, ( तिने जे काही तारे इन्स्टा वर उधळले आहेत त्याविषयी बोलण्याची पात्रता आमच्याकडे नाही. असो.) साहजिकच अन्य नंबरचा छडा लावणं आम्हाला सोपं गेलं विद्यार्थ्यांच्या नावे अशा पद्धतीने एकाद्या महाविद्यालयाने, ते देखील फडतूस नव्हे तर चांगली १६६ वर्षांची परंपरा असलेल्या महाविद्यालयाने अशा प्रकारे पैसे गोळा करणं ही कल्पनाच आम्हाला धक्का देऊन गेली. इथूनच मग योग्य दिशेनं शोध सुरु झाला.
या क्षेत्रातल्या असंख्य तज्ज्ञांशी बोललो तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या नावे पैसे गोळा करणे ही अत्यंत आक्षेपार्ह गोष्ट आहे. कुठल्याही कॉलेजच्या व्यवस्थापनाला हा अधिकार नाही. आणि जिथं रोखपालाची व्यवस्था आहे अशा महाविद्यालयांना तर असे व्यवहार करण्यास मुळीच परवानगी नाही. हे जर त्यांनी केलं असेल तर हा मोठा गुन्हा आहे असेही त्या तज्ज्ञांनी निक्षून सांगितले. आता कल्पना करा साडेचार हजार पेक्षा जास्त विदयार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला असेल (काहींचं म्हणणं असं होतं की ही नोंदणी झालेली संख्या आहे, प्रत्यक्ष स्पर्धेच्या वेळी असंख्य विद्यार्थी रोख रक्कम भरून प्रवेश घेत होते म्हणे. असं जर असेल तर ही आणखीनच गंभीर गोष्ट ठरते.) कारण ती रक्कम अकरा लाखापेक्षा जास्त होते. आताही रक्कम जर पाच विद्यार्थ्यांच्या जीपे अकाउंट वर विभागली गेली असेल तर ते नैतिक दृष्ट्या योग्य आहे का ? असेल तर यावरच सरकारी कर किंवा जीएसटी आता कोण भरणार ? विद्यार्थी ? पालक ? कलादीप ? जेजेआईट्स ? का दस्तूरखुद्द जे जे स्कूल ऑफ आर्ट ? या प्रश्नाचे उत्तर आता साबळे साहेबाना द्यावेच लागेल. साबळे साहेब देणार नसतील मिश्रा साहेबाना ते त्यांच्या कडे मागावे लागेल. मिश्रा साहेब देखील असमर्थ ठरले तर डेप्युटी सेक्रेटरी तिडके साहेबाना यात हस्तक्षेप करावा लागेल. ( मंत्रालयापासून रोज संध्याकाळी घरापर्यंत मिळणारी लिफ्ट आता काही काळ तिडके साहेबाना विसरावी लागेल.) आणि हे सारे असमर्थ ठरले तर आशा आहे की शिक्षण सचिव रस्तोगीसाहेब यात जातीने लक्ष घालतील.
आम्ही उभ्या केलेल्या या प्रश्नांची ही नुसती झलक आहे. या संदर्भात असे असंख्य प्रश्न आम्हाला पडले आहेत आणि असंख्य निरीक्षणं आम्ही नोंदवली आहेत. ती जाणून घेण्यासाठी या लेखाचा तिसरा भाग अवश्य वाचा.
– सतीश नाईक
संपादक ‘चिन्ह आर्ट न्यूज’
Related
Please login to join discussion