No products in the cart.
प्रेमाला कलेची स्फूर्ती मानणाऱ्या ललिता लाजमी
ललिता लाजमीची पहिली ओळख झाली ती ‘तारे जमीन पर’ या चित्रपटातून. खर सांगायचं तर आम्हा गावाकडून आलेल्या नव्वदोत्तर पिढीची गोची अशी होती की चांगल्या गोष्टींची ओळख आम्हाला बहुतांशी चित्रपटातून व्हायची. तर हा चित्रपट पाहिला आणि आर्ट कॉलेजात शिकत असल्यामुळे इतर मित्रांकडून कळलं की ललिता लाजमी या पडदयावरच नाही तर प्रत्यक्षात देखील चित्रकार आहेत. मग त्यावेळी इंटरनेट फारसं सहज उपलब्ध नसलं तरी कॉलेज निमित्त वापर व्हायचाच त्यामुळे कुतुहलातून त्यांची चित्र सर्च केली होती. स्त्री आणि कुटुंब केंद्रस्थानी ठेवून काढलेली त्यांची चित्र त्यावेळी समजण्यास सोपी वाटली पण त्या वयातही जाणवलं की यातला आशय गूढ नसला तरी खोल आहे.
ललिता लाजमी यांचं १३ फेब्रुवारी रोजी निधन झालं. आपल्याकडे चित्रकाराला फारसं महत्व दिलं जात नाही. त्यामुळे या बातमीबद्दल फारसं काही वाचनात आलं नाही. हे नेहमीचंच असल्यामुळे यात फार काही विशेष जाणवलं नाही. ‘चिन्ह’ने मात्र ही बातमी सर्वप्रथम दिली. ललिता लाजमी या खरं तर सेलिब्रेटी चित्रकार. साक्षात गुरुदत्त यांच्या भगिनी असल्यामुळे चित्रपट क्षेत्राशी त्यांचा थेट संबंध होता. तरीही त्या केवळ चित्रकार म्हणून मुख्य प्रवाहात माध्यमांनी त्यांच्याबद्दल हे अक्षम्य दुर्लक्ष केले असावे. 13 जानेवारी पासून नॅशनल गॅलरीत त्यांच्या कामाचे सिंहवलोकनी प्रदर्शन सुरू आहे. पण त्याची कुठलीच बातमी नाही. हे प्रदर्शन सुरू असतानाच ललिता लाजमी यांचं वृद्धापकाळामुळे निधन झालं.
ललिता लाजमी या मूळच्या ललिता पडुकोन. कलकत्ता येथे पाच भावंडांच्या मोठ्या कुटुंबातली एकुलती एक मुलगी. ललिता लाजमी यांचे वडील बर्माशेल मध्ये कामाला होते. परिस्थिती तशी ओढ ग्रस्तीची असली तरी पूर्ण कुटुंबच कलासक्त असल्याने ललिता यांचा ओढा कलेकडे होता. ललिता यांना चित्रकलेची आवड होती. त्या अगदी पाच वर्षांच्या असताना त्यांनी वॉल्ट डिस्ने चित्रकला स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेत त्यांना पहिलं बक्षीस मिळालं होतं. त्यावेळी त्यांचं नाव पेपरातही आलं होतं. पण स्पर्धेच्या आयोजकांनी एवढीशी मुलगी इतकं चांगलं चित्र काढू शकते यावर विश्वास बसेना. त्यांनी ललिता लाजमी यांना पुन्हा समोर चित्र काढायला सांगितलं एवढी त्यांची कामातली सफाई होती.
पुढे दुसऱ्या महायुद्धात कलकत्यामध्ये बॉम्ब हल्ल्याच्या भीतीमुळे ललिता लाजमी यांचं कुटुंब मुंबईला स्थलांतरित झालं. तिथे गुरुदत्त चित्रपट क्षेत्रात स्थिरावले. गुरुदत्त यांच्या गीता दत्त यांच्याबरोबरच्या प्रेमप्रकरणामुळे ललिता यांचा विवाह लवकर ठरवण्यात आला. गोपालकृष्ण लाजमी यांच्याशी या विवाहबद्ध झाल्या. त्याकाळी स्त्रियांनी अर्थार्जन करायलाच हवे अशी पद्धत नव्हती. पती बीपीटीमध्ये मोठे अधिकारी होते तरीही ललिता या हट्टाने आर्थिक दृष्टया स्वावलंबी झाल्या. जेजेमध्ये त्यांनी ‘आर्ट मास्टर’ हा कोर्स पूर्ण केला आणि त्या फोर्ट परिसरातील कॉन्व्हेंट शाळेत चित्रकला शिक्षक म्हणून शिकवू लागल्या.
कलेची आवड असल्याने त्यांना केवळ चित्रकला शिक्षक होऊन राहायचं नव्हतं. चित्रकलेतील वेगवेगळ्या शक्यता उमजून घेण्यासाठी त्यांनी जेजेमध्ये संध्याकाळच्या हॉबी क्लासला म्हणजे त्यावेळच्या ग्राफिक क्लासला प्रवेश घेतला. त्यावेळी हॉबी क्लासची जबाबदारी प्रा. पॉल कोळी यांच्यावर होती. पॉल कोळी पेंटिंगच्या वर्गाला शिकवत होते आणि परब सरांच्या आग्रहामुळे त्यांनी हॉबी क्लासचीही जबाबदारी घेतली होती. या हॉबी क्लासचं वातावरण काहीसं हॉबी सारखंच होतं. पण ललिता लाजमी मात्र अत्यंत गंभीरपणे काम करायच्या. कामाप्रती त्यांची निष्ठा होती त्यामुळे प्रा कोळी आणि ललिता यांच्यात छान मैत्री झाली. खरं तर ललिता लाजमी पॉल कोळी यांच्यापेक्षा वयाने बऱ्याच ज्येष्ठ पण त्या त्यांचा शिक्षक म्हणून खूप आदर करत. कुठेही आपण गुरुदत्त यांची बहीण असल्याचा अहंभाव त्यांच्या स्वभावात नव्हता. ही निष्ठा पाहून कोळी यांनी त्यांना खूप मदत केली. या काळात त्यांनी मुखवट्यांचा फॉर्म वापरून आपल्या चित्रांमध्ये खूप प्रयोग केले. हा एक वेगळा प्रयत्न होता. विदूषक या पात्राभोवतीही त्यांनी अनेक चित्रे तयार केली. या प्रयोगांना वैयक्तिक आयुष्यातील कडू गोड अनुभवाची किनार होती.
ललिता लाजमी या वेगवेगळ्या प्रयोगातून स्वतःला अभिव्यक्त करत राहिल्या. त्यात बहुतांश काम हे ग्राफिक (प्रिन्टमेकिंग) माध्यमातील होतं. चित्रकार के.एच.आरा यांनी त्यांना एकल प्रदर्शनाची पहिली संधी दिली. त्याकाळातल्या मोजक्या स्त्री चित्रकारापैकी एक असलेल्या ललिताजींनी आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि शाळेतील नोकरी या व्यापांमधून चित्रकलेतले सातत्य कायम ठेवले. जेजेमधला हॉबी क्लास पूर्ण झाल्यानंतर त्यांनी घराच्या स्वैयंपाकघरामध्येच आपला प्रिन्टमेकिंग स्टुडिओ तयार केला. शाळेची नोकरी करून त्या संध्याकाळच्या वेळात काम करत असत. संध्याकाळच्या वेळच्या अपुऱ्या प्रकाशामुळे त्यांच्या चित्रांमध्ये सेपिया आणि राखाडी छटेकडे झुकणाऱ्या काळपट रंगांचा वापर होत असे. पुढे त्यांनी ऑईलसारख्या माध्यमातही काम केलं तेव्हा त्यांची कलर पॅलेट बदलली. चित्रांमध्ये इतर रंगांचंही अस्तित्व उमटलं.
आर्थिकदृष्टया कितीही मर्यादा असल्या तरी ललिताजींना कला विषयक उत्तमोत्तम पुस्तके जमा करण्याची आवड होती. पण शिक्षकी पेशात परदेशी महागडी पुस्तके खरेदी करणे शक्य नसे, अशा वेळी त्या बार्टर पद्धतीचा वापर करत. म्हणजे आपली चित्रे जर्मन स्नेही, पुरातत्वशास्रज्ञ डॉ. हेंज मोड यांना भेट म्हणून देत आणि त्यांना त्याबदल्यात पुस्तके मिळत. अशा याप्रकारे त्यांनी स्वतः उत्तम पुस्तकांचा संग्रह जमा केला होता.
चित्रकार आणि संयोजक सुमेश शर्मा यांनी त्यांच्या ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’मध्ये सिंहावलोकन प्रदर्शनाचे संयोजन केले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन जितीश कल्लाट, आमिर खान यांच्या हस्ते झाले. सुमेश शर्मा ललिता लाजमी यांचे शाळेतील विद्यार्थी. ललिता लाजमींनी सुमेश यांचं काम बघून त्यांना चित्रकार बनण्यासाठी खूप प्रोत्साहन दिले. सुमेश यांच्या मते ललिताजींनी चित्र विषय आपल्या कौटुंबिक जीवनातच शोधले. त्यासाठी त्यांना बाहेरून प्रेरणा घ्यावी लागली नाही. स्वभावाने अत्यंत साध्या असणाऱ्या ललिता लाजमी यांचा हा धाडसी प्रयत्न होता. कारण जेव्हा तुमचे चित्रविषय हे तुमच्या कुटुंबातून येतात तेव्हा ते एक दृश्यरूपातील आत्मचरित्रच असते आणि त्यामध्ये आपलं संपूर्ण जीवनच उघड्या स्वरूपात रसिकांसमोर उभे होऊ शकते. ललिता लाजमींनी अगणित अशी सेल्फ पोर्ट्रेटस केली. या सेल्फ पोर्ट्रेटसमधून त्यांनी भीती, स्वप्नरंजन, अशा वेगवेगळ्या भावनांना चित्रित केले. 2022 मध्ये त्यांनी शेवटचे सेल्फ पोर्ट्रेट केले. ज्यात त्या स्वतःला फ्रीडा कोहलोच्या स्वरूपात दाखवतात.
ललिता लाजमींच्या मते चित्र काढण्यासाठी प्रेरणा महत्वाची. ही प्रेरणा येते ती प्रेमामधूनच. प्रेमाशिवाय अभिव्यक्तीमध्ये मजा नाही आणि प्रेम करण्यासाठी कुठलंही वयाचं बंधन नाहीये.
सध्याचं जग हे मानसिक रोगांच्या गंभीर समस्यांना सामोरं जातंय. ज्या काळात मानसिक समस्या हा हास्याचा विषय असायचा (आजही तो काही प्रमाणात आहे, तरी मानसिक समस्या हा स्वास्थ्याशी निगडित प्रश्न आहे हे लोकांना समजलंय.) तेव्हापासून ललिता लाजमींनी (साधारण 70 चं दशक) मानसिक समस्यांना आपल्या कॅनव्हासवर स्थान दिलंय. ‘चिन्ह’मधील ‘कागज के फूल’ या लेखात ललिता लाजमी यांनी उल्लेख केला आहे की गुरुदत्त यांच्याप्रमाणेच आपण एकटेपणाचा सामना आयुष्यभर केला. ही समस्या गंभीर आहे हे त्यांनी वेळीच ओळखले आणि यावर सायको ऍनालिसिसचे उपचार घेतले. दुर्दैवाने गुरुदत्त यांना हा उपाय सापडला नाही.
आजूबाजूला माणसांची गर्दी असूनही आतून येणाऱ्या या एकटेपणावर ललिताजींनी चित्रकलेच्या साहाय्याने मात केली. चित्रकलेची आवड हे एकप्रकारे त्यांच्यासाठी वरदान ठरलं कारण ही कला अशी आहे की तुम्ही अगदी मोजक्या साधनामध्येही स्वतःला स्वतःच्या सोयीच्या परिघात अभिव्यक्त करू शकता. गुरुदत्त देखील प्रेमातील विफलता म्हणा किंवा नैराश्य यामुळे एकटेपणाने घेरले गेले होते. अशा वेळी चित्रपट हे माध्यम काहीसं व्यावसायिक किंवा सामूहिक प्रयत्न असल्याने गुरुदत्त यांना स्वतःचा एकटेपणा कमी करण्यासाठी काहीशा मर्यादा आल्या असाव्या का ? जर गुरुदत्त यांनाही चित्रकलेची आवड असती तर नक्कीच आज परिस्थिती वेगळी असू शकली असती का?
चित्रकलेची निवड करणं सोपं नसतं. निवडीनंतर सातत्य राखणेही सोपं नसत. अनेक जण निवड करतात आणि पुरेसं यश, प्रसिद्धी मिळाली नाही की सोडून देतात. पण ललिताजींनी मात्र आर्थिक परिस्थिती बेताची असताना चित्रकलेची साधना केली. स्त्री म्हणून असणारे कौटुंबिक व्याप, पूर्णवेळ नोकरी, आर्थिक जबाबदाऱ्या या सगळ्यातूनही आपली चित्रकलेची साधना कायम अगदी शेवटच्या श्वासापर्यंत सुरु ठेवली. प्रत्येक चित्रकाराला, विशेषत: कौटुंबिक व्याप पाचवीलाच पुजलेल्या स्त्री चित्रकारांसाठी ललिता लाजमी या आदर्श घालून देतात. येणारी पिढीला या आदर्शांवरून चालायचे आहे, हे सोपे निश्चित नाही.
**
( लेखासाठी सुमेश शर्मा आणि प्रा.पॉल कोळी यांनी माहिती दिली. लेखातील सर्व फोटो सुमेश शर्मा यांच्या सौजन्याने. )
– कनक वाईकर
Related
Please login to join discussion