Features

काळ्या रंगाला प्रतिष्ठा मिळवून देणारा चित्रकार

दुसऱ्या महायुध्दानंतर चित्रकलेला नवा आयाम देणारे चित्रकार पिअर सुलाझ यांचे दि २६ ऑक्टोबर रोजी निधन झाले. सुलाझ यांनी प्रामुख्याने काळ्या रंगात काम केलं. सुलाझ यांच्या मते “चित्रकलेने रसिकाला स्वप्नांच्या आणि भावनांच्या दुनियेत नेले पाहिजे तरच ती श्रेष्ठ कलाकृती ठरते.” सुलाझ यांच्या या मतानुसार त्यांच्या प्रत्येक कलाकृतीने रसिकांसाठी स्वप्नांच्या आणि भावनांच्या अगणित शक्यतांची निर्मिती केली. सुलाझ यांनी आपल्या हयातीत शेकडो कलाकृती तयार केल्या. वयाच्या १०२ व्या वर्षी त्यांचा कुंचला थांबला तो केवळ त्यांच्या मृत्यूमुळेच!

सुलाझ यांचा जन्म रोडेझ, फ्रांस इथे १९१९ मध्ये झाला. बालपणापासूनच त्यांना चित्रकलेची आवड होती. गावातच असलेल्या म्युझिअमला (Musée Fenaille) ते दररोज भेट देत असत. त्यामुळे त्यांच्या पुढील आयुष्यात या प्राचीन वस्तूंचा प्रभाव त्यांच्या चित्रकृतींवर पडला. त्यांनी काही पुरातत्व संशोधन मोहिमांमध्येही भाग घेतला होता. या मोहिमेत सापडलेल्या वस्तू रोडेझच्या Musée Fenaille या संग्रहालयात संग्रहित आहेत.

पिअर सुलाझ हे सहा फूट उंचीचं दणदणीत व्यक्तीमत्व. त्यामुळे त्यांचे कॅनव्हासही भव्य असत. कधीकधी अगदी एखादी पूर्ण भिंत व्यापणाऱ्या कलाकृतीही त्यांनी तयार केल्या आहेत. सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक रंगी कॅनव्हास रंगवले. पण नंतर त्यांच्या कल्पनाविश्वाला व्यापले ते काळ्या रंगानी. खरं तर या काळ्या रंगाच्या वापराची सुरुवात झाली ती एका अपघाताने. १९७९ मध्ये चित्र काढत असताना त्यांच्या हाताने कॅनव्हासवर काळ्या रंगाचा ठिपका चित्रित झाला. सुरुवातीला त्यांना हे कलाकृतीचे अपयश वाटले. नंतर त्या ठिपक्यावर जेव्हा प्रकाश पडला तेव्हा या कलाकृतीचे महत्व त्यांच्या लक्षात आले. आणि काळ्या रंगावर जेव्हा प्रकाश पडतो तेव्हा त्यात तयार होणाऱ्या उठावांमुळे कलाकृती सुंदर विभ्रम तयार करते असे त्यांचे कलेचे तत्वज्ञान तयार झाले.

सुलाझ यांच्या कामाची शैली त्याकाळच्या मानाने अभिनव होती. मोठ्या कॅनव्हासवर ब्रश,इझल, पॅलेट अशा पारंपरिक साधनांचा वापर न करता त्यांनी रोलरचा थेट वापर केला. त्याचबरोबर नाइफने कॅनव्हासवर थेट रंग लावून विशिष्ट ठिकाणी दाब देऊन पॅटर्न तयार केले. काळ्या रंगाचा जाड थर आणि विशिष्ट कोनातून नाईफचा दाब यामुळे रंग कापला जातो. त्यावर प्रकाश पडला की सुंदर असे आकृतिबंध तयार होतात. हे पॅटर्न रसिकांना तासनतास खिळवून ठेवतात. एकप्रकारे काळ्या रंगाला नाइफने पैलू पाडण्याचे हे काम होते. हे सुलाझ यांच्या कलाकृतीचं वैशिष्टयं होतं.

आपल्याकडे काळा रंग हा निराशा, दुःख यांचे प्रतीक म्हणून वापरला जातो. पण सुलाझ यांनी काळ्या रंगाला खऱ्या अर्थाने प्रतिष्ठा मिळवून दिली. काळ्या रंगाची भव्यता, त्यावर प्रकाश पडला की तयार होणाऱ्या असंख्य शेड्स यामुळे रसिकांना मोहवून टाकण्याची क्षमता या चित्रांमध्ये तयार झाली. आणि काळा रंग हा भव्यता, संपन्नता यांचे प्रतीक म्हणून सुलाझ यांच्या चित्रातून पुढे आला.

पिअर सुलाझ हे १०२ वर्षाचे संपन्न आयुष्य जगले. त्यांच्या मते त्यांनी चित्रकलेला निवडलं नाही तर चित्रकलेने त्यांना निवडलं. आयुष्यात जी काही निर्मिती केली ती ठरून नाही तर कुठल्याश्या अनाम स्फुर्तीने घडून आली असे पिअर सांगतात. पिअर यांनी आपल्या हयातीत असंख्य कलाकृती तयार केल्या. त्यामुळे त्यांच्या कलाकृतींचे भव्य म्युझिअम रोडेझ या त्यांच्या गावी २०१४ साली उभारण्यात आले. या महान कलाकाराला ‘चिन्ह आर्ट न्यूज’तर्फे श्रद्धांजली !

*****
– कनक वाईकर
(हा लेख लिहिताना गोव्याचे प्रसिद्ध चित्रकार सुहास शिलकर यांनी दिलेल्या माहितीचा खूप उपयोग झाला.)

‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD

‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.