No products in the cart.
कोकणचो ‘जॉन स्मिथ’
जॉन स्मिथने अजिंठा वेरूळ लेण्यांचा शोध लावला तर अण्णा शिरगावकरांनी दापोली तालुक्यातील पन्हाळेकाजी येथील २९ लेण्यांच्या समूहाचा शोध एका ताम्रपटाच्या सहाय्याने लावला! जे काम एखाद्या पीएचडीधारक पुरातत्वशास्त्रज्ञाने करायचे ते अण्णांनी कुठल्याही पदावर नसताना आपल्या इतिहास संशोधनाच्या ध्यासामुळे केले. नोकरीसाठी पीएचडीपर्यंत शिक्षण घेणारे अनेक आहेत. पण केवळ सातवी पास शिक्षण असताना आपल्या व्रतस्थ ज्ञानयोगाद्वारे एखाद्या प्राध्यापकाला लाजवेल असे संशोधन करणारे अण्णा शिरगावकर! आजच्या पोटभरू काळात असे ज्ञानयोगी पुरातत्व संशोधक आणि अभ्यासक सापडणे दुर्मिळच आहे. तारुण्यातच आपल्या आयुष्याची दिशा ठरवून अण्णांनी ४० ते ४५ वर्षे दऱ्याखोऱ्यातून पायपीट करत डहाणू ते कारवार पर्यंत कोकणच्या इतिहासाचा धांडोळा घेतला. अशा प्रयत्नातून त्यांनी ९ ताम्रपट, शिलालेख, ऐतिहसिक आणि पुरातत्वीय वस्तूंचा संग्रह केला. कोकणच्या इतिहासात मौलिक संशोधनाची भर घालणारे आदरणीय अण्णा शिरगावकर यांचे दिनांक ११ ऑक्टोबर २०२२ रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी अल्पशा आजाराने देहावसान झाले. रत्नागिरी जिल्ह्याच्या ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या संशोधनाने, सेवेने आणि समर्पणाने ऋषीतुल्य योगदान देणारे अण्णा आपल्यातून निघून गेले. अण्णांचे संपूर्ण जीवन हा एक आदर्श वस्तुपाठ आहे. त्यांच्या जाण्याने अनेक संस्था आणि कोकणच्या ऐतिहासिक वर्तुळात मोठी उणीव भासणार आहे. अण्णांचे सहकारी प्रवीण कदम यांनी त्यांच्या कारकिर्दीवर ‘चिन्ह आर्ट न्यूज’साठी विशेष लेख लिहिला आहे.
यशस्वी जीवनकथा म्हणजे नक्की काय, तर आयुष्यातील अडीअडचणींवर मात करत विशिष्ट ध्येयाचा ध्यास घेत आपल्याला हव्या असलेल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजात आदर्श निर्माण करणे. दाभोळचे ९३ वर्षीय श्री. अण्णा शिरगावकर यांचे जीवनकार्य ह्या व्याख्येत चपखल बसते. ५/९/१९३० रोजी जन्मलेले अण्णा १९६० पासून दाभोळवासी झाले ते वयाच्या नव्वदीपर्यंत. त्यानंतर सोबतीची अर्धांगिनी नसल्याने व शरीर साथ देत नसल्याने चिपळूण तालूक्यातील शिरगाव गावी रहायला गेले होते. अण्णांच्या विविध क्षेत्रातील कार्य आणि छंद नव्या पिढीला प्रेरणादायी व मार्गदर्शक आहेतच पण त्याचसोबत अण्णांचे राजकीय जीवन वर्तमान काळातील राजकारणी लोकांना अनुकरणीय आहे. आपल्याला आयुष्यात काय करायचे आहे हे अण्णांना तारुण्यातच कळले होते, तेंव्हापासून त्यांनी आपल्या आयुष्याची आखणी करून त्याप्रमाणे योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन यशस्वी जीवनाचा धडा घालून दिला. अण्णांचे शिक्षण सातवी नापास असूनही एखाद्या प्रतिभावान साहित्यिकाला आणि इतिहास संशोधकाला मार्गदर्शक ठरणारी; शोध अपरान्ताचा, ऐतिहासिक दाभोळ वर्तमान व भविष्य, गेट वे ऑफ दाभोळ (कदीम बाबुल हिंद), वासिष्ठीच्या तीरावरून, मॉरिशस, इस्त्रायल आणि युरोप, प्रकाशदीप, आनंदिनी, इकडचं-तिकडचं, शेव-चिवडा, अशी अशी एकूण १० पुस्तके त्यांनी लिहिली.
१९५८ साली सरपंच पदापासून राजकीय जीवनाची सुरुवात करून १९७५ ते १९७७ म्हणजेच आणीबाणीच्या काळात अण्णांनी येरवड्यात तुरुंगवास भोगला. त्यानंतर १९७८ ते १९९० रत्नागिरी जिल्हा सभापती पदापर्यंत राजकारणाच्या माध्यमातून लोकशाहीची सेवा केली. ज्या निष्ठेने राजकारणात प्रवेश केला होता त्याच तत्वनिष्ठतेने वयाच्या पन्नाशीनंतर राजसंन्यास घेतला. दुर्दैवाने अण्णांचा हा तत्वनिष्ठपणा आजच्या काळात दुर्मिळ झाला आहे. नंतरचा उर्वरित काळ अण्णांनी समाजकारण आणि इतिहास संशोधनात व्यतीत केला. १९५८ पासून २००६ पर्यंत शिक्षण, सहकार, कामगार, ग्रामीण विकास, वाचन संस्कृती, अपंग संस्था, पंचायत राज, संग्रहालय शास्त्र, साहित्य, इतिहास अशा वैविध्यपूर्ण क्षेत्रातील जवळपास ३५ संस्थांमध्ये अण्णा सक्रिय होते. ह्यामध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेसारख्या शासकीय संस्था, कोमसाप सारख्या साहित्य संस्था, गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेसारख्या सामाजिक संस्था तर सागरपुत्र विद्या विकास संस्थेसारख्या शैक्षणिक संस्थांचा अंतर्भाव होतो.
कर्तृत्वाचे असे सप्तरंग उधळीत असतानाच कोणतेही पारंपरिक किंवा विहित शिक्षण नसतानाही अण्णांनी ४० ते ४५ वर्षे दऱ्याखोऱ्यातून पायपीट करत डहाणू ते कारवार पर्यंत कोकणच्या इतिहासाचा धांडोळा घेतला. अशा प्रयत्नातून त्यांनी ९ ताम्रपट, शिलालेख, मुर्त्या, तोफा, बंदुका, दांडपट्टे, वेगवेगळ्या काळातील भांडी, हस्तलिखिते, भूर्जपत्रे, ताडपत्रे, वल्कले, सनदा, चिलखत, विटा, टेराकोटा, वीरगळ, यज्ञ साहित्य, अश्मयुगीन हत्यारे, प्रभावळी, घंटा इत्यादी ऐतिहसिक आणि पुरातत्वीय वस्तूंचा संग्रह केला. १९७० साली दापोली तालुक्यातील पन्हाळेकाजी येथील २९ लेण्यांच्या समूहाचा शोध एका ताम्रपटाच्या सहाय्याने अण्णांनी लावला. ह्या लेण्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकात खोदल्या गेलेल्या असाव्यात आणि त्यानंतर अनेक वर्षे त्यांचे खोदकाम सुरु होते असे आढळते. अण्णांचा हा शोध कोकणला प्राचीन इतिहास नाही असे म्हणणाऱ्या मान्यवरांना चोख उत्तर होते.
कालांतराने ह्या लेण्यांचा अनेक अभ्यासकांनी शास्त्रीय अभ्यास व विवेचन केले. अंजनवेल उर्फ गोपाळगड किल्ल्याचे प्राचीन किल्लेदार प्रिन्स चित्रेश खेडेकर यांनी परदेशातून आपल्या मातृभूमीत आणून त्यांचे पूर्वज जिथे राहत होते त्यांच्या कर्मभूमीत ग्रामस्थांकरवी त्यांचा सत्कार केला. अण्णांनी गोपाळगड किल्याच्या खाजगी मालमत्तेला शासनाच्या संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळवून देण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले. अण्णांच्या संग्रहात ८० देशातील जवळपास १० हजार नाणी होती. त्यामध्ये मोगल, आदिलशाही, बहामनी, पोर्तुगीज, माळवा, सुलतान, बंगाली, विजय नगर, गधीया, दाभोळ लारी, शिवराया, ब्रिटिश, जोधपुरी, इत्यादी असंख्य प्रकारची नाणी होती. अण्णांना निवळ ऐतिहासिक वस्तू जमविण्याचा छंद होता असे नव्हे तर पोस्टाची तिकिटे, मेडल्स, शो-पीस, फर्स्ट डे कव्हर्स, सिगारेट लायटर्स, मायनिंग सॅम्पल्स, समुद्री अवशेष, कवड्या, शंख, प्रवाळ, खनिजे, पट्टे, आगपेट्या, इत्यादी वस्तू जमविण्याचा जमविण्याची आवड होती. त्यांनी त्याचा संपूर्ण संग्रह वेगवेगळ्या संग्रहालयांना देऊन टाकला. प्रसंगी आपल्या संग्रहातील अनेक मौल्यवान वस्तू सामाजिक कामासाठी विकल्या. अण्णांच्या वस्तूंचे रत्नागिरीला वस्तुसंग्रहालयात रूपांतर व्हावे अशी त्यांची इच्छा होती, पण ते शक्य न झाल्याने त्यांनी तो संग्रह ठाणे येथील प्राच्य विद्या केंद्राच्या वस्तुसंग्रहालयात सुपूर्द केला. ज्या समाजातून मिळवले त्यातच आपला छंद विलीन केला.
जीवनाच्या ह्या प्रवाहात अशी राजकारण, समाजसेवा आणि इतिहास संकलन करत असताना अण्णांना अनेक शासकीय, खाजगी व सामाजिक मिळून एकूण ६६ पुरस्कार प्राप्त झाले. त्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाचा “डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित-मित्र पुरस्कार” आणि सन १९७५ ते ७७ च्या आणीबाणी कालखंडात भारतीय लोकशाहीच्या मूल्यांचे रक्षण केल्याबद्दल राजकीय/सामाजिक बंदिवान म्हणून महाराष्ट्र शासनाने सन्मानपत्र देऊन गौरव केला. त्याचा समावेश आहे. ह्याव्यतिरिक्त अखिल दाभोळखाडी भोई समाजाचा समाजसेवेच्या सन्मानार्थ दिलेले गौरवपत्र, नेहरू युवा केंद्र, रत्नागिरी यांचे गौरवपत्र,काटवी कृषी संशोधन केंद्र, अलिबाग यांचा भूतदया व तत्सम सेवेसाठीचे मानपत्र, कोमसाप चा लक्षवेधी पुरस्कार, इत्यादी पुरस्कार आहेत. त्यांच्या इतिहासाच्या प्रदीर्घ सेवेबद्दल कोंकण इतिहास परिषदेने २०११ साली “जीवनगौरव” पुरस्काराने सन्मानित केले.
वयाच्या नव्वद वर्षांची वेगवान कारकीर्द गाजविताना अण्णांनी आपल्या मिस्कील विनोदी परंतु तितक्याच मार्मिक वक्तृत्व कलेमुळे अनेक मान्यवर व्यक्तींना मित्रत्वाच्या गोतावळ्यात आणले. त्यामध्ये गो. नि. दांडेकर, आत्माराम भेंडे, मधू मंगेश कर्णिक, माधव गडकरी, डॉ. दाऊद दळवी अशा एकाहून एक तपस्वी आणि आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेली व्यक्तिमत्वे होती.
गेली ७५ वर्षे रोजनिशी लिहीत आपल्या आयुष्याचा हिशेब स्वतःच ठेवला व त्याचे आत्मवलोकन केले. आजही जुन्या पारंपरिक पत्र व्यवहारासह तरुणाच्या व्हाट्स ऍप, ईमेल, संकेतस्थळे अशा आधुनिक माध्यमांसह दोन्ही पिढ्यांशी साकव बनून राहिले. जागा जमीन, गाडी, बांगला, प्रॉपर्टी अशी स्वप्ने पहिली नाहीत. मुलाबाळांसाठी पैसे ठेवले नाहीत. नेटके राहावे, लुबाडू नये, जगण्यापुरते कमवावे, कुणाचे देणेदार असू नये, कुणावर अवलंबून राहू नये, स्वतःचे छंद जोपासावे, लोकसंग्रह करावा, स्वतः लिहावे किंवा आपल्याबद्दल कुणी चांगले लिहावे असे वागावे, देवाकडे सुबुद्धी, शक्ती याशिवाय काही मागू नये आणि दुसऱ्यासाठी जगावे अशी साधी सोपी वाटणारी पण आचरणास तितकीच कठीण तत्वे अण्णांनी पाळली.
योग्य वेळी योग्य ते तत्व, काम, छंद जोपासण्याचा व नेमक्या वळणावर त्यातून निवृत्ती घ्यायची हा नियम त्यांनी आत्मसात केला. जे हाती घेतले ते पूर्णत्वास नेले. पन्नाशीनंतर आण्णा राजकारणात राहिले असते तर आज कदाचित मंत्रीसुद्धा झाले असते. त्यांचे हे गुण आज दुर्मिळ झाले आहेत. त्यामुळे अण्णा म्हणजे खेड्यात जन्माला येऊन खेड्याचा समाज आणि इतिहास याच्यासाठी जीवनाचे अर्ध्य देणारा खेड्यातला असामान्य व्रतस्थ कर्मयोगीच होय. त्यांच्या कार्यातील ही निवडक माहिती नव्या तरुण पिढीला प्रेरणादायी ठरेल.
सरतेशेवटी सरणावर जाऊन आपल्या देहाचे पंचतत्वात विलीनीकरण करणे अण्णांनी जाणीवपूर्वक टाळले. आपल्या हयातीतच आपल्या मृत्यूनंतर देहाचे “देहदान” करण्याची तरतूद अण्णांनी केली होती. त्यांच्या शेवटच्या समाजोपयोगी कृतीचा आदर्शपाठ आजच्या आधुनिक जगातील तरुणाईने आवर्जून गिरवल्यास तीच अण्णांना खरी श्रद्धांजली ठरेल.
सर्व छायाचित्रे अण्णा शिरगावकरांच्या वेबसाइटवरून साभार.
वेबसाईट लिंक : http://www.annashirgaonkar.in/
****
– प्रवीण सहदेव कदम
कार्यकारिणी सदस्य, कोकण इतिहास परिषद,
भ्रमणध्वनी ९३२३२९४५३०
ईमेल – gherarasalgad@gmail.com
‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD
‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag
Related
Please login to join discussion