Features

मिशन ‘ऍडमिशन जे जे’!

चित्रा ही महाराष्ट्रातील एका छोट्या शहरातील विद्यार्थिनी सर जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेण्यास उत्सुक आहे. प्रवेशप्रक्रियेची तयारी करण्यासाठी ती विद्या नावाच्या तिच्या मैत्रिणीची मदत घेते. विद्या चित्राला मार्गदर्शन करण्यासाठी श्री सुमित या अनुभवी शिक्षण प्रशासकाशी ओळख करून देते. श्री सुमित यांना जे जे संस्थेबद्दल जी माहिती मिळते त्यामुळे ते काहीसे व्यथित होतात. चित्राला तिच्या अॅडमिशन जे जेमिशनमध्ये मदत करण्याचा प्रयत्न करत असताना सुमित जसजसे अधिक सखोल माहिती मिळवत जातात तसतसे तिला मदत करायची तरी कशी याबद्दल ते अधिकच पेचात पडतात.

चित्रा* ही महाराष्ट्रातील एका छोट्या शहरातील तरुण आणि उत्साही विद्यार्थिनी कलाक्षेत्रात करिअर करण्यास उत्सुक आहे. ती चांगले स्केचिंग, ड्रॉइंग आणि पेंटिंग करते. तिने हायस्कूलमध्ये असताना एलिमेंटरी आणि इंटरमीडिएट या दोन्ही कला-परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत याचा तिला अभिमान आहे. त्यासाठी तिचे शाळेतील कलाशिक्षक तिला मार्गदर्शन करायचे. मात्र, तिला यापुढील मार्गदर्शन करू शकेल असे तिच्या आजूबाजूला फारसे कोणीच नाही. तिच्या पालकांनाही कलाशिक्षणाबद्दल काहीच माहिती नाही. तिने स्वतः कला महाविद्यालये आणि संस्थांची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. तिला तिच्या शाळेतील कलाशिक्षकांकडून एवढेच समजले होते की तिने मुंबईतील सर जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण ती संस्था भारतातील सर्वोत्तम कला शिक्षणसंस्थांपैकी एक आहे.

सुदैवाने, चित्राची भेट विद्याशी* झाली. विद्या चित्रापेक्षा काही वर्षांनी मोठी आहे, तिने इंजीनीअरिंग केले आहे आणि आता ती व्यवस्थापन क्षेत्रात उच्चशिक्षण घेत आहे. चित्राच्या मते, विद्या ही आतापर्यंतची तिला भेटलेली सर्वात हुशार तरुणी आहे. विद्या करिअर आणि शिक्षणाविषयी माहीतगार आहेच, पण ती खूप मनमिळाऊ आणि मदत करणारीदेखील आहे. चित्राने तिच्या करियरसाठी निवडलेल्या कलाक्षेत्रात कसे पुढे जायचे याबद्दल तपशीलवार माहिती शोधण्यासाठी विद्याची मदत आणि सल्ला घ्यायला सुरुवात केली.

विद्याने चित्राला सांगितले की तिला ज्या कोर्सेसमध्ये रस आहे त्यांच्या अभ्यासक्रमाबद्दल आणि तिला जिथे प्रवेश घेण्यात घ्यायची इच्छा आहे त्या संस्थांबद्दल सर्व तपशील तिने जाणून घ्यायला हवेत. ती CET परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर होणाऱ्या मुलाखतीसाठी ती माहिती उपयुक्त ठरेल. त्यासाठी चित्राने जेजे स्कूल ऑफ आर्टची वेबसाईट बघायला सुरुवात केली, तेव्हा तिला तिथे असलेले वेगवेगळे कोर्सेस, विविध विभाग आणि कॅम्पसचे फोटो पाहून आनंद झाला. चित्राने लवकरच सीईटी परीक्षेचा अर्ज भरला. तिने तिची पहिली पसंती अर्थातच जेजे स्कूल ऑफ आर्टला देण्याचे ठरवले होतेच पण तिथे प्रवेश मिळाला नाही तर पर्याय म्हणून तिच्या गावाजवळ असलेल्या एका आर्ट कॉलेजचेही नाव ठरवून ठेवले. ती हुशार आणि कष्टाळू विद्यार्थिनी असूनही, मुंबईच्या प्रतिष्ठित जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेण्यासाठी महाराष्ट्रातील आणि भारतभरातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा असल्यामुळे तिला चिंता वाटत होती.

आपल्या आवडीच्या क्षेत्रात करियर करण्यासाठी चित्राच्या आयुष्यातील हा एक मोठा महत्त्वाचा निर्णय असल्यामुळे, विद्याच्या सल्ल्यानुसार ती श्री सुमित* यांना तपशीलवार मार्गदर्शनासाठी भेटली. सुमित एका खाजगी महाविद्यालयात काम करतात आणि त्यांना शिक्षणक्षेत्राशी संबंधित सरकारी नियमांची सखोल माहिती आहे. सुमित यांनी चित्राच्या भविष्यातील स्वप्ने, आकांक्षा आणि जेजेमधील प्रवेशाच्या मुलाखतीच्या तयारीबद्दलच्या तिच्या शंका शांतपणे ऐकल्या. त्यांनी चित्राला मुलाखतीसाठी उपयुक्त ठरतील अशा संवाद-कौशल्याच्या काही युक्तीच्या गोष्टीसुद्धा सांगितल्या. त्यांना स्वतःला मात्र जेजे आणि तिथल्या कोर्सबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता होती. म्हणून, त्यांनी स्वतःच अभ्यास करून तिला सखोल मार्गदर्शन करण्याचे ठरवले. कारण अनोळखी असली तरी चित्रा त्यांच्या मुलीच्या वयाचीच होती.

जेजे स्कूल ऑफ आर्टची वेबसाइट बघत असताना, श्री सुमित यांच्या अनुभवी नजरेला असे काहीतरी दिसले ज्यामुळे ते काहीसे निराश झाले. त्यांना असे आढळले की जेजे स्कूल ऑफ आर्टच्या वेबसाइटवर असलेले AICTE कडून मिळालेले मंजूरीपत्र (LoALetter of Approval) चक्क पाच वर्षांपूर्वीचे म्हणजे दिनांक ३०/०४/२०१८ चे आहे, ज्यात स्पष्टपणे नमूद केले आहे की ते मंजूरीच्या दिनांकापासून दोन वर्षांच्या कालावधीसाठी वैध आहे. याचाच अर्थ तिथल्या अभ्यासक्रमांची वैधता एप्रिल २०२० च्या अखेरीस संपली आहे. पण चित्राने तर २०२३-२४ च्या शैक्षणिक वर्षात प्रवेशासाठी अर्ज केला होता! “ती हे जे करते आहे ते योग्य आहे का?” श्री.  सुमित स्वतःशीच उद्गारले.

सुमित यांच्या डोक्यातील विचारचक्र प्रकाशाच्या वेगाने धावू लागले. त्यांनी विचार केला की, संस्थेने त्यांच्या वेबसाइटवर हे मंजूरीपत्र उपलब्ध करून दिलेले असले तरी त्यानंतर संस्थेला असे नवे मंजूरीपत्र प्राप्त झाले आहे की नाही हे मात्र स्पष्ट होत नाही. त्यामुळे एप्रिल २०२० पासून आजपर्यंत (जुलै २०२३) म्हणजेच गेल्या तीन वर्षांमध्ये, संस्थेने आयोजित केलेल्या अभ्यासक्रमांच्या आणि त्यामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला शासनाची मान्यता होती की नव्हती, हे स्पष्ट होत नाही. कदाचित संस्थेला नवीन मंजूरीपत्र मिळालेही असेल परंतु अद्याप ते त्यांच्या वेबसाइटवर ठेवले गेले नसेल? असा विचार सुमित यांनी केला, कारण त्यांना घाईघाईने कोणताही निष्कर्ष काढायचा नव्हता.

पण त्याचवेळी, नामांकित शैक्षणिक संस्था त्यांच्या वेबसाइटवर अशा महत्त्वाच्या कागदपत्रांच्या अद्ययावत प्रती नियमितपणे प्रदर्शित करतात या वस्तुस्थितीकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही हेही सुमित यांच्या लक्षात येत होते. अशा शिक्षणसंस्था विद्यार्थी आणि सर्व संबंधितांच्या हितासाठीच हे करतात. असे केल्यामुळे ज्यांना संस्थेच्या अभ्यासक्रमांबद्दल अद्ययावत माहितीची आवश्यकता असते अशा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नांना मदतच होते. सुमित यांना त्यांच्या महाविद्यालयाचे व्यवस्थापक संस्थेच्या वेबसाइटवर असे तपशील अद्ययावत ठेवण्याबद्दल किती जागरूक असतात, हे चांगलेच माहीत होते.

तेव्हा श्री. सुमित यांनी AICTE (All India Council for Technical Education म्हणजेच भारतातील अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि इतर शैक्षणिक संस्थांच्या तसेच कलाशिक्षण संस्थांच्या नियामक बाबींवर नियंत्रण ठेवणारी सर्वोच्च संस्था) कडून ही माहिती पडताळून घेण्याचे ठरवले. मात्र एआयसीटीईच्या वेबसाईटवर जे जे स्कूल ऑफ आर्टचे नाव ‘अप्रमाणित’ (Unapproved)  संस्थांच्या यादीत दिसत नाही, हे पाहिल्यावर त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्या माहितीची लिंक:

https://facilities.aicte-india.org/dashboard/pages/angulardashboard.php#!/unapproved

तरीही सुमित यांचे समाधान झाले नाही. एकंदर परिस्थितीची सखोल माहिती घेण्यासाठी, ते जेजेच्या वेबसाइटवर परत आले. तिथे दिलेल्या माहितीवरून त्यांना असे लक्षात आले की संस्थेमध्ये कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठी कमतरता आहे, कारण अर्ध्याहून अधिक सरकारमान्य पदे रिक्त आहेत. हे त्यांना समजले या लिंकवर:

https://www.sirjjschoolofart.in/about-us/members-of-faculty.

नेमके सांगायचे तर, जेजेच्या वेबसाइटनुसार, ५० पदांपैकी, फक्त २१ पदे भरली आहेत. त्यामुळे तिथे शिक्षणाचे नियमित वर्ग हे मोजकेच पूर्णवेळ शिक्षक आणि काही कंत्राटी तत्त्वावर काम करणारे शिक्षक चालवतात.

सर जे जे स्कूल ऑफ आर्ट वेबसाइटवर असलेली शिक्षकांची यादी. ५० मंजूर पदांपैकी केवळ २१ पदे भरली आहेत.

“हे काही बरोबर वाटत नाही!” सुमित आता चित्राच्या भविष्यातील स्वप्नांची काळजी करत स्वतःशीच म्हणाले. कारण १६६ वर्षांचा गौरवशाली इतिहास असलेल्या संस्थेबद्दल त्यांच्या मनात असलेल्या प्रतिमेशी ही गोष्ट फारच विसंगत वाटत होती.

म्हणून त्यांनी पुन्हा एआयसीटीई वेबसाइटवर जाऊन पाहिले आणि शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी एआयसीटीईच्या नोंदीनुसार जेजे स्कूल ऑफ आर्टमधील प्राध्यापकांची प्राध्यापकांची यादी दिसली, त्यापैकी २५ पैकी फक्त ८ नियमित आहेत, १० कंत्राटी तत्त्वावर आहेत आणि ७ तात्कालिक तत्त्वावर आहेत. सुमित यांना ही माहिती मिळाली त्या एआयसीटीई वेबसाइटची लिंक:

https://facilities.aicte-india.org/dashboard/pages/angulardashboard.php#!/approved

शैक्षणिक वर्ष २२-२३ साठी एआयसीटीई वेबसाइटवर जे जे स्कूल ऑफ आर्टमधील शिक्षकांची यादी ५० मंजूर प्राध्यापक पदांपैकी सध्या फक्त ८ प्राध्यापक नियमित आहेत.

“अरे देवा, याचा अर्थ जेजेच्या वेबसाइटवर दाखवलेल्या २१ प्राध्यापकांपैकी फक्त ८ पूर्णवेळ आहेत!” आता श्री सुमित यांनी पूर्णवेळ आणि कंत्राटी तत्त्वावर असलेल्या प्राध्यापकांचा वापर करून शिक्षणाचा दर्जा टिकवून ठेवताना त्यांच्या महाविद्यालयाला तोंड द्यावे लागलेल्या  आव्हानांची आठवण झाली. “कंत्राटी शिक्षकांच्या विरोधात माझे काहीही म्हणणे नाही. परंतु नेमून दिलेला अभ्यासक्रम शिकवणे आणि एकंदर शैक्षणिक गुणवत्तेची जबाबदारी घेणे या दोन्ही गोष्टी सांभाळणे हे कंत्राटी पद्धतीने काम करताना मिळणार्‍या तुटपुंज्या मोबदल्यात करणे कोणासाठीही कठीणच आहे.” असा विचार श्री सुमित यांनी केला, कारण ते एकंदर परिस्थितीचा संतुलित दृष्टिकोनातून आढावा घेत होते.

कारणे काहीही असली तरी पूर्णवेळ शिक्षकांचा अभाव ही एक गंभीर समस्या आहे जी कोणत्याही संस्थेतील शिक्षणाच्या गुणवत्तेवर दुष्परिणाम करते. श्री सुमित आता चित्रासारख्या इतर अनेक विद्यार्थ्यांच्या भविष्याबद्दल अधिकच चिंतित झाले होते, ज्यांनी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी एआयसीटीईकडून जेजेला कोणतीही मान्यता नाही हे माहीत नसताना आणि तिथे पुरेसे शिक्षक नाहीत हेही माहीत नसताना तिथे प्रवेशासाठी अर्ज केला होता. राज्याच्या आणि देशाच्या विविध भागांमधून आलेल्या या विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांनाही अशा प्रशासकीय बाबींची कल्पना नसते. केवळ एका प्रतिष्ठित संस्थेत प्रवेश घेणे हेच त्यांचे स्वप्न असते.

सुमितच्या मनातील अनुभवी शिक्षणप्रशासक मात्र त्यांना हे मान्य करू देत नव्हता. “एआयसीटीईने अशा उणीवांवर मात करण्यासाठी काहीनाकाही प्रशासकीय पातळीवरचा मार्ग उपलब्ध करून दिलेला असणार. तो मला शोधून काढलाच पाहिजे.”, श्री सुमित म्हणाले. त्यांनी कसून पुढचा विचार करायला सुरुवात केली. लवकरच त्यांना त्याला आढळले की एआयसीटीईने आधीच असा एक मार्ग उपलब्ध करून दिला आहे.

त्यांना एआयसीटीईच्या वेबसाइटवर आढळले की एआयसीटीईने १/०५/२०२३ रोजी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या उच्च आणि तंत्रशिक्षण संचालनालय / तंत्रशिक्षण संचालनालय (DTE – Directorate of Technical Education) यांना लिहिलेले, शिक्षणसंस्थांमधील शिक्षकांची संख्या आणि पायाभूत सुविधांमधील कमतरता यांची पूर्तता (Compliance of deficiencies) करण्याबाबत एक पत्र जारी केले आहे, ज्यात संस्थांनी अंमलात आणण्याच्या आवश्यक बाबी नमूद केल्या आहेत. त्यात स्पष्टपणे म्हटले आहे की शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठीची मान्यता संस्थांना “मान्यता प्रक्रिया पुस्तिका २०२३-२४” मध्ये विहित केलेल्या नियमांनुसार दिली जाईल.

हे पत्र वाचण्यासाठी एआयसीटीई वेबसाइटची लिंक:

https://aicte-india.org/sites/default/files/approval/2023-24/Compliance%20of%20Deficiencies%20-%2001-05-2023.pdf

एआयसीटीईचे "कमतरतांची पूर्तता करण्याबाबत" पत्र

याचा अर्थ, कोणतीही संस्था पुरेसे शिक्षक आणि पुरेशा पायाभूत सुविधा प्रदान केल्याशिवाय शैक्षणिक वर्ष २०२३-२४ ची प्रवेशप्रक्रिया सुरू करू शकत नाही. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी ज्या संस्थांमध्ये अशा काही कमतरता होत्या, त्यांना २०२३-२४ ची प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यापूर्वी त्या कमतरता भरून काढण्याची संधी देण्यात आली होती. आता श्री सुमित यांच्यासमोर प्रश्न होता की जेजे स्कूल ऑफ आर्टने ही प्रक्रिया केली आहे की नाही?

त्यांना यापुढे असे आढळून आले की एआयसीटीईद्वारे मंजुरी प्रक्रियेसाठी एक सार्वजनिक सूचना जारी केली आहे ज्यामध्ये शिक्षणसंस्थांनी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १३/०४/२०२३ आहे, असा उल्लेख आहे.

ही सार्वजनिक सूचना वाचण्यासाठी एआयसीटीई वेबसाइटची लिंक:

https://www.aicte-india.org/sites/default/files/Website%20-%20Public%20Notice_0.pdf

एआयसीटीई मंजुरी प्रक्रियेसाठी सार्वजनिक सूचना (पृष्ठ १)
एआयसीटीई मंजुरी प्रक्रियेसाठी सार्वजनिक सूचना (पृष्ठ २)

ही तारीख आधीच निघून गेली आहे, तरीही श्री सुमित यांनी अजूनही आशावादी विचार केला की, जेजेसारख्या प्रतिष्ठित संस्थेने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ ची प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यापूर्वी आवश्यक मंजूरी घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली असेल. परंतु याची शहनिशा करण्यासाठी त्यांनी याबद्दल संस्थेकडे त्या तपशिलांची चौकशी केली असता संस्थेकडून त्यांना दुजोरा मिळू शकला नाही.

श्री सुमित आता चित्राला सुयोग्य करिअर मार्गदर्शन कसे करायचे? आणि संस्थेची पूर्ण माहिती न घेता आंधळेपणाने प्रवेश घेण्यासाठी येणाऱ्या इतर सर्वच विद्यार्थ्यांचे भविष्य काय असेल? या विवंचनेत आहेत.

वाचकहो, तुम्ही त्यांना काही सुचवू शकाल का ?

 विनील भुर्के

 * टीप: चित्रा, विद्या आणि श्री सुमित ही बदललेली नावे आहेत.

तुम्हाला भारतातील कलाशिक्षण देणारी महाविद्यालये आणि संस्था यांची माहिती हवी आहे का?

त्यासाठी चिन्हने एक सूची तयार केली आहे. ती बघण्यासाठी खाली दिलेल्या Art Colleges या लिंकवर क्लिक करा.

Art Colleges

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.