No products in the cart.
‘मंतरलेले दिवस!’
चांगला चित्रकार बनण्यासाठी जितकी शास्त्रशुद्ध तंत्राच्या अभ्यासाची गरज असते तितकीच किंबहुना त्यापेक्षा थोडी अधिक प्रगल्भ विचारांची गरज असते. हे प्रगल्भ विचार चौफेर वाचनातून येतात. वाचन आणि लेखन या परस्पर पूरक गोष्टी आहेत. चांगले वाचन असणारा कधीतरी लिहितोच. आणि चांगला लेखक हा आधी चांगला वाचक असतो. वाचन, लेखन या प्रक्रियेतून जाणीवा प्रगल्भ होतात. प्रगल्भ जाणीवा प्रगल्भ चित्रकार निर्माण करतात. त्यामुळे केवळ चित्रकला विषयक लेखन प्रकाशित न करता चित्रकारांना लिहितं करणं हा ‘चिन्ह’चा प्रयत्न असतो. आणि या प्रयत्नांचा एक भाग म्हणजे चित्रकार संजय सुरेश कुलकर्णी यांचा ‘मंतरलेले दिवस’ हा लेख! दसरा, दिवाळी हे सणांचे दिवस बालपण किती सुखी करतात हे या लेखातून मांडले आहे. त्या मनोहारी दिवसांचे चित्र लेखक अक्षरश: आपल्या डोळ्यांसमोर शब्दातून चित्रित करतात. सोबत छान फोटोही या लेखाची रंगात वाढवतात.
आज मस्त हवा आहे!
दिवाळीच्या आधीची एक स्पेशल हवा असते नाही का? आता हळुहळु पडु लागली आहे ती! मला जाम आवडते ही हवा. हा ऋतु बदल जाणवोय अगदी बारीकसा…
दसऱ्याच्या थोडंसं आधी चकचकीत ऊन परत पडायला लागतं….आणी हवेत एका आगळ्या उत्साहाचा संचार होऊ लागतो! अतिशय निर्माणशील कालखंड असतो हा सृष्टीसाठी ! झाडांची वाढ पटपट होऊ लागते, पक्षी कुंजारव करु लागतात! माणसं आगळ्याच समाधानात वावरु लागतात! लहान शाळकरी मुलांसाठी सहामाही परीक्षा जवळ येऊ लागतात आणी पर्यायाने सुट्ट्याही! मस्त असतात हे दिवस…
पुण्यांत रस्त्यांच्या आजूबाजूला तोरणं, गोंड्यांच्या राशी दिसायला लागतात! नवरात्रीत पोरी आपलं नवयौवन मिरवत, संध्याकाळी आपापल्या मित्रांबरोबर (म्हणे! ) दांडिया,रास गरबा खेळायच्या निमित्ताने रात्री उशिरा बाहेर पडू लागतात! त्यांच्या त्या उघडी पाठवाल्या ‘चणिया चोली’ आणि ( दिल्लीसे लेके आग्रावाल्या ) घागऱ्यातून त्यांचं सौंदर्य अधिकच खुलून दिसु लागतं!
मग त्या दांडीयात मनाची स्पंदनं व्यक्त होऊ लागतात! पंधरा सोळा वर्षांच्या पोरी सतरा अठरा वर्षांच्या तरुणांच्या प्रेमात पडु लागतात! हा माझा पार्टनर तो तुझा पार्टनर वगैरे चालू होतं… लहान मुलांइतकंच वयाने मोठी माणसंही एन्जाॅय करु लागतात हे दिवस! सगळीकडे हवेत प्रेम, तारुण्य, रसरशीत सौंदर्य यांचा वावर जाणवू लागलेला असतो! आजकालच्या फेसबुक व व्हाट्सएपच्या जमान्यातही ही ‘ ई- पीढी ‘ आपले धार्मिक सण उत्साहाने हौसेने इव्हेंटसारखे साजरे करतेच आणि त्याला त्यांच्या ई- शुभेच्छांचा एक मस्त टच असतो!
मला या नवतरुण पीढीशी संपर्क ठेवायला नी त्यांचे फंडे समजुन घ्यायला जाम आवडंतं! हनी सिंगच्या गाण्यांवर थिरकणारी ही पिढी! मोटीव्हेशन फॅक्टर्स वेगळे असतील त्यांचे कदाचित…पण सामाजिक मुळं अजून घट्ट शाबुत आहेत हे ही जाणवतं!
या दिवसांतही मला माझं रम्य बालपण आठवतंच! निसर्गरम्य अशा कोकण किनारपट्टीवरचं माझं गाव, रत्नागिरी. एका बाजुला सुंदर रत्नदुर्ग किल्ला तर समोर अफाट अमर्याद समुद्र! रत्नागिरीत कोकणपट्टीतला सर्वात जास्त पाऊस होतो! आणि भारतात क्रमांक दोन लागतो रत्नागिरीचा तोही चेरापुंजीनंतर !
त्यामुळे पावसाळ्यानंतर सगळीकडेच अमाप हिरवा रंग उधळलेला असतो देवाने! अगदी सिमेंटच्या उघड्या भिंती नी मंगलोरी कौलांवरही हिरवासा शेवाळ्याचा थर उगवलेला असतो ! जणू एक मस्त हिरवी चादर पांघरुन सारी सृष्टी ऊन खात पहुडली आहे असा नजारा असतो या दिवसांत!
सध्याच्या पुण्यातल्या बोली भाषेत अतिशयोक्ती अलंकार वापरण्याची पद्धत आहे! ज्याला पुणेकर “आभाळ फाटलंय आज! शी मेला कीती तो पाउस पडतोय! जीव कावलाय अगदी… ” असं खिडकीतुन बाहेर पहात कांदाभज्याचा तुकडा मोडीत नी चहाचा वाफाळलेला घोट घेत अगदी वैतागाने म्हणतो ना….तो पाऊसही एखादी बारीकशी सर वाटावी असा तो रत्नागिरीचा अजस्त्र पाउस! तो पडुन गेल्यावरचे हे नव्हाळीचे दिवस.. त्यातला तो दसऱ्याच्या आजूबाजूच्या दिवसांतला चार्म नेमका शब्दांत मांडणं अवघड काम आहे… ती अनुभूतीची गोष्ट आहे मांडायची नव्हे!
कोपऱ्यावरच्या सायकल मार्टवाल्याकडुन भाड्याने तासावर सायकल घेऊन ती हाणत किल्ला चढणं, वर चढलो की दीपस्तंभ न्यहाळत बसणं! मावळत्या सूर्यबिंबाचं दर्शन घेत बुरुजाच्या भिंतीवर तासन् तास ‘सूर्यत्राटक’ केल्यागत अविचल बसणं, त्या अर्धवट वयातल्या आवडत्या मुलीवर विचार करत तिच्यावर जमेल तशी कविता करणं… तिला पत्र लिहीणं, (जे कधीच पाठवलं नाही! अजूनही ही हिंमत काही होत नाही! तर ते असो!) हे आजकालसाठीचे वायफळ समजले जाणारे उद्योग अमाप सुख देउन जात त्या काळी!
स्थळ काळाचं कुठलंही बंधन नसलेल्या त्या स्वातंत्र्याच्या दिवसांत मी आयुष्य अक्षरशः उपभोगत आलो आहे!
नशिबानेच मला हे स्वातंत्र्य दिलं! आणि आईबाबांनी…आजकाल सिमेंटच्या जंगलात वाढणाऱ्या नविन पिढीला हे स्वातंत्र्य कसं मिळणार ? बिचारे कुठल्यातरी चायनिज किंवा अमेरिकन कंपनीने बनवलेल्या मारामारीच्या गेममध्ये आपली फ्रस्ट्रेशन्स काढत दिवसभर बसतात कोचावर.. आणि आयशीने बक्कळ पैसे मोजुन ऑफिसातून येताना मॅक्डीतून आणलेले बेचव बर्गर्स चघळत व कोल्ड्रिंक्स पीत आयुष्य ढकलताहेत!
किल्ल्याच्या चढावावर सायकल हाणून तहानेने व्याकुळ झालेला जीव, किल्ल्यावर पोचल्यावर हंड्यात कुणीतरी सत्कार्य म्हणून भरुन ठेवलेल्या माठातलं गोड पाणी पीताना अर्ध पाणी घामाने भिजलेल्या शर्टवर (मुद्दाम) सांडताना आलेल्या अंतर्बाह्य गारव्याने मन कसं सुखावतं हे नेमकं शब्दांत कसं मांडणार हो?
बालपणीची स्ट्रगल हा जगण्याचा एक महत्वाचा भाग आहे आणि ही लहानपणीची स्ट्रगलच आपल्याला माणूस बनवते हे सत्य आपण विसरत चाललोय हेच खरं! आणि डार्विनिझम म्हणतं की माणसाला प्राचीन काळी असलेली शेपुट न वापरल्याने गळून पडली तसं या मुलांचं हे बालपणही एक दिवस गळून पडेल की काय अशी भीती वाटते.
रत्नागिरीत या दसऱ्याच्या दिवसांत एक महत्वाचा बदल जसा बाहेर सृष्टीत घडत असतो तसांच तो आणखीही एका ठिकाणी घडत असतो…माणसांच्या मनात! ” अच्छे दिन आयेंगे” ही प्रचारकी थाटाची घोषणा ज्या दिवसात नव्हती, त्या दिवसातही ही अति पावसाने झोडपल्यानंतरची ‘सृष्टीला आता खरंच छान दिवस येणार’ ही भावना रत्नागिरीकरांना सुखावीत असे !
मंतरलेल्या त्या दिवसात नंतर येणाऱ्या दिवाळीच्या उत्सवाची चाहूल असे. आजूबाजूला गावांतून शेतीच्या कामांची लगबग असे! लहानपणी शाळेत धम्माल असे… सवंगड्याबरोबर क्रिकेट, फुटबाॅल खेळण्यासाठी परवानगी लागत नसे! यथेच्छ खेळांनंतरच्या भरणाऱ्या कोपरा सभांमध्ये आम्हां मुलांच्या डोक्यात एक नविन विषय घोळत असे! “दिवाळीचा किल्ला कुठला नी कसा बनवायचा ? ” अनेक सूचना येऊन फेटाळल्या जात व मग कागदावर काही चित्र आकाराला येत! मग डोक्यातल्या डोक्यात त्या किल्ल्याची जुळवणी सुरु होत असे!
अनुभवांनी समृद्ध करुन जात हे मंतरलेले रत्नागिरीचे दिवस! आजही नुसत्या आठवणींनी मजा येतेय….खरंच फारच मस्त असतात हो, हे अश्विनातले दिवस!
****
– संजय सुरेश कुलकर्णी
मो. नं. ९८२२२७९८९१
‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/IgdCKjB4vEsGVz68ljV34n
‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag
Related
Please login to join discussion