No products in the cart.
जेजे की साबळे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ?
जे जे स्कूल ऑफ आर्टच्या 166 वर्षाच्या इतिहासात व्यवस्थापन आणि शैक्षणिक दर्जा या दोन्ही बाबतीत कधीच अधोगतीला गेलं नसेल इतकं ते आज अधोगतीच्या अगदी खालच्या स्तरावर जाऊन पोहोचले आहे. याचे सारे श्रेय ज्या मंत्रालयातर्फे जे जे चा कारभार चालवला जातो त्या उच्च व तंत्र शिक्षण विभागालाच द्यायला हवे. गेल्या 30-35 वर्षात या विभागाच्या अधिकाऱ्यांनी जेजेची अक्षरशः दुर्दशा करून ठेवली आहे. सध्याचे अधिष्ठाता विश्वनाथ साबळे यांनी आपल्या बेमिसाल कर्तृत्वानं त्यावर चार चांदच लगावले आहेत. कसे ते वाचा आमच्या विशेष प्रतिनिधीने लिहिलेल्या या विशेष रिपोर्ट मध्ये.
जेजे स्कूल ऑफ आर्ट हे १६६ व्या वर्षात पदार्पण केलेलं आशियातील पहिलं आणि एकमेव कला महाविद्यालय आहे. पण सध्या संस्थेत डीन साबळे ज्या पद्धतीने कारभार चालवत आहेत ते बघून जेजे ही एक सरकारी संस्था नसून डीन साहेबांची खाजगी कंपनी आहे की काय असा भास होतो आहे अशी चर्चा जेजेच्या कॅम्पसमध्ये उघडपणे केली जात आहे. त्याचं झालं असं की येत्या १७ डिसेंबर पासून संस्थेमध्ये दुसरा कोरियन मुंबई बिएनाले सुरु होत आहे. पण या बिएनालेमागे संस्थेच्या डीन साहेबांचं मोठं प्लॅनिंग आहे.

कोरियाच्या कुठल्या तरी खाजगी ‘के आर्ट फौंडेशन’ या संस्थेला हाताशी धरून २०१८ मध्ये पहिला कोरियन मुंबई बिएनाले आयोजित करण्यात आला होता. एखाद्या सरकारी संस्थेत दुसऱ्या देशाच्या संयुक्त विद्यमाने जर काही इव्हेंट आयोजित करायचा असेल तर त्यासाठी रितसर शासनाची परवानगी घेणे अनिवार्य असते. पण अशी कुठलीही परवानगी न घेता हा इव्हेंट आयोजित करण्यात आला होता, असे जेजेच्या परिसरात सांगितले जाते.

हा बिएनाले आयोजित कसा झाला हा मोठा प्रश्नच आहे. हा बिएनाले बॉम्बे आर्ट सोसायटीमध्ये आयोजित करण्यात येणार होता. पण तिथल्या कार्यकारिणीच्या काही निवडक सभासदांनी तिकडून हा इव्हेंट पळवला आणि जेजेमधल्या काही शिक्षकांच्या संगनमताने जेजेमध्ये आयोजित केला. अनेक विद्यार्थी आणि कलाकार खरं तर त्यामुळे उत्साहित झाले होते. दोन चार कला विद्यार्थी स्टुडण्ट एक्सचेंज प्रोग्राममध्ये कोरियाला जातील आणि त्यांना कोरियामधील कला क्षेत्राची ओळख होईल असे अनुमान काढले जाऊ लागले. पण लवकरच विद्यार्थी वर्गात आणि कला वर्तुळात काही वेगळीच चर्चा सुरु झाली. हा बिएनाले केवळ जेजेचे डीन, त्यांचा परिवार आणि डीन यांच्या मर्जीतल्या काही कर्मचाऱ्यांची धन करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता की काय अशी चर्चा सुरु झाली.

या बिएनालेसाठी मुलांनी हुरळून जाऊन उत्साहात तयारी केली. आयोजनाचं काम करण्यासाठी डीन साहेबाना फुकटचं मनुष्यबळ मिळालं! पण प्रत्यक्ष पाहता जेजेची एक आदरणीय विद्यार्थिनी बुसान इंटरनॅशनल आर्ट फेअरमध्ये २०१९ ला गेली. ती म्हणजे जेजेचे डीन साबळे यांची सुविद्य पत्नी! या मॅडम म्हणे त्या वेळी जेजेमध्ये आर्ट मास्टरचा कोर्स करत होत्या! बुसान इंटरनॅशनल आर्ट फेअरमध्ये जेजेतर्फे कोण जाणार यासाठी कुठलीही निवड समिती गठीत करण्यात आली नव्हती. त्याचे नियमही ठरले नव्हते. असे असताना डीन साहेबांच्या कर्तृत्ववान पत्नीची कोणत्या निकषावर निवड झाली आणि कुणी केली आणि का केली? असं कोणतं कर्तृत्व त्यांनी गाजवलं होत की कॉलेजतर्फे त्यांची निवड बुसान इंटरनॅशनल आर्ट फेअरसाठी करण्यात यावी? इंटरनेटवर स्वाती साबळे यांचा बायोडाटा पाहिला असता दोन चार फुटकळ प्रदर्शने सोडली तर कोणतंही विशेष काम त्यांनी कला क्षेत्रात केलेलं नाही.

मुळात जेव्हा सरकारी संस्थेचे विद्यार्थी परदेशात पाठवायचे असतात तेव्हा नियमाप्रमाणे निवड समिती गठीत करणे गरजेचे असते. पण अशी कुठलीही समिती गठीत न करता परस्पर डीन साबळे यांच्या पत्नीला बुसानला पाठवण्यासाठी निवड करण्यात आली. हा जेजेच्या फाईन आर्टच्या विद्यार्थ्यांवर अन्याय नाही का? तसेच ज्या कर्मचाऱ्यांनी या बिएनालेच काम केलं त्यांच्यावरती हा अन्याय नाही का? विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी काही करण्याऐवजी मोक्याच्या ठिकाणी आपल्या पत्नीला घुसवणे हा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी केला जाणारा अत्यंत क्रूर खेळ आहे! सरकार काय कायमचे झोपले आहे का? की कोणीही डीन यांना याचा जाब विचारत नाही?

स्वाती मॅडमच्या दि २४ नोव्हेंबर २०१९ च्या फेसबुक पोस्टवरून हा गैरप्रकार उघडकीस आला. (त्यांच्या फेसबुक वॉलवर आजही ही पोस्ट बघता येते.) अतिउत्साहात मॅडम हे जाहीर करून बसल्या आणि आपले पती यातून अडचणीत येऊ शकतील याचेही भान त्यांना राहिले नाही. स्वाती मॅडम बुसानला गेल्यानंतर त्यांची चित्रे ज्या पॅनलवर लावली होती त्या पॅनलवर जेजे स्कूल ऑफ आर्टचे नाव ठळक अक्षरात दिसते. इथे स्वाती यांच्याबरोबर सपकाळ पती पत्नी आणि आणखी दोघे जण छायाचित्रात दिसतात. सपकाळ यांच्या पत्नी शुभांगी या अप्लाइड आर्टच्या विद्यार्थिनी. त्यांचा फाईन आर्टशी दुरान्वयानेही संबंध नाही. तरी कुठल्या निकषावर त्या एका आंतरराष्ट्रीय आर्ट फेअरमध्ये जेजे स्कूलच्या प्रतिनिधी म्हणून गेल्या होत्या?

जर स्टॉल जेजे स्कूल ऑफ आर्टचा होता तर तिथे जेजेच्या वैभवशाली परंपरेमधल्या कलाकारांच्या कलाकृती लागणे गरजेचे होते. जेजेचे कितीतरी मास्टर आर्टिस्ट होते ज्यांच्या कलाकृती नेता आल्या असत्या परंतु वेळ आणि साधनांची मर्यादा बघता निदान प्रिंट लावता आल्या नसत्या का? त्यामुळे नक्कीच संस्थेच्या गौरवशाली परंपरेची ओळख कोरियन कलाविश्वाला झाली असती. आता इथे हा प्रश्न उपस्थित होतो की कुठल्या निकषावर ही मंडळी जेजेमार्फत कोरियाला पाठवण्यात आली आणि यांचा खर्च किती आला आणि कोणी केला?का केला? आणि हा पैसे कसा उभा राहिला? याची आता तरी रितसर चौकशी होणार आहे का? ती जेजेच्या भल्यासाठी होणं गरजेचं आहे.
जेजेमध्ये विजय सपकाळ हे तात्पुरत्या स्वरूपात गेले २०-२२ वर्ष काम करतात. त्यांना सगळ्या सुखसुविधा मिळतात. कुठलाही सरकारी कर्मचारी जर देश सोडून बाहेर जाणार असेल तर त्याला सरकारची परवानगी घेणे अनिवार्य असते. आणि सरकारचे ना हरकत प्रमाणपत्र व्हिसा मिळवताना आवश्यक असते. पण सपकाळ यांनी अशी कुठली परवानगी घेतली होती का हे गुलदस्त्यात आहे. आपल्या कार्यकाळात ते तीन वेळा परदेशात जाऊन आले आहेत असे खात्रीलायकरीत्या कळते. सीईटीचा मुद्दा ऐरणीवर होता तेव्हा ते देशाबाहेरच होते.

आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सरकारची ( राज्य सरकार, केंद्र सरकार) यांची परवानगी घेणे आवश्यक असते. अशी कुठलीही परवानगी न घेता परस्पर कोरियन बिएनाले जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये आयोजित करण्यात येतो. डीन साबळे यांच्या मर्जीतले कर्मचारी या बिएनाले मध्ये कोऑर्डिनेटर म्हणून काम करतात. सरकारची परवानगी न घेता परस्पर जेजे स्कूल ऑफ आर्टला बुसान आर्ट फेअरचे प्रायोजक म्हणून नाव टाकण्यात येते. इंटरनेटवर चेक केले असता जेजे स्कूल ऑफ आर्ट बुसान इंटरनॅशनल आर्ट फेअरचा १५ नंबरचा प्रायोजक आहे असे स्पष्ट दिसते. हे प्रयोजकत्व कुठल्या स्वरूपाचे आहे? यात परकीय चलनाची आर्थिक उलाढाल झालीय का? डीन साहेबानी कुणाला विचारून हे प्रायोजकत्व दिले हा प्रश्न कला शाळा आवारातील आणि कला वर्तुळातील बर्याच लोकांना पडतो आहे. उच्च तंत्र शिक्षण विभागाला तरी याची माहिती असेल का? का तिथेही काही साटंलोटंच आहे? ज्याप्रमाणे बुसान हा एक आर्ट फेअर होता त्याप्रमाणे मुंबईतही तो बुसान कोरिया आर्ट फेअरच होणे अपेक्षित होते. पण जेजेचे प्रमुख आणि त्यांचे उत्साही कार्यकर्ते यांनी या इव्हेंटला बिएनालेचे आकर्षक पॅकेजिंग करून सगळ्यांच्याच डोळ्यात धूळफेक केली हे तितकाच सत्य आहे! आपण काहीतरी भरीव काम करत आहोत हे शासन दरबारी दाखवण्यासाठी जेजेसारख्या संस्थेला वेठीस धरण्यात आले. तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करण्यात आला, असा आरोप केला जात आहे.
जूनपासून डिसेंबर महिन्यापर्यंत डीन साहेबानी स्वतःला वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये गुंतवून घेतलेलं आहे. त्यामुळे येन केन प्रकारे डिनोवोचे काम टाळणे, त्याला अडथळा आणणे असाच त्यांचा या साऱ्या मागे हेतू दिसत आहे. शिवाय डिनोवाचे जे विरोधक आहेत त्यांना अशा प्रदर्शनामध्ये संधी देऊन आपल्या बाजूने वळवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे असं देखील कलाशाळा आवारात बोललं जात.
यावर्षी १७ डिसेम्बरपासून दुसरा मुंबई कोरियन बिएनाले जेजेच्या मुख्य इमारतीत होणार आहे. या इव्हेंटच्या पहिल्या दिवशी कोरियन डेलिगेट्स आणि काही सरकारी मंत्री संत्री, आणि साबळेंच्या खास वर्तुळातील मंत्रालयातले काही डेस्क ऑफिसर वर्णी लावतील. उदघाटन थाटात होईल. पण दुसऱ्या दिवशीपासून काळं कुत्रही फिरकणार नाही या बिएनालेत. खोटं वाटत असेल तर रोज जाऊन बघा किती लोक येतात ते. निदान किती लोक येतात ते चेक करण्याच्या निमित्ताने तरी चार लोक हजेरी लावतील. ( २०१८ मध्ये झालेल्या बिएनालेतील फुटेज काढून पहिले तर वरील वाक्यातील सत्यता समजेल.) या असल्या फुटकळ कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अक्षरश: विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वेठीस धरण्यात आले आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांची दोन वर्ष अक्षरश: वाया गेली आहेत. त्यातच कॉलेज उशिरा सुरु झालं. सीईटी परीक्षेत घोळ झाला. त्यात शिकवायला शिक्षक नाहीत. आहेत ते शिक्षक कोट्यवधी रुपयाची सरकारी कामे (?) करण्यात मश्गुल आहेत. शिक्षकांचा प्रश्न न्यायालयात पोहोचला आहे. त्यात पुन्हा विद्यार्थ्यांना टॉयलेटसारख्या मूलभूत सोयीसाठी संप करावा लागला. आता कुठे सारं काही सुरळीत होत आहे तेव्हा हा तथाकथित बिएनालेचा गोंधळ कशासाठी हे सारं ? हे सगळं केवळ मूठभर लोकांची परदेशवारीची हौस फिटावी, डीन साहेबांच्या पत्नीला परदेशात मिरवता यावं म्हणून करण्यात येतं असं समजायचं का?
सरकारला जर खरंच जेजेच्या वैभवशाली परंपरेची थोडी जरी जाण असेल तर सरकारने हे सर्व आयोजन तात्काळ थांबवावं. याची खातेनिहाय चौकशी करावी. आणि जेजेचे डीन साबळे यांना या सर्व घटनांचा जाब विचारावा. हा बिएनाले जेजेच्या परिसरात का आयोजित करण्यात आला? बुसान आर्ट फेअरला जेजेनी स्पॉन्सरशिप कोणाला विचारून दिली? दिली तर कुठल्या स्वरूपात दिली याची चौकशी उच्च आणि तंत्रशिक्षण खात्याचे सचिव रस्तोगी आणि मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी करावी. जेजे आणि महाराष्ट्रातील कला वर्तुळ या चौकशी आणि योग्य कारवाईच्या अपेक्षेत आहे.
– kim chuk lee


Related
Please login to join discussion