No products in the cart.
मुंबईचं कलाक्षेत्र मागे का?
२ नोव्हेंबर २०२३ पासून ‘गायतोंडे जन्मशताब्दी‘ वर्ष सुरु झाले. ते साजरं करण्याच्या बाबतीत कुठलंही राज्य सरकार किंवा केंद्र सरकार पुढाकार घेणार नाही हे लक्षात आल्यावरच ‘चिन्ह‘नं निर्णय घेतला की आता आपणच आपल्या पद्धतीनं ‘गायतोंडे जन्मशताब्दी‘ वर्ष साजरं करायचं. त्या निमित्तानं ‘चिन्ह‘ ‘गायतोंडे‘ ग्रंथाची आंतरराष्ट्रीय दर्जाची निर्मितीमूल्य लाभलेली आवृत्ती प्रसिद्ध करणार आहोत आणि ‘चिन्ह‘च्या या वेबसाईटवर एका विशेष विभागात तसेच समाजमाध्यमांवर दर आठवड्याला गायतोंडे यांच्या स्मृती जागवणार आहोत. त्या मालिकेतील हा तिसरा लेख.
‘गायतोंडे जन्मशताब्दी वर्ष’ कुणी नाही तर ‘चिन्ह’ तरी साजरं करणार असं आम्ही म्हटलं, नव्हे तसं जाहीरदेखील केलं आणि कामाला लागलो. लगेचच दिवाळी येणार आणि संकल्पांचा फज्जा उडणार हे त्यावेळी ध्यानीमनी देखील नव्हतं. पण दिवाळीची सुट्टी लागली आणि साऱ्याच बेतांवर अगदी पाणीच फेरलं गेलं. गणपती आणि दिवाळी हे सण आले की त्यावेळी कार्यालयास द्यावयास लागणाऱ्या सुट्ट्यामुळे माझ्या छातीत नेहेमीच धस्स होतं. यावेळीदेखील अगदी तस्संच झालं. सर्व जय्यत तयारी करुनदेखील आयत्या वेळी पंचाईतच झाली. गायतोंडे यांच्यावरचा लेख किंवा गुरुवारची पोस्ट तर चांगलीच रखडली पण कवी ग्रेस यांच्या संदर्भातली संजय मेश्राम यांची लेखमालादेखील समाज माध्यमांवर व्यवस्थित प्रसारित नाही करता आली. यातून एक धडा मात्र चांगलाच शिकायला मिळाला तो म्हणजे आता या तंत्रज्ञानाच्या बाबतीत आता आपण मागे राहावयाचे नाही. तर सांगायची गोष्ट अशी की मी आता वयाच्या या टप्प्यावर नव्याने नवं तंत्रज्ञान शिकू पाहतोय, आत्मसात करू पाहतोय. त्यामुळे भविष्यात इथून पुढं आपली भेट अगदी नेमानं होईल हे नक्की. असो!
२ नोव्हेंबर रोजी ‘गायतोंडे जन्मशताब्दी वर्षा’ची घोषणा केल्यानंतर सरकारी पातळीवर काहीतरी हालचाल केली जाईल अशी अनेक ‘गायतोंडे’ चाहत्यांना अपेक्षा होती, अनेकांनी फोनवरून किंवा मेसेजेस पाठवून तशी विचारणादेखील केली. तसे काहीही होणार नाही याबाबत मला मात्र पूर्ण खात्री होती, त्यामुळे मला काही या साऱ्याचा फारसा धक्का वगैरे बसला नाही. पण सरकारी कामकाजाविषयी अनभिज्ञ असलेले ‘चिन्ह’ आणि ‘गायतोंडे’ यांचे चाहते मात्र या सरकारी अनास्थेमुळे निश्चितपणे दुखावले गेले. महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा आता ज्या पद्धतीनं रसातळाला गेला आहे ते पाहता अशा प्रकारच्या अपेक्षांना आता महाराष्ट्रातल्या सुजाण नागरिकांनी फाटा द्यायला हवा असे मला मनापासून वाटते. असो! एकूणच प्रकरण आता इतकं हाताबाहेर गेलं आहे की यावर आणखी काही भाष्य करणं हा वेळेचा अपव्यय ठरावा.
पण ‘चिन्ह’च्या लेखांची दखल महाराष्ट्र आणि गोव्यातल्या संवेदनशील कलावंत, कार्यकर्त्यांनी निश्चितपणानं घेतली आहे असे म्हणावयास हरकत नाही. आजच आम्ही ‘चिन्ह’च्या इंग्रजी विभागात जो वृत्तांत प्रसिद्ध केला आहे तो गोव्याच्या दीनानाथ दलाल मेमोरियल आर्ट एज्युकेशन सेन्टर या संस्थेने गोवा राज्य सरकारच्या कला आणि संस्कृती विभागाच्या मदतीनं गोव्यात १५ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत चित्रकार गायतोंडे यांच्या कर्तृत्वाला मानवंदना देण्यासाठी एका आर्टिस्ट कॅम्पचं आयोजन केलं होतं. गोवा आणि महाराष्ट्रातल्या अनेक चित्रकारांनी या कॅम्पमध्ये भाग घेतला. श्रीधर कामत बांबोलकर यांनी पुढाकार घेऊन या कॅम्पचं यशस्वीपणे आयोजन केलं. ही खरोखरच मोठी घटना आहे. श्री बांबोलकर यांचं यासाठी खरोखरच अभिनंदन करावयास हवं.
अशाच पद्धतीनं अनेक शहरातून जर कार्यकर्ते उभे राहिले तर गायतोंडे जन्मशताब्दी निश्चितपणानं मोठ्या दणक्यात साजरी होईल. या क्षेत्रात कार्य करणाऱ्या लोकांनी आता ‘सरकार काही करेल’ वगैरे अपेक्षाच करणं सोडलं पाहिजे. सरकार किंवा राज्यकर्ते या क्षेत्रासाठी आता काहीही करणार नाहीत, कारण असं काही क्षेत्र आहे आणि त्यासाठी आपण काही करायला हवं आहे याची जाणीव असणारे नेते निर्माण होण्याची प्रक्रियाच आता मंदावली आहे. राजकारण – समाजकारण हा आता धंदाच झाला आहे. आणि तिथं आपल्या क्षेत्राला आता वाव राहिलेला नाही. म्हणूनच जेजे स्कूल ऑफ आर्टचा प्रश्न वर्षानुवर्षे लोंबकळत राहिला. या साऱ्या पार्श्वभूमीवर आता ‘ गायतोंडे’ जन्मशताब्दी वर्ष साजरं करण्यासाठी अनेकजण पुढं येत असल्याचं जाणवू लागलं आहे. परवा पुण्यातून प्रा नितीन हडप यांचा फोन आला होता. ते सांगत होते ‘डॉ श्रीराम लागू यांच्या कुटुंबीयांतर्फे पुण्यात ‘श्रीराम लागू रंगावकाश’ नावानं एक रंगभूमी प्रकल्प साकारतो आहे. जानेवारीत त्याचं उद्घाटन होणार आहे. पुण्यातल्या महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि सुदर्शन आर्ट गॅलरी या दोन्ही संस्थातर्फे त्यावेळी एक तीन दिवसांचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्या महोत्सवात गायतोंडे यांच्या चित्रांच्या प्रिंटसचं एक प्रदर्शन आणि गायतोंडे यांच्यावरील लेखांचं अभिवाचन वगैरे कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे’. वगैरे. असेच कार्यक्रम जर सर्वत्र साजरे केले गेले तर कशाला हव्यात त्या सरकारी मिनतवाऱ्या?
आश्चर्य याचं वाटतं की बॉंबे आर्ट सोसायटी किंवा आर्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थांकडून अद्याप कोणतीच घोषणा होताना का दिसत नाही याचं. ज्या काळात गायतोंडे मुंबईत कार्यरत होते त्या काळात या दोन संस्थांशी त्यांचा निश्चितपणे संबंध आला असणार. आर्टिस्ट्स सेंटरच्या गॅलरीत तर ते रोज़च येत होते. तिथं ते गप्पांमध्ये सहभागी होत होते. कुणी विचारलं तर आपली मतं अगदी ठासून मांडत होते. त्याकाळच्या अनेक छायाचित्रात ते ठळकपणे दिसतात. आता आर्टिस्ट्स सेंटर अस्तित्वात आहे किंवा नाही या विषयी मला काहीएक कल्पना नाही पण अन्य दोन संस्थानी ‘गायतोंडे जन्मशताब्दी वर्ष’ साजरं करण्यासाठी पुढाकार घेण्यात कोणती अडचण आहे?
सतीश नाईक
संपादक
‘चिन्ह आर्ट न्यूज’
Related
Please login to join discussion