No products in the cart.
नवे अध्यक्ष या ‘व्हाईट कॉलर’ गुंडाना तुरुंगात धाडतील?
लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी आयपीएस अधिकारी रजनीश शेठ यांची निवड झाली आहे. श्री शेठ हे १९८८ च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी. कला संचालनालय आणि जे जे स्कूल ऑफ आर्टसारख्या शासकीय कला संस्थामध्ये पदभरतीच्या संदर्भात जो भ्रष्टाचार चालला आहे तो जवळजवळ १९८८ सालापासूनच चालू आहे. या भ्रष्टाचारानं आता कला संचालनालयच नाही तर जे जे स्कूल ऑफ आर्टदेखील संपवून टाकलं आहे. भविष्यात एकाही लायक माणसाची नेमणूक करता येणार नाही अशी अवस्था त्यांनी करून ठेवली आहे. म्हणूनच राजीव मिश्रा यांच्यासारख्या डचरु लोकांच्या नेमणूका इथं वारंवार होत राहतात. त्यामुळंच सातत्यानं या संस्थांमधला भ्रष्टाचार वाढत गेला आहे. आताही तेच होणार आहे. म्हणूनच ‘चिन्ह‘नं जागल्याची भूमिका अंगिकारली आहे. आमचं आवाहन आहे माननीय श्री रजनीश शेठ यांना. उच्च व तंत्रशिक्षण खातं तसेच कला संचालनालय आणि लोकसेवा आयोगातील त्यांचे ‘व्हाईट कॉलर‘ गुंड असलेले साथीदार यांना आता तेच वठणीवर आणू शकतील. अन्यथा जे जे स्कूल ऑफ आर्टचं नामोनिशाण लवकरच मिटणार आहे हे निश्चित.
जे जे स्कूल ऑफ आर्ट आणि अन्य तीन शासकीय कला महाविद्यालयातील अध्यापक – प्राध्यापकांचा गेल्या चाळीस वर्षातला बॅकलॉग भरून काढणाऱ्या ज्या जाहिराती महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे प्रकाशित होत आहेत त्यावर मी गेला आठवडाभर लेख लिहीत आहे. या माध्यमात वाचकांची वाचण्याची शब्दमर्यादा ही सुमारे ६००-७०० शब्दांचीच असल्यामुळं मी तुकड्यातुकड्यानं लिहितो आहे. एखाद्या वृत्तपत्रांसाठी जर मला लेख लिहायचा असता तर संपूर्ण पानभराचा लेख लिहून हा विषय मी सहजगत्या हातावेगळा केला असता. पण विषय चित्रकलेचा असल्यामुळं त्यात संपादकांना किती रस असणार? म्हणूनच मी ‘चिन्ह आर्ट न्यूज’ची निर्मिती केली आणि उच्च व तंत्रशिक्षण विभाग मंत्रालय त्याच्या अखत्यारीत येणारं कला संचालनालय आणि या कला संचालनालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या महाराष्ट्रातील कला महाविद्यालयामधला भ्रष्टाचार बाहेर काढण्यास सुरुवात केली.
हे लेखन किती लोकं वाचतील असा प्रश्न मला अनेकांनी विचारला. त्याला कारणंही अतिशय सबळ अशीच होती. मुख्य म्हणजे या क्षेत्रात लिखित किंवा छापील शब्दांचा फारसा व्यवहार होत नाही. कलेचा इतिहास किंवा सौन्दर्यशास्त्र असे दोन विषय इथं आहेत, नाही असं नाही. पण त्या दोन्ही विषयांची आणि ते शिकवणाऱ्याची सुरुवातीपासूनच सातत्यानं गळचेपी केली जात आहे. हे दोन्ही विषय हे सामुदायिक कॉपी करण्यासाठीच असतात असाच समज इथल्या विद्यार्थ्यांतच नव्हे शिक्षकांमध्येदेखील रूढ आहे. साहजिकच या क्षेत्रातल्या लोकांचं अवांतर वाचन हे शून्यच असतं. ज्यांना मातृभाषा मराठीतून नावपत्तादेखील लिहिता येत नाही अशी लोकं इथं प्राध्यापक आणि पीएचडीवाले डॉक्टर म्हणून मिरवतात. इतकी या क्षेत्रात भयानक अवस्था आहे. या साऱ्याची पार्श्वभूमी ‘किती लोकं वाचतील?’ असा प्रश्न मला विचारणाऱ्यांच्या मनात असावी.
पण मला सांगायला आनंद वाटतो की ‘चिन्ह आर्ट न्यूज’ आता मोठ्या प्रमाणावर वाचलं जाऊ लागलं आहे. चित्रकार, व्यावसायिक चित्रकार, कला महाविद्यालयातील प्राध्यापक-अध्यापक आणि चित्रकारेतर कर्मचारी वर्ग, प्राथमिक आणि माध्यमिक शाळातील कलाशिक्षक तसेच कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये ‘चिन्ह आर्ट न्यूज’ मोठ्या प्रमाणावर वाचलं जातं. आज कुणावर टीका केली आहे? कुठलं नवं प्रकरण बाहेर काढलं आहे? जे जे स्कूल ऑफ आर्टच्या परिसरात काय चाललं आहे? इतकंच नाही तर शासकीय कला महाविद्यालय नागपूर यांच्या परिसरात काय घडतंय? त्याचबरोबर जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये कुठली नवी प्रदर्शनं भरली आहेत? हे जाणून घेण्यासाठी ‘चिन्ह आर्ट न्यूज’चा वाचक रोजच उत्सुक असतो. ‘चिन्ह’कडून येणाऱ्या लिंक्स नियमितपणे मिळाव्यात यासाठी हा नवा वाचक वर्ग रोजच ‘चिन्ह’च्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये प्रवेश करतोय.
‘चिन्ह’च्या इंग्रजी आवृत्तीलादेखील असाच प्रतिसाद मिळू लागला आहे. तिथं केवळ महाराष्ट्रभरातूनच नव्हे तर संपूर्ण देशभरातून चित्रकार मंडळी ‘चिन्ह’शी संपर्क साधू लागली आहेत. क्वचित प्रसंगी परदेशातील कलारसिकही भारतीय कलेच्या उत्सुकतेमुळं ‘चिन्ह आर्ट न्यूज’च्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये सहभागी होऊ लागले आहेत. या सर्वांनाच घरबसल्या चित्रकलेच्या क्षेत्रात काय चाललं आहे हे जाणून घेता येत आहे. ‘चिन्ह आर्ट न्यूज’ सुरु करण्यामागे आमचाही हाच प्रमुख उद्देश होता. तो सफल होत आहे हे पाहून आनंद होतोय. गूगल अनॅलिटीक्सच्या वापरामुळे रोजच ‘चिन्ह’शी कसा वाचकवर्ग जोडला जातो आहे ते आम्हाला पाहता येतंय आणि हा अनुभव केवळ अवर्णनीय आहे.
ज्यांच्या ज्यांच्या भ्रष्टाचारावर आम्ही विशेष लेख किंवा बातम्या प्रसिद्ध केल्या त्या साऱ्याच्या साऱ्या संबंधितांनी प्रिंट करून घेऊन चौकशीसाठी ‘वर’ पाठवल्या असल्याचे कळते. त्यामुळे वरवर पाहता लागलीच काही कळत नसले तरी भविष्यात बऱ्याच बातम्या आपणास ऐकावयात मिळणार हे निश्चित. प्राध्यापक-अध्यापकांच्या लोकसेवा आयोगाकडून केल्या जाणाऱ्या पदभरती संदर्भात आम्ही ज्या ज्या बातम्या दिल्या किंवा जे लेख प्रकाशित केले त्या लेखांवर त्याच्याशी निकटच्या संबंधितांनादेखील लेखनाविरुद्ध टिपणी करता येत नाही अशी त्यांची अवस्था आहे. या साऱ्याला ‘चिन्ह’ला मिळालेली संबंधितांची दादच आहे असं आम्ही समजतो.
ही लेखमाला लिहीत असतानाच अतिशय चांगली घटना घडली आहे. १९८८ च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी रजनीश शेठ यांची राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. ही खरोखरच चांगली बातमी आहे. रजनीश शेठ यांनी आता लोकसेवा आयोगाची चांगला झाडू मारून साफसफाई करावी हेच महाराष्ट्रातल्या सुजाण नागरिकांना त्यांच्याकडून अपेक्षित आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अन्य नेमणुकांविषयी मला काहीही म्हणायचं नाही. कारण तो माझ्या अभ्यासाचा विषय नाही. पण उच्च व तंत्रशिक्षण खात्याच्या अखत्यारीत असलेल्या संपूर्ण भारतातील एकमेव अशा कला संचालनालयात आणि पर्यायानं जे जे स्कूल ऑफ आर्ट, जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट या दोन्ही महत्वाच्या संस्थांमध्ये उच्च व तंत्रशिक्षण खात्यातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी गेली पंचवीस-तीस वर्ष भ्रष्टाचाराचा जो नंगानाच घातला तो मला अगदी यच्ययावतरीत्या ठाऊक आहे. आज या तीनही संस्थांचं अक्षरशः मातेरं झालं आहे. अक्षरशः मरणपंथाला टेकल्या आहेत या संस्था. आणि आता जेजेला डिनोव्हो दर्जा जाहीर झाल्यानंतर अवघ्या २३ दिवसात प्राध्यापकांची १५० पद उच्च व तंत्रशिक्षण खात्यातल्या अधिकाऱ्यांनी लोकसेवा आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या साहाय्यानं भरावयास काढली आहेत.
ज्या अधिकाऱ्यानं पुढाकार घेऊन हे केलं तोच हा बेशरम अधिकारी जेजे आणि अन्य कला महाविद्यालयातील सुमारे दीड डझन कायम स्वरूपी अध्यापकांना भूतसंवर्गात टाकावयास निघाला आहे. कसा लावायचा या दोन्ही परस्परविरोधी निर्णयांचा अर्थ? रजनीश शेठ साहेब घालाल का यात जातीनं लक्ष? द्याल निर्णय? कराल कारवाई? आणखीन एक सांगतो तिकडे सुप्रीम कोर्टानं हाच प्रश्न संबंधित अधिकाऱ्याला विचारला तर त्यानं नंतर उत्तर देतो म्हणून वेळ मारून नेली. वर्ष झालं या गोष्टीला. गेल्या आठवड्यात सुप्रीम कोर्टानं पुन्हा या साऱ्या प्रकरणाची दखल घेतली आहे. ३० किंवा ३१ ऑक्टोबरला या प्रकरणाचा निकाल लागणारच आहे. त्या आधी हे संपूर्ण ‘व्हाईट कॉलर’ गुन्हेगारी स्वरूपाचं प्रकरण रजनीश शेठ आता कसं हाताळतात ते पाहायचं.
सतीश नाईक
संपादक ‘चिन्ह आर्ट न्यूज’
Related
Please login to join discussion