No products in the cart.
योगियांचा राजा
चित्रकला ही एक साधना आहे. त्यामुळेच ही साधना करणाऱ्यांना ईश्वरप्राप्तीचा साधना करणं शक्य होत असावं. कदाचित यामुळेच जेजेमध्ये शिकलेला एक उत्कृष्ट चित्रकार अध्यात्माकडे वळतो आणि चक्क संन्यास घेऊन ईश्वरभक्तीमध्ये तल्लीन होतो. जेजेचे फेलो, उत्कृष्ट व्यक्तिचित्रण करणारे प्रा. धनंजय वर्मा अर्थात महंत वैद्यराज यक्षदेव बाबा यांची ही कहाणी विलक्षण आहे. झळाळती चित्रकला कारकीर्द वेगात सुरु असताना धनंजयसिंग वर्मा यांना अध्यात्माची गोडी लागली. ती इतकी की त्यांनी लग्नही केलं नाही. त्यांनी महानुभाव पंथाची दीक्षा घेतली आणि आयुष्यभर परमेश्वर प्राप्तीची वाट पकडली. नागपूरमध्ये बरीच वर्ष त्यांनी विद्यार्थ्यांना घडवलं. त्यांच्या लाडक्या विद्यार्थ्यांपैकी एक म्हणजे चित्रकार विजय ढोरे. विजय ढोरे हे केंद्रीय हिंदी संस्थानसाठी आर्टिस्ट म्हणून काम करतात. केंद्रीय हिंदी संस्थान तर्फे प्रकाशित अनेक पुस्तके त्यांच्या कुंचल्याने सजलेली आहेत. ढोरे यांचा हैद्राबाद येथेच स्टुडिओ आहे आणि त्यांनी अनेक चित्र प्रदर्शनात भागही घेतला आहे. महंत यक्षराज बाबा हे त्यांचे चित्रकलेतील आणि अध्यात्मिक गुरुही आहेत. सात्विक, विनयशील, भक्तांना परमेश्वराची वाट दाखवणाऱ्या महंत यक्षराज बाबांबद्दल तेच चित्रकार विजय ढोरे हे आठवणी सांगत आहेत.
वैद्यराज यक्षदेव बाबा यांची आणि माझी पहिली भेट झाली ती नागपूरच्या शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालयात. तिथे मी फौंडेशन कोर्ससाठी प्रवेश घेतला होता. पुढे बीएफएचं शिक्षणही मी याच संस्थेत पूर्ण केलं. यक्षदेव बाबा अर्थात पूर्वाश्रमीचे धनंजय वर्मा सर आम्हाला व्यक्तिचित्रण खूप छान शिकवायचे. त्यांचा सर्व भर हा स्केचिंगवर अधिक असायचा. सर म्हणायचे खूप सराव करा. मगच रेषेमध्ये ताकद येईल. शंकर पळशीकर सरांच्या तालमीत तयार झाल्यामुळे सरांची पोर्ट्रेट या विषयावर हुकूमत होती. सरांच्या मते पोर्ट्रेट हे एखाद्या फोटोग्राफर सारखं हुबेहूब काढण्यापेक्षा मॉडेलच व्यक्तिमत्व, त्याच्या मनातील भावतरंग त्या पोर्ट्रेटमध्ये उतरण महत्वाचं आहे. असं झालं तरच तुमचं पोर्ट्रेट यशस्वी झालं म्हणून समजायचं.
वर्मा सर जेजे स्कूल ऑफ आर्टचे हुशार विद्यार्थी होते. डॉली कर्सेटजी अवॉर्ड, उषा देशमुख अवॉर्ड, बॉम्बे आर्ट सोसायटीचे अवॉर्ड असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. जेजे स्कूल ऑफ आर्टची फेलोशिप मिळाल्यामुळे तिथेच ते शिक्षक म्हणून रुजू झाले. सात्विक, विनयशील स्वभाव आणि शिकवण्याची हातोटी यामुळे ते विद्यार्थी प्रिय शिक्षक होते. तरुणवयापासूनच त्यांना अध्यात्माची ओढ होती. अमरावती येथील वाठोडा शुक्लेश्वर या गावी त्यांचा जन्म झाला होता. या गावात त्यांच्या घराजवळच महानुभाव पंथाचे मंदिर होते. त्यामुळे लहानपणापासूनच महानुभाव संतांच्या सानिध्यात ते वाढले. या पंथाच्या तत्वज्ञानाचा त्यांच्यावर प्रभाव होता. तरुण वयात जेजेमध्ये शिकतानाही त्यांनी अध्यात्माची कास कधीच सोडली नाही. पुढे ते महानुभाव अध्यात्मिक मार्गाशी इतके एकरूप झाले की त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला.
अध्यात्मात त्यांनी खूप प्रगती साधली होती. त्यांची चित्र साधनाही या मार्गासाठी पूरकच होती. पोर्ट्रेट चित्रणात त्यांचा जबरदस्त हातखंडा होता. त्यामुळे कॉलेजमध्ये ते जेव्हाही प्रात्यक्षिक देत तेव्हा बघणाऱ्यांची खूप गर्दी होत असे. त्यांचं पोर्ट्रेट चित्रण उत्तम होतंच पण ते करताना तल्लीन झालेल्या सरांना पाहणं हा देखील एक सोहळाच असे. चित्र काढताना ब्रश पकडण्याची त्यांची लकबही वैशिष्टयपूर्ण होती. आपण ताल वाद्य वाजवणारे ड्रमर नेहमी बघतो. एखादा ड्रमर ज्या पद्धतीनं ड्रम वाजवण्याच्या स्टिक्स हातात पकडतो त्यापद्धतीनं ते ब्रश एकदम टोकाला पकडायचे आणि एखाद ताल वाद्य वाजवल्याप्रमाणे ब्रशचे वेगवान फटकारे कॅनव्हासवर उमटायचे. हा एक नेत्र सूखद सोहळाच असायचा. एवढी वर्षं झाली सरांची प्रात्यक्षिकं पाहून, पण आजही ते दृश्य डोळ्यांसमोर जसाच्या तस उभं राहतं. पोर्ट्रेट चित्रण करताना मॉडेलच्या शरीरावरील लोकरीचे कपडे चित्रित करणं खूप जिकिरीचं काम असतं. पण सर ते सहज चित्रित करायचे. त्यांच्या चित्रांमध्ये कुठेही अनावश्यक रंग वापरलाय, रंगांचे थरच्या थर कॅनव्हासवर चोपडले आहेत असं कधीच नव्हतं. सारं काम कसं मोजून मापून शिस्तीत व्हायचं. चुकांसाठी जागाच नसायची. सगळं काही बिनचूक आणि आखीव रेखीव. तरीही कलात्मक, मोहक आणि शैलीदार काम सर करायचे.
जेजेमध्ये शिकवत असतानाच सरांना नागपूरच्या कला महाविद्यालयात शिकवण्याची संधी आली आणि सरांनी या संधीचा आनंदानेच स्वीकार केला. खरं तर जेजेमध्ये त्या काळात शिकवणारे शिक्षक मुंबई अनिच्छेनेच सोडत. मुंबईत मिळणारी संधी कोणालाच सोडावीशी वाटत नसे. पण आमच्या सरांसाठी मात्र मुंबई, नागपूर एकच होतं. दोन्ही ठिकाणी त्यांनी तितक्याच तळमळीनं काम केलं. विद्यार्थ्यांना मुक्तहस्ताने ज्ञान वाटलं. अध्यात्मिक पायावर सरांचं जगण्याचं तत्वज्ञान तयार झाल्यामुळेच सरांना मुंबईचा मोह सोडणं शक्य झालं असावं.
सर अध्यात्मिक असले तर ते विद्यार्थ्यांशी खेळीमेळीनं वागत. लहानशी लहान होऊन त्यांच्यात मिसळत. महंत झाल्यानंतरही ते अनेक मुलांना चित्रकला शिकवत असत. मी सरांचा लाडका विद्यार्थी होतो. महानुभाव पंथाशीही सरांमुळेच माझा जवळून परिचय झाला. सरांच्या सहवासात मला एवढं कळलं होतं की सर अध्यात्मिक मार्गात खूप पुढे गेले आहेत. कुठेतरी मला असंही वाटत की अध्यात्मिक मार्गात जेव्हा मनुष्य ध्यानाच्या सर्वोच्च मार्गावर पोहोचतो तेव्हा त्याची कुंडलिनी जागृत होते, ती सिद्धी सरांनाही प्राप्त झाली असावी. कारण मुळातच तेजस्वी रूप लाभलेले सर जितके अध्यात्माशी एकरूप होत गेले त्यांच्या चेहऱ्यावरील तेज आणखीनच वाढत गेलं. त्यांच्याशी होणाऱ्या प्रत्येक भेटीत माझ्या ते लक्षात येत असे. तुम्ही जर त्यांचे फोटो पहिले तर तुम्हालाही ते समजेलच. सरांचा सहवासही मला कायम प्रगल्भच करत आला आहे. सरांच्या डायरीचा काही भागही माझ्याकडे आहे. त्यातून त्यांचे विचार समजतात.
चित्रकलेची ओढ असणारे सगळेच तरुण जेजेमध्ये प्रवेश मिळावा म्हणून धडपडत असतात. कारण तिथे असणारे एकापेक्षा एक नावाजलेले प्राध्यापक ( निदान आमच्या वेळी तरी तसंच होतं.) आणि त्यांच्या सहवासात शिकण्याची मिळणारी संधी. मी मात्र स्वतःला भाग्यवान समजतो की नागपूरच्या शासकीय कला महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथे प्रवेश घेतला म्हणूनच मला वर्मा सर भेटले. आणि त्यांच्या सहवासात मी केवळ चित्रकलाच नाही तर जीवन जगण्याची कलाही शिकलो.
त्यामुळे सरांसोबतची प्रत्येक भेट मला एक सकारात्मक ऊर्जा देत असायची. काही महिन्यापूर्वी मी सरांची भेट घेतली होती. यावेळी माझी आईही सोबत होती. पुढच्या भेटीचं नियोजन करतानाच ही दुःखद बातमी कळली आणि मला धक्का बसला. आता पुढे सरांशी कधी भेट होणार नाही याचं दुःख मला कायम राहील. माझ्या या सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.
*******
– विजय ढोरे
शब्दांकन : कनक वाईकर
वर्मा सर ( यक्षराज बाबा) यांच्या फोटोंविषयी विचारलं असता, विजय ढोरे यांनी वर्मा सरांची उत्तम चित्रे, जुने फोटो आणि डायरीचा खजिनाच जमा केला आहे हे त्यांनी मला सांगितलं. खरं तर या फोटोंचं एक प्रदर्शन शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय नागपूर येथे भरवण्याचा त्यांचा मानस आहे. मी हे फोटो प्रसिद्ध करण्यासाठी मागताच सरांनी हा संग्रह ‘चिन्ह’च्या वाचकांसाठी खुला केला आहे. त्यामुळे विजय ढोरे सरांचे आभार.
– कनक वाईकर
Related
Please login to join discussion