No products in the cart.
मिस्टर परफेक्शनिस्ट !
नुकतंच भारतातील एक अत्यंत महत्वाचे आर्किटेक्ट बाळकृष्ण दोशी यांचे निधन झालं. स्वातंत्र्यानंतर भारतात जे काही मोजकेच तीन चार आर्किटेक्ट वेगळ्या स्वरुपाचं काम करत होते त्यापैकी एक म्हणजे बाळकृष्ण दोशी. ‘पद्मभूषण’ आणि स्थापत्यशास्त्रातला ‘नोबेल पुरस्कार’ समजला जाणारा ‘प्रित्झर पुरस्कार’ त्यांना मिळाला होता. बंगलोरमध्ये आर्किटेक्ट म्हणून प्रॅक्टिस केलेले पण आता सांगली जवळच्या गावात स्थायिक झालेल्या आर्किटेक्ट शंकर कानडे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवातीची काही वर्षे दोशी सोबत काम केले होते. बाळकृष्ण दोशी यांचा दबदबा एवढा होता की प्रत्येक आर्किटेक्टला त्यांच्याकडे काम करावे असे वाटत असे. त्यामुळे संधी आली तेव्हा कानडे यांनी आपली ‘हायेस्ट पेइंग’ नोकरी सोडून दोशी यांच्याकडे कमी पगारात नोकरी केली. या नोकरीदरम्यान दोशी यांच्याबरोबर काम करताना आलेले अनुभव शंकर कानडे यांनी खास ‘चिन्ह आर्ट न्यूज’च्या वाचकांसाठी सांगितले आहेत.
बाळकृष्ण दोशी यांची आणि माझी पहिली ओळख वर्तमानपत्रातून झाली. मी कॉलेजमध्ये असताना ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये बाळकृष्ण दोशी यांच्यावर एक लेख आला होता तो वाचून मी प्रभावित झालो. त्यावेळी त्यांच्याकडे काम करण्यासाठी मी जरी थेट प्रयत्न केले नसले तरी मनात कुठेतरी ती इच्छा होती. त्याकाळी मोजक्या आर्किटेक्चरल फर्म होत्या. त्यामुळे चार्ल्स कोरिया, कानविंदे यांच्यासारख्या बड्या आर्किटेक्ट्सकडे मी नोकरी करण्यासाठी प्रयत्न केले, पण जागाच नसल्यामुळे तिथे प्रवेश मिळाला नाही. पुढे जेजेमधलं आर्किटेक्चरचं शिक्षण पूर्ण झाल्यावर मी बंगलोरमध्ये काम करत होतो. तिथे मला त्याकाळी तब्बल चारशे रुपये पगार होता ( ही साठच्या दशकातील गोष्ट ). पण तिथल्या कामात काही नवीन शिकायला मिळत नसल्याने आणि काम अत्यंत निरस असल्याने मी बाळकृष्ण दोशी यांच्याकडे काम मिळावे यासाठी अर्ज करत राहिलो. आणि योगायोगाने मला तिथे दोशी यांनी नोकरी दिली. खरं तर इथली नोकरी कमी पगाराची होती पण या काळात जे मी शिकलो ते मला आयुष्यभरासाठी पुरुन उरलं.
दोशी कामाच्या बाबतीत अगदी मिस्टर परफेक्शनिस्ट. अगदी एखाद्या इमारतीचं कंपाउंड जरी करायचं असेल तर ते बारीकातील बारीक डिटेलिंगला महत्व देत. नुसतं सौन्दर्य किंवा नुसती उपयुक्तता यांना महत्व न देता दोन्हीचा योग्य विचार करून त्यांची प्रत्येक इमारत उभी राहत असे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक इमारतींचं नव्याने निर्माण होऊ लागलं होतं. त्यामुळे कामाच्या भरपूर संधी होत्या आणि आर्किटेक्ट मात्र मोजकेच होते. त्यामुळे चांगल्या संधी येत गेल्या आणि बाळकृष्ण दोशींनी त्या संधीचं सोन केलं. आयआयएम बेंगलोर, सीईपीटी अहमदाबाद, इफको टाऊनशिप यासारख्या स्थापत्यशास्त्रातील आदर्श ठरतील अशा इमारती त्यांनी उभ्या केल्या. यातल्या काही इमारतींच्या उभारणीमध्ये त्यांच्यासोबत काम करण्याचं भाग्य मलाही मिळालं.
दोशी कोणतीही इमारत बांधताना किती बारीक विचार करत याचं एक उदाहरण मी सांगतो. सुरुवातीला मी नवीन असताना त्यांनी मला एका इमारतीचं कंपाउंड बांधण्याचं काम दिल होतं. त्यांनी मला विचारलं की कशी बांधशील भिंत ? मी सर्वसाधारण विचार करून उत्तर दिलं की, स्टॅंडर्ड प्रॅक्टिसनुसार तीन फुटाची भिंत बांधायची आणि प्लास्टर करून काम पूर्ण करायचं. त्यावर ते म्हणाले की तू आर्किटेक्ट आहेस ना मग अशी पुस्तकी उत्तरे नको देऊस. शहरात जा आणि चांगली कामं बघून ये. मग आपण बोलूया. चांगली काम शोधताना मी विक्रम साराभाई यांची बहीण गीरा साराभाई यांनी बांधलेलं एक घर पाहिलं. श्रीमंत व्यक्तीचं अत्यंत कलात्मक बांधणी असलेलं घर होतं ते. या घराचं कंपाउंड हे फक्त विटांमध्ये केलं होत आणि ते बांधताना मध्ये ग्रील्स ठेवल्या होत्या. या घराबद्दल आणि त्याच्या कंपाउंडबद्दल मी दोशींना माहिती दिली. त्यावर दोशी यांनी कंपाउंड ग्रील पद्धतींनी का बांधलं आहे आणि त्यातलं सोंदर्य मला समजावून सांगितलं. या सुंदर धड्यानंतर मीही घरमालकाची गरज, सोंदर्य आणि उपयुक्तता यांचा विचार करून कंपाऊंड बांधून दिलं. केवळ व्यावसायिक विचार न करता एखादी इमारत किती पर्फेक्शननी बांधायला हवी याचा विचार त्यांनी मला शिकवला. या कंपाउंड बांधण्याच्या कामात मी एक दिवस नुसता शहरातील इमारती बघत फिरत होतो. आजच्या काळातल्या गल्लाभरू व्यावसायिकाने विचार केला असता की एक दिवसाचा पगार याच्या फिरण्यात फुकट गेला ! पण त्या काळाची माणसचं वेगळी. आपल्या कामात परफेक्शन असणे हे बाळकृष्ण दोशी यांचे पॅशन होते. ते संस्कार त्यांनी माझ्यावरही केले. म्हणून दोशी हे केवळ व्यावसायिक न राहता मोठे बनले. त्यांना ‘पद्मभूषण’ मिळालं. आज कुठल्या आर्किटेक्टला असा पुरस्कार मिळू शकेल ?
दोशी यांनी कलात्मक बांधकामाचे धडे दिलेच पण व्हिज्युअल पर्सेप्शन म्हणजे काय हे देखील मी त्यांच्याकडे शिकलो. कोणतंही काम मिळालं की अगदी शेवटचा हात फिरेपर्यंत दोशी यांचं त्या कामाकडे बारीक लक्ष असे. हाताखालच्या माणसाकडे सोपवून ते मोकळे होत नसत. आयआयएम बंगलोरचं काम करताना मी पाहिलं होतं की शेवटपर्यंत त्यांच या कामावर लक्ष होतं. त्यामुळे अजूनही थंडीवाऱ्याला तोंड देत ती इमारत दिमाखात उभी आहे. आज किती सरकारी कामं एवढ्या परफेक्शननी होतात? दोनचार वर्षातच इमारतींचं प्लास्टर, विटाच काय अख्ख छतच खाली येतं ! परफेक्शन हा दोशी यांचा महत्वाचा गुण होता.
या काळात मी जे शिकलो ते प्राध्यापक झाल्यावर विद्यार्थ्यांनाही मी शिकवलं. प्रत्यक्ष काम करून मिळालेलं ज्ञान हे पुस्तकी शिक्षणापेक्षा महत्वाचं असतं असं मी मानतो. स्थापत्यशास्त्र ही एकप्रकारची दृश्यकलाच आहे. ती पाहून शिकता येते, वाचून नाही असं माझं मत झालं ते दोशी यांची कामाची पद्धत पाहूनच. आपल्याकडे शिक्षणाचा एकूणच बट्याबोळ झाला आहे. स्थापत्यशास्त्राचे प्राध्यापक हे नुसत्या पदव्या मिळवतात प्रत्यक्ष कामाचा अनुभव शून्य असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होते. ही परिस्थिती आज तयार झाली आहे असं मुळीच नाही अगदी सुरुवातीपासूनच म्हणजे मी शिकत होतो तेव्हापासून ही परिस्थिती होती. त्यामुळेच मी कामाचा आधी अनुभव तेही बाळकृष्ण दोशी यांच्याकडे घेऊन मगच शिक्षक झालो याचा मला अभिमान आहे. त्यावेळी मी भरपूर पगार देणारी नोकरी सोडून दोशी यांच्याकडे कमी पगारावर काम करण्याचा धाडसी निर्णय घेतला म्हणूनच मी आयुष्यात काहीतरी चांगलं शिकू शकलो आणि त्याचे धडे विद्यार्थ्यांना देऊन मी विद्यार्थी घडवू शकलो.
बाळकृष्ण दोशी माझ्यासाठी केवळ माझे बॉस नव्हते तर गुरुही होते. त्यांचे अनुकरण केले म्हणूनच मीही चांगला गुरु होऊ शकलो. !
– शंकर कानडे.
आर्किटेक्ट व निवृत्त प्राध्यापक.
Related
Please login to join discussion