No products in the cart.
कोई माने या न ‘माने’!
पण भ्रष्टाचार तर झाला आहेच. औरंगाबादच्या ‘शाकम’मध्ये नुकत्याच तासिका तत्त्वावरील शिक्षकांच्या नेमणुका झाल्या. या नेमणुका अर्थातच वादग्रस्त ठरल्या कारण त्या करताना अनुभवी उमेदवारांना डावलून गतवर्षी शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांची निवड ठरवून करण्यात आली असा आरोप औरंगाबादचे स्थानिक उमेदवार करीत आहेत. त्यांच्या तक्रारीमध्ये तथ्य आढळल्यामुळे हा विशेष लेख प्रकाशित करीत आहोत.
जेजेचे प्रश्न मार्गी लागल्याबरोबर आता औरंगाबादवरूनदेखील मोठया संख्येने फोन येऊ लागले आहेत. हे फोन अर्थातच तिथल्या शासकीय कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे, माजी विद्यार्थ्यांचे किंवा क्वचित प्रसंगी माजी शिक्षकांचे असतात. साऱ्यांचं म्हणणं एकच असतं की तुम्ही जसं जेजेच्या बाबतीत केलं तसं आमच्या बाबतीत का करत नाही ? काहीजण तर असंही म्हणतात, ‘आम्ही मराठवाड्याचे म्हणून आम्हाला हा न्याय का?’ अशा प्रकारच्या भाषेकडे मी साधारणपणे दुर्लक्ष करतो. जात, पात, प्रांत हे प्रश्न माझ्या दृष्टीने अत्यंत गौण आहेत. पण अनेकदा ही मंडळी अशी पूर्वग्रहदूषित किंवा राजकीय भूमिका घेऊन आलेली असतात की त्यांच्याशी बोलणंदेखील अवघड होऊन बसतं. मराठवाड्यावर अन्याय हे पालुपद ते काही सोडत नाहीत. त्यामुळे अशांशी संवाद मी तात्काळ थांबवतो आणि फोनमधून त्यांचा नंबर डिलीट देखील करून टाकतो.
खरंतर औरंगाबादच्या शासकीय महाविद्यालयासंबंधी आम्ही आतापर्यंत अनेक वृत्तांत प्रसिद्ध केले आहेत. अर्थातच माहिती मिळवण्याच्या बाबतीत आमची संपर्क व्यवस्था कमी असल्यामुळं असं घडत असावं. पण ती त्रुटी आम्ही आता दूर केली आहे. आता पुढलं टार्गेट ‘शाकम’ औरंगाबाद असणार हे निश्चित.
तिथल्या अधिकाऱ्यांबद्दल येणाऱ्या तक्रारींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागली आहे. आमचे एक मित्र तर सांगत होते (ते शिक्षण मंत्र्यांच्या मित्रपरिवारातले आहेत.) की तिथल्या अधिकाऱ्यांविषयी किंवा अधिष्ठात्यांविषयी मोठ्या प्रमाणावर इतक्या मोठ्या प्रमाणावर भयंकर तक्रारी त्यांच्या खात्याकडे आल्या आहेत की ही अशी माणसं कशी निवडली गेली याविषयीच त्यांना आश्चर्य वाटत होतं. वगैरे. असं जर असेल तर हे चांगलंच लक्षण आहे असं म्हणायला हवं. असो.
अलीकडे तासिका तत्वावर ‘शाकम’ औरंगाबादमध्ये सुमारे तीन-चार डझन शिक्षकांच्या तात्पुरत्या नेमणूक झाल्या. त्यासंदर्भात अतिशय वाईट प्रतिक्रिया आमच्यापर्यंत येत आहेत. अगदी उदाहरण सांगायचं झालं तर या संदर्भातला जीआर प्रकाशित झाला तो २३ मार्च २०२३ रोजी. पण त्यासंदर्भात कारवाई होण्यासाठी २० जून २०२३ हा दिवस उजाडावा लागला. यावरून तिथल्या अधिष्ठाता किंवा तत्सम अधिकाऱ्यांना मुलांच्या शिक्षणाची किती काळजी असेल ते समजून येतं.
या तासिका तत्त्वावरील नेमणुकांसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज आले होते. त्यासाठी चार शिक्षकांची निवड समिती तयार करण्यात आली होती. त्यातले एक होते ‘शाकम’चे अधिष्ठाता रमेश वडजे हे. ते म्हणे शिल्पकार आहेत. दुसरे होते विजय सुरळकर ते उपयोजित कलेसाठी नेमले गेले होते. तर तिसऱ्या होत्या शायनी देठे. त्यांचा वस्त्रकला हा विषय आहे. तर चौथे होते श्री विनोद दांडगे. त्यांचा आणि चित्रकलेचा काहीएक संबंध नाही. ते बहुदा कागदपत्र तयार करण्यासाठी असावेत. खरं तर ते अत्यंत आजारी होते. मुंबई आणि औरंगाबाद अशा दोन्ही ठिकाणी ते काम करत असतात. काही महिन्यांपूर्वी मुंबईत असताना एके दिवशी अचानक बेशुद्ध झाले, अतिशय आजारी पडले. पण असं असताना त्यांचं नाव का दिलं होतं हे फक्त वडजेच जाणो. कारण श्री विनोद दांडगे हे संपूर्ण मुलाखतीच्या वेळी अनुपस्थितच होते.
याशिवाय मुंबईवरून जे जे स्कूल ऑफ आर्टमधले एक प्राध्यापक गणेश तरतरे हे मुलाखती घेण्यासाठी ‘बाह्यविषय तज्ज्ञ’ म्हणून आले होते. ते मुंबईत जेजेमध्ये कला व प्रशिक्षण विभागात शिकवतात. या संपूर्ण समितीमध्ये रंगकला व रेखाकला विभागातील शिक्षकांच्या मुलाखती घेण्यासाठी एकाही शिक्षकाची नेमणूक केले गेली नव्हती हे आपल्या लक्षात येईल. इथूनच मुलाखतींचा हा सारा प्रकार संशयास्पद वाटू लागतो.
रंगकला व रेखाकला विभागासाठी त्यांना आणखीन एका मुलाखतकर्त्यांची गरज भासली नाही कारण रंगकला व रेखाकला विभागासाठी निवडले गेलेले तीन-चार उमेदवार तर मुंबईहूनच निवडून पाठवण्यात आले होते असा आरोप या मुलाखतीला उपस्थित राहिलेले उमेदवार थेट करतात. या संदर्भात मुंबईत जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये चौकशी केली असता मुंबईतल्या संबंधितांनी त्यास दुजोराच दिला. म्हणाले त्यातल्या एका उमेदवाराने तर मुलाखतीला जाण्याच्या आदल्या दिवशी जेजेच्या परिसरात जाहीरच केलं होतं की, ‘आता मी औरंगाबादला चाललो, आता काही मी इतक्यात मुंबईला येणार नाही. तासिका तत्वावर औरंगाबादला जे शिक्षक नेमले जाणार आहेत त्यात माझी निवड साहेबांनी केलेली आहे. (साहेब म्हणजे कोण? हे एव्हाना ‘चिन्ह’च्या वाचकांना कळले असेलच ) माझीच नाही तर अन्य दोघा-तिघांची निवड देखील साहेबांनीच करुन दिली आहे. तिकडे फक्त फॉर्मॅलिटी पूर्ण करण्यासाठी चाललो आहे.’ असंही त्यानं छातीठोकपणे सांगितलं. त्याच्या अगदी जवळच्या मित्रांना त्यांनी पार्टी दिल्याचेदेखील कळले.
हे जे दोन- तीन उमेदवार होते जे मुंबईहून गेले होते ते मुंबईतल्या साहेबांची म्हणे कामं करतात. कामं करतात याचा अर्थ कृपया असा करून घेऊ नका की, ते साहेबांकडे धुणीभांडी करतात, कलेत असलेल्या सरकारी पदावरील साहेबांचं दुसरं काय करणार? तर कलाक्षेत्रातील आपल्या सरकारी स्थानामुळे जी काही लाखोंच नव्हे तर कोट्यवधी रुपयांची धंदेवाईक कामं त्यांच्या कला महाविद्यालयाकडे येतात ती कामं साहेब अंगावर घेतात आणि मग आपल्या गोटातल्या लोकांना वाटून टाकतात. छोटीमोठी जी कामं असतात ती कामं पूर्ण करण्यासाठी साहेब अशा गरजवंत विद्यार्थ्यांना हाताशी धरतात. त्यामुळे व्यावसायिक कलावंतांना जो मेहनताना द्यावा लागतो तो त्यांना इथं द्यावा लागत नाही. विद्यार्थीदेखील अत्यंत गरजू असतात. मुंबईत पैशाची चिंता सतत जाणवत असते. घरून तरी किती पैसे मागवणार? त्यामुळे साहेबांच्या सापळ्यात अलगदपणे अडकतात. आणि धंद्याला लागतात. कलेमधली अभिजातता विसरून जातात. शिक्षणाची चार वर्ष अशा प्रकारे ताबडून घेतल्यानंतर साहेब अशा विद्यार्थ्यांना जिथे शक्य असेल तिथे चिकटवतात.
औरंगाबादमध्ये अशाच काही विद्यार्थ्यांना त्यांनी चिकटवलं असा आरोप औरंगाबादमधले निवड न झालेले उमेदवार नावानिशीवार करतात. एका उमेदवाराने तर असं सांगितलं की ज्यांना निवडलं गेलं त्यांना अध्यापनाचा कुठलाही अनुभव नाही. अगदी गेल्या वर्षी परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी इथं निवडले गेले आहेत. आणि ज्यांना अनुभव आहे किंबहुना शाकममध्येच ज्यांनी आधी शिकवलं आहे असे मराठवाड्यातलेच स्थानिक उमेदवार / शिक्षक यात डावलले गेले आहेत. हा कुठला न्याय ? असं जर घडलं असेल तर ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. या साऱ्या प्रकरणाची उच्च व तंत्रशिक्षण खात्याने त्वरित दखल घेऊन चौकशीच केली पाहिजे.
तसेच ज्या पद्धतीने निवड समितीचे सदस्य निवडले गेले त्याचीही चौकशी झाली पाहिजे. श्री गणेश तरतरे यांची या निवड समितीत निवड झालीच कशी? कुणी यांची निवड केली? वास्तविक पाहता ते शिक्षक प्रशिक्षक विभागात शिकवतात. ‘बाह्य विषय तज्ञ म्हणून इथं त्यांची निवड झालीच कशी?’ शिल्पकला, फाईन आर्ट, वस्त्रकला या विषयामधले ‘बाह्य विषय तज्ञ म्हणून त्यांची निवड झाली असेल तर हीदेखील अत्यंत गंभीर गोष्ट आहे.’ ‘मुंबईच्या साहेबांबरोबर तरतरे यांनी आपले दोन उमेदवार निवडीमध्ये घुसवले होते. त्यामुळेच स्थानिक उमेदवारांना, अनुभवी उमेदवारांना त्यांनी आडवे तिडवे, निरुत्तर करणारे, प्रश्न विचारून नाउमेद केलं, असाही आरोप अनेक उमेदवारांनी केला.’ हे जर खरं असेल तर ही देखील अत्यंत गंभीर गोष्ट आहे. या मुलाखती संदर्भात ज्या प्रतिक्रिया आमच्याकडे आल्या आहेत त्या सर्वच प्रसिद्ध करायच्या ठरवल्या तर आठवडा देखील अपुरा पडेल. पण गरज भासल्यास त्यादेखील आम्ही प्रसिद्ध करणार आहोत. तत्पूर्वी उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे सचिव या प्रकरणाची दखल घेणार आहेत का? का नेहमीप्रमाणेच हे सारं प्रकरण वाऱ्यावर सोडणार? हा आमचा शिक्षण सचिव यांना खडा सवाल आहे!
हा लेख लिहीत असताना प्रभारी कला संचालक राजीव मिश्रा हे औरंगाबादेत असल्याचे कळले. कदाचित मंत्री महोदयांकडे या संदर्भात मोठ्या प्रमाणावर तक्रारी गेल्यामुळेदेखील चौकशीसाठी राजीव मिश्रा यांना तेथे पाठवले गेले असल्याची शक्यता आहे. पण राजीव मिश्रा यांनी आजवर अशा अनेक प्रकरणात कुठलीही कारवाई केलेली नाही, हेदेखील उघड सत्य आहे. त्यामुळे या प्रकरणात ते काहीही करणार नाहीत असे आमचे ठाम मत आहे. म्हणूनच या सर्व प्रकरणाची सरकारने विशेष चौकशी घडवून आणावी अशी मागणी उमेदवार आणि त्यांचे कुटुंबीय करीत आहेत.
सतीश नाईक
संपादक ‘चिन्ह आर्ट न्यूज’
Related
Please login to join discussion