No products in the cart.
काय झालं? कसं झालं?
जे जे स्कूल ऑफ आर्ट आणि अन्य तीन शासकीय कला महाविद्यालयांच्या प्राध्यापक भरतीसंदर्भात आम्ही जी लेखमाला प्रसिद्ध करतो आहोत तिची व्याप्ती सतत वाढते आहे. रोज नवीनवी माहिती हाती येत आहे. वेबसाईटसाठी लिहीत असल्यामुळं शब्दसंख्येचं भान हे राखावंच लागतं. ‘चिन्ह‘चा बहुतांशी वाचक आपल्या मोबाईलवरच हे लेख वाचत असल्यामुळं शब्दसंख्येची मर्यादा ही पाळावीच लागते. पण त्यामुळेही लेखमाला वाढते आहे असं नाही तर मूळ कट कारस्थान कसं शिजलं? कुठं शिजलं? कुणी शिजवलं? ही सर्वच माहिती ज्याला ‘हॉर्सेस माऊथ‘ अशा लोकांकडूनच हाती येत असल्यामुळं ही लेखमाला लांब लांब होत चालली आहे. तिचा शेवट मात्र चांगला व्हावा अशीच आमची अपेक्षा आहे. तुमचंही तेच मत असेल नाही का?
जे जे स्कूल ऑफ आर्ट आणि अन्य तीन शासकीय कला महाविद्यालयातील सुमारे दीडशे प्राध्यापक पदाच्या भरतीसाठी लोकसेवा आयोगानं जी जाहिरात प्रकाशित केली तिच्यावर टीका करणारे लेख मी सातत्यानं लिहितो आहे. सर्वसामान्य माणसांना असं वाटण्याची शक्यता आहे की ‘काय हे सारखं जेजे जेजे चालवलं आहे’ वगैरे. जे जे ही भारतीय कलेची मातृसंस्था आहे. या संस्थेचं उद्दिष्ट आणि ध्येय डोळ्यासमोर ठेवूनच भारतात नंतरच्या काळात अन्य कलाशिक्षण संस्थांची निर्मिती झाली.
१६६ वर्षाच्या इतिहासात गेली तीस वर्ष वगळता या संस्थेनं कलाशिक्षणाबाबत खूप मोठं कार्य केलं आहे. खूप मोठे कलावंत घडवले आहेत. आणि अशी ऐतिहासिक वारसा लाभलेली संस्था राज्यकर्त्यांच्या अनास्थेपायी, भ्रष्ट नोकरशाहांच्या विळख्यात सापडून कालांतरानं काळाच्या उदरात गडप होऊ नये या हेतूनं ‘चिन्ह’नं हे कार्य हाती घेतलं आहे. मी स्वतः जे जे स्कूल ऑफ आर्टचाच माजी विद्यार्थी. आपण हयात असताना आपल्या आवडत्या कॉलेजची ही अशी अवहेलना केली जात आहे हे पाहूनच मी लेखणी हाती घेतली आणि सटासट बडवत सुटलो आहे. मी जर हे केलं नसतं तर मी स्वतःलाच माफ करू शकलो नसतो.
आता चाळीस वर्षानंतर का होईना प्राध्यापक भरतीची प्रक्रिया सुरु झाल्यामुळं गिधाडांचे थवेच्या थवे जेजे परिसरावर घिरट्या घालू लागले आहेत. या साऱ्याला कुठंतरी आळा बसावा या एकमेव हेतूनंच मी कार्य हाती घेतलं आहे. त्यामुळं इथून पुढं आणखीन काही काळ तरी जे जे स्कूल ऑफ आर्ट, कला संचालनालय यांचे उल्लेख माझ्या लेखनात सातत्यानं येणारच. चित्रकलाविषयक अन्य लेखनदेखील आम्ही सतत प्रकाशित करीत असतो. पण कोरोना लॉकडाउनच्या काळात हे संपूर्ण क्षेत्र विकलांग झालं असल्यानं अजूनही या क्षेत्रात फारसं घडू लागलेलं नाही. त्यामुळेच चित्रकलाविषयक अन्य घडामोडींना ‘चिन्ह आर्ट न्यूज’मध्ये तुलनेनं कमी स्थान मिळतं आहे ही वस्तुस्थिती आहे. येत्या दिवाळीनंतर मात्र त्यात चांगला बदल अपेक्षित आहे. आणि तो जर झाला तर त्याविषयीचे लेखन निश्चितपणानं ‘चिन्ह आर्ट न्यूज’ मध्ये वाचायला मिळेल याची खात्री बाळगा.
लोकसेवा आयोगाच्या जाहिरातीसंदर्भात मी करत असलेलं लेखन मोठ्या प्रमाणावर वाचलं जात आहे. सर्वसामान्य वाचकांना त्यात जरी फारसा रस नसला तरी कलाक्षेत्रातील कलावंत, शिक्षक, विद्यार्थी आणि रसिक यांच्याकडून मात्र हे लेखन मोठ्या प्रमाणावर वाचलं जात आहे. प्रतिक्रिया फारशा येत नाहीत कारण सारेच दबकून असतात. समजा आपण प्रतिक्रिया दिली आणि ती नाही आवडली तर आपल्यावर कला संचालकांच्या कार्यालयातून कुणी कारवाई तर करणार नाही ना? काहीच नाही तर जहांगीर तर कुणी नाकारणार नाही ना? असे बरेच समज-अपसमज चित्रकारांमध्ये असल्यामुळे प्रतिक्रिया या फारशा येत नाहीत. प्रतिक्रिया न येण्यामागचं आणखीन एक कारण म्हणजे छापील किंवा लिखित माध्यमाचा कुठलाही प्रभाव या क्षेत्रातल्या लोकांवर नसल्यामुळे लिहायचं म्हणजे जरा घाबराघुबरीच होते. या कलावंतांच्या व्हाट्सअप ग्रुपवर सतत फक्त फॉर्वर्डसच इकडून तिकडे जात असतात. लिहिणारे मुद्दलातच कमी. साहजिकच प्रतिक्रिया या फारशा येत नाहीतच.
लिहिणाऱ्यांची या क्षेत्रात इतकी बोंब आहे की पीएचडी मिळवणाऱ्या बऱ्याच जणांना मातृभाषा मराठीतसुद्धा नावपत्ता लिहितांना चक्क घाम फुटतो. या पार्श्वभूमीवर परवा ‘आरोग्य खात्याचं कला संचालनालय झालंय’ या लेखासंदर्भात प्रतिक्रिया देताना शिरीष मिठबावकर यांनी लिहिलेलं वाक्यदेखील मला अस्वस्थ करून गेलं. त्यांनी लिहिलं होतं ‘तसे तर कलेचे विद्यार्थी गेली कितीतरी वर्ष मरतच आहेत.’
अक्षरशः खरं आहे शिरीष मिठबावकर यांचं हे विधान. अक्षरशः एका वाक्यात त्यांनी शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची व्यथा व्यक्त केली आहे यात शंकाच नाही. गेल्या २५-३० वर्षात महाराष्ट्रातल्या चित्रकारांच्या तेवढ्याच पिढ्यानी हे सारं सोसलं आहे याची ना कुणा राज्यकर्त्यांना खंत ना खेद. खरोखरच महाराष्ट्राला अतिशय लाजिरवाणी अशी ही बाब आहे. कोणे एके काळी चार शासकीय कला महाविद्यालयं आणि २०-२१ अनुदानित कला महाविद्यालयं यांचा कारभार अतिशय सुखनैव पद्धतीनं चालला होता. कला संचालकांचंदेखील साऱ्यावर बारकाईनं लक्ष असायचं. पण पुण्याच्या अभिनवचे मुरलीधर नांगरे नावाचे गृहस्थ कला संचालक झाले आणि फक्त एका वर्षात महाराष्ट्रात सुलभ शौचालयांप्रमाणे सुमारे २०० विनाअनुदानित कला महाविद्यालयं सुरु झाली. आणि तिथूनच कला संचालनालयाला नाट लागायला सुरुवात झाली. नांगरे यांनी कुठलीही गैर कृत्य करण्याचं शिल्लक ठेवलं नाही. ज्यांची शिडी चढून ते इथवर आले होते त्या अभिनव कला महाविद्यालयाची आणि त्यातल्या शिक्षकांचीदेखील त्यांनी वाताहत करून टाकली.
त्यांचाच कित्ता नंतरच्या कला संचालकांनी यथेच्छ गिरवला. आणि शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी आणि कला संचालक दादा आडारकर यांच्या स्वप्नांची त्यांनी अक्षरशः राख रांगोळी करून टाकली. चित्रकार माधवराव सातवळेकर आणि बाबुराव सडवेलकर यांच्या कालखंडात वरवर चढत गेलेला कला संचालनालयाचा ग्राफ नंतरच्या काळात उतरताच राहिला. आणि आता सध्याच्या तिथल्या अधिकाऱ्यांच्या कालखंडात तर जमिनीत गडपला गेला आहे की काय असे वाटावे अशी स्थिती आहे.
वास्तविक पाहता आज कला संचालनालयाचा कारभार ज्यांच्या हातात आहे. त्यांचा आणि चित्रकलेचा शष्पदेखील संबंध नाही. साधी पाच भारतीय चित्रकारांची नावं सांगा असा प्रश्न विचारला तर त्या प्रश्नांची उत्तरं देतानासुद्धा त्यांना फेफरं येईल अशी परिस्थिती आहे. अशा आचरटांच्या हाती उच्च व तंत्रशिक्षण विभागानं मानाचं कला संचालनालय सोपवलं आहे. साहजिकच माकडाच्या हाती कोलीत दिल्यावर जे काही होतं तेच या कला संचालनालयाच्या बाबतीत घडलं आहे.
या साऱ्या पार्श्वभूमीवर जे जे स्कूल ऑफ आर्ट आणि अन्य तीन कला महाविद्यालयातील अध्यापक-प्राध्यापकांच्या जागा भरण्याचा कट कुणी शिजवला? तो कसा प्रत्यक्षात आणला? कुणाकुणाची मदत घेतली गेली? या साऱ्याविषयी आम्ही सविस्तर लिहिणार आहोत. पण ते उद्यापासून. अवश्य वाचा आणि महाराष्ट्राच्या प्रशासन व्यवस्थेची काय अवस्था झाली आहे ते जाणून घ्या.
सतीश नाईक
संपादक ‘चिन्ह आर्ट न्यूज’
Related
Please login to join discussion