No products in the cart.
‘कलावेध’ का ‘सीईटी’ची बेगमी ? भाग – ३
ज्या १६६ वर्ष जुन्या ऐतिहासिक कला महाविद्यालयाच्या अधिष्ठात्याला शासनाने अर्थसंकल्पात मंजूर केलेले १० कोटी धड खर्च करता येत नाहीत , सुमारे २५० ते ३०० विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहाची गरज असताना तो निव्वळ एक कोटी रुपये नुसते पावसाचं पाणी वाहून जाणाऱ्या गटारावर खर्च करतो त्या अधिष्ठात्याला जेजेत शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘ कलावेध ‘ स्पर्धा भरवण्याचा नैतिक हक्क तरी आहे का ? ‘चिन्ह’च्या संपादकांनी शासनाला विचारलेले सडेतोड प्रश्न .
‘कलावेध’च्या ८ जानेवारीच्या गोंधळामुळे अनेक प्रश्न जेजे आणि कलावर्तुळाशी संबंधित लोकांच्या मनात उभे राहिले आहेत. त्यातला पहिला प्रश्न असा होता की, अशा स्वरूपाच्या मार्केटिंगशी संबंधित उपक्रमाची ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’ला खरोखरच गरज होती का ? जेजे सारख्या जगभरच्या कला रसिकांनां ठाऊक असलेल्या १६६ वर्ष जुन्या कलासंस्थेला या असल्या थेरांची गरज नाही अशीच भावना बहुसंख्यानी व्यक्त केली आहे .त्यांनी हेही निदर्शनास आणून दिलं की श्री साबळे आणि त्यांच्या कोंडाळ्यातील व्यक्ती सोडल्या तर कुणालाही त्याची कधी गरज भासलेली नाही. साबळेना ती भासली असावी याचं कारण साबळे आणि त्याच्या कोंडाळ्यातील बहुसंख्य शिक्षकांचं शिक्षण हे ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’ मध्ये झालेलंच नाही, त्यामुळे त्यांना जेजेची संस्कृतीचं ठाऊक झालेली नाही. आपण जिथं नोकरी करतो आहोत ते एक सरकारी कार्यालय आहे आणि त्या नोकरीचा एक भाग म्हणूनच ते आणि त्यांचे सवंगडी अत्यंत रुक्षपणे या साऱ्याकडे पाहत असावेत.
ज्या कलामहाविद्यालयाला दीडशे पेक्षा जास्त वर्षांची परंपरा आहे, ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी दर वर्षी तीन ते चार हजार अर्ज येतात, ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी सीईटीची परीक्षा देत मुलं आपल्या आयुष्यातली तीन – तीन चार – चार वर्ष अक्षरशः फुकट घालवतात, त्या कॉलेजसाठी ही असली ‘कलावेध’ स्पर्धेची थेरं घेणं हा शुद्ध मूर्खपणा आहे, असेच मत बहुसंख्य जाणकार व्यक्त करतात. साबळे आणि त्यांच्या सवंगड्यांनी स्वतःच आधी जेजे परिसराचा, तिथल्या अभ्यासक्रमांचा तसेच जेजे संस्कृतीचा अभ्यास करावा म्हणजे मग असले आचरट आयोजन करण्याचं धाडस त्यांच्याकडून होणार नाही.
साबळेसाहेब हे गेली जवळजवळ वीस वर्ष ते ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’मध्ये नोकरी करत आहेत. त्यातली दहा बारा वर्ष तर ते अधिष्ठाता म्हणून कार्यरत आहेत. या काळात त्यांनी कलाशिक्षण सुधारण्या संदर्भात कोणते उपक्रम राबवले ? संगणकीकरण आणि जागतिकीकरणामुळे जगभरच्या कलाशिक्षणात आमूलाग्र बदल होत असताना त्याची पुसटशी चाहूल देखील जेजेच्या विद्यार्थ्याना अनुभवावयास मिळू नये यालाच साबळे यांचं कर्तृत्व म्हणायचं का ?
हा प्रश्न खूपच वरच्या पातळीवरचा झाला, त्याचं उत्तर आम्ही साबळेंकडून अपेक्षित देखील करत नाही. पण साबळे याना समजेल असा एक प्रश्न आम्ही जरूर विचारु इच्छितो. तो म्हणजे ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’चा दीडशे वर्षाचा सोहळा साजरा झाला तेव्हा म्हणजे २००८ साली शासनाने एक अत्यंत अद्ययावत अशी कॉम्प्युटर रूम आर्ट आणि क्राफ्ट विभागात बांधून दिली होती.त्या रुम मध्ये असंख्य महागडे संगणक आणि आणि लॅपटॉप ( लॅपटॉप बहुदा अँपलचेच होते ) दिले होते. त्या रुमचे पुढे काय झाले ? उदघाट्न समारंभानंतर ती रुम कधी उघडलीच गेली नाही असे का झाले ? नुकतेच असे कळले की अलीकडेच ती रुम जमीनदोस्त करण्यात आली आणि सगळे महागडे संगणक भंगार मध्ये काढण्यात आले. मुलांनी जो संप केला होता त्यात ती एक देखील मागणी होती या साऱ्याची जबाबदारी अधिष्ठाता म्हणून साबळेंवर येत नाही का ? असे असंख्य प्रश्न आहेत जे आम्ही सतत विचारणारच आहोत, कारण पाणी आता डोक्यावरुन वाहू लागलं आहे.
मुनगंटीवारांनी अर्थसंकल्पात दहा कोटींची तरतूद केली. अर्थसंकल्प सुरु असताना वाहिन्यांनी त्या बातमीचं महत्व जाणून त्याची ब्रेकिंग न्यूज देखील केली. इतकंच नाही तर दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांनी त्या बातमीच्या चौकटी देखील केल्या, पण साबळे साहेबानी काय केलं ? तर त्या दहा कोटी रुपयांपैकी एक कोटी रुपयांचे गटार बांधले नऊ कोटी रुपये खर्च केलेच नाहीत. या पुढचा कहर म्हणजे नंतरच्या वर्षी सरकारनं आणखीन एकशे पन्नास कोटी जेजेला देण्याची अर्थसंकल्पात घोषणा केली. पण दहा कोटी पैकी फक्त एक कोटी खर्च करू शकले त्या साबळे साहेबानं कडून आजी माजी विद्यार्थांनी, शिक्षकांनी आणि कलाक्षेत्राने काय अपेक्षा करायची ?
साबळेंचं कर्तृत्व समजावून सांगण्यासाठी आम्ही दोनच उदाहरणं देऊ इच्छितो आणि त्यांना समजेल असा एकाच प्रश्न आम्ही विचारु इच्छितो. आपल्या अधिष्ठाता पदाच्या कारकिर्दीत जेजेच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारापासून जेजे कंपाऊंडच्या प्रवेश द्वारापर्यन्त शासनाने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या दहा कोटी रक्कमेपेकी एक कोटी रुपये खर्चून बांधून घेतलेल्या दोन किंवा तीन फर्लांगभर अंतराच्या गटाराखेरीज कोणते मोठे काम करुन दाखवले ? उरलेल्या नऊ कोटी रुपयांचे काय झाले ? त्या पैशातून जेजेच्या विद्यार्थिनीसाठी स्वछता गृह आणि कॉमन रुम बांधताआली नसती का ? या कारणावरुन मुलांनी संप केल्यावर स्वछतागृह बांधून घेण्याची वेळ साबळे यांच्यावरआली ती ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’साठी सर्वात नामुष्केची गोष्ट होती. काय झालं त्या उरलेल्या नऊ कोटी रुपयांचं ?
या काळात साबळे साहेब आणि त्यांचा गोतावळा महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांच्या सुशोभिकरणाची कामे घेत आणि ती पूर्ण करत गावगन्ना हिंडत होते. त्यांना कुठं वेळ होता जेजेचं सुशोभीकरण करण्याचा किंवा जेजेला वरच्या स्तरावर नेऊन ठेवण्याचा ? ज्या जेजेमध्ये कायम स्वरूपी असे अवघे चार पाच शिक्षक उरले आहेत – सारा कारभार कंत्राटी आणि हंगामी शिक्षकांच्या नावावर चालला आहे, त्या जेजेचा अधिष्ठाता हा ‘मुलांना बाहेरच्या कामाचा अनुभव मिळावा’ असा मोठा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेऊन जिल्ह्याजिल्ह्यातून सुशोभीकरणाची कामे करतोय. काय लायकीचं शिक्षण जेजेच्या मुलांना मिळत असेल ? याची संपूर्ण कल्पना या एकाच उदाहरणावरून येऊ शकते. सामंत कृपेने कला संचालक पदावर बसण्याची संधी मिळालेल्या साबळेंनी पहिला शासन निर्णय कोणता काढला असेल तर, तो या कामांचा. त्यांना कला शिक्षणा संदर्भात कोणता शासन निर्णय काढावा वाटला नाही. आणि या गृहस्थांना सामंत साहेबानी कलासंचालक पदावर बसवलं होतं. चंद्रकांत दादांनी ही चूक त्वरित दुरुस्त केली हे खूप बरं झालं पण दरम्यानचा काळात साबळे यांनी असंख्य उद्योग करून ठेवले होते.
‘कलावेध’ स्पर्धा हा त्यातलाच एक. त्याच्या मागे खूप मोठा कार्यकारण भाव आहे. तो समजावून सांगण्यासाठीच हा लेखन प्रपंच. तो आणखीन किती काळ चालणार आहे कुणास ठाऊक ?
– सतीश नाईक
संपादक चिन्ह आर्ट न्यूज
Related
Please login to join discussion