No products in the cart.
कार्टूनिस्ट्स कंबाईन संमेलनाच्या आठवणी
चित्रकार कितीही यशस्वी झाले तरी ते त्यांचं चित्रकार म्हणून टाकलेलं पहिलं पाऊल ते कधीच विसरू शकत नाही. त्यांचं पहिलं कला प्रदर्शन म्हणजे त्यांचं पहिलं पाऊल. त्याच्या आठवणी त्यांनी जपून ठेवलेल्या असतात यात काहीच शंका नाही. प्रख्यात कार्टूनिस्ट सुरेश लोटलीकर यांच्याबाबतीतही तसच काहीसं झालं. त्यांनी भाग घेतलेल्या कार्टूनिस्टस् कंबाईनचं पहिलं संमेलन आणि प्रदर्शनाच्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या अनेक व्यंगचित्रकरांची व्यंगचित्र सुरेश लोटलीकर यांनी काढली होती. जवळजवळ २७ वर्षांनंतर पसारा आवरायला घेतला असताना त्यांना ती सारी व्यंगचित्र पुन्हा सापडली आणि त्यातून साकार झाला हा छोटेखानी लेख.
१९९० सालच्या रत्नागिरीच्या साहित्य संमेलनात अरुण मयेकर आणि सुरेश क्षीरसागर या दोन व्यंगचित्रकारांची ओळख झाली होती. एकदा अरुण मयेकरांनी बातमी आणली की, पुण्यात कार्टूनिस्ट्स कंबाईनचं संमेलन आणि व्यंंगचित्र प्रदर्शन भरणार आहे. १९९४ सालची ती गोष्ट. आम्ही ठरवलं की, आपण त्याला जाऊया. मग प्लॅन सुध्दा ठरला. पण ऐनवेळी, अक्षरशः ऐनवेळी अरुण मयेकर गायब ! मयेकरांनी टांग मारली तरी “आता जायचंच !” असं म्हणून मी पुण्याला गेलो.
तोपर्यंत कार्टूनिस्ट मंडळींशी “कार्टूनिस्ट्स कंबाईन” नावाची संघटना आहे हे मला माहित देखील नव्हतं आणि विकास सबनीस सोडून इतर व्यंगचित्रकारांना मी ओळखत देखील नव्हतो. बालगंधर्वात गेलो तर तिथं प्रदर्शन लावालावी चालली होती. चौकशी केली तर मला एका दाढीधारी गृहस्थांना भेटा असं सांगितलं गेलं. त्या दाढीधारी गृहस्थानी मला माझं नाव विचारलं आणि चित्र दाखवा असं म्हणाले. त्यांनी ती चित्रं पाहिली. मग त्यांनी कोणाला तरी ‘कैलासला बोलवा’ असं सांगितलं. मग त्या दाढीधारी गृहस्थानी कैलासला चित्रं कुठे लावायची ती जागा दाखवली आणि मी अक्षरशः उडालो. कारण आर के लक्ष्मण, बाळ ठाकरे, श्रीकांत ठाकरे, मारिओ मिरांडा यांच्या लगतच्या जागेत माझी चित्रं लावली गेली होती. ते दाढीधारी गृहस्थ म्हणजे मंगेश तेंडुलकर आणि कैलास म्हणजे ज्यांनी कार्टूनिस्ट्स कम्बाईनचं ते संमेलन आणि प्रदर्शन आयोजित केलं होतं ते कैलास भिंगारे.
संमेलन आणि प्रदर्शन तीन दिवस चालणार होतं. कैलास भिंगारेनी संमेलन आणि प्रदर्शन दणक्यात आयोजित केलं होतं. पुण्यात ठिकठिकाणी बॅनर्स आणि कापडी फलकं झळकत होते. प्रदर्शनाला अलोट गर्दी झाली. कार्टूनिस्ट मंडळींच्या प्रदर्शनाला एवढी गर्दी मी त्यानंतर कधीही बघितली नाही. मिडीयात प्रसिध्दी देखील चांंगलीच मिळाली. कैलास भिंगारेनी व्यंगचित्रकारांची राहायची सोय चांगल्या हॉटेलमध्ये केली होती. पहिल्या दिवशी मी त्या हॉटेलमध्ये राहिलो. तिथे खूप व्यंगचित्रकारांच्या ओळखी झाल्या. दुसर्या दिवशी चर्चा, घटना, ठराव वगैरे कार्यक्रम होते, पण त्याचा मला कंटाळा आला.
संध्याकाळी ‘तुमचं अर्क चित्र तुमच्यासमोर’ असा कार्यक्रम होता. मी अशा कार्यक्रमात त्या वेळेपर्यंत भाग घेतलेला नव्हता. पण त्या दिवशी प्रथम अशा प्रकारची थोडी अर्कचित्रं काढली. मग बाकीचे चित्रकार कशी चित्रे काढतात ते पाहिलं. अर्कचित्र काढून घ्यायला भलीमोठी रांग. अर्थात त्यानंतर व्यंगचित्रकारांमध्ये रुसवे फुगवे झालेच. त्याचाही मला कंटाळा आला. मी उठलो आणि सरळ माझ्या एका नातेवाईकाकडे गेलो. तिथे जास्त मजा आली.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी बालगंधर्वला प्रदर्शनाला आलो. तेव्हा तिथे ज्ञानेश सोनार एक रंगतदार कार्यक्रम घेत होते. ईझलवरती मोठा ड्रॉइंग पेपर लावलेला. प्रेक्षकांपैकी कोणीही यायचं आणि त्या पेपरवर कशीही वेडी वाकडी, वाटेल तशी रेषा मारायची. मग एखादा व्यंगचित्रकार येऊन त्या रेषेवरून व्यंगचित्र काढेल. असा हा समस्यापूर्तीचा खेळ होता. त्याला मजा आली !
नंतर कार्यक्रम होता व्यंगचित्रकारांच्या ओळखीचा. त्यात भाग घ्यायला लांब रांग होती. तो कार्यक्रम अतिशय बोअर होऊ लागला. म्हणून मी कैलास भिंगारेंकडे ड्रॉइंग पेपर्स मागितले. त्यांनी त्यांच्या लायब्ररीचा स्टॅम्प असलेले लिहायचे बॉण्ड पेपर दिले. समोर ओळखी चालू असताना त्या त्या व्यंगचित्रकारांची भरभर लाईन स्केचेस काढायला सुरुवात केली. तो कार्यक्रम संपल्यावर त्या चित्रांवरती मी व्यंगचित्रकारांच्या सह्या देखील घेतल्या. त्याच रात्री मी मुंबईला परतलो.
हल्ली सर्व पसारा आवरायला घेतलाय. त्यात ते कागद सापडले. ती ही व्यंगचित्रकारांची क्षणचित्रे, २७ वर्षे जुनी, काही पूर्ण, बरीच अपूर्ण.
सुरेश लोटलीकर
Related
Please login to join discussion