No products in the cart.
फसवणुकीचा नवा वाद ?
इंटरनेटच्या आगमनानंतर सगळीच क्षेत्रं ऑनलाईन झाली तशीच चित्र विक्रीही ऑनलाईन होऊ लागली. अनेक ऑनलाईन आर्ट गॅलरीच्या माध्यमातून चित्रकारांच्या चित्रांची विक्री सुरु झाली. कोरोनाकाळात या ऑनलाईन चित्र विक्रीला बऱ्यापैकी गती मिळाली. अनेक चित्रकार आज आपली चित्रं प्रत्यक्ष गॅलरीमध्ये तर प्रदर्शित करतातच पण ऑनलाईन गॅलरीतही ती ठेवतात. यामुळे ही चित्रं सहजपणे जगभर पोहोचू शकतात. ऑनलाईन गॅलरीचे हे फायदे असले तरी यात फसवणुकीची शक्यता नाकारता येत नाही. असाच एक फसवणुकीचा प्रकार सध्या दृश्यकला क्षेत्रात चर्चेत आहे. चित्रकार रवींद्र पाबरेकर यांनी कला व्यावसायिक आणि ‘वर्ल्ड आर्ट हब’ या गॅलरीचे मालक रवींद्र मारडिया यांच्याविरुद्ध ऑनलाईन फसवणुकीचा दावा केला आहे. काय आहे प्रकरण जाणून घेऊया या लेखातून.
चित्रकार रवींद्र पाबरेकर हे स्टोरी लिमिटेड, वर्ल्ड आर्ट हब यासारख्या ऑनलाईन आर्ट गॅलरींना आपली चित्रं प्रदर्शित करण्यासाठी देतात. काही वर्षापूर्वी त्यांनी रवींद्र मारडिया यांना आपली काही चित्रं प्रदर्शित करण्यासाठी दिली होती. त्यापैकी दोन चित्रं रवींद्र मारडिया यांनी पाबरेकरांच्या नावानेच वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवली. त्यांच्या चित्रांना या काळात चांगला प्रतिसाद मिळत होता. पण अशातच पाबरेकर यांच्या लक्षात आलं की अहमद मिकदाद नावाच्या एका चित्रकाराची तीन चित्रं रवींद्र पाबरेकर यांच्या नावाने ‘वर्ल्ड आर्ट हब’ या वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवली आहेत. हा गैरप्रकार निदर्शनास येताच त्यांनी शहानिशा करण्यासाठी आपल्याच बिल्डिंगमधल्या अब्राहम पावलोस यांना एक चित्र खरेदी करण्यास सांगितलं. त्याची रक्कमही पाबरेकर यांनीच भरली. या चित्राची किंमत 15,000/- रुपये होती आणि एक हजाराच्या खरेदीवर डिलिव्हरी फ्री असा उल्लेख असताना ऑनलाईन खरेदी करताना 17,700 रुपये शुल्क वेबसाईटकडून आकारण्यात आलं. खरेदीनंतर काही दिवसांनी ते पेंटिंग पावलोस यांना कुरिअरने मिळाले. ते चित्र पाबरेकर यांनी आपल्याकडं आणलं. कुरिअरने आलेल्या या पेंटिंगच्या मागे अहमद मिकदाद यांचे नाव, दोन फोन नंबर व एक ईमेल आयडी लिहिला असल्याचे पाबरेकर यांच्या निर्दशनास आले. पण ‘वर्ल्ड आर्ट हब’ या वेबसाईटवर नमूद केल्याप्रमाणे या पेंटिंगचे ऑथेंटीसिटी सर्टिफिकेट मिळालं नव्हतं. आता हा सर्व प्रकार प्रत्यक्ष पाहिल्यानंतर पाबरेकर यांनी माटुंगा पोलिस स्टेशन येथे सर्व पुराव्यासहित फसवणुकीची लेखी तक्रार 11 ऑगस्ट 22 रोजी केली.
पाबरेकर यांच्या मते पोलिसांनी ही तक्रार दिल्यानंतर वर्ष उलटून गेल्यानंतरही अपेक्षित कारवाई या प्रकरणात केलेली नाही. त्यामुळे पाबरेकर यांनी हे प्रकरण नेटानं लावून धरलं आहे. पाबरेकर पुढे सांगतात की, “पोलिसांनी अहमद मिकदाद ही व्यक्ती कोण आहे? तिचा छडा लावणं गरजेचं होतं. तसंच या व्यक्तीला चौकशीसाठी बोलावणंही गरजेचं होतं कारण माझ्या नावाचा गैरवापर करून ही चित्रं ऑनलाईन विकली जात आहेत.” या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी पाबरेकर यांनी रवींद्र मारडिया यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली अशी माहिती पाबरेकर दिली. “आता ते माझा फोनही उचलत नाहीत” असे पाबरेकर सांगतात. त्यामुळे होणाऱ्या मनस्तापाबद्दल पाबरेकर यांनी रवींद्र मारडिया आणि अहमद मिकदाद यांना 20 लाखांची अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस, वकील श्री ए.जी.पंडित यांच्या मार्फत पाठवली आहे.
या सर्व प्रकरणावर रवींद्र मारडिया यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता त्यांनी उत्तर दिलं की, “हा सर्व प्रकार अनवधानाने झालेला आहे. मी गेली अनेक वर्ष चित्र खरेदी विक्रीच्या व्यवसायात आहे. अनेक चित्रकारांना मी पुढे येण्यास मदतच केली आहे. पाबरेकरांच्या बाबतीत जे झालं ते नजरचुकीनं झालेलं आहे. आम्ही वेबसाईट तयार करण्याचं काम डेव्हलपरला दिलं होतं. त्यामुळे चित्रासोबत जे तपशील दिले जातात ते देताना डेव्हलपरने नजरचुकीने मिकदाद यांच्या जागी पाबरेकरांचे नाव टाकले होते. या सर्व प्रकाराबद्दल मी दिलगीर आहे. आणि त्यामुळे मी पाबरेकरांना काही दिवसापूर्वी नुकसान भरपाई देण्याबद्दल बोललोही होतो पण त्यांनी थेट माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे.”
‘चिन्ह’ची भूमिका
चित्रकलेच्या क्षेत्रात असे प्रकार घडणे दुर्दैवी आहे. अनेक चित्रकार आयुष्यभर चित्रसाधना करतात. त्यानंतर कुठे त्यांना स्वतःची शैली गवसते आणि रसिक त्यांच्या कलाकृतींना सकारात्मक प्रतिसाद देऊ लागतात. चित्रकाराचं नावही होऊ लागतं. पण जेव्हा भलत्याच चित्रकाराचं चित्र आपल्या नावानं विकलं जातं, असं चित्रकाराच्या निर्दर्शनास येतं तेव्हा त्याला प्रचंड मनस्ताप होतो. अशा वेळी गॅलरी मालकाने तात्काळ प्रतिसाद देऊन ती चित्रं वेबसाइटवरून काढून टाकणं किंवा जाहीर माफी मागणं अपेक्षित आहे. असं जर होत नसेल तर संशयाची सुई निश्चितच गॅलरी मालकाकडे वळते.
या प्रकरणावर लवकरात लवकर तोडगा निघणं अपेक्षित आहे. कारण कोरोनामुळे दृश्यकला क्षेत्राचं अतोनात नुकसान झालं आहे. आणि अशा दुर्दैवी घटनांमुळे या नुकसानीत अजूनच भर पडते. अशा घटना जर वारंवार घडू लागल्या तर चित्रकार आपली चित्रं ऑनलाईन विक्री करण्यास कचरतीलच, पण खरेदीदारही ऑनलाईन चित्र विकत घेणं टाळतील. या प्रकरणात कोण बरोबर कोण चूक याचं उत्तर पुढील पोलीस कारवाई नंतरच कळेल. पण बाजू कुठलीही बरोबर असली तरी चित्रकलेचा पराभव होईल हे निश्चित. त्यामुळे आम्हाला तरी असं वाटत की नफ्या तोट्याचा तात्कालिक विचार न करता चित्रकार, गॅलरी मालक, सर्व ऑनलाईन आणि ऑफलाईन चित्रं विक्रेते यांनी कलेच्या हितासाठी समन्वयानं काम करणं गरजेचं आहे.
****
कनक वाईकर
चिन्ह आर्ट न्यूज
Related
Please login to join discussion