No products in the cart.
- Home
- Uncategorized
- अब तेरा क्या होगा कालिया?
अब तेरा क्या होगा कालिया?
चित्रकार अमित अंबालाल यांचे ‘अब तेरा क्या होगा कालिया?’ या शीर्षकाने चित्रप्रदर्शन साक्षी आर्ट गॅलरी येथे प्रदर्शित करण्यात आले आहे. अंबालाल हे स्वयंशिक्षित चित्रकार आहेत. आपला वडिलोपार्जित व्यवसाय सोडून त्यांनी चित्रकलेसाठी स्वतःला झोकून दिले. विनील भुर्के यांनी अंबालाल यांच्या या महत्वाच्या प्रदर्शनाला भेट देऊन त्यांच्या चित्रांचे रसग्रहण खास ‘चिन्ह आर्ट न्यूज’च्या वाचकांसाठी केले आहे.
चित्रांच्या जंगल-दुनियेची सफर
“अब तेरा क्या होगा कालिया?” असे कोणी कोणाला म्हटले, हे मी नव्याने सांगण्याची गरज नाही. गेल्या पन्नास वर्षांपासून भारतभर प्रत्येकाला हे वाक्य माहीत आहे. त्यामुळे हे वाक्य आणि त्याचा संदर्भ यापेक्षा वेगळे आणि नवे असे काहीतरी मी तुम्हाला सांगणार आहे. हेच शीर्षक असलेल्या प्रदर्शनाच्या रुपाने स्वयंशिक्षित चित्रकार अमित अंबालाल यांच्या चित्रांची अनोखी दुनिया मुंबईत साक्षी गॅलरीमध्ये कलारसिकांच्या भेटीला आली आहे. ७ एप्रिलपर्यंत हे प्रदर्शन रसिकांसाठी खुले असेल. दक्षिण मुंबईत कुलाबा भागामधील ‘तिसरी पास्ता लेन’ असे आकर्षक नाव असलेल्या रस्त्यावर साक्षी गॅलरी आहे. आजूबाजूला मुंबईचा शहरी कोलाहल असला तरी गॅलरीत शिरताच एक वेगळी दुनिया सुरू होते. तिथे लक्ष वेधून घेतात ती झाडांवर मुक्त संचार करणारी लहानमोठ्या आकाराची काळ्या तोंडाची लंगूर वानरे, जंगलात स्वतःच्याच मस्तीत रमलेले वाघ, पाण्यात मनसोक्त डुंबणारे हत्ती, म्हशी, कासवे आणि मासेसुद्धा! यामध्ये दुभंग व्यक्तिमत्त्व (Split personality) मानसिक विकार असलेले एक कासवसुद्धा आहे!
मुंबई शहराच्या आसपासच्या परिसरातील जंगलामधून चुकार वन्य प्राणी शहरात येण्याचे प्रकार नवीन नाहीत, परंतु हे प्रकरण जरा वेगळे आहे. मोठ्या आकाराच्या कॅनव्हासवर मुक्तपणे वावरणारे हे सर्वच प्राणी आपल्या आजूबाजूला पाहून, ते जंगलातून शहरात आलेले नसून, आपणच शहरातून जंगलात गेलो आहोत, असे वाटायला लागते. त्यांचे आविर्भाव, त्यांची मस्ती, त्यांच्या जिवंत हालचाली यामध्ये आपण रंगून जातो. ही सगळीच चित्रे जिवंत वाटतात. वानर झाडांच्या फांद्यांवरून वेड्यावाकड्या उड्या मारतात, पाण्यात उड्या मारून पाणी उडवतात, एकमेकांना भिजवतात, इतर प्राण्यांना भिववतात, वाघ कमळाची फळं चघळत त्याची गुंगी डोळ्यावर येत असताना मस्तमौला होऊन लोळतात. हत्ती पाण्यात धबडगा करतात, पाण्याची कारंजी उडवतात, इतर प्राण्यांना आणि माणसांना भिजवतात, माणसे आपले माणूसपण विसरून या खेळात सामील होतात, म्हशी सुस्तावून पाण्यात डुंबत राहतात, पाण्यातील मासे आणि कासवे मात्र या सर्वांच्या कालव्याने कावून इकडेतिकडे सुळसुळत पाणी शांत होण्याची वाट पाहतात. अशी ही अनोखी दुनिया आपल्या डोळ्यांसमोर जिवंत होते, हे खरे. थोड्या वेळाने लक्षात येते की, ही चित्रे पूर्णपणे वास्तवदर्शी नाहीतच. काही वानरे निळी तर काही चक्क हिरवी आहेत, हत्ती आणि वाघ गुलाबी रंगाचे आहेत, म्हशी आणि कासवे हे तर नुसते धूसर काळोखे आकार आहेत, तर काही कासवे लाल आहेत. कुठे पाणी लालसर करड्या रंगाचे आहे, तर कुठे आकाश पिवळसर रंगाचे आहे, काही माणसे हिरव्या रंगाची तर काही चक्क लाल आहेत. इतकंच नव्हे, तर गुरुत्वाकर्षणाच्या नियमातूनसुद्धा इथे सर्वांना सूट मिळाली आहे, असे वाटते. तरीही हा अनुभव अगदी सच्चा आहे. हे कसे काय? इथेच अंबालाल यांच्या चित्रशैलीची ओळख होऊ लागते.
अंबालाल यांची वैशिष्ट्यपूर्ण चित्रशैली
अंबालाल त्यांच्या चित्रांमध्ये आपल्याला एखादी गोष्ट प्रत्यक्षात जशी दिसते, ती तशीच्या तशी रंगवत नाहीत, तरीही आपल्याला ती प्रत्यक्षात पाहताना जशी वाटते, तशीच चित्रातही वाटते, हा काय प्रकार आहे? याचे कारण अमित अंबालाल यांनी ही चित्रे काढताना पारंपरिक ‘नाथद्वारा’ आणि ‘पिचवाई’ चित्रशैलींचा बाज घेतलेला असला, तरी त्यामध्ये चित्रातील प्रसंगाचा एकंदर मूड (भाव) अचूकपणे पकडला आहे. तो त्यांच्या रेषांमधून, आकारांमधून आणि रंगांमधून अगदी सहजपणे प्रत्यक्ष घडलेल्या त्या प्रसंगाची स्मृती आपल्यासमोर साकारतो. वानरांचा अगोचरपणा, हत्तींचा खेळकरपणा, वाघाची स्वतःमध्ये रमण्याची मस्ती, म्हशींचा आळसावलेपणा, कासवांचा हलेडुलेपणा हे सगळे त्यांनी त्यांच्या रेषांमधून, आकारांमधून बोलके केले आहे. त्यांचे रंगसुद्धा या प्राण्यांच्या व्यक्तिमत्त्वांचे भाव दर्शवतात, केवळ त्यांच्या शरिरांचे रंग नव्हे. इतकंच नव्हे तर, निसर्गातील इतर घटक म्हणजे पाणी, आकाश, जमीन हेसुद्धा त्या त्या प्रसंगात त्यांचे भाव कसे असतील, त्या भावांच्या खास रंगांमध्ये रंगवले आहेत. त्यामुळेच या चित्रांमधील पाणीसुद्धा “पानी तेरा रंग कैसा? जिसमे मिलाओ वैसा!” या उक्तीप्रमाणे कधी हिरवेगार, कधी निळेशार, कधी पांढरेशुभ्र तर कधी चक्क लालसर आहे. हे सगळे रंग त्या पाण्यात घडणाऱ्या प्रसंगांचे आहेत. या चित्रांमधील पाणी असे प्रसंगानुरूप रंग धरण करते, तसेच अनेकवेळा रंगसुद्धा चित्रांमध्ये पाण्यासारखे उसळतात, ओसंडतात आणि फवाऱ्यासारखे उडतात!
अंबालाल यांच्या चित्रशैलीचे बालकलेच्या दृष्टिकोनातून आकलन
चित्राच्या तांत्रिक बाजूविषयी थोडासा खोलात जाऊन विचार केला की असे लक्षात येते की, ही सगळी वैशिष्ट्ये ज्याला ‘बालकला’ म्हणतात त्या प्रकारच्या चित्र-तंत्राची आहेत. ‘बालकला’ म्हणजे लहान मूल होऊन चित्र काढणे. लहान मुले एखाद्या (प्रत्यक्ष दिसत असलेल्या किंवा काल्पनिक) दृश्याचे चित्र काढतात, तेव्हा ती ते दृश्य त्यांना किंवा इतरांना डोळ्यांनी जसे दिसते किंवा त्या दृश्याचे छायाचित्र काढले तर जसे दिसेल, तसे काढत नाहीत. उलट त्यांना ते दृश्य मनामध्ये कसे ‘जाणवते’ किंवा ‘भावते’, तसे काढतात. त्यामुळे लहान मुलांनी काढलेल्या चित्रांकडे अॅकेडेमिक चित्रशैलीच्या दृष्टीने पाहिले, तर त्यात अनेक वैगुण्ये आहेत, असे वाटू लागते. उदाहरणार्थ, त्या चित्रांमध्ये Perspective मध्ये गोची असते, Colour scheme मध्ये घोळ असतो, Geometry and Proportions चा आनंदीआनंद असतो, Lines चा गुंता झालेला असतो आणि Sketching चा बट्टयाबोळ झालेला असतो. हे सगळे तथाकथित दोष असूनही, ते चित्र मात्र अतिशय जिवंत आणि सृजनात्मक असते. त्यामधून त्या लहान मुलाला त्या दृश्यातून नेमके काय जाणवते आहे, त्यात प्रामुख्याने कोणते भाव आहेत, हे चित्र बघणाऱ्यांच्या सहजपणे लक्षात येते. बालकलेची हीच खासियत आहे. जिथे दृश्यातील भाव, हालचाली, जिवंतपणा व्यक्त करायचा आहे, तिथे अशी शैली वापरली जाते. अमित अंबालाल यांच्या शैलीचे वैशिष्ट्य नेमके हेच आहे. मूळ दृश्यामधील नाट्यमयता ते त्यांच्या चित्रांमधून परिणामकारकरित्या उभी करतात. त्यामुळे चित्रामध्ये दृश्य वास्तवाचे यथार्थ चित्रण नसले, तरीही त्यातील भाव बघणाऱ्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचतात. त्यातूनच एक जादुई दुनिया उभी राहते, चित्र बघणारा त्या दुनियेत ओढला जातो, आणि तिथेच रमतो.
बालकलेचे महत्त्व आणि उपयोजन
बालकला या विषयाची व्याप्ती मोठी आहे, ती या लेखात सामावणारी नाही. तरीही बालकलेचे शिक्षणातील महत्त्व स्पष्ट होण्यासाठी काही गोष्टींचा थोडक्यात उल्लेख करतो. युरोपात १८५० च्या सुमारास बालकलेचा स्वतंत्रपणे विचार सुरू झाला. व्हिएन्नातील फ्रांटस् सिझेक या तंत्रज्ञाने शिक्षणक्षेत्रात बालकलेचे धाडसी प्रयोग प्रथम केले. बालकांच्या व्यक्तिविकासाचे एक साधन म्हणून बालकलेला शिक्षणक्षेत्रात फार मोठे स्थान आहे. या विचारांचे पहिले बीज जे जे स्कूल ऑफ आर्टमधील चित्रकला विषयाचे प्राध्यापक प्रल्हाद अनंत धोंड यांनी शिक्षणक्षेत्रात पेरले. त्यामुळे महाराष्ट्रात बालकलेला सर्वसाधारण शिक्षणात स्थान मिळाले (संदर्भ: मराठी विश्वकोश खंड ११). हाच विचार पुढे नेला, तर असे वाटते की बालकलेचा अभ्यास आपल्या कलाशिक्षणाच्या अभ्यासक्रमातही केला जावा. कारण चित्रकलेचे, अॅकेडेमिक चित्रशैलीचे औपचारिक शिक्षण घेऊन अनेक वर्षे कलेची उपासना केलेले अनेक मोठे चित्रकार त्यांच्या कारकिर्दीच्या नंतरच्या काळात पुन्हा लहान मुलांसारखे होऊन चित्र काढू लागतात आणि त्यामधून त्यांना नवे आणि मौल्यवान असे काहीतरी सापडते, ही वस्तुस्थिती आहे. अंबालाल यांच्यासारख्या स्वयंशिक्षित चित्रकाराच्या उदाहरणावरून हे अधिक स्पष्ट होते. असे असेल तर बालकलेसंबंधीच्या या विचारसरणीचा आणि त्यामधून निर्माण होणाऱ्या चित्रशैलीचा अंतर्भाव कलेच्या औपचारिक शिक्षणामध्येच केला, तर ही शोध-प्रक्रिया अधिक जोमाने होऊ शकेल. यावर अधिक विचार व संशोधन व्हायला हवे.
अमित अंबालाल: एक स्वयंशिक्षित चित्रकार
अमित अंबालाल हे मूळचे गुजरातमधील अहमदाबादचे निवासी. कला, वाणिज्य व कायदा या तीन विद्याशाखांच्या पदव्या त्यांच्याकडे आहेत. ते स्वतःचा व्यवसाय करत होते. परंतु लहानपणापासूनच त्यांना चित्रकार व्हावेसे वाटत असे. त्यामुळे १९७७ मध्ये वयाच्या ३४ व्या वर्षी त्यांनी आपला वडिलोपार्जित व्यवसाय बंद करून पूर्णवेळ चित्रकार होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याकडे चित्रकलेचे औपचारिक शिक्षण नव्हते परंतु त्यांना गुजरातमधील सुप्रसिद्ध चित्रकार छगनलाल जाधव यांचे मार्गदर्शन मिळाले. ते जलरंग व अॅक्रीलिक रंग वापरतात, तसेच काही वेळा Intaglio तंत्राचासुद्धा वापर करतात. त्यांच्या चित्रांमध्ये अनेक प्राणी तसेच देवादिकांच्या, गुरूंच्या प्रतिमा येतात आणि त्याची प्रेरणा त्यांना भारतीय पारंपरिक कला, miniature painting, आदिवासी कला इत्यादींमधून मिळते. ‘नाथद्वारा’ आणि ‘पिचवाई’ या पारंपरिक चित्रशैलींचा अभ्यास करून त्यामधील परंपरेचा बाज त्यांनी आपल्या चित्रांमध्ये घेतला आहे आणि त्याला कलेसंबंधीच्या नवविचारांची जोड दिली आहे. त्यासाठी प्रसंगी ते प्रस्थापित चित्र-संकेतांचा भंग करून त्यामधून त्यांच्या नव्या नाट्यमय शैलीचा आविष्कार करतात आणि त्याद्वारे एखाद्या विषयावर गमतीशीर पण मार्मिक भाष्य करतात. त्यांना १९६८ मध्ये गुजरात ललित कला अकादमी पुरस्कार व १९९९ मध्ये इटलीच्या Civitella Ranieri Foundation ची Fellowship असे सन्मान प्राप्त झाले आहेत. आतापर्यंत त्यांची ४० पेक्षा जास्त चित्रप्रदर्शने झालेली असली तरीही ते स्वतःला चित्रकलेचा विद्यार्थी मानतात.
संदर्भ:
- साक्षी गॅलरीचे संकेतस्थळ. यावर आपण अमित अंबालाल यांच्या “तेरा क्या होगा कालिया” या प्रदर्शनातील चित्रांची छायाचित्रे पाहू शकता.
https://sakshigallery.com/details?section=exhibition&id=648&ref=%2fexhibition
- जहांगीर निकोलसन आर्ट फाऊंडेशन (JNAF), मुंबई यांचे संकेतस्थळ. यावर आपण अमित अंबालाल यांची जीवनी आणि JNAF च्या संग्रहातील त्यांच्या चित्रांची छायाचित्रे पाहू शकता.
https://jnaf.org/artist/amit-ambalal/
- Archer Art Gallery, अहमदाबाद यांचे संकेतस्थळ. यावर आपण त्यांच्या संग्रहातील अमित अंबालाल यांच्या चित्रांची छायाचित्रे पाहू शकता.
https://www.archerindia.com/amit-ambalal?p=1
बालकला. मराठी विश्वकोश (खंड ११) मधील नोंद.
https://vishwakosh.marathi.gov.in/29271/
*****
– विनील भुर्के
लेखक स्वयंशिक्षित चित्रकार व कला-अभ्यासक आहेत.
Related
Please login to join discussion