No products in the cart.
माझी ‘अभ्यासपूर्ण’ शिल्पं !
शिल्पकार जयदीप आपटे यांचा ‘शिवशिल्प साकारताना’ हा लेख वाचकांना खूप आवडला होता. या लेखात कुठलेही शिल्प साकारताना कलाकाराला किती बारीकसारीक गोष्टींचा विचार करावा लागतो याची माहिती दिली होती. खरं तर शिल्पकार म्हणून काम करताना मातीकामाव्यतिरिक्त कितीतरी गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. यामध्ये तांत्रिक बाबी, तंत्रज्ञान, उपकरणे यांची माहिती समजून घेणं आवश्यक आहेच. पण त्याचबरोबर शिल्पकाराचा इतिहास, भूगोल, राजकारण या विषयांचा अभ्यास असणंदेखील खूप गरजेचं आहे. तेव्हाच आपण परिपूर्ण कलाकृती साकारू शकतो.
मुळात आपल्याकडे वाचन संस्कृती हळूहळू कमी होत चालली आहे. अशा वेळी कुठलंही शिल्प घडवताना फक्त संदर्भ वापरून काम केलं जातं. पण संदर्भ वापरून त्या व्यक्तीचं बाह्य वैशिष्ट्य साकारलं जातं. त्या व्यक्तिमत्वाचं सार त्या शिल्पात साकारता येत नाही. मुळात आपल्याकडे जे शिल्पाचं काम शिल्पकाराला देतात, त्यांच्या समोर एखादं आधी बघितलेलं शिल्प असतं. तसाच पुतळा त्यांना हवा असतो. अशा वेळी कलाकाराचं काम आहे की काम देणाऱ्याच्या डोक्यातून आधीचं चित्र पुसून नवीन कल्पना सुचवणं. पण ही कल्पना तेव्हाच येऊ शकते, जेव्हा त्या कलाकाराचा अभ्यास असेल किंवा त्या, त्या विषयावरचं वाचन असेल.
माझ्यापुरतं म्हणायचं तर १७/१८ व्या वयापासून दर वाढदिवसाला इतर काहीही घेण्याऐवजी मी पुस्तकं घ्यायला सुरुवात केली. स्वतःच्या कामाचे पैसे यायला लागले, तसं मग सरासरी महिन्याला एक याप्रमाणे पुस्तकं घ्यायला सुरुवात केली. फक्त शिवचरित्रावर आज माझ्याकडे साधारण चाळीसएक पुस्तकं आहेत. मला माहित आहे की हा फार मोठा संग्रह नाही. पण माझ्या कामात जेवढ्या अभ्यासाची गरज आहे तेवढी पुस्तकं नक्कीच आहेत. आधीच्या लेखात शिल्प करताना अभ्यास महत्वाचा आहे ते सांगितलं आहेच,पण हा अभ्यास या पुस्तकांच्या वाचनामुळे आपोआप होत असतो. कधी कधी त्या त्या व्यक्तीच्या अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टीही बराच परिणाम करतात.
श्री अप्पासाहेब पटवर्धन यांचा पूर्णाकृती पुतळा करायची संधी मला मिळाली होती. त्यांना कोकण गांधी म्हणत असत. त्यांचे सगळे मिळून फक्त ५ ते ६ फोटो उपलब्ध आहेत. ते सुद्धा बऱ्याच वर्षापूर्वीचे. अशा वेळी काम खूप अवघड होतं. सगळ्यात आधी त्यांचं एक पुस्तक मिळवून ते वाचलं. त्या शिवाय जुन्या काळातला कोकणी माणूस, त्याचा पेहराव हे सगळं समजून घ्यायला पु. ल. देशपांडेंच्या अंतू बरवा या व्यक्तिरेखेचा खूप फायदा झाला. त्या व्यक्तिरेखेच्या वर्णनात हातात काठी, खांद्यावर पंचा अस वाचलेलं, ऐकलेलं आठवत होतं. वाचनात आलेल्या संदर्भामुळे मी अप्पासाहेबांच्या पुतळ्यात काठी दाखवली. या काठीमुळे वेगळा परिणाम साधता आलाच, शिवाय तांत्रिकदृष्ट्या हातातल्या काठीमुळे तिपाई ( tripod) सारखी रचना झाल्याने पुतळ्याचा तोल जास्त चांगल्या पद्धतीने साधला गेला.
आता आपण पुन्हा शिवशिल्पांकडे वळूया. एखाद्या शिल्पावर काम करताना त्या, त्या विषयाचं माझं वाचन तर आधी होतचं असतं. त्या शिवाय त्यावर उपलब्ध असलेली व्याख्यानं , कीर्तनं, किंवा इतर माहिती ऐकत मी काम करतो, त्यामुळे नकळत काही गोष्टी साकारत जातात.
मी साकारलेल्या काही शिवशिल्पाच्या कल्पनांवर किंवा स्केच मॉडेल वर काम करताना काय विचार केला होता ते सांगतो. एक शिल्प करायचं होतं. ते रत्नागिरी मधल्या रत्नदुर्ग किल्ल्यावर बसवण्यासाठी करायचं होतं. त्यासाठी शिवाजी महाराजांचं उभं शिल्प नक्की केलेलं. या एवढ्या सुरुवातीच्या माहितीवर काम करायला मी सुरुवात केली. ज्यांनी रत्नदुर्ग किल्ला पाहिला आहे त्यांना लगेच लक्षात येईल, की किल्ल्यावर जो कडा आहे तिथून खाली समुद्र दिसतो. त्या कड्यावर त्या पुतळ्याची जागा मी निश्चित केली. त्यामुळे समुद्राकडे तोंड करून, उजव्या हाताची वळलेली मूठ, डावा हात तलवारीच्या मुठीवर अशा आक्रमक पवित्र्यात समुद्राकडे पाहताना शिवाजी महाराज. असं डिझाईन मी केलं होतं. प्रत्यक्ष पाहताना पुतळा आधी पाठमोरा दिसतो. माणसाच्या स्वभावात जे नैसर्गिक कुतूहल असत, जसं एखादी व्यक्ती एका जागी काही बघत असेल तर आणखी १० जण तिकडे ती व्यक्ती काय बघतेय यासाठी बघायला लागतात. तसाच हा पुतळा पाठमोरा खाली काय आहे बघताना दाखवला आहे. हे बघून शंभरातल्या दहा जणांना तरी यावर विचार करायला प्रवृत्त करतो.
आणखी एका शिवशिल्पाच्या स्केच मॉडेलवर काम करताना असाच अभ्यासाचा फायदा झालेला. जागा होती सावंतवाडी. सावंतवाडी हे नाव ऐकल्यावरच शिवाजी महाराजांची कोकण स्वारी आणि तिथल्या सावंतांनी शिवाजी महाराजांना दिलेल्या तलवारीचा संदर्भ डोक्यात आला. ती तलवार उठावदार दिसेल अशा प्रकारे पुतळ्याचं डिझाईन मी केलं होतं. आत्ता अलीकडेच जे शिवाजी महाराजांचं उठावशिल्प मी साकार केलं आहे, त्यात तर मी तलवार दाखवलीच नाहीये ! यामागचा माझ्या मनातला विचार हा होता की, शिवाजी महाराजांचं राज्याभिषेकानंतरचं चित्रण या शिल्पांत मला करायचं आहे. त्यामुळे त्यांची बसण्याची पद्धत साधी, पण एक अधिकार दाखवणारी या शिल्पात मी साकार केली आहे. या एका विचाराने, त्यामागील या अभ्यासाने एक वेगळं शिल्प साकार करण्याचा आनंद मला मिळाला. सिंहासनाधिष्ठित शिवरायांच्या शिल्पांपेक्षा या शिल्पाकडे पहाताना वेगळेपण निश्चितच जाणवतं.
या उदाहरणांवरून आपल्या लक्षात आलंच असेल की शिल्प करताना त्यामागच्या अभ्यासाबरोबरच ते शिल्प कुठे स्थापन केले जाणार आहे, याचा विचार करणंदेखील तितकंच गरजेचं आहे. यावरुन एक आठवलं. बऱ्याच ठिकाणी प्रवेशद्वारावर गॅलरीमध्ये शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बघितलेला आहे, यावर काही न बोललेलंच बरं.
आत्तासुद्धा मी एका भव्य शिवशिल्पावर काम करतोय पण त्याबद्दल नंतर सविस्तरपणे सांगेन. बऱ्याच वेळा रायगडावरचा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे ना तसा सिंहासनावरचा पुतळा बनवून द्या असं सांगितलं जातं. पण खरं तर शिवाजी महाराज हे महत्वाचे आहेत. ते कुठेही बसले तरी महाराज छत्रपतीच राहणार असतात. त्यामुळे सिंहासन, दागिने अशा बाह्यगोष्टींची गरजच राहत नाही. जर शिवाजी राजांचं व्यक्तिमत्व शिल्पकाराला आपल्या अभ्यासातून, विचारांतून उभं करता आलं तर. काम करून घेणारे आणि देणारे दोघही जेव्हा कसंही, कुठलाही सखोल अभ्यास न करता केलेलं काम करतात आणि करवून घेतात, त्यात शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व साकार होण्यापेक्षा, शिवाजी महाराजांचा अपमानच जास्त होत असतो, असं मला मनापासून वाटतं. यासाठी शिल्पकारांनी छत्रपती शिवराय असो किंवा कुठलंही ऐतिहासिक शिल्प, सखोल वाचन, त्यावर मनन, चिंतन करुन ते शिल्प साकारणं खरंच आवश्यक असतं. तेव्हाच असामान्य कर्तृत्वाचं व्यक्तिमत्व एका पुतळ्यातून, एका शिल्पातून खऱ्या अर्थाने प्रकट होतात, साकार करता येतात.
*****
जयदीप आपटे
Related
Please login to join discussion