No products in the cart.
लडाख डायरी १
शरद तरडे आणि सुचिता तरडे हे चित्रकार दांपत्य गेली ७-८ वर्षे देशाच्या विविध भागांत प्रवास करू स्थानिक कला संस्कृती आणि कलाकारांची जडण-घडण समजून घेत आहेत. नुकतीच त्यांनी लडाख परिसराची सफर पूर्ण केली आहे. निसर्गाच्या सान्निध्यात होम-स्टेमध्ये राहून ते स्थानिकांचे जीवन जवळून अनुभवायचा प्रयत्न करतात. स्थानिक मुलांना चित्रकलेचे रंग आणि साहित्य देऊन त्यांच्यामध्ये कलेची रूची निर्माण करण्याचा प्रयत्नही या प्रवासा दरम्यान केला जातो. लडाखच्या दुर्गम वातावरणातील रमणीय निसर्गाचा आणि स्थानिक जनजीवनाचा अनुभव शब्दबद्ध करणारे *लडाख डायरी* हे पाच लेख त्यांनी लिहिले आहेत. हे लेख ‘चिन्ह’ च्या वाचकांसाठी दर आठड्याला एक या प्रमाणे प्रसिद्ध करत आहोत. या लेखमालेतील हा पहिला भाग.
कालपासून जी लेह यात्रा चालू झाली ती आज ग्रीन व्हीला येथे येऊन थांबली. हे आमचे पहिले तीन दिवसाचे वास्तव्याचे ठिकाण. इथल्या रूममधून झोपून,बसून बाहेर डोकावले की डोंगरावरची मॉनेस्ट्री इतकी सुंदर दिसते ती कधी एकदा त्या डोंगरावर जाऊन ती नीट बघतोय असे झाले होते पण आज काहीही करायचे नव्हते.कारण पुण्यावरून लगेच विमानाने लेहला आल्यामुळे एक दिवस सक्तीची विश्रांती होती.त्यामुळे हॉटेलच्या खिडकीतून मॉनेस्ट्री बघणे, बर्फाच्छादित शिखरे बघत थंडीचा अनुभव घेणे. घराच्या मालकिणीच्या मुलांबरोबर बोलणे,खेळणे एवढेच काम सुरू होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही टसोगस्ती ( Tsogsti) या तांब्या पितळेच्या वस्तू तयार करणाऱ्या गावाकडे निघालो. ती जागा लेहपासून साधारण 44 किलोमीटरवर होती आणि प्रत्येक वळणावर निसर्ग इतके सुंदर दर्शन देत होता की ही ट्रीप एका दिवसातच बरेच काही निसर्गभान देणार असे वाटू लागले. गाडी इंडस आणि झांस्कर या नदीच्या कडेकडेने जात होती.एक पूल ओलांडल्यावर आम्ही त्या गावाजवळ पोहोचलो.
झंस्कार नदीच्या कडेला अगदी एका दरीमध्ये हे गाव वसले आहे. तिथे कुठलीही मोबाईलची रेंज किंवा इंटरनेट येत नाही त्यामुळे निघायच्या आधी लेहमधील एका माणसांकडून एक वाईस मेसेज तयार करून घेतला आणि त्या गावी गेल्यावर त्या माणसाला तो ऐकविला.या गावाजवळ गेल्यानंतर उतरला उतरल्या जी काही हिरवीगच्च शेती आणि मागं उंच उंच डोंगर, दरीमधून पाण्याचा खळखळाट करत जाणारी झांस्कार नदी ! आपण स्वप्नांच्या जागेवर आलो आहोत याचा अंदाज आलाच.
या गावांमध्ये जेमतेम चार-पाच घर आहेत आणि ती सुद्धा थोडी डोंगर उतारावर वसलेली आहेत. प्रत्येक घराची मांडणी आणि डिझाईन इतकी अफलातून आहे की आपण नक्की लडाख मध्ये आहोत आणखीन कुठल्यातरी परदेशातल्या गावात आहोत असेच आम्हाला वाटले.या गावात राहणारे तांबट लोक आहेत ते फक्त देवाच्या पूजेसाठी लागणारे कमंडलुसारखी भांडी बनवतात. त्याच्यामध्ये तांबा, पितळ आणि त्यावर अत्यंत सुबकरितिने आणि कोरलेले डिझाईन पूर्ण हाताने बनवितात, या सगळ्यात त्याचा घाट खूपच मोहक आहे……
आणखीन एक वैशिष्ट्य जाणवले की जी भेट देणारी मंडळी तिथे जातात तेव्हा क्रमाक्रमाने प्रत्येकाचा नंबर आल्यावर ते पाहुणे त्यांच्याकडे जाऊन राहतात. आम्ही गेल्यानंतर एका खूप मोठे घर आम्हाला मिळाले . त्यातला काम करणारा मालक आणि त्याची बायको इतकी अगत्यशील होती की आम्ही त्यांच्याकडे कुठल्या गोष्टीसाठी बघितलं तरी आम्हाला काय पाहिजे याचा त्यांना अंदाज येत होता.
गेल्या गेल्या गावांमध्ये बोळातून बोळातून हिंडून आलो आणि इतके सुंदर घरांची रचना अनुभवता आली की सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि परत दुसरी दिवशीची सकाळ ह्याच्यात खूप वेगळी प्रकाश योजना अनुभवायला मिळाली.उन्हाचे कवडसे, उंच डोंगरावर दिसणारा चकचकीत बर्फ , त्यावरून गप्पा मारत जाणारे काळे पांढरे ढग आणि कारागिरांचे पत्र्यावरचा ” ठक,ठक ” आवाज!
सकाळी ब्रेकफास्ट केल्यावर आम्ही त्या कारागिरांचे काम बघण्यासाठी त्यांच्या छोट्या खोलीकडे वळालो. तुडुंब सामानाने भरलेली खोली होती. एका बाजूला बैठक होती, अनेक गोष्टी इकडेतिकडे पडलेल्या होत्या. त्या माणसाची बैठक म्हणजे अगदी योग्य होती. त्यांनी एक उशीचा आधार घेऊन बैठक तयार केली होती आणि अंगावर काम करताना ते पायावर घोंगडी टाकत असत. त्याच्यामुळे एखादी धातूचा गरम तुकडा पायावर पडला तरी अंगावर पडून इजा होत नसे. त्या घोंगडीला अनेक भोके पडून ती एकदम कलात्मक दिसत होती.
मी त्यांचे काम बघून थोडे मी काम करून पाहू का? असे विचारले. त्याने आनंदाने जागा करून दिली.एका तांब्याच्या पत्र्यावर मी ठोकून त्याची लांबी वाढवली. ” जमले का ? ” म्हणून त्याच्याकडे पाहिले तेव्हा त्याने मला सांगितलं की आतापर्यंत त्यांच्याकडे एवढे पाहुणे येऊन गेले परंतु कोणीही त्याच्या कामात असा हात लावला नव्हता.. त्यामुळे त्याला वाटलेला आनंद चेहऱ्यावर दिसतच होता.
दहा मिनिटे काम केल्यानंतर आम्ही खाली त्यांच्या शेताकडे गेलो. त्याच्या बायकोने बरोबर एक बादली घेतली होती मग शेतामध्ये जाऊन वाटाणे, पालक, फ्लावर पाहिजे तेवढे बादलीत काढून घेतले आणि डाव्या हाताला अप्रिकॉटने लगडलेली झाडे होती. त्यांनी आम्हाला थोडे खाऊ शकता असं म्हणल्यानंतर जन्मभरचे अप्रिकॉट आम्ही दोघांनी खाऊन घेतले. त्या ओल्या जरदाळू सारख्या फळाची चव इतकी अप्रतिम असते हेही कधी ध्यानी मनी आले नव्हते.
रात्रीच्या जेवणाची तयारी लगेच चालू झाली आणि त्या होम स्टेच्या मालकीण बाईंनी छानसे मोमो बनवायला घेतले. सुचिताने त्यांना मदत केली आणि म्हणता म्हणता साडेसात वाजले आणि आम्ही जेवायला बसलो. सुंदर भाज्यांची सूप आणि मोमोज आणि अमूल बटर याचा संगम तोंडामध्ये इतका सुंदर रीतीने घोळत होता की बस.
काल होम स्टेच्या मालकीण बाईंनी आम्हाला बाथरूम, टॉयलेटला जायचं असेल तर एक खोली दाखविली. आम्ही त्या खोलीमध्ये गेल्यावर आश्चर्यचकीत झालो. तिथे एक सिमेंटची स्लॅब टाकली होती आणि एक फुटाचा चौकोनी गाळा पाडला होता. त्यावर एक लाकडाचा चौकोन ठेवलेला होता. तुम्हाला टॉयलेटला जायचे असेल तर तो चौकोन बाजूला करायचा आणि आपापले काम करून घ्यायचे आणि त्यावर तिथे चारी बाजूला पसरलेली माती येथील केरसुणीने ढकलून द्यायची. या सर्व गोष्टींचे जे कंपोस्ट खत तयार होते ते पुढे भाजीपाला किंवा फळबागांना वापरले जाते.मुख्य म्हणजे इथे कुठलाही वास येत नव्हता. हा अनुभव खरोखरच खूप वेगळा होता. इथल्या सर्व दूर पसरलेल्या खेड्यांमध्ये हीच पद्धत वापरली जात होती.
सकाळी पाच वाजता जाग आल्यावर होम स्टेचा मालक शेतामध्ये पाणी द्यायला गेला होता. त्यांच्या चार घरांमध्ये प्रत्येकाची पाळी आल्यावर एका घराचा मालक चार दिवस पाण्यासाठी वेळ देत असे. खरंच किती समजुतीने सर्व कामे वाटून घेतली होती त्यांनी. मला त्यांचं कौतुक वाटत होतं. गप्पांमध्ये त्याने सांगितले की आमच्याकडे परदेशी कुटुंब राहायला येतात , १५ दिवस आमच्या शेतात ,घरी सगळी कामे करतात ,इथल्या गोष्टी शिकून घेतात. त्यांना आम्हाला खूप मजा येते. आता पुन्हा लेहला परतायची वेळ झाली होती आणि ठरल्याप्रमाणे ड्रायव्हर घेऊन आम्हाला आमच्या हॉटेलमध्ये सोडून गेला.
या २४ तासात आलेला अनुभव इतका वेगळा आणि अगत्याने भारलेला होता कि ती जागा खरोखरच सोडू नये असेच आम्हाला वाटत होते.
लेखक : शरद तरडे – संपक्र क्र. ९४२२०१०४१८
(या लेखाच्या पुढील भाग येत्या शुक्रवारी प्रसिद्ध केला जाईल.)
Related
Please login to join discussion