No products in the cart.
निसर्गात रमणारी कलाकार
पुणे येथील चित्रकार स्नेहल पागे या “इम्प्रेशनिस्ट आर्टिस्ट” म्हणून प्रसिद्ध आहेत. स्नेहल यांचे वैशिष्ट्य म्हणजे चित्रकलेची आवड आणि कौशल्य अधिक समृद्ध करण्यासाठी त्या चित्रांच्या थिमनुसार देशाच्या विविध भागात एकटीने प्रवास करतात. ट्रान्स हिमालय रांगेची चित्रे काढण्यासाठी नुकताच त्यांनी दीड महिन्याचा लेह-लडाख प्रवास केला. निसर्गाच्या सान्निध्याचा मनमुराद आनंद घेत कलासाधनेत एकतानता साधत असल्याने त्यांच्या चित्रांत निसर्गातील सौंदर्य अधिक जीवंतपणे प्रतित होताना दिसते. आपल्या देशातील कित्येक चित्रकार आजही आपल्या बंदिस्त स्टुडिओमध्येच बसून चित्र काढणे पसंत करतात. अशावेळी केवळ कलासाधनेसाठी स्त्रीने एकटीने प्रवास करणे ही आजही एक धाडसाची गोष्ट मानली जाते. एकटीने केलेल्या प्रवासात आलेल्या विविध अनुभवांमुळे त्यांच्या चित्रांमध्ये एक प्रकारची प्रगल्भता दिसून येते. त्यांची चित्रे अत्यंत आकर्षक आणि देखणी तर आहेतच पण त्याबरोबरच ती तंत्रशुद्ध देखील आहेत. चित्रकार शरद तरडे यांनी या लेखात स्नेहल पागे यांच्या चित्रांचे रसग्रहण करत त्यांचा परिचय करून दिला आहे.
***
लेखक : शरद तरडे
चित्रांमधला जिवंतपणा, रंगसंगती या गोष्टी या गोष्टींनी समृद्ध असलेले चित्र जर तुम्हाला पहायचे असेल, अनुभवायचे असेल तर तुम्हाला स्नेहल पागे यांचे चित्र पहायला आवडेल. या चित्रातलं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी प्रत्येक चित्राबाबत केलेला विचार आणि त्यांची सर्जनशीलता यांच्या संगम आपल्याला त्यांच्या प्रत्येक चित्रामध्ये दिसून येतो. हे चित्र काढण्याची पद्धत ही काही एका क्षणात किंवा काही महिने काम करून मिळालेली नाही तर त्यासाठी त्यांनी अखंड परिश्रम घेतलेले दिसतात.
आपल्याला चित्रकला शिकवताना एका शिस्तबद्ध परीघ घातलेल्या किंवा आखून दिलेल्या भागातच रंग भरणे हे शिकवले जाते आणि त्यांनी त्यांच्या चित्रांमध्ये ही मर्यादा तोडण्याचे भान दाखवले आहे हे नीट लक्षात येते.
पुण्याच्या अभिनव कॉलेज मधून त्यांनी प्राथमिक चित्रकलेचे शिक्षण घेऊन पुढे परदेशातील * Studio Incamminati, School for Contemporary Realist Art, Philadelphia, PA या कला अकॅडमी मध्ये जाऊन त्यांनी “इम्प्रेशनिस्ट पेंटर” म्हणून नाव कमावले, पण हे नाव कमावताना ज्या प्रकारे रंगसंगती, प्रकाश योजना यांचा बारकाईने अभ्यास केला, त्या गोष्टी त्यांनी आत्मसात केल्या हे चित्रांतून प्रामुख्याने दिसून येते. त्याच गोष्टींनी त्यांची चित्रे आज सर्वत्र प्रसिद्ध होत आहेत.
त्यांच्या चित्रातील मुख्य गोष्ट म्हणजे चित्रातला उजेड आणि रंग! त्यांच्यामध्ये “मी जे पाहिले अनुभवले तेच माझ्या चित्रात दिसते” ही भूमिका चित्रकारांसाठी खूप महत्त्वाची आहे असे मला वाटते. त्यांनी आत्तापर्यंत “झाड गूढ, शिशिरागम” अशी प्रदर्शने ही केलेली आहेत. ज्याच्यात त्या निसर्गाच्या,लोकांच्या जीवन,कार्यपद्धतीची दखल चित्राद्वारे घेतात, त्यातून त्या कार्याला सलाम करतात असेच वाटते.
पण मला त्यांची ओळख ही वेगळ्या रीतीने करून द्यावीशी वाटते. त्यांच्या निसर्ग चित्रांमधला विषयाचा प्रभाव बघितला तर त्यातून त्यांची वेगळा विचार करण्याची दृष्टी समोर येते. मागील महिन्यातच माझी आणि त्यांची लेहमध्ये गाठ पडली होती आणि त्याही आमच्यासारख्याच खेडोपाड्यात जाऊन त्या लोकांची जीवन, संस्कृती अनुभवत होत्या. तिथला निसर्ग आपल्यामध्ये कसा सामावून घेतला आहे याचा प्रत्यय त्यांचे चित्र बघितल्यावर मला लगेचच आला. अशी आपल्या कामासाठी तळमळ असेल तरच आपले ध्येय जवळ येतेच हे समजणारे कलाकार माझ्या बघण्यात खूपच कमी आहेत.
हे सुद्धा त्या फिरतात त्या एकट्या आणि हे एकटेपणच त्यांच्या चित्रांमधून आपल्याला मुक्तपणे जाणवते म्हणजेच चित्राशी त्या इतक्या एकरूप होतात की त्या आणि चित्र यांना आपण वेगळे करू शकत नाही. गेल्या दीड महिना त्या कश्मीर, लेह लडाख आणि जवळपासची खेडी, निसर्ग रम्य परिसर येथे फिरत आहेत आणि तेथील निसर्गाकडून ऊर्जा,प्रेम, आत्मीयता घेत आहेत हे पाहून आम्हालाही खुप छान वाटले. त्यामुळेच त्यांच्या चित्रात निसर्गातील समृद्धता दिसून येते.आपल्याही आयुष्यात असे काही करता येईल का याची प्रत्येक कलाकाराने विचार केला पाहिजे आणि त्यासाठी आपल्या जवळपासच्या निसर्गरम्य गावात जाऊन चित्रांमध्ये जीवंतपणा आणला पाहिजे .
एखाद्या चित्रकर्तीने आपल्या मनाप्रमाणे आणि आपल्याला कामाला सहाय्य होईल अशा गोष्टी कायम करत राहणे हीच गोष्ट त्यांना त्यांच्या ध्येयाकडे घेऊन जाणारी ठरेल यात काही शंका नाही. पूर्वीपासूनच मला त्यांचे काम आवडत होतेच पण आता त्या कामासाठी ज्या ज्या गोष्टी करत आहेत, स्वतःशी संवाद साधत आहेत, त्यासाठी वेळ काढत आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दलचा आदर खूप वाढला आहे. त्यांच्या या चित्र- कार्यपद्धतीला खूप शुभेच्छा!
त्यांची चित्र आपण www.snehalpage.com इथे पाहु शकता.
******
चिन्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील व्हाट्सएपवर लिंकवर क्लीक करून ग्रुप जॉईन करा. https://chat.whatsapp.com/KGQC5yb4CyR6fvFrJPGnJq
चिन्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी चिन्हचे फेसबुक पेज लाईक करा.
https://www.facebook.com/chinha.art
लेख कसा वाटला ते आम्हाला खालील कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन जरूर सांगा.
Related
Please login to join discussion