No products in the cart.
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे….
आठ वर्षांपूर्वी ११ डिसेंबर रोजी चित्रकार हेमा उपाध्याय आणि तिचे वकील हरेश भंबानी यांचा अत्यंत निर्घृण पद्धतीनं खून झाला. बेवारशी प्रेतं टाकतात तशी त्यांची प्रेतं कांदिवलीच्या नाल्यात कोरोगेटेड बॉक्समध्ये भरून टाकली गेली. ज्या पद्धतीनं ती प्रेतं बांधली होती ती पाहूनच बहुदा पोलिसांना आरोपी चित्रकला क्षेत्राशी संबंधित असणार याचा सुगावा लागला असणार. कारण नंतरच्या काही दिवसातच त्यातल्या एक सोडून अन्य आरोपींची पोलिसांनी गठडी वळली. आता तर न्यायालयानं सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षाच ठोठावली आहे. परवा तर उच्च न्यायालयानं आरोपी चिंतन उपाध्यायची शिक्षेला स्थगिती देण्याची मागणीदेखील फेटाळली आहे. त्याच निमित्तानं हे स्फुट.
———
चित्रकार हेमा उपाध्याय (४३) आणि त्यांचे वकील हरेश भंबानी (६३) यांची हत्या झाल्याला परवाच आठ वर्षं पूर्ण झाली. आठ वर्षांपूर्वी म्हणजे २०१५ साली ११ डिसेंबर रोजी दोघांचा खून झाला आणि १२ डिसेंबर रोजी कांदिवलीच्या नाल्यात त्यांची प्रेतं सापडली होती. त्या भयंकर बातमीनं कला विश्वात एकच खळबळ उडाली होती. त्या दिवशीची ती अतिशय मोठीच बातमी ठरली.
हेमा उपाध्याय आणि हरेश भंबानी यांची शवं ज्या पद्धतीनं व्यवस्थित गुंडाळून खोक्यात घालून नाल्यात फेकण्यात आली होती त्याची वर्णनं वृत्तपत्रात आणि वाहिन्यांवरुन प्रसारित झाल्याबरोबर कलाविश्वातील जाणकारांनी अंदाज केला होता की, ज्यांनी उभयतांच्या हत्या केल्या ते चित्रकला क्षेत्राशी संबंधित असणार! त्यांचा तो अंदाज खराच ठरला. पोलिसांनी या दुहेरी खुनातील आरोपींना लागलीच बेड्या ठोकल्या. या खुनांमागचा प्रमुख आरोपी ठरला तो हेमा उपाध्याय यांचा नवरा चित्रकार चिंतन उपाध्याय आणि त्याचे चार साथीदार. हल्लीच्या प्रथेप्रमाणे चित्र काढताना किंवा शिल्प घडवताना एखाद्या कलावंताला आपण साहाय्य केलं म्हणजे आपण त्या कलाकृतीचे निर्माते होत नाही. त्या कलाकृतीचा निर्माता हा तो कलावंतच राहतो याची जाणीव असलेल्या त्या चौघांना बहुदा असे वाटले असणार की इतक्या गंभीर कृत्यात मदत केल्यानंतर आपली जबाबदारी काहीच नसणार ती त्या कलावंताचीच असणार, असंदेखील वाटून हे चौघेजण त्या कृत्यात सहभागी झाले असणार आणि त्यामुळेच ते लागलीच फरारीदेखील झाले असावेत.
या चार आरोपींमधला विद्याधर राजभर हा आरोपी तर घटना घडली त्या दिवसापासून फरारी आहे. पोलिसांना तो सापडलेलाच नाही. पण दरम्यान पोलिसांनी आपली जबाबदारी पूर्ण केली आणि आरोपींवर खटलादेखील दाखल केला.
त्या खटल्याचा दोनच महिन्यांपूर्वी म्हणजे १० ऑक्टोबर २०२३ रोजी निकाल लागला आणि चिंतन उपाध्यायसह चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली. त्यानंतर चिंतन उपाध्याय यानं जन्मठेपेच्या शिक्षेच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील केलं. अपील निकाली काढेपर्यंत आपली शिक्षा स्थगित करावी आणि आपली जामिनावर सुटका करावी अशी त्याची मागणी होती. पण कोर्टांनं परवा ही मागणी फेटाळून लावली. आता चिंतन आणि त्याच्या तीन साथीदारांना जन्मभर तुरुंगात खडीच फोडावी लागणार आहे.
हे लिहीत असताना जहांगीरच्या परिसरात किंवा पहिल्या मजल्यावरच्या केमोल्ड आर्ट गॅलरीत आपल्या प्रदर्शनाच्या वेळी अत्यंत हसतमुख मुद्रेनं वावरणारी हेमा आठवत राहते. एक वेळ असं समजूया की तिनं बिचारीनं त्या चिंतनचं घोडं मारलं असेल, पण तो विद्याधर राजभर, शिवकुमार राजभर, विजय राजभर, प्रदीप राजभर या साऱ्यांचं तिनं असं काय वाईट केलं असेल की त्यांनी ही एवढी भयंकर शिक्षा तिला द्यावी? त्यातले दोन आरोपी तर जेमतेम विशी बाविशीचे आहेत. त्यांना तर आता आयुष्यभर ‘चक्की पिसिंग’ करावं लागणार आहे. ते बिचारे वकील हरेश भंबानी, ते तर ज्येष्ठ नागरिक. ६३ वर्षांचे. त्यांनी तरी या चौघांचं असं काय बिघडवलं होतं की वायरच्या साहाय्यानं या साऱ्यांनी मिळून त्यांचा गळा घोटावा? किती हे क्रूर कृत्य?
पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ११ डिसेंबर २०१५ पासून जो सतत पळतो आहे तो विद्याधर राजभर खटल्याचा निकाल लागला तरी अद्याप पोलिसांच्या हाती सापडलेला नाही. तो अजूनही पळतोच आहे. त्याच्या पत्नीची आणि बहुदा आईची कैफियत टाइम्स ऑफ इंडियानं त्या खटल्याच्या निकालानंतर लगेचच प्रसिद्ध केली होती. ती खरोखरच हृदयद्रावक होती. ते संपूर्ण कुटुंबच आता उद्ध्वस्त झालं आहे.
ती हेमा काय? ते वकील भंबानी काय? किंवा चिंतनसकट चारही आरोपी काय? साऱ्यांच्याच आयुष्याची अक्षरशः वाताहातच झाली. त्यांची सारी स्वप्न अक्षरश: धुळीला मिळाली. त्या विद्याधर राजभरच्या पत्नीची कैफियत वाचताना कुणीही संवेदनशील माणूस हेलावून जाईल.
चिंतनसोबत तसा परिचय असा कधी झाला नाही, पण चिंतन संदर्भात एक लेख आम्ही बहुदा ‘चिन्ह’च्या शेवटच्या अंकात प्रसिद्ध केला होता. त्यातल्या चिंतनाच्या ‘न्यूड’ दर्शनानं तो लेख अनेकांच्या स्मरणात राहिला असेल. फार थोड्या अवधीत त्यांनं कमालीचं यश मिळवलं होतं. त्याच्या कलाकृतीविषयी असंख्य वदंता कलाक्षेत्रात होत्या. पण टाइम्स ऑफ इंडिया सारख्या वृत्तपत्रांमध्ये प्रदर्शनाच्या संपूर्ण पानभरच्या जाहिराती वारंवार प्रसिद्ध होणे ही काही सोपी गोष्ट नव्हे पण तीदेखील त्यानं करून दाखवली होती. फार थोड्या वेळात तो सेलिब्रिटीचा दर्जा मिळवून यशस्वी झाला होता. त्यांनं अल्पावधीत मिळवलेलं हेच यश कालांतरानं त्याच्या अंगाशी आलं. खुनाच्या घटनेनंतर तर तो वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर झळकू लागला. एरवी कलेविषयीच्या बातम्या प्रसिद्ध करावयास नकार देणाऱ्या मराठी वृत्तपत्रांनीदेखील त्याच्या अटकेच्या, शिक्षेच्या बातम्या अगदी पहिल्या पानावर प्रसिद्ध केल्या. हे सारं आता धुळीला मिळालंय.
त्याच्या चित्रकार वडिलांशी मात्र माझा परिचय झाला होता. ऐंशीच्या दशकात जहांगीरमध्ये माझा आणि त्यांचा शो एकाच आठवड्यात आला होता. त्यामुळे साहजिकच खूप गप्पादेखील झाल्या. पण नंतर त्यांचा संपर्क तुटला तो तुटलाच. आज हे स्फुट लिहिताना अचानक त्यांची आठवण झाली. खूपच सौम्य व्यक्तिमत्व होतं त्यांचं. त्यांनी हा आघात कसा सोसला असेल? असा प्रश्न राहूनराहून माझ्या मनाला स्पर्शत राहतो.
या दुर्मिळातल्या दुर्मिळ अशा भयंकर घटनेमधून अनेक प्रश्न आपल्याला सतत सतावत राहतात. उदाहरणार्थ आपल्यापेक्षा दुप्पट वयाच्या अपरिचित स्त्रीवर किंवा तिच्यासोबत असलेल्या संपूर्णतः अनोळखी अशा वृद्ध गृहस्थांवर हात टाकताना, त्यांचे गळे दाबून त्यांना मृत्यूच्या दारात पोहोचवताना त्या चौघांच्या मनात अन्य कुठलेच विचार आले नसतील? इतकं भयंकर कृत्य केल्यानंतर आपल्याला संपूर्ण आयुष्य अंधारकोठडीत घालवावं लागेल किंवा मृत्युदंडदेखील मिळू शकेल याची कणभर भीतीदेखील त्यांच्या मनात उमटली नसेल?
अत्यंत क्षुल्लक अशा घटनांवरून एकमेकांच्या जिवावर उठण्याच्या बातम्या आजकाल सततच आपल्याला वृत्तपत्रामधून वाचावयास मिळतात किंवा वाहिन्यांमधून पहावयास मिळतात, वाहिन्यांवरील बातम्या तर आपण तटस्थपणे पाहूदेखील शकत नाही. अत्यंत वेगाने बदलणाऱ्या सभोवतालच्या परिस्थितीकडे पाहून एकच विचार वरचेवर मनात येतो की मुंबईसारख्या अस्ताव्यस्त आणि अत्यंत गचाळपणे पसरलेल्या विशाल अशा महानगरात राहणारे आपण पुन्हा एकदा आदिमानवी रानटीपणाच्या दिशेनं वाटचाल करू लागलो आहोत की काय?
सतीश नाईक
संपादक, चिन्ह आर्ट न्यूज
Related
Please login to join discussion