No products in the cart.
चांदण्यांचा ‘सडा’!
रत्नागिरी जिल्ह्यातील जांभ्या दगडांचा सडा आणि त्यावरील कातळशिल्पे म्हणजे महाराष्ट्राचं वैभव. पण प्रतिपदेच्या मिट्ट काळोखात लांबवर पसरलेल्या सड्यावर उभे राहून अनंत कोटी ब्रम्हांडातील मंदाकिनी नावाने ओळखली जाणारी आपली आकाशगंगा नुसत्या डोळ्यानी पहातानाचा आनंद काही निराळाच. त्यात भर म्हणजे पायाखाली अश्मयुगीन कालखंडात येथे वावरणाऱ्या मानवाने त्याच्या अनुभव विश्वातून साकारलेली कातळशिल्प. एका वेगळया अवकाशाचा अनुभव देणारी.
‘अरे आज आकाश जरा स्वच्छ वाटत आहे. वेळ असेल तर एक चान्स घेऊया का ?’ असा मेसेज एकमेंकात झाला आणि बऱ्याच दिवसांनी इच्छा आज फलद्रूप व्हावी असे म्हणत प्रवास सुरू झाला. आकाशाच्या वेध घ्यायचा असेल तर कृत्रिम प्रकाशापासून लांब जाणे आलेच. शहरातून बाहेर पडलो तोपर्यंत आकाशात ढगांनी आक्रमण करायला सुरुवात केली. बरे गंमत म्हणजे आम्हाला आकाशाच्या ज्या भागाचा वेध घ्यायचा होता बरोबर तोच भाग ढगांनी व्यापून टाकला होता. म्हंटले जागेवर पोचू मग बघू तो पर्यंत ढग थोडे फार दूर झाले तर ठीक. दूर सड्यावर पोचेपर्यंत चांगलाच काळोख झाला. आसमंत निरव शांततेच्या अधीन झाले होते. लांबवर पसरलेल्या सड्यावर काळोखात आपले अस्तिव दाखवणाऱ्या खुरट्या वनस्पती वेगळाच आभास निर्माण करीत होत्या.
हळुवार येणारे वारे आणि त्यासोबत येणारा गारवा यामुळे वातावरण आल्हाददायक होते. ढग दूर झाल्याने काही काळापुरते का होईना निरभ्र आकाश अगणित लखलखत्या चांदण्यांनी, ग्रह ,ताऱ्यानी क्षितिजाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत व्यापून गेले होते. आकाशातील ग्रह गोल जरा अधिकच जवळ असल्याचे जाणवत होते. जणूकाही हात लांब करून टिपून घ्यावेत. पावसाळ्याच्या दिवसांत स्वच्छ झालेल्या वातावरणामुळे निर्माण झालेली उत्तम दृश्यमानता हे खरे त्याचे कारण. हा आसमंत अनुभवत असताना आकाशात साधारण दक्षिण पश्चिम क्षितिजापासून उत्तर पूर्व क्षितिजापर्यंत पसरलेला पांढऱ्या धूसर रंगाच्या पट्ट्याने लक्ष वेधले. हा धूसर पट्टा म्हणजे मंदाकिनी. ज्याला मिल्की वे म्हणून देखील ओळखले जाते.
आम्ही एकदम खुश झालो. ज्यासाठी आलो होतो त्यातील एक गोष्ट म्हणजे आकाशगंगा नजरेसमोर होती. दिसत असलेली गोष्ट टिपण्यासाठी माझ्याकडची साधने अपुरी होती. पण सोबत असलेला सुकुमार मात्र जाम आनंदात होता. त्याच्याकडील आधुनिक मोबाईल आणि कॅमेरा यांच्या साहाय्याने आकाश टिपण्यासाठी त्याची धावपळ सुरू झाली. पहिल्याच प्रयत्नात खूप सुंदर छायाचित्र हाती लागली. माझ्या मनात काहीतरी वेगळेच घोळत होते. मला कातळशिल्प आणि आकाशगंगा एकाच वेळी एकाच फ्रेम मध्ये छायाबद्ध करावयाचे होते. कातळशिल्प ठिकाण गाडी रस्त्यापासून थोडे दूर होते. आकाशात परत एकदा ढगांचे आक्रमण सुरू झाले होते. त्यामुळे थोडी घाई करत अंधारात चालत कातळशिल्प परिसराकडे निघालो. रस्ता तर नाहीच मळणीची पायवाट देखील सोबत नव्हती. कातळावर पावसाळ्यात उगवणाऱ्या पोटरीभर उंचीच्या गवतातून वाट काढत मार्गक्रमणा चालू झाली. गवतावर पडलेल्या दवाने पाय ओले होत होते. पण तो स्पर्श सुखावून जाणारा.
पायाखाली काही नाही ना, आजूबाजूच्या झुडपात कोणी नाही ना याचा अंदाज घेत चाललेली आमची वाट. सोबत असलेल्या सुकुमारची रात्रीच्या वेळी सड्यावर फिरायची ही पहिलीच वेळ. त्यामुळे तो काहीसा धास्तावलेला. भाई तुम्ही सोबत आहात म्हणून ठीक आहे पण या सड्यावर वेळ आली तर लोक कसं काय जात असतील असा प्रश्न त्याने केला. त्याच्या प्रश्नावर मी लगेचच सोबत असलेल्या अजिंक्यला कुठे एखादी मजबूत काठी मिळते का पहा असे सांगितले. सुदैवाने चांगली दणदणीत काठी लगेचच मिळाली. आता काठी जमिनीवर आपटत चालत जायचे. सुकुमारचा प्रश्नाला कृतीतून उत्तर दिले.
निरव शांततेत पायाखाली चुरगळणाऱ्या गवताचा आवाज आणि सोबत काठी ठोकल्याचा आवाज वातावरणातील गंभीरता वाढवत होता. कातळशिल्प परिसरात पोचेपर्यंत ढगांनी आकाश पुन्हा एकदा व्यापून टाकले. आता वाट बघणे एवढेच शिल्लक राहिले.
अंधाराचे साम्राज्य, निरव शांतता मधूनच येणार रातकिड्यांचा आवाज, वाऱ्याच्या झुळकीने झुडपांच्या पानांची हालचाल. वातावरणातील गूढता वाढवत होत्या. त्यात आता कातळशिल्प रचनेची सोबत एक वेगळाच अनुभव देऊन गेली. अर्थात हा अनुभव आम्ही वेळोवेळी घेत आलो आहोत. पण यावेळी मात्र त्यात भर होती ती प्रतिक्षेची. वेळ सरकत होती. या अगोदरच्या वेळी याच ठिकाणी बिबट्या आणि जंगली डुकरांचे दर्शन झाले होते. म्हणून अधूनमधून हातात असलेल्या विजेरीच्या सहाय्याने आजूबाजूच्या प्रदेशातील हालचालींचा वेध घेण्याचे माझे काम चालू होते. अर्थात ही गोष्ट इथे पोचेपर्यंत सुकुमार आणि अजिंक्य यांना सांगितली नव्हती. म्हटले जरा यांची गंमत करू. जशी ही गोष्ट त्यांना कळली तशी त्यांची चांगलीच पाचावर धारण बसली मी मात्र हसत होतो. भाई हे अगोदर सांगायला काय झाले असे म्हणत आता काही झाले तर त्याला तुम्ही कारणीभूत असा तक्रारीचा सूर लावला.
काही वेळाने ढग थोडे दूर झाले. परत एकदा आकाशाचे विलोभनीय दर्शन झाले. ज्या उद्देशाने आलो ते साधण्याची वेळ आली. जमिनीवरील कातळशिल्प त्याच्या पार्श्वभूमीवर आकाशात दिसणारी आकाशगंगा ( मंदाकिनी ) अशी फ्रेम मिळवण्यासाठी आमची धडपड सुरू झाली. आमच्या सुदैवाने काळवेळ जुळून आली आणि दोन तीन प्रयत्नात आम्हाला असलेला अपेक्षित परिणाम काही प्रमाणात का होईना साधणे शक्य झाले. अशा प्रकारचे छायाचित्र टिपण्याचा हा पहिलाच प्रयत्न काही प्रमाणात यश देऊन गेला. अशी परत फ्रेम गाठायची झाली पुढील महिन्याभरातील अंधाराचे दिवस गाठायचे नाहीतर पुढच्या वर्षीची वाट पहायची. परत एकदा ढगांनी व्यत्यय निर्माण केला. एकंदर परिस्थिती पहाता आता मात्र परतीची वाट पकडण्याशिवाय पर्याय नव्हता.
परतीच्या प्रवासात काढलेली छायाचित्र बघताना कातळशिल्प रचना आणि आकाशात दिसत असणारी आकाशगंगा यामधील अवकाशाकडे लक्ष वेधले गेले. किती वेगवेगळे पैलू या अवकाशात दडून बसले आहेत. बारकाईने पहात जातो तसतसे हे पैलू प्रकाशित होत जातात. ह्या अवकाशात काय काय दडून बसले आहे या विचारांच्या गर्तेत मन हरवून गेले.
विश्वाच्या अफाट पसाऱ्यातील आपली एक लहानशी आकाशगंगा त्यातील तीळ मात्र पृथ्वी त्यावरील कण मात्र मनुष्य प्रजातीने आपल्या अनुभव विश्वातून साकारलेली कातळशिल्प त्यातील विविध पैलू आणि या सर्वांना सामावून घेणारं अवकाश — एक अविस्मरणीय अनुभव. रात्रीच्या वेळेत सड्यावर फिरणं भू, जल आणि आकाश यांच्या विविध पैलूंना सामावून घेणारे अवकाश जाणून घेण्याचा प्रयत्न करणं हा एक वेगळाच आणि आनंददायी अनुभव आहे. हा अनुभव घेण्यासाठी कोंकणातील सड्यांवर आपणही याच. कोंकणातील कातळ सड्यांवरून आकाश दर्शनाचा मनमुराद आनंद लुटता येतो.
हा एक मात्र सावधगिरीचा सूचना रात्रीच्या वेळी सड्यावर फिरताना स्वतःची काळजी घेणे आलेच पण माहितीगार व्यक्ती मात्र सोबत हवीच नाहीतर चकव्याचे भूत मानगुटीवर बसले म्हणून समजाच.
****
– सुधीर रिसबूड सोबत सुकुमार भाटवडेकर आणि अजिंक्य प्रभुदेसाई
‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD
‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag
Related
Please login to join discussion