No products in the cart.
लडाख डायरी ४
चित्रकार शरद तरडे आणि सुचेता तरडे लिखित लडाख आणि लेह च्या दुर्गम वातावरणातील रमणीय निसर्गाचा आणि स्थानिक जनजीवनाचा अनुभव शब्दबद्ध करणाऱ्या *लडाख डायरी* या मालिकेतील हा शेवटचा भाग. लेखाच्या या भागात तुम्हाला लेखकाने लेह परिसरातील मनोहारी निसर्गाची सैर घडवून आणली आहे. तेथील स्थानिक ‘हेमीस’ फेस्टीवल चे दर्शन घडवले आहे. ही खडतर सफर उत्कृष्ट नियोजनामुळे सफल करणाऱ्या ऐश्वर्या फडके या मुळच्या पुण्याच्या पण आत्ता लडाखमध्ये स्थायिक होऊन सहलींचे आयोजन करणाऱ्या धाडसी तरुणीबाबत तुम्हाला या लेखात जाणून घेता येईल.
लेखक : शरद आणि सुचेता तरडे.
उनाडक्या करीत बेभान फिरणारा गार वारा आणि समोरचे तलावाचे स्थितप्रज्ञ दृश्य! यांचा मनामध्ये मेळ घालण्याचे काम अखंड चालू होते. परंतु ते एकमेकांना साथ करीत समोरचे चित्र दृश्य बदलायचे हे काम करत आहेत हे मात्र नंतर लक्षात आलं. बारीक वाळूचे कण हळुवारपणे डोंगरावर पसरण्याचे काम हा बेभान वारा किती अचूकपणे करत होता हे आता लक्षात आले आणि आता त्यावरच लक्ष केंद्रीत व्हायला लागले. तोपर्यंत आम्ही सोमुरिरी या तलावापाशी येऊ लागलो होतो. कडेला छोट्या छोट्या रूम आणि तंबू दिसत होते आणि लांबवर तो पाचुसारखा चमचमता तलाव आणि त्याच्यात डोकवणारे बर्फाच्या टोप्या घातल्यासारखे वाटणारे डोंगर हे दृश्य साठवायला डोळे सुद्धा अपुरे पडत होते. कधी एकदा सामान तंबूमध्ये टाकून धावत त्या तलावाच्या किनारी जातो असे सगळ्यांना झाले परंतु हवेमधला गारवा हा चहा प्यायलाशिवाय सोडत नव्हता, प्रत्येकाने मग चहा,कॉफी पिऊनच तलावाकडे प्रयाण केले.
तलावावर हलकेच वाऱ्याने प्रेमाची हळुवार चादर ओढायला सुरुवात केली होती. त्यामुळे तलावाचे हृदयातील हालचाली आमच्यापर्यंत पोहोचत होत्या, या लाटा इतक्या छान पाण्यावर नर्तन करत होत्या आणि त्यातून अनेक रंग दाखवीत होत्या. त्यामुळे वेळ कसा चाललाय हे कळलेच नाही. सगळे शांतपणे एका रांगेमध्ये तलावाकडे बघत बसले होते, कोणीही एकही शब्द बोलत नव्हते. जणू ते दृश्य डोळ्यांमध्ये साठवण्याचे काम चालू होते. हळूहळू संध्याकाळ होऊ लागली आणि डोंगरांच्या पलीकडं हळूच एक पांढरे स्वच्छ फुल उमलू लागले. पांढऱ्या शुभ्र वाळूच्या डोंगरांमागे हळुवारपणे चंद्र उगवत होता. तो दिवस पौर्णिमेचा असल्याने चंद्राची प्रतिमा निरामय शांत भासत होती. प्रत्येक जण ते दृष्ट कॅमेरा टिपण्याचा प्रयत्न करत होता पण मला तरी ते दृश्य मनावर कोरून घ्यावेसे वाटले त्यामुळे शांत बसून होतो. सर्व दूर तो पांढरा स्वच्छ प्रकाश पसरल्यानंतर ती अंधुक शांतता ही आणखीनच मनाच्या कोपऱ्यात जाऊन बसली आणि मग मनाशी असलेले चिंतनही थांबले. हे सर्व जण एकाक्षणी स्तब्ध झाल्यासारखे भासले आणि त्या शांततेत स्वतःला वाहून टाकले.आता पोटातले कावळे ओरडू लागले होते आणि आम्ही कॅन्टीन कडे निघालो.मस्त पुरी भाजी, गरमागरम भात आणि डाळ असा जेवणाचा बेत होता. बरोबरीला सूप होते. तिथल्या खिडकीतूनही तलावाचे ते अप्रतिम दृश्य डोळ्यात साठवावेसे वाटत होते त्यामुळे सगळेच चुपचाप कधी जेवणाकडे तर कधी तलावाकडे लक्ष देऊन हा क्षण कधीच संपू नये अशा बेताने जेवण लांबवित होते. जेवण संपल्यावर पुन्हा सर्व जण तलावाच्या दिशेने निघालो. आता मात्र फक्त लाटांचा हलकासा आवाज येत होता आणि वरच्या चंद्राने तलावात डोकवण्यास सुरुवात केलेली होती. ते लाटांवरचे त्याचे न्याहाळून बघणे याचा अनुभव घेणे हे खरोखरच जगा वेगळी गोष्ट होती हे लक्षात आले. पुन्हा सर्वजण ते दृश्य बघण्यात गर्क झाले.उनाडक्या थांबल्या आणि निरव शांतता वेढायला लागली होती आणि चंद्राच्या सौम्य प्रकाशामध्ये आता सर्व दूरवरचे डोंगर, बर्फाच्छादित शिखरे आणि परिसर स्वच्छ दिसायला लागले होते. यासाठी एवढ्या दूरवर येऊन मनाला शांतता लाभली हे प्रत्येक जण स्वतःला समजून देत होता, जणू आता उद्या कधीच उजाडणार नव्हता आयुष्यात असाच तो क्षण होता! निशब्द आणि शांत!
“हेमिस फेस्टिवल” !
खरं तर आम्ही लडाखला ज्या कारणासाठी गेलो होतो तो हा कल्चरल फेस्टीवल. जो साधारण जुलैच्या आसपास हेमिस या मॉनेस्ट्रीमध्ये साजरा होतो आणि तो बघण्यासाठीच आमची धावाधाव चालली होती. सकाळी साडेआठलाच ब्रेकफास्ट करून आम्ही त्या मॉनेस्ट्रीला निघालो. जाता जाता अत्यंत रम्य परिसर आणि सारखा बदलणारे निसर्ग चित्रं! याची आता थोडीफार सवय झालेली होती. सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या आणि आम्ही जवळपास बारा वाजता तिथे पोहोचलो. गाड्यांच्या रांगाच रांगा लागलेल्या होत्या आणि सगळेच अतिशय उत्साहात होते. लहान मुले, त्यांचे आई-वडील, मित्र, तरुण-तरुणी सगळे आपापल्या उत्सवाच्या मूडमध्ये मॉनेस्ट्रीकडे चालले होते. गाडीतून उतरले असतानाच पावसाची मोठी सर आली आणि सगळेच भिजत पण हळूहळू चालत होतो. मॉनेस्ट्रीचा परिसर आल्यावर तिथले जत्रेचे स्वरूप लक्षात आले. छोटे स्टॉल, बुद्धाच्या चित्रमय गोष्टी, मूर्ती, खाण्याचे स्टॉलस मोमोज, मॅगी आणि बटर टी, चहा, कॉफी असे मस्त वातावरण. आजूबाजूला अथांग पसरलेला डोंगर! बाजूनेच एका बाजूला धबधब्यासारखे पाणी वाहत होते. तिथे लोक फोटोही काढत होते आणि रस्त्यात दिसणारे पिवळ्या लाल वस्त्रातले मॉंक अतिशय शांतपणे मार्गक्रमण करीत होते. तिकीट काढून आत गेल्यावर मॉनेस्ट्रीची भव्यता लक्षात आली. थोडे वर गेल्यावर चहुबाजूनी भरपूर गर्दी होती. खाली एक मंडप होता पण त्याला छत नव्हते. दोन्ही बाजूनी गच्चीसारखी बसण्याची व्यवस्था होती आणि त्यामध्ये वाद्यवृद्ध आणि प्रतिष्ठित लोक आणि बुद्ध भिक्षू बसलेले होते लोक बसले होते . जिथे जागा मिळेल तिथे बसून फोटो काढत होती. तिथेच उजव्या हाताला कार्यक्रम होणार होता आणि एका बाजूला बुद्ध भिक्षु बसले होते. त्यामध्ये सर्व वयांचे लोक होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे भाव त्याच्या वयानुसार दिसत होते.
साडेबारा एकच्या सुमारास कार्यक्रम चालू झाला. लडाकी वाद्य वाजायला सुरुवात झाली तशी तिथे शांतता पसरली. आजूबाजूचे दिसणारे डोंगर आणि बर्फाच्छादित शिखरे, वाद्य वाजवताना आणखी रम्य वातावरण तयार झाले. वाद्य वाजवणारे सुद्धा वेगळ्या प्रकारचे वेश परिधान करून आले होते.प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. अतिशय सुंदर कॅप त्यांनी घातल्या होत्या आणि वेगवेगळे मुखवटे धारण करून ते हळूहळू एका मागे एक स्टेजवर येत होते. त्यात काही राक्षसी मास्क घालून आलेले होते तर कोणी प्राण्यांचे मास्क घातलेले होते. त्यानंतर त्यांचा पद्मनाभून या बुद्धाच्या शिल्पाची एक प्रतिकृती होते तीचे कपडे सिल्क कापडाचे होते. त्यावर नंतर पुष्प वृष्टी झाली आणि इथे मला आपल्या संस्कृतीची खूप आठवण झाली मिरवणूक बघण्यासारखी होती दोन-तीन फेऱ्या पटांगणाला मारल्या नंतर दुसरा ग्रुप आला आणि त्यांनी असेच दृश्य सादर केले. दर वेळेस वेगळ्या पद्धतीची वाद्य वाजत होते नंतर बुद्धाच्या मूर्तीची स्थापना झाली . त्यांच्या भाषेत सगळे गाणी, उपसानेचे मंत्र म्हणत होते. ते आवाज खूप गंभीर होते त्यामुळे वातावरणही गंभीर झाले होते.
हे सगळे दीड-दोन वाजेपर्यंत चालू होते आम्ही पण उन्हामुळे आणि गर्दीमुळे एका बाजूला जाऊन बसलो.नंतर मॉनेस्ट्री बघितली. हेमिस उत्सव पद्मसंभव यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो, ज्यांना गुरू रिम्पोचे म्हणूनही ओळखले जाते. रिम्पोचेस हे भगवान बुद्धांचे पुनर्जन्म मानले जातात. हा सण त्यांचा वाढदिवस साजरा करतो. लडाखमधील सर्वात मोठा आणि श्रीमंत बौद्ध मठ आहे. हेमिस गोम्पामध्ये हा उत्सव होतो. बुद्धाची प्रतिमा पण सोन्याची आहे बाहेर दोन स्तंभ आहेत. आजूबाजूला भिक्षुंची राहण्याची व्यवस्था आहे. आणि एकंदरीतच शिस्तबद्ध असा प्रोग्राम बघायला मिळाला, त्यांच्या संस्कृतीची आणि शांततेची प्रकर्षाने मनावर छाप पडली.
आतापर्यंत आपण लेह मधली अनेक ठिकाणं आणि त्यातलं वेगळेपण हे जाणून घेतलं परंतु हे घेताना या मागची खरी जाणती माणसं यांच्या बद्दल सांगितल्याशिवाय हा लेख पूर्ण होणारच नाही कारण त्यांनी अतोनात कष्ट आणि नियोजन केल्यामुळेच हे सर्व शक्य झाले.
आम्ही गेले तीन वर्ष लेह लडाखचा अभ्यास करत होतो एवढेच नव्हे तर २०१९ ला कोविडच्या आधी लेह मधल्या एका कंपनीला ट्रीपचे पूर्ण पैसे पाठवून दिले होते. परंतु कोविड मुळे ते शक्य झाले नाही आणि मुख्य म्हणजे त्यांनी आमचे पैसे पूर्णपणे परत केले होते त्यामुळे तिथल्या माणसांच्या मनोवृत्तीचा साधारण अंदाज आला होता. मागील वर्षी पुन्हा लेहच करायचे असे मनात आल्यामुळे बरोबर कोणी आपल्यासारखेच कलाकार भेटले आणि आपल्याला हवी तशी ट्रीप करता आली तर बरे होईल असे वाटले. त्याच वेळेस सुमेधची एक मैत्रीण गेल्या दोन वर्ष लेह मध्ये राहून वेगळ्या प्रकारच्या ट्रीपचे आयोजन करते हे कळले मग लगेचच तिच्याशी बोलणे झाले आणि तिचा प्रोग्राम पाहून आपण वाट बघत असलेली ती ट्रीप हीच आहे हे लक्षात आले आणि लगेचच बुकिंग करून टाकले.
या मुलीचे नाव ऐश्वर्या फडके!तिच्या कंपनीचे नाव आहे ” Travel Dirty” हीचे लेहला जाणे, तिथे रमणे, तिथल्या लोकांची वागणूक आणि बाकीच्या गोष्टी पटणे आणि मग तिनेही आपण लेहला राहून आपल्याला पाहिजे ….तशा ट्रीप अरेंज करीत राहणे हे खरोखरच स्वप्नवत होते. कारण कुठल्याही अन्य प्रदेशात एखाद्या तरुण मुलीने पुण्यातील नोकरी सोडून स्वतःला तिथे जुळवून घेणे एवढेच नव्हे तर त्यांची थोडीफार भाषा शिकणे, त्यांचे चालीरीतीचा अभ्यास करणे, तिथे स्वतःचे घर घेणे, गाडी घेणे हे सर्व कौतुकास्पद होते. कारण पुण्यामध्ये आई-वडील बहीण हे सर्व कुटुंब असताना लेहमध्ये जाऊन स्वतःला आजमावणे आणि सिद्ध करून दाखवणे हे किती अवघड आहे कोणाच्याही लक्षात येईल. आणि हिचे वैशिष्ट्य म्हणजे ती ज्या लोकांसाठी काम करते त्यांना पूर्णपणे समजून घेते. त्यांना या ट्रीप मधून काय पाहिजे हेही लक्षात घेते.
आमच्या बाबतीतही ऐश्वर्याने आमच्याशी अनेक वेळा बोलून आम्हाला कशा कशामध्ये रस आहे हे विचारून त्याप्रमाणे तिथल्या गोष्टी, कलाकार यांचा अभ्यास केला आणि त्याप्रमाणे आम्हा दोघांनाच तिने त्या कलाकारापर्यंत कसे पोहोचवता येईल, तिथे कसे राहता येईल याची सर्व माहिती घेतली. हे सर्व करताना आम्ही जिथे जाणार होतो तिथे मोबाईल किंवा कुठलेही नेटवर्क नव्हते हे लक्षात घेतले पाहिजे परंतु तरीही अत्यंत व्यवस्थित रीतीने तिने मार्गदर्शन केले आणि आमची ही ट्रीप खरोखरच अविस्मरणीय झाली. या प्रवासात तिने अनेक गोष्टी, अडचणी यांचा विचार प्रथमच केला होता हे जागोजागी जाणवत होते. मुख्य म्हणजे तिचा हसमुख चेहरा, दिलखुलास हसणे आणि कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्याची सवय ही गोष्ट आम्हा सर्वांना खूप महत्त्वाची वाटली. त्यामुळेच आम्हालाही वेगळेपण अनुभवता येत होते.
अगदी मी किंवा अन्य कोणी आजारी पडले तर त्यांना औषधे, ऑक्सिजन एवढेच नव्हे तर जाण्यायेण्याची व्यवस्था या गोष्टीने कटाक्षाने पाळल्या होत्या. सर्व लोकांना व्यवस्थितपणे एकत्र राहता येईल याचीही आखणी तिने करून ठेवलेली होती. प्रवासात काय हवे नको ते पाहणे आणि दूरवरनं प्रत्येकाकडे काळजीपूर्वक लक्ष देणे हा अनुभव मला खूप वेळ आला त्यामुळे आमच्या ट्रीप मध्ये अनेक वयोगटातील लोक असले तरीही त्यांच्यामध्ये एकोपा राहील याची काळजी तिनेही आणि आम्ही कसोशिने पाळली.
मुख्य म्हणजे ही ट्रिप नसून माहित नसलेल्या व्यक्तींबरोबर मैत्रीचा, प्रेमाचा, आपुलकीचा वेगळा अनुभव घेणे,संस्कृती जवळून अनुभवणे हेच ध्येय होते असेच वाटले. तिच्या या ट्रिप मधल्या अनुभवामुळेच लेह मधले अनेक वेगळ्या जागा आम्ही बघू शकलो येथे श्रेय फक्त ऐश्वर्यालाच जाते. आपण कोणालाही जर अशा प्रकारच्या वेगळ्या, सांस्कृतिक प्रकारच्या ट्रीप लेह, लडाखला करायची असेल नक्कीच तुम्ही तिचे सहकार्य घ्यावे असे मी सर्वांना खात्रीपूर्वक सांगतो आणि तुम्हालाही असेच अनुभव येतील अशी आशा करतो.
Related
Please login to join discussion