No products in the cart.
- Home
- Uncategorized
- तरुणपणीचे हिरो : प्रयाग शुक्ल !
तरुणपणीचे हिरो : प्रयाग शुक्ल !
सत्तरच्या दशकात जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकत असताना वाचनाचा भयंकर नाद लागला होता. जे जे वाचता येईल ते सारं मी त्या काळात वाचत असत. त्यावेळी मी चुनाभट्टीत राहत असे. तिथला स्टॉल हे माझं हक्काचं वाचनाचं ठिकाण होतं. लोकलमधे बसताना खरं तर मागच्या बाजूला बसल्यास सीएसटीच्या मागच्या दारातून जेजेमध्ये प्रवेश करणं अतिशय सोपं होतं. पण मी मात्र पुढल्या फर्स्ट क्लास डब्यामध्ये बसणं पसंत करत असे. कारण सीएसटीला उतरल्याबरोबर रोज व्हीलरच्या स्टॉलला भेट देणं हा माझा रिवाज होता.
आता तिथे फक्त तिकिट विक्रीच्या खिडक्या आहेत. तो भलाथोरला स्टॉल लोकल आणि एक्सप्रेसच्या मधल्या जागेत हलवला गेला आहे. पण मूळचा जो स्टॉल होता तो अतिशय भव्य होता. भारतातली सारीच्या सारी नियतकालिकं तिथं मिळत असत. हळूहळू त्या स्टॉलवरचे सारेच मला ओळखू लागले. मी तिथे रोजच काहींना काही विकत घेत असे पण त्यापेक्षा अधिक मी तिथे पाहत असे. म्हणजे उदाहरणार्थ मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतली नियतकालिकं वगैरे.
मला रोज लागणारी सोबत, माणूस, जत्रा, सत्यचित्र, चित्ररंग, रसरंग वगैरे सर्वच साप्ताहिकं तिथं मला बघायला आणि विकत घ्यायलाही मिळत असत. इलस्ट्रेटेड विकली, धर्मयुग, यांच्या बरोबर मला एके दिवशी ‘सारिका’ या पाक्षिकाचा शोध लागला. कमलेश्वरांची ‘परिक्रमा’ दूरदर्शन वर पाहत होतो पण आता ‘सारिका’च्या रूपानं कमलेश्वर वाचू देखील लागलो. मग राजेंद्र यादवांचा ‘हंस’चा अंक माझ्या हातात आला. तोही मी नियमितपणे वाचू लागलो. पुढं पुढं तर बाजारात नवीन आलेलं प्रत्येक नियतकालिकं तिथले विक्रेते मला दाखवू लागले. कसाब एपिसोड झाला तेव्हा कसाबने केलेल्या गोळीबारात त्यातला एक विक्रेता मारला गेला होता. दुसऱ्या दिवशी त्याच्या मृतदेहाचे फोटो पहाताना मी अक्षरशः हादरुन गेलो होतो. असो.
कलकत्यावरून प्रसिद्ध होणारं ‘रविवार’ हे साप्ताहिक मला तिथंच पहिल्यांदा दिसलं. एस पी सिंग ला मी तेव्हा पासूनच ओळखू लागलो. एके दिवशी मला तिथल्या विक्रेत्याने ‘दिनमान’ या साप्ताहिकाचा अंक बघायला दिला. तो अंक पाहिल्या बरोबर मी त्याच्या प्रेमातच पडलो. आणि तिथून तो जो वाचायला लागलो तो ते साप्ताहिक शेवटचा अंक प्रसिद्ध होईपर्यंत.
टाइम मॅगझिनच्या धर्तीवर ते अंक निघत असत. नाटक, चित्रपट, संगीत, साहित्य, राजकारण, समाजकारण इत्यादी क्षेत्रात जे जे काही चांगलं घडत होतं त्या साऱ्याची नोंद त्या अंकात आवर्जून घेतली जात असे. प्रत्येक अंक वाचनीय निघत असे. प्रख्यात हिंदी साहित्यिक ‘रघुवीर साहाय्य’ हे त्याचे संपादक होते. चित्रकला हा माझा आधीपासूनचाच आवडता विषय होता. त्यावर ‘विनोद भारद्वाज’ आणि ‘प्रयाग शुक्ल’ लिहीत असत. दिल्लीतल्या सर्व मोठ्या प्रदर्शनाची समीक्षा त्या काळात ‘दिनमान’मध्ये प्रसिद्ध होत असे. त्यातलं ‘प्रयाग शुक्ल’ यांचं लिखाण मला अतिशय आवडत असे. खूप मोठ्या चित्रकारांवर त्या काळात त्यांनी लिहिलं होत. ‘दिनमान’ बंद झालं आणि या साऱ्या जगाशी माझा संपर्कच तुटला.
फेसबुक सुरु झाल्यानंतर मात्र तो पुन्हा जोडला गेला. पण मधे बराच काळ गेला होता. सुमारे वर्ष दीड वर्षांपूर्वी एके दिवशी कॅम्लिनच्या ओझा यांचा मला फोन आला. ते म्हणाले ‘प्रयाग शुक्ल’ इथे आले आहेत. जहांगीरला ते येणार आहेत. त्यांना इथल्या काही लेखक, चित्रकार संपादकांना भेटण्याची खूप इच्छा आहे. मला खूप आनंद झाला मी त्या ओझांना म्हटलं की मी नक्की येतो. वांद्र्याला येणं काही मला शक्य नाही पण जहांगीरला मी नक्की येईन. त्यांना भेट देण्यासाठी मी ‘गायतोंडे’ ग्रंथाची प्रत देखील तयार ठेवली. पण त्याच दिवशी नेमकी बायको आजारी पडली आणि ते राहून गेलं. शुक्ला यांना देण्यासाठी तयार ठेवलेली ती प्रत मला अगदी काल परवापर्यंत दिसत राहिली.
तीन चार दिवसापूर्वी अचानक माझे कला संग्राहक मित्र केतन करानी यांनी मला दिल्लीचे प्रख्यात कला समीक्षक केशव मलिक यांच्यावर निघालेल्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचं निमंत्रण पाठवलं. पाहिलं तर काय ‘प्रयाग शुक्ल’ यांच्या हस्तेच त्या पुस्तकाचं प्रकाशन होणार होतं. आणि केतन करानी त्या प्रकाशनाला मुंबईहून खास दिल्लीला जाणार होते. मी केतनना एक विनंती केली मला प्रयागजींना एक पुस्तक द्यायचं आहे, न्याल का ? तर ते म्हणाले आयोजकांनी मला तुम्हाला उचलून दिल्लीत प्रकाशन समारंभालाच घेऊन यायला सांगितलंय. मी म्हटलं ते काही मला शक्य नाही. केतन मला चांगलंच ओळखत असल्यामुळे त्यांनीही काही आग्रह धरला नाही. पण जाताना ‘गायतोंडे’ ग्रंथाची प्रत ते आवर्जून घेऊन गेले.
काल कार्यक्रम संपताच केतनजींचा फोन आला. मला म्हणाले प्रयागजींना मी पुस्तक दिलंय, त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे. आणि मग आमचा संवाद सुरु झाला. मागे ठरवून सुद्धा येऊ शकलो नाही याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केली. पण ते म्हणाले हरकत नाही मी पुन्हा मुंबईला येतोय तेव्हा अवश्य भेटू. पण आज तुम्ही जी मला ‘गायतोंडे’ ग्रंथाची भेट पाठवली आहे ती माझ्या दृष्टीने खूप मोलाची आहे. मी उद्या त्यावर फेसबुकवर लिहिणार देखील आहे. वगैरे.
सकाळीच फोन उघडला तर व्हाट्सअपवर केतन करानी यांनी प्रयागजींची फेसबुक पोस्ट मला पाठवली होती. आज प्रयागजी ८३ वर्षाचे आहेत पण काल रात्री तो कार्यक्रम झाल्याबरोबर घरी गेल्यानंतर बहुदा रात्री कधीतरी त्यांनी ती पोस्ट लिहिली असणार आणि आज सकाळी प्रसारित केली असणार. यावर मी काय बोलणार ? ही अशी माणसं तुम्हाला खूप काही शिकवून जातात. प्रयागजींची अनेक पुस्तकं माझ्या संग्रहात आहेत त्यावर लिहायचा देखील विचार आहे. पाहूया कधी जमतं. बहुदा त्यांची भेट झाल्यावर ते जमेलच.
*****
– सतीश नाईक
संपादक ‘चिन्ह आर्ट न्यूज’
Related
Please login to join discussion