Features

प्रकाशाची जादू

प्रशांत कुलकर्णी आणि मानसिंग जाधव यांचं चित्रकला प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी येथे आयोजित करण्यात आले आहे. प्रशांतची सारी चित्रं कुरुंदवाडमधल्या स्टुडिओत रेखाटली आहेत. मानसिंगही इस्लामपूरमधल्या त्याच्या स्टुडिओत चित्रं रेखाटतो. त्याचं जहांगीरमधलं हे दुसरं प्रदर्शन. या प्रदर्शनाच्या निमित्ताने प्रशांत साजणीकरांनी दोघांशी मस्त गप्पा मारल्या. त्यांच्या कलाप्रवासाबद्दल जाणून घेतलं. एखादं चित्र रेखाटत असताना कलाकाराच्या मनात नेमकं काय चाललेलं असतं याचा मागोवा या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर प्रशांत साजणीकर यांनी या लेखाद्वारे घेतला आहे. सोबत प्रदर्शनातील काही क्षणचित्रे खास चिन्ह आर्ट न्यूजच्या वाचकांसाठी.

फोर्ट मधल्या आवडत्या जागे पैकी एक म्हणजे जहांगीर आर्ट गॅलरी. चित्रांमधलं फारसं कळत नसलं तरी तिथल्या त्या भारलेल्या दालनात मूकपणे चित्रं न्याहाळणं हा नेहमीचा आवडता कार्यक्रम. देशाच्या कानाकोपर्‍यातून येणारे कलाकार. तिथे भिंतींवर लावलेली चित्रं. काही कळणारी तर काही अजिबात न कळणारी तरीही नजरबंद करणारी. कलेचा शांतपणे आस्वाद घेणारे तिथले रसिक. हे सगळं वातावरण पुन्हा पुन्हा अनुभवावं असं वाटणारं.

समोवर मात्र आता तिथे नाही. तिथे बसून आता चहा किंवा कॉफी घेता येत नाही याचं नेहमीच वाईट वाटतं. पण जेव्हा जेव्हा या भागात जाणं होतं तेव्हा जहांगीरला गेलो नाही असं होत नाही.

पण यावेळी जहांगिरला जाण्याचं कारण फार वेगळं होतं. आपल्याच गावच्या एका तरुण मित्राच्या चित्रांचं प्रदर्शन इथे भरतंय हे कळल्यावरच फार आनंद झाला होता. प्रशांत कुलकर्णी हे त्या तरुणाचं नाव. दोन दिवसापूर्वीच त्याचा मेसेज आला होता. आणि संधी मिळताच तिथे जायचं हे मनात पक्कं केलं आणि आज तो योग आला.

कुरुंदवाडचा प्रशांत कुलकर्णी आणि इस्लामपूरचा मानसिंग जाधव या दोन कलाकारांच्या पेंटिंग्जचं प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीत भरलंय. The Magic of Light- Duet Show of Paintings ! प्रशांतने The Market अशी प्रमुख थीम घेऊन तर मानसिंगने The Morning Light या थीमवर अप्रतिम अशी चित्रं रंगवली आहेत. चित्रातलं मला फारसं कळत नसलं तरी पाहता क्षणी मंत्रमुग्ध व्हावं अशी चित्रं.

The Market या थीममधे प्रशांतने प्रामुख्याने क्रॉफर्ड मार्केट आणि गावाकडच्या बाजाराची मनोवेधक अशी चित्रं रेखाटली आहेत. या चित्रांमधला रंगाचा ताजेपणा आणि तेजस्वी वापर लक्ष वेधून घेतो. उन्हापासून रक्षण व्हावे म्हणून वापरल्या जाणारी ताडपत्री आणि त्यातून झिरपत येणारे उन प्रशांतच्या कुंचल्याने ज्या प्रकारे पकडले आहे ते पाहून थक्क व्हायला होतं. फ्रूट सेलर या चित्रातले त्याने टिपलेले बारकावे विलक्षण आहेत. बाजारातले फळ विक्रेते, व्यापारी, तिथली माणसं एवढेच नव्हे तर तिथल्या फरशांवर पडलेले उन ! विविध रंगांच्या ताडपत्र्या आणि त्यातून येणारे उन. दुसर्‍या एका चित्रात मंदिराबाहेचे मार्केट दिसते.

The Mornig Light ही मानसिंगची प्रमुख थीम आहे. त्याच्या चित्रातली निळाई लक्ष वेधून घेते. सकाळच्या प्रहराच्या चित्रांना सोनेरी किंवा केशरी, पिवळा असा रंग न वापरता निळा रंग का वापरला असा प्रश्न विचारल्यावर तो म्हणतो फोटो मधे जसं दिसतं तसं चित्रकाराला दिसेलच असं नाही. त्याच्या नजरेतून जे दिसतं तसं तो चित्र रेखाटतो. आणि निळा हा मानसिंगचा आवडता रंगही आहे. गावाकडच्या अनेक गोष्टी त्याच्या चित्रात प्रामुख्याने पहायला मिळतात. दारातून दिसणारं झाड आणि उन्हाची तिरीप आणि त्यात न्हाऊन निघालेलं तुळशी वृंदावन. मंदिराबाहेरचा नंदी. प्रतिक्षा या थीमवर त्याची काही अतिशय सुंदर पेंटिंग्ज आहेत. चावडीवर गप्पा मारत बसलेल्या तरुणांचं चित्रही अतिशय सुंदर आहे. मानसिंग इस्लामपूरच्या शाळेत कलाशिक्षक आहे.

जहांगीरमधे आपल्या कलाकृतींचं प्रदर्शन भरावं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. मानसिंग आणि प्रशांतने २०११ साली अर्ज केला होता आणि तब्बल दहा वर्षांनी त्यांना दालन उपलब्ध झालं. बरं, नुसतं अर्ज करुन चालत नाही तर तुमच्या चित्रांचा दर्जा पाहूनच इथे प्रदर्शन करण्याची परवानगी दिली जाते. सध्या २०२९ सालच्या प्रदर्शनासाठी फॉर्म्स दिले जात आहेत असं प्रशांत सांगत होता.

प्रशांतची सारी चित्रं कुरुंदवाडमधल्या स्टुडिओत रेखाटली आहेत. आपल्या गावच्या एखाद्या तरुणाची कला जगप्रसिध्द अशा जहांगीर आर्ट गॅलरीमधे प्रदर्शित होतेय ही अभिमानाची गोष्ट. मानसिंगही इस्लामपूरमधल्या त्याच्या स्टुडिओत चित्रं रेखाटतो. त्याचं जहांगीरमधलं हे दुसरं प्रदर्शन. या प्रदर्शनाच्या निमित्ताने दोघांशी मस्त गप्पा मारता आल्या. त्यांच्या कलाप्रवासाबद्दल जाणून घेता आले. एखादं चित्र रेखाटत असताना कलाकाराच्या मनात नेमकं काय चाललेलं असतं याचा थोडा मागोसाही घेता आला.

The Magic of Light असं यथार्थ नाव असलेलं या गुणी कलाकारांचं प्रदर्शन २३ ऑक्टोंबर पर्यंत जहांगीरमधे असणार आहे. प्रशांत आणि मानसिंग यांनी त्यांच्या कुंचल्याद्वारे कॅनव्हासवर पकडलेली प्रकाशाची जादू चुकवू नका .

*****

– प्रशांत साजणीकर

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.