No products in the cart.
‘कलावेध’ का सीईटीची बेगमी ? भाग – ४
‘कलावेध’ स्पर्धेसंदर्भातला हा आमचा चौथा लेख. खरं तर चार पाच लेखांमध्ये हे प्रकरण आटपायचं असं आम्ही ठरवलं होतं पण आता इतकी नवीनवी माहिती आमच्याकडे येते आहे की, ही बहुदा दहा पंधरा भागांची लांबलचक लेखमाला होईल, असेच आता वाटू लागले आहे. जे या संदर्भात कोर्टात न्याय मागू इच्छितात किंवा भोंगळ कारभारामुळे आधी पैसे भरुन देखील ज्यांना स्पर्धेच्या ठिकाणी प्रवेश मिळू शकला नाही अशा मंडळींनी ‘चिन्ह’शी अवश्य संपर्क साधावा. या संदर्भात काही करता येईल का याचीही चाचपणी आम्ही करीत आहोत. काहीच जमले नाही तर या सर्वांच्या मनस्तापाला एक व्यासपीठ उभे करून देऊ हे निश्चित !
‘महाराष्ट्र टाइम्स’या वृत्तपत्रांनं ९ जानेवारीच्या अंकात बातमी देताना बातमीच्या प्रारंभी ‘कलावेध’ ही स्पर्धा जेजेच्या आजी माजी विद्यार्थांनी आयोजित केली होती, असे म्हटले आहे. ते अत्यंत चुकीचे आहे. माजी विद्यार्थ्यांचा यात कोणताही सहभाग नव्हता . ज्या ‘जेजेआईट्स’या माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेचा लोगो अत्यंत वाईट डिझाईन केलेल्या पोस्टरवर लावला गेला आहे. त्या संघटनेचा मी देखील एक आजीव सदस्य आहे. इतकंच नाही तर ‘जेजे आईट्स ग्रुप’च्या व्हाट्सअप ग्रुपवर देखील मी आहे. पण स्पर्धेविषयीची कोणतीही पूर्वसूचना किंवा पोस्ट अथवा स्पर्धेचं साधं पोस्टर देखील या ग्रुपवर कधी पडलंच नाही हे मी अगदी खात्रीनं सांगतो. मग ‘जेजेआईट्स’ हे नाव पोस्टरवर आले तरी कसे याचा शोध घेतला असता अतिशय मनोरंजक माहिती हाती आली.
उदाहरणार्थ ‘जेजेआईट्स’ या माजी विद्यार्थ्यांच्या संस्थेसोबत इतक्या मोठ्या आयोजनाबाबत ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’ आणि ‘कलादीप’ या दोन्हीं सोबत कोणताही लेखी करार झाला नाही. जे काही ठरले ते तोंडीच ठरले.आधी कधी ‘जेजेआइट्स’ या स्पर्धेशी संबंधित नसताना ती नेमकी याच वर्षी आयोजनात कशी सहभागी झाली. याची मिळालेली माहिती अधिकच गंमतीदार होती. काय तर म्हणे ‘कलादीप’ ही संस्था रजिस्टर नसल्यामुळे तिथे कॉलेज बाहेरून येणारे प्रायोजकत्वाचे चेक आणि विद्यार्थ्यांकडून येणारे प्रवेश फीचे पैसे जमा करण्यासाठी संयोजकांना कुठली तरी रजिस्टर संस्था हवी होती म्हणून त्यांनी ‘जेजेआईट्स’च्या पदाधिकाऱ्यांना गळ घातली. त्यासाठीची मीटिंग देखील फोनवरूनच झाली. आणि कोणतीच कागदपत्र तयार न करता ‘जेजेआईट्स’ ही संस्था लोगो सकट जेजेच्या लौकिकाला न साजेशा पोस्टरवर अवतरली. आहे की नाही गंमत ?
संयोजकांच्या या दूरदृष्टीवरुन यंदा स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळणार याची कल्पना संयोजकांना आली होती हे उघड होतं. अत्यंत पद्धतशीरपणे प्लॅन करून ‘जेजेआईट्स’ वाल्याना यात गुंतवण्यात आलं असं म्हटलं तर त्यात काय चुकीचं आहे ? जेजेसारख्या १६६ वर्षाच्या शासकीय कला महाविद्यालयात रोखपाल, तिजोरी आदी सर्व व्यवस्था उपलब्ध असताना हा निर्णय का घेतला ? कोणी घेतला ? याची चौकशी होणे गरजेचे आहे. ‘कलावेध’ स्पर्धे संदर्भातली ‘चिन्ह’ची लेखमाला वाचून एका संतप्त पालकाने फेसबुकवर जी प्रतिक्रिया दिली आहे त्यात असं म्हटलं आहे की, ‘या संदर्भात मी माझ्या वकीलांशी चर्चा केली आहे आणि लवकरच योग्य ते पाऊल उचलणार आहे वगैरे’ असे जर घडले तर भविष्यात कुणाचीही अशा पद्धतीने स्पर्धा आयोजित करण्याची हिंमत होणार नाही हे निश्चित.
‘जेजेआईट्स’च्या पदाधिकाऱ्यानुसार स्पर्धेच्या आयोजनात आमचा वाटा हा एव्हडाच होता. स्पर्धेच्या आयोजनाशी आमचा दुरान्वयानेही संबंध नाही. त्यांच्या आवाहनावरुनच मदत करण्याच्या हेतूने आम्ही यात पडलो असे देखील त्यांनी स्पष्ट केले. असे जर असेल तर आता आम्ही ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’च्या अधिष्ठात्यांना आणि कलादीप च्या विद्यार्थी प्रतिनिधींना थेट प्रश्न विचारतो की, ही वाकडी वाट कशासाठी ? आलेला सर्व पैसा रोखपालाकडे का गेला नाही ? चार विद्यार्थिनी आणि एक विद्यार्थी यांच्या नावे स्पर्धकांनी जीपे द्वारा पैसे भरण्याची कल्पना कुणाची ? ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’च्या नावे जीपे अकाउंट उघडून स्पर्धकांना त्यात पैसे टाकणे अवघड होते का ? ४८०० विद्यार्थांनी या स्पर्धेत भाग घेतला त्या स्पर्धकांचे सारेच पैसे या पाच अकाउंटवर गोळा झाले आहेत का ? सर्व स्पर्धकांच्या नावे पावत्या फाडल्या गेल्या आहेत का ?
स्पर्धेच्या वेळी सुमारे २५० स्पर्धकांनी रोख रक्कम भरुन या स्पर्धेत भाग घेतला असे म्हटले जाते त्या पैशांचा हिशोब कुठल्या अकाउंटवर दाखवला गेला आहे ? प्रवेशद्वार बंद करून घेतल्यामुळं आधी नाव रजिस्टर केलेल्या आणि जीपे द्वारा पैसे भरलेल्या पण स्पर्धेत भाग न घेता आलेल्या विद्यार्थ्यांना पैसे परत मिळणार की नाहीत ? स्पर्धेच्या अटीशर्तींमध्ये तो मिळणार नाही असे स्पष्ट लिहिले आहे. पण गलथान संयोजनाची झळ त्या विद्यार्थ्यांनी का बरं सोसावी या प्रश्नाचं उत्तर कलादीपचे अध्यक्ष किंवा जेजेचे अधिष्ठाता आता तरी देणार आहेत का ? ते देणार नसतील तर प्रभारी कलासंचालक राजीव मिश्रा त्यांना या प्रश्नांची उत्तर देण्यास भाग पाडणार आहेत का ? अधिष्ठाता कला संचालकांना जुमानणार नसतील तर ज्यांच्या हातात जेजेचा कारभार आहे ते डेप्युटी सेक्रेटरी सतीश तिडके त्यात लक्ष घालणार आहेत का ? का नेहमी प्रमाणे हे प्रकरण दप्तर जमा करुन टाकणार का ? ते आता पाहायचे.
सर्वानी एक मात्र लक्षात ठेवावे की, हा शेवट नाही ही सुरुवात आहे. आता आमचे प्रश्न संपणारे नाहीत. उत्तरे मिळेपर्यंत आम्ही ते जाहीरपणे याच माध्यमातून विचारतच राहणार आहोत.
– सतीश नाईक
संपादक चिन्ह आर्ट न्यूज
Related
Please login to join discussion