No products in the cart.
नांगरेनी कला संचालनालय धंद्याला बसवलं!
‘नटसम्राट’ नाटकातलं ते गाजलेलं स्वगत आहेना ‘घर देता कुणी घर…’ त्या चालीवर ‘कला संचालक देता का कुणी कला संचालक’ असं साकडं घालायची पाळी कला संचालनालय आणि उच्च व तंत्रशिक्षण खात्यावर आली आहे. गेल्या तीस पस्तीस वर्षात उच्च व तंत्रशिक्षण खात्यातल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी जे पेरलं ते आता उगवलं आहे. कला संचालनालयातल्या असंख्य भानगडींचा पंचनामा करणारी एक विशेष लेखमाला ‘चिन्ह’चे संपादक सतीश नाईक १ सप्टेंबर पासून महिनाभर सोमवार ते शुक्रवार रोज लिहिणार आहेत. त्यातील हा चौथा भाग.
काल मी जे लिहिलं ते याआधीदेखील एकदा लिहिलं होतं. कदाचित दोनदा-तीनदा देखील लिहिलं असेल, मला आता आठवत नाही. २००८ साली जेव्हा मी ‘कालाबाजार’ अंक काढला त्या अंकात अगदी डॉ. अरुण टिकेकर यांचं नाव घेऊन मी सारा घडला प्रकार लिहिला होता. पण त्यांच्याकडून कुठलाही खुलासा आला नाही. खुलासा तर सोडाच पण साधा निरोप देखील आला नाही. यावरून मी केलेले आरोप त्यांना मान्य असावेत हे उघड होतं.
१९९६ मधल्या त्या बातमीचा उल्लेख मी केला तो २००८ साली. तोपर्यंत बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलं होतं. कला संचालनालयाची दशा दशा झाली होती. हेच जेजे स्कूल ऑफ आर्ट संदर्भात घडलं होतं. आणि तेच अन्य तीन शासकीय कला महाविद्यालयांबाबत देखील घडत होतं. पण तेव्हा हे सारं प्रकरण इतकं अंगावर आलं नव्हतं. गेल्या २७ वर्षात लोकसत्तेच्या त्या खोट्या बातमीचे परिणाम अतिशय भयानक पद्धतीने जाणवू लागले आहेत. कलासंचालनालय किंवा जेजे स्कूल ऑफ आर्ट किंवा महाराष्ट्राच्या कलाशिक्षणाला कलेच्या क्षेत्रात चारआणे इतकी देखील किंमत उरलेली नाही. हे सारे त्या लोकसत्तेच्या खोट्या बातमीचे परिणाम आहेत.
आज या घडीला कलासंचालक पदावर लायक व्यक्ती नाही. आर्किटेक्चर कॉलेजच्या राजीव मिश्रा नामक प्राचार्याला त्याची कलाक्षेत्रात कुठलीही पात्रता नसताना या पदावर बसवलं आहे. ‘जेजे जगी जगले’ या ग्रंथासाठी काही दुर्मिळ छायाचित्रे हवीत म्हणून सुमारे पाच-सहा वर्षांपूर्वी पहिल्यांदा मी त्यांच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळी त्यांनी कार्यालयात येण्याचं निमंत्रण दिलं होतं. १९८५ नंतर इतक्या वर्षानं मी पहिल्यांदाच त्या कार्यालयात गेलो होतो. ज्या कामासाठी गेलो होतो ती छायाचित्र काही मला मिळालीच नाहीत, पण महाराष्ट्राचे प्रभारी कलासंचालक म्हणून मिरवणारे हे गृहस्थ ज्या टेबलावर बसले होते त्या टेबलाखाली त्यांच्या पायाजवळ हळदणकर, गुर्जर यांच्यासारख्या नामवंत चित्रकारांची चित्र धूळ खात उभी होती. दस्तुरखुद्द महाराष्ट्राचा कलासंचालकच इतक्या मोठ्या चित्रकारांची चित्र आपल्या पायाखाली ठेऊन काम करीत असेल तर त्याच्याकडून आपण महाराष्ट्राच्या चित्रकलेचं कधी भलं होईल अशी अपेक्षा करावी का ? असा प्रश्न मला तेव्हा पडला होता.
सडवेलकर कलासंचालक पदावरून पायउतार झाले ते १९८६ साली. त्यानंतर प्रा. शांतीनाथ आरवाडे यांनी सुविहितपणे कारभार चालवला. ते सेवानिवृत्त झाले १९८९ रोजी. आणि त्यानंतर मात्र राजकारण्यांचे खेळ याही क्षेत्रात सुरु झाले. प्रा. मुरलीधर नांगरे यांची कलासंचालक पदावर नेमणूक होणं ही कलासंचालनालयाच्या इतिहासातली सर्वात दुर्दैवी घटना होती. या माणसानं कलासंचालनालय अक्षरशः धंद्याला बसवलं! काहीही करायचं त्यानं शिल्लक ठेवलं नाही. इथूनच कलासंचालनालयाच्या दुर्दशेला सुरुवात झाली. चित्रकलेच्या क्षेत्रातली चित्रातली आचरट व्यक्ती आणून कलासंचालक पदावर बसवल्यामुळे कलासंचालनालयातल्या कारकुनांचं फावलं. रसाळ यांच्यासारख्या उन्मत्त माणसाने या साऱ्याचा फायदा घेतला नसता तर नवलच ठरलं असतं.
जातीचा खोटा दाखला दाखवून या माणसानं उप कलासंचालक पद मिळवलं. आणि कला संचालक पदावर बसणाऱ्या कलाक्षेत्रातील शिक्षकांची बौद्धिक पातळी पाहून त्यानं कला संचालनालयाचा सर्व कारभार आपल्या हाती घेतला आणि कला संचालनालयाला भ्रष्टाचाराचा मेरुमणी बनवलं. युतीशासनानंतर आलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाच्या सरकारांनी या साऱ्याला जवळजवळ खतपाणीच घातलं. नंतरची नऊ वर्ष एकछत्री कारभार चालवलेल्या शिक्षणमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कालखंडात तर या विभागाचं अक्षरशः मातेरं झालं. वळसे पाटलांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कला संचालनालयात जे थैमान घातलं त्या साऱ्याचं चित्रण ‘चिन्ह’च्या ‘कालाबाजार’ अंकात मी केलं होतं. त्यामुळे त्या मजकुराची पुनरावृत्ती मी इथं करू इच्छित नाही. जिज्ञासूंसाठी सदर अंकाची पीडीएफ ‘चिन्ह’च्या वेबसाईटवर आम्ही ठेवली आहे, तिची लिंक देखील आम्ही लेखाअखेरीस दिली आहे. तिच्यावर क्लिक करून तो अंक जरूर वाचवा. अक्षरशः नावानिशीवर आम्ही साऱ्यांचे वाभाडे काढले होते.
पण कुणाचाही केस देखील वाकडा झाला नाही. कारण वरपासून खालीपर्यंत सारे जण या भ्रष्टाचारात सामील होते. १९६५ साली कलासंचालनालय स्थापन झालं. अतिशय दूरदृष्टीनं शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांनी दादा आडारकरांच्या मदतीनं या खात्याची स्थापना केली होती. महाराष्ट्रात चित्रकलेला आणि कलाशिक्षणाला उर्जितावस्था यावी म्हणून स्थापन झालेला हा भारतातला एकमेव विभाग म्हणून त्याचं महत्व अधिक होतं. इतकी वर्ष लोटल्यावर देखील अशा विभागाची स्थापना भारतातलं कुठलंही राज्य करू शकलेली नाही ही वस्तुस्थिती आहे. म्हणूनच कलासंचालनालयाचं महत्व अधिक आहे. पण त्या विभागाच्या नंतरच्या मंत्र्यांना दुर्दैवानं ते कधी कळलंच नाही. म्हणूनच आज ‘कलासंचालक देता का कुणी.. कलासंचालक..’ असं म्हणण्याची वेळ उच्च व तंत्रशिक्षण खात्यावर आली आहे. आणि या साऱ्याला जबाबदार आहे ती डॉ. अरुण टिकेकर यांनी लोकसत्तेच्या संपादक पदावर असताना दिलेली अत्यंत खोटी बातमी. या बातमीचे दुष्परिणाम कसे कसे होत गेले त्याविषयी मी सविस्तर लिहिणारच आहे. पण तूर्त इथंच थांबतो.
‘चिन्ह’चा ‘कालाबाजार’ हा २००८ साली प्रसिद्ध केलेला अंक ‘चिन्ह’नं आपल्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिला आहे. कृपया पुढील लिंकवर क्लीक करा आणि सदर अंक अगदी फुक्कट वाचा. https://chinha.in/2008_edition
सतीश नाईक
संपादक ‘चिन्ह आर्ट न्यूज‘
Related
Please login to join discussion