Features

कुलगुरु कोण होणार?

डिनोव्हो विद्यापीठाच्या कुलगुरुपदी कुणाची नेमणूक करायची. हा यक्ष प्रश्न सध्या उच्च व तंत्रशिक्षण खात्याला सतावतोय. कारण आधीच्या अधिकाऱ्यांनी सारंच भुईसपाट करून ठेवलं आहे. अशा परिस्थितीत पुन्हा ‘डिप्लोमा होल्डर’च  महत्वाची पदं गिळंकृत करणार का? असं जर घडलं तर आधीचं जेजे आणि डिनोव्होतलं जेजे यात काय फरक राहणार आहे? याच प्रश्नाचा घेतलेला मागोवा. 

जे जे स्कूल ऑफ आर्टचा इतकी वर्ष रेंगाळलेला प्रश्न आता मार्गी लागला आहे. दिवाळीच्या सुमारास अत्यंत समारंभपूर्वक डिनोव्होची घोषणा होईल. बहुदा जे जे स्कूल ऑफ आर्टच्याच परिसरात उदघाटनाचा मोठा सोहळा होईल. त्यानंतर मात्र जे जे स्कूल ऑफ आर्ट संदर्भात कुठल्याच बातम्या प्रकाशित करायची वेळ वृत्तपत्रांवर किंवा ‘चिन्ह’सारख्या छोट्या माध्यमांवर येऊ नये अशी अपेक्षा आहे. डिनोव्होला ज्यांचा विरोध होता त्यांचा संपूर्णपणे बिमोड करण्यात आला आहे. प्रकरण इतक्या टोकाला गेलं आहे की आता जे कुणी विरोध करण्याचा प्रयत्न करतील त्यांना त्याची जबर किंमत मोजावी लागेल यात शंकाच नाही. 

अर्थात यातले काही अतृप्त आत्मे शांत राहणार नाहीत हे उघडच आहे. प्रत्येकालाच मोठ्या पदाची हाव असते. तशी ती डिनोव्होमधले सर्वोच्च पद मिळवण्यासाठीदेखील असणार आहे यात शंकाच नाही. जेजेच्या परिसरात थोडासा फेरफटका मारला का कुजबुजीच्या स्वरूपात बरंच काही ऐकायला मिळतं. उदाहरणार्थ डिनोव्हो विद्यापीठाचं कुलगुरुपद कुणाला मिळणार? यासाठी सध्याच्या व्यवस्थेतले एक गृहस्थ अतिशय जोरात प्रयत्न करत आहेत. आजवरचं त्यांचं करियर हे अशाच ‘प्रयत्नां’मधून उभं राहिलेलं असल्यामुळं त्यानुसार जर काही घडलं तर जेजेची अवस्था आगीतून फुफाट्यात अशी झाली तर त्यात काहीही नवल नाही.

याला कारणीभूत आहे ते गेल्या पंचवीस तीस वर्षातलं उच्च व तंत्रशिक्षण खात्याचं भरतीविषयक धोरण. १९८२ साली जेजेत दोन प्राध्यापकांची पदं रिक्त होती. आज २०२३ साली १६ पैकी फक्त दोनच प्राध्यापक तिथं उरले असावे. जे प्राध्यापकांबाबत तेच साहाय्यक अधिव्याख्यात्यांबाबत देखील घडले. त्यामुळेच जे जे स्कूल ऑफ आर्ट, जे जे अप्लाइड आर्ट आणि शाकम औरंगाबाद व नागपूर येथे मिळून जी काही पदं होती (ती संख्या बहुदा १७५ ते १८० च्या घरात पोहोचेल.) त्यातली आता फक्त डझनभर पदं ही कायमस्वरूपी अध्यापकांची आहेत. बाकी सारा हंगामी आणि कंत्राटी शिक्षकांचा अनागोंदी कारभार. काय शिक्षक शिकवणार आणि काय विद्यार्थी शिकणार ? 

काही शिक्षकांची तर अख्खी हयात या अशा हंगामी, तात्पुरत्या किंवा कंत्राटी पदांचा भार वाहण्यातच संपली. तीस एक वर्ष सरकारी कला महाविद्यालयात नोकरी करून सुद्धा त्यांना त्या सेवेचे कुठलेही फायदे मिळणार नाहीयेत. त्यांच्या कथा, व्यथा – विवंचना ऐकताना पोटात अक्षरशः कालवाकालव होते. पण सांगायचं कुणाला? आणि ऐकणार कोण? हे तर काहीच नाही. चित्रकार श्रीकांत जाधव, चित्रकार अनंत निकम आणि चित्रकार अनिल नाईक या सारखे गुणी कलावंत ज्या पदावर जेजेच्या नोकरीत रुजू झाले, त्याच पदावरून तीस-बत्तीस वर्षानंतर सेवानिवृत्त झाले. हे कमी पडलं म्हणून की काय आचरट विद्यार्थ्यालाच बॉस म्हणवून घेणं नशिबी आलं.

किती भयंकर गोष्ट आहे ना ही? पण उच्च व तंत्रशिक्षण खात्याला याचं काहीही पडलेलं नाही. त्यातल्या नीच मनोवृत्तीच्या अधिकाऱ्यांनी ‘हे काय कलावंत आहेत, यांना काय कळणार आहे?’ ‘आणि कळून कळून हे करणार तरी काय?’ असं म्हणून त्यांनी गेल्या पंचवीस-तीस वर्षात या खात्यामध्ये अक्षरशः भ्रष्टाचाराचा कळस गाठला. काहीही करायचं त्यांनी बाकी ठेवलं नाही. त्यांना तितकंच भ्रष्ट आचरण करणारे मंत्री सतत लाभल्यामुळं कला संचालनालय आणि त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या कला महाविद्यालयांची अक्षरशः दशादशा झाली. या मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी संगनमतानं महाराष्ट्राच्या कलाशिक्षणाचं अक्षरशः वाटोळं केलं. अशा प्रकारच्या विशेष कला संस्थांमध्ये चतुर्थश्रेणी कर्मचारी होण्याची देखील ज्यांची पात्रता नाही असे उमेदवार केवळ शेजारच्या घरात राहतात, किंवा गावात राहतात किंवा ‘आपल्यातले’ आहेत म्हणून बिनदिक्कतपणे नेमले गेले. त्या साऱ्यांनी मिळून कला संचालनालय, शासकीय कला महाविद्यालयं आणि महाराष्ट्रातली महाविद्यालयं यांची पूर्णतः वाताहत करून टाकली.

तब्बल तीस-पस्तीस वर्ष हे सारं चाललं. आमच्यासारखे जेजेचे माजी विद्यार्थी प्रचंड आरडाओरडा करीत होते. माध्यमांमध्ये सारा भ्रष्टाचार उघड करत होते. पण तेवढ्यापुरते सारे प्रकार थांबायचे. काही काळ गेला का पुन्हा सुरु व्हायचे. केवळ त्यामुळेच आज गुणी माणसं शोधायची वेळ उच्च व तंत्रशिक्षण खात्यावर ठेपली आहे. नवीन अध्यापकांची भरती केली गेली नाही. कंत्राटी कारभार सातत्यानं चालवल्यामुळं काही गुणी कलावंत, कलाशिक्षक वयोमानपरत्वे बाद झाले. काहींनी तर हे क्षेत्रच सोडून दिलं. त्यामुळेच केवळ आता महाराष्ट्राला कला संचालक पद भरता येत नाही. जे कला संचालकाबाबत तेच चारही शासकीय कला महाविद्यालयांच्या अधिष्ठाता पदाबद्दल सांगता येईल. जी दोन ‘रत्नं’ सध्या या पदांवर कार्यरत आहेत त्यांच्याविषयी सभ्य आणि सुसंस्कृत शब्दात म्हणण्यासारखं काहीही उरलेलं नाही. इतकी भीषण परिस्थिती आहे. 

सध्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मात्र आपली नेमणूक होताच पहिला हात घातला तो जेजे आणि कला संचालनालयाच्याच प्रश्नाला. केवळ त्यांच्यामुळेच डिनोव्होचा प्रश्न अल्पावधीत मार्गी लागला. आता डिनोव्होच्या महत्वाच्या पदांवर कुणाची नेमणूक करायची असा प्रश्न त्यांना निश्चितपणे भेडसावत असेल. कारण त्या लायकीची माणसंच कला संचालनालय अथवा शासनाच्या चारही कला महाविद्यालयात शिल्लक राहिलेली नाहीत. जी काही हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहेत त्यांना पदोन्नती देण्याच्या बाबतीत या विभागातल्या माजी अधिकाऱ्यांनी कुठलीही कार्यवाही केली नसल्यामुळं त्यांच्या हातात सूत्र कशी द्यायची असा प्रश्न दादांना पडला असल्यास नवल नाही. 

वास्तविक पाहता एखाद्या महाविद्यालयाला डिनोव्हो दर्जा मिळणं ही फार मोठी आणि दुर्मिळ गोष्ट आहे. आणि अशा  डिनोव्हो विद्यापीठासाठी कुलगुरु नेमणं हीदेखील अतिशय मोठी गोष्ट आहे. साहजिकच कुलगुरु पदावर कुणाची आणि कशी नेमणूक करायची असा प्रश्न उच्च व तंत्रशिक्षण विभागाला पडला असल्यास नवल नाही. पण हे गेल्या ३५ वर्षातलं त्यांचंच पाप आहे. आणि त्याची फळं आता त्यांनाच भोगावी लागणार आहेत. या साऱ्याचा गैरफायदा आधीच्या अनुभवाप्रमाणे कुणी ‘डिप्लोमा होल्डर’ घेणार नाहीत ना? हे आता पाहण्याची जबाबदारी अर्थातच शिक्षणमंत्री आणि शिक्षणसचिव यांच्यावरच आहे. आणि त्यांनी ती उत्तम पद्धतीनं सोडवावी अशीच आमची इच्छा आहे. न सोडवल्यास पुन्हा लढाई निश्चित. 

 

सतीश नाईक 

संपादक ‘चिन्ह आर्ट न्यूज’

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.