No products in the cart.
‘कलावेध’ : मुलांना उत्तेजन का ‘सीईटी’ची तजवीज ?
१६६ वर्ष वयाचं ‘जे जे स्कूल ऑफ आर्ट’ चित्रकलेला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुलांना किंवा त्यांच्या पालकांना ठाऊक नसतं का ? जेजेत कधीही न शिकलेल्या, साधी जेजेसंस्कृती देखील ठाऊक नसलेल्या पण असं असूनही जेजेच्या डिग्रीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं भाग्य लाभलेल्या तथाकथित शिक्षकांना मात्र वाटतं की ‘मुलांना शाळेत असतानाच जेजे ठाऊक व्हायला हवं’ आणि मग ही अशी ‘कलावेध’ सारखी आचरट पद्धतीनं स्पर्धांची आयोजनं केली जातात साधे सरळ उपक्रम असते तर ‘चिन्ह’नं त्याचं स्वागतचं केलं असतं, पण त्या मागचा हेतू आणि ८ तारखेचा एकूण गोंधळ पाहिल्या नंतर या साऱ्याची दखल घेणं अत्यावश्यक वाटू लागलं. त्या मालिकेतला हा पहिला लेख.
८ जानेवारी रोजी ‘जे जे स्कूल ऑफ आर्ट’ मध्ये जो प्रकार घडला तो केवळ अभूतपूर्व होता. त्या संदर्भांत दि ९ जानेवारीच्या ‘महाराष्ट्र टाइम्स’ ने आपल्या अंकाच्या पहिल्या पानावर जी बातमी मास्टेडच्या खाली ज्या पद्धतीने दिली तो प्रकार देखील केवळ अभूतपूर्व असाच होता. ‘जे जे स्कूल ऑफ आर्ट’च्या सध्याच्या व्यवस्थापनानं ‘कलावेध’ स्पर्धेचे आयोजन करताना जो बेजबाबदारपणा दाखवला, जे आत्यंतिक भोंगळ कारभाराचे दर्शन घडविले त्याचाच परामर्श अत्यंत सौम्य पद्धतीने मटाने आपल्या बातमीत घेतला होता, इतकंच नाही तर सदर बातमी हेडलाईनच्या ठिकाणी छापून आपण ‘जे जे स्कूल ऑफ आर्टला’ आपण किती महत्व देतो हे देखील दाखवून दिलं होतं. उच्च व तंत्रशिक्षण खाते तसेच कला संचालनालयातील मूर्ख, बेअक्कल पण आत्यंतिक भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या हे कितपत लक्षात आलं असेल कुणास ठाऊक ! समजा चुकून माकून ते आलंच असेल तर ते या संदर्भात कितपत कारवाई करतील या विषयी शंकाच आहे, कारण खालपासून वरपर्यंतचे सारेच भ्रष्टाचाराच्
पूर्व नियोजित कार्यक्रमानुसार बाहेरगावी जायचं ठरलं असल्यामुळे ८ तारखेचा रविवार प्रवासाच्या तयारीत गेला तर ९ तारखेच्या पहाटे प्रवास सुरु झाल्यामुळं जेजेतल्या गोंधळाची बातमी महाराष्ट्र टाइम्स हाती पडल्यावरच वाचावयास मिळाली. खरं तर आदल्या दिवशी रविवारी अधनंमधनं कुणाकुणाचे फोन येतच होते की ‘जेजेत बराच गोंधळ चालला आहे, खूप गर्दी उसळली आहे इतकी की दरवाजे बंद करून घ्यावे लागले आहेत, ज्यांनी आधीच नाव नोंदणी केली आहे आणि पैसे देखील भरले आहेत अशा अनेकांना कंपाउंडमध्ये प्रवेश मिळाला नाही किंवा झालंच तर प्रवेश घेण्यासाठी आयत्यावेळी आलेल्या अनेक विद्यार्थ्यांना रोख पैसे भरूनच प्रवेश दिला गेला वगैरे. त्या गोंधळात चेंगराचेंगरी देखील झाली म्हणे, काही विद्यार्थी तिथल्या तिथे हरवले देखील वगैरे’. हे सारं ‘चिन्ह’ला फोन करून का सांगितलं जात होतं ? तर ‘चिन्ह’नं या साऱ्याची दखल घ्यावी आणि सडकून टीका करावी म्हणून, पण पूर्वनियोजत कार्यक्रमानुसार जाणं भाग होतं किंबहुना तो संपूर्ण आठवडाच प्रवासात गेला. आल्यानंतर मात्र या संदर्भात संपूर्ण माहिती घेतली असताना असं लक्षात आलं की ‘कलावेध’ स्पर्धेचं आयोजन हे अत्यंत भोंगळ पद्धतीनं करण्यात आलं होतं.
‘महाराष्ट्र टाइम्स’च्या बातमीतल्या इंट्रोमध्ये असं म्हटलं आहे की ‘ सर जे जे कला महाविद्यालयातील आजी माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या ‘कलावेध’ या चित्रकला स्पर्धेच्या योग्य नियोजना अभावी राज्यभरातून आलेल्या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी हुकली’ या वाक्याचा पूर्वाध संपूर्णतः चुकीच्या माहितीवर आधारित आहे. सदर वार्ताहराला ही माहिती कुणी दिली या विषयी आम्हाला कल्पना नाही, पण हेडलाईनच्या जागी दिलेल्या बातमीचं पहिलंच वाक्य चुकीच्या माहितीवर आधारित असावं हे ‘मटा’ सारख्या वृत्तपत्राला शोभनीय निश्चितच नाही. हे मी अत्यंत खात्रीनं सांगू शकतो कारण सदर बातमीच्या दुसऱ्या परिच्छेदाच्या सुरुवातीच्या वाक्यात ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’च्या ‘ जेजेआईट्स’ या माजी विद्यार्थ्यांच्या संस्थेचा मी एक आजीव सदस्य आहे. या संदर्भात कोणत्याही स्वरुपाची माहिती ‘जेजेआईट्स’च्या कार्यकारिणीने अद्यापही प्रसारित केलेली नाही. इतकंच नाही तर याच ‘जेजेआईट्स’ संस्थेतर्फे जो ‘जेजेआईट्स असोसिएशन अपडेट्स’ या नावाचा जो व्हाट्सअप ग्रुप चालवला जातो त्याचा देखील मी एक सदस्य आहे. पण सदर ग्रुप वर २ ऑक्टोबर २०२२ पासून आजतागायत कोणतीही पोस्ट किंवा फॉर्वर्डस पडलेले नाहीत. जेजेमध्ये एव्हडी मोठी स्पर्धा घेतली जाते ज्या स्पर्धेत साडेचार हजार पेक्षा जास्त विद्यार्थी आणि त्यांचे पालक देखील सहभागी होतात, दहा अकरा लाखापेक्षा अधिक रक्कम नुसत्या प्रवेशापोटी भरतात त्या स्पर्धेविषयींची कोणतीही माहिती लिखित स्वरूपात आजीव सदस्यांना द्यावीशी वाटली नाही, याचे खरोखरच आश्चर्य वाटते. याचाच अर्थ असा की ‘कलादीप’चे सदस्य आणि ‘जेजेआईट्स’चे कार्यकारणी सदस्य या स्पर्धेविषयी बहुतांशी अंधारातच असावेत. इतक्या मोठ्या स्पर्धेच्या आयोजनच्या संदर्भात कुठलेही लेखी करार मदार केले नसावेत. असे जर घडले असेल तर ही ‘कलादीप’ आणि ‘जेजेआईट्स’यांच्या दृष्टीने अतिशय गंभीर बाब आहे. ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’चे अधिष्ठाता किंवा अधिकारी ‘महाराष्ट्र टाइम्स’ सारख्या वृत्तपत्राच्या वार्ताहरासमोर खोटी विधाने करून ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’चा याच्याशी काहीही संबंध नाही ‘कलादीप’ आणि ‘जेजेआईट्स’ या संस्थांची ती जबाबदारी होती असे म्हणून आपली जबाबदारी टाळू शकत नाहीत कारण या संदर्भात ‘चिन्ह’कडे पुरावेच आहेत.
अधिष्ठाता विश्वनाथ साबळे यांनी एका परीक्षकाला दिलेल्या पत्राची प्रत आम्ही इथं देत आहोत. या वरुन ‘कलावेध’ स्पर्धा ‘जे जे स्कूल ऑफ आर्ट’ ने आजोजित केली होती असं दिसतंय. तसं जर नसतं तर सदर पत्र ‘कलादीप’च्या किंवा ‘जेजेआईट्स’च्या लेटरहेडवर असायला हवं होतं. पण ते दिसत नाहीये हा ‘जे जे स्कूल ऑफ आर्ट’चाच एक कार्यक्रम आहे असे स्पष्ट दिसते आहे आणि असे जर असेल तर ही अतिशय गंभीर बाब आहे असे म्हणायला हवे. कारण त्यामुळे असंख्य प्रश्न उभे राहतात. त्यांचा परामर्श आम्ही पुढल्या काही लेखात घेणार आहोत.
– सतीश नाईक
Related
Please login to join discussion