Features

रंग त्यांचा वेगळा…

कला ही माणसाला माणूस म्हणून घडवते. लहानपणापासूनच मुलांना कलेची ओळख झाली तर त्यांचं व्यक्तिमत्व चहू अंगानी फुलतं. मुलांना कलेच्या माध्यमातून घडवण्याचं काय गुरुवर्य चन्ने सरांनी चाळीस वर्ष केलं. कलाशिक्षणात त्यांनी अनेक अभिनव प्रयोग केले. त्यांच्या हाताखाली घडलेली कितीतरी मुलं आज इतर क्षेत्रात काम करत असतील पण लहानपणी चित्रकलेच्या माध्यमातून त्यांच्यावर जे संस्कार झाले ते त्यांना आयुष्यभर साथ देत आहेत. या मुलांना घडवण्याचं कार्य करणाऱ्या चंद्रकांत चन्ने यांच्या कारकिर्दीचा आढावा प्रतोद कर्णिक यांनी या लेखातून घेतला आहे.

गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांच्या काव्यावर रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, दादर इथे एक कार्यक्रम होणार होता. एक नागपूरचा ग्रुप, त्यांची नृत्य नाटिका सादर करणार होता, त्याबद्दल मला प्रचंड उत्सुकता होती. … आणि अचानक स्टेजवर पांढऱ्याशुभ्र कागदाचे अत्यन्त क्रिएटिव्ह आकार, अतिशय सुंदर आकृतीबन्ध साकारत, काही मुलं रविंद्रनाथांच्या काव्यावर एक दर्जेदार नृत्य अविष्कार सादर करायला लागले. डोळ्याचं पारणं फेडत, ओरिगामी या पेपरक्राफ्टचा सुंदर उपयोग करत, गुरुदेव रविंद्रनाथांवर, त्यांच्या काव्यावर अतिशय दर्जेदार नृत्य सादर झालं.

हा फोटो तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याबरोबर बसोलीयन्स.

नृत्य संपताच, मी माझ्याही नकळत उभं राहून त्या नृत्याला दाद देत, टाळ्या वाजवु लागलो. “धन्यवाद”, शेजारच्या खुर्चीतून आवाज आला… मी वळून शेजारी पाहिलं. एक कलात्मक गडद रंगाचा झब्बा, पांढरी दाढी, चष्मा असे एक साठीच्या घरातले गृहस्थ शेजारी बसले होते. ते एक चित्रकार आहेत, हे पाहूनच लक्षात येत होतं. मनःपूर्वक हसून माझ्याकडे पहात ते परत म्हणाले, “इतकी मनपूर्वक दाद दिलीस, माझ्या मुलांच्या मेहनतीचं चीज झालं.” मी पण हसून म्हटलं, खरंच खूप अप्रतिम सादर केलं. मग ओळख झाली. मी वाकून नमस्कार केला, बहुदा, त्यांना नमस्कार करणे फारसं आवडत नसावं, हेही माझ्या लक्षात आलं.

त्यांची आणि माझी पहिली ओळख ही अशी झाली… … असं नेहमीच म्हटलं जातं, आपण सर्वसामान्य माणसं, आपण ना सिस्टीम बदलू शकत ना समाजासाठी भरीव असं काही करु शकत.

पण…त्यांनी हे सगळं खोडून काढत, त्यांच्या ध्यासातून एक कलेची आगळी वेगळी चळवळच उभी केली… “बसोली”

बसोली हे जम्मू काश्मीरच्या हिमपर्वतांच्या कुशीतलं कठूआ जिह्यातलं एक पहाडी जमाचं गाव, त्यांच्या दैनंदिन जीवनातही अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही कलात्मकता, रंगांची उधळण पटकन नजरेत भरते. त्यांची परंपरागत मिनिएचर स्वरुपातली बसोली पेंटिंग्ज ही अतिशय प्रसिद्ध आहेत. लहान मुलांना त्यांच्या बंदिस्त, चौकटीतल्या जगातून अलगद बाहेर काढत, त्यांच्यामधल्या सुप्त कला गुणांना मोकळी वाट मिळावी… त्यांच्यातल्या कलागुणांना मुक्त विहार करायला खुलं आकाश मिळावं, यासाठी निर्माण केलेल्या संस्थेचं नावही सरांनी किती समर्पक दिलंय, हे यातून लक्षात येतं. आजपर्यंत नागपूर आणि परिसरातील लाखो मुलं, या बसोलीतून कलेच्या या दुथडीभरून वाहणाऱ्या नदीत डुंबत, त्यांचं लहानपण रंगीबेरंगी करत मोठी झाली.

प्राध्यापक चंद्रकांत चन्ने… एक जगावेगळं कलात्मक व्यक्तिमत्व.

बडोद्यातल्या कला महाविद्यालयाचा लौकिक तेव्हा सर्वत्र होता, आर्थिक अडचणी असूनही सरांनी जिद्दीने तिथून व्हिज्युअल आर्ट आणि एस्थेटिक्स मध्ये एम ए केलं. एक स्वप्न पूर्ण केलं आणि लगेच सरांना दुसरं मोठं स्वप्न साद घालायला लागलं.  त्रिखंडात ज्या कला विश्वविद्यापीठाचा नावलौकिक होता, त्या गुरुदेव रवींद्रनाथांच्या शांतिनिकेतनमध्ये सर दाखल झाले.  प्रख्यात चित्रकार प्रा. निहार रंजन रे यांच्या मार्गदर्शनाखाली, बाल चित्रकला…चाईल्ड आर्ट, या विषयात सरांनी पी एच डी संपादन केली. सरांची ज्ञानार्जनाची लालसा इतकी प्रबळ होती, की कित्येकदा पोटात भुकेने आग पडूनही, रात्रीचा दिवस करून सरांनी आपला प्रबंध पूर्ण केला. सरांना जेव्हा पी एच डी चं प्रमाणपत्र प्राप्त झालं, तेव्हा ते आपल्या गुरूंना भेटायला आणि त्यांचे आशिर्वाद घ्यायला गेले. त्यांच्या गुरूंनी तेव्हा जे संगीतल, त्यांने सरांच्या कला प्रवासाला एक वेगळी दिशा लाभली. भविष्यातल्या बसोलीच्या जन्माची बीजं त्याच गुरुआज्ञेत होती.

बाल चित्रकला प्रत्येक क्षणाला बदलत असते, नवीन अविष्कारात प्रकट होत असते, जर खरंच बाल चित्रकलेसाठी काही करायची इच्छा असेलच तर लहान मुलांना तुझी कला दे, त्यांच्यातल्या कलाकाराला घडव. आपल्या गुरूंचे हे मोलाचे शब्द… गुरु आज्ञा सरांनी शिरसावंद्य मानली. आणि म्हणूनच इतक्या खडतर परिश्रमातून मिळवलेली डॉक्टरेट सरांनी कधीच मिरवली नाही. सुरवातीच्या काळात सर नागपूरवरून मुंबईत आले, त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरवात सर जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये प्राध्यापक म्हणून केली.

पण सरांचं मुंबईत मन अजिबात रमल नाही. सरांनी परत नागपूर गाठलं. लहान मुलांना चित्रकला शिकवायची या ध्यासातून शाळेत कला शिक्षक व्हायचं ठरवलं. गुरू आज्ञेचे शब्द कानात रुंजी घालत होतेच. पण इतकं प्रचंड उच्च शिक्षण घेऊन सर शाळेत चित्रकला शिक्षक म्हणून रहातील, टिकतील यावर कुठल्याच शाळेतल्या संचालकांचा विश्वासच बसेना. शेवटी नागपूरच्याच पंडीत बच्छराज व्यास विद्यालयात नोकरी मिळाली, पण नोकरी मधेच सोडायची नाही ही तोंडी अट होती.

आजकाल सकाळी दिलेला शब्द संध्याकाळी लोक सोयीस्कर विसरतात. पण सरांनी आपला शब्द इतका पाळला की १९७८ ला तिथे नोकरीला लागले ते थेट २००७ साली तिथून रिटायर्ड झाले. नोकरीला लागल्यावर सरांनी तिथेच नागपुरात बसोलीची स्थापना केली.  ४८ वर्ष एक संस्था किंवा चळवळ चालवणं, तेही इतक्या शिस्तीने, हेही खूप महाकठिण काम. यातून त्यांनी हजारो मुलांना घडवलंय. कुणी चित्रकार झाले, कुणी शिल्पकार, कुणी गायक, कुणी नाट्यकर्मी तर त्यांच्या कितीतरी विद्यार्थ्यांनी चित्रपट क्षेत्रातही आपला ठसा उमटवला.

लहान मुलांमध्ये  कलात्मक दृष्टिकोन विकसित व्हावा, त्यांचं बालपण जास्तीत जास्त कलेची उपासना करण्यात जावं, तेही अगदी हसत खेळत… यासाठीच सरांचा रात्रंदिन हा अट्टाहास. आणि यामध्ये कधीही ‘आर्थिक फायदा’ या दृष्टिकोनाचा लवलेशही सरांनी येऊ दिला नाही, उलटपक्षी आपल्या सशक्त कुंचल्यातून आणि प्रगल्भ कलेतून वेळोवेळी बसोलीची आर्थिक बाजूही स्वतःच सांभाळली. पालकांनी जसं आपल्या गोजिरवाण्या  बाळाला मोठं करावं, तसं सरांनी त्यांच्या बसोलीला मोठं केलं.

गुरुदेव रवींद्रनाथ यांनी “शांतिनिकेतन” च्या माध्यमातून कला शिक्षण आणि कलेची जोपासना या साठी एक आगळावेगळा प्रयोग करून तो यशस्वी करून दाखवला. जगातल्या सगळ्याच कलाकारांना, अगदी आजही, इतक्या वर्षानी सुद्धा गेल्या अनेक पिढ्यांसाठी, शांतिनिकेतन हे नवनिर्मितीचा, कलात्मकतेचा अखंड स्रोत वाटत आलाय.
चन्नेसर, गुरुदेवांच्या पुढल्या  पिढीतील एक सर्वोत्तम शिष्य. शांतिनिकेतन मधल्या वास्तव्यात, आपलं कला शिक्षणातलं ध्येय गाठतानाच, शांतिनिकेतनमध्ये, जागोजागी गुरुदेवांच्या पाऊलखुणा शोधत, सरांमधला कलाकार घडत गेला. पण ते नुसतेच तिथून कलेचं भांडार घेऊन बाहेर पडले नाहीत, तर ती गुरुदेवांची अक्षय देन त्यांनी “बसोली” च्या माध्यमातून आपल्या भोवतालच्या समाजाला अगदी भरभरुन वाटली.

छोट्या छोट्या बालकांवर या अक्षय कला भांडाराची गेली ४८ वर्ष सर सढळ हस्ते उधळण करतायत. गुरुदेवांचे वैश्विक चैतन्यही सरांचं हे कार्य पाहून खूप प्रसन्न होऊन सरांना भरभरुन आशिर्वाद देत असेल.इतक्या वेगवेगळ्या संकल्पनांमधून, असंख्य विषयांवर, कलेचे इतके नाविन्यपूर्ण अविष्कार बसोलीमध्ये सादर केले जात असतात, की सरांची कल्पकता किती अचाट आहे हे त्या प्रत्येक कार्यक्रमातून दिसून येत.

सर, न चुकता दर रविवारी त्यांच्या बसोली परिवारसाठी आणि त्या परिवाराशी सरांमुळे जोडले गेलेले, अशा  सगळ्यांसाठी एक पोस्टर डिझाईन करून पाठवतात. त्यातल्या विषयांमधली विविधता, उत्स्फूर्तता आणि त्या पोस्टरवर असलेल्या चार ओळी… सगळंच लाजवाब. त्या चार ओळींमधून दिसणारी सरांची काव्य क्षेत्रातली मुशाफिरीही थक्क करायला लावणारी आहे.मी कित्येकदा सरांना खूप आवर्जून सांगितलंय, की तुमच्या या बसोली संडेच्या पोस्टर्सचं एक पुस्तक झालं पाहिजे.

फाईन आर्टिस्ट म्हटलं की खांद्यावर झोळी… झब्बा, कॅनव्हास आणि रंगांच्या विश्वात रमणारे कलंदर कलाकार असं एक चित्र पटकन डोळ्यांसमोर उभं राहतं. पण याबरोबरच आणखीन एक गोष्ट या फाईन आर्टिस्ट कलावंतांमध्ये बऱ्याचवेळा दिसते. ती म्हणजे जाहिरात, ब्रँडिंग, डिझायनिंग अशा विषयांबद्दलची अनास्था किंवा त्या विषयातलं आपलं अज्ञान झाकायला असेल कदाचित, पण तिकडे ढुंकूनही न बघण्याची वृत्ती. उत्तम पेंटिंग आर्टिस्ट असूनही ब्रँडिंग, डिझायनिंग, जाहिरात या क्षेत्रांमध्येही उत्तम काम करणारे कलाकार अगदीच विरळा. चन्ने सर या विषयात उत्तम कामच करत नाहीत, तर त्यावरील त्यांची व्याख्यान ऐकल्यावर लक्षात येतं, की अगदी बोटावर मोजता येतील इतक्या या विषयांमधल्या तज्ञ व्यक्तींपैकी ते एक आहेत. पुरातत्व हाही सरांच्या अगदी सखोल अभ्यासाचा विषय. कलाविश्वातलं असं एकही दालन नसेल, ज्यात सरांनी उत्तम काम करून ठेवलं नाही आणि त्यावर त्यांचा सखोल अभ्यास नाही. त्यांच्या व्यक्तिमत्वात मला नेहमीच, उत्तुंग प्रतिभे बरोबरच माणुसकीचं भान आणि विनम्र आणि विवेकी वागणं बोलणं दिसतं.


सरांबरोबर भेटताना सरांच्या काही विद्यार्थ्यांना भेटण्याचा योगही काहीवेळा येतो. बसोलीतली जी मुलं आज, आय टी किंवा इतर दुसऱ्या शाखांमध्ये काम करतायत, त्यांच्यावर सुद्धा लहानपणापासून सरांनी केलेले संस्कार पटकन दिसून येतात. सरांच्या अशा विद्यार्थ्यांचा आज कलेशी रोजच्या आयुष्यात फारसा संबंध येत नसेलही, पण त्यांची सरांबरोबर, बसोली बरोबर जी नाळ अगदी लहानपणापासून जुळली, ती आजही तशीच घट्ट आहे.

गुरुदेव रवींद्रनाथांच्या साहित्यात जसा खुला निसर्ग, प्रकाश, खळाळून वाहणारे निर्झर दिसतात, तसाच त्यांच्या साहित्याचा एक मोठा भाग हा काळोखाला जवळ करणारा, सृष्टीच्या गूढ अगम्य गोष्टींनी मोहित झालेला पण दिसतो. सरांच्याही कलेत हा गुरुदेव रविंद्रनाथांचा, विश्वाच्या अगदी भिन्न रूपांवर तितकंच उत्कट प्रेम करायचा वारसाही अगदी सहजपणे आलाय, सरांच्या कलाकृतीतून अगदी प्रकर्षानी ते जाणवतं. पंडीत बच्छराज शाळेत कला शिक्षक म्हणून नोकरी करतानाच,  बसोलीचा पसारा तर सरांनी उभा केलाच, तो वाढवला, फुलवला. त्या बरोबरच सरांनी आपल्या पेंटिंग्जनी अक्षरशः विश्व पादाक्रांत केलं.

देश विदेशात सरांच्या पेंटिंग्जच्या प्रदर्शनाचे असंख्य शो आजवर झाले आहेत आणि त्याला जगभरातल्या रसिकांनी उदंड प्रतिसाद दिलाय. कला शिक्षकाच्या नोकरीतून निवृत्त झाल्यावर सरांनी नागपूरच्या सेंट्रल स्कूल ऑफ फाईन आर्ट्स, या कला महाविद्यालयाच्या डीन पदाची धुरा नऊ वर्ष अत्यन्त यशस्वीपणे सांभाळली. इथे सरांना कामाचं स्वातंत्र्य मिळालं आणि त्यातून त्यांनी या कला महाविद्यालयाला खूप नवीन प्रयोगांनी, नवनवीन उपक्रमानी वेगळी दिशा दिली, आपल्या सृजनशील कला दृष्टीचा ठसा उमटवला. शिक्षणाचा वसा सरांना या वयातही घरी बसू देत नाही, आजही त्यांचं कला महाविद्यालयातलं ज्ञानदानाचं काम अखंड सुरू आहे.

सध्या सर मुंबईत असतात, घरात त्यांची अगदी जीवापाड काळजी घेणारा मुलगा, सून आणि गोड नातू यात सर रमले असले तरीही बसोलीचं काम आजही अगदी अव्याहतपणे करत असतात, लॉकडाऊन मध्येही घरात बसून सर, जोमाने बसोलीचं काम करतच होते. आपल्या  कलेतून पुढल्या पिढ्यांना, “देता किती घेशील दो कराने”, इतकं भरभरून देणारे… आणि आपण किती दिलंय याची मागे वळून मोजदाद न करता, सतत नवनिर्मितीच्या नवनवीन आकाशांना गवसणी घालणारे…

इतके बहुआयामी, तत्वनिष्ठ, नवनिर्मितीच्या ओढीने कायमच झपाटलेले, आपल्या प्रगल्भ कलेने, कलेच्या क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवूनही अगदी जमिनीवर पाय असणारे चन्ने सर…सरांच्या इतक्या भरीव कार्याची आठवण जरी झाली तरीही मनोमन नतमस्तक व्हायला होतं आणि अंतर्मनात एकच ध्वनी उमटतो…

“तस्मै श्री गुरुवे नमः।”
******
– प्रतोद कर्णिक, ठाणे

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.