‘चिन्ह’च्या सर्व वाचक , चाहते , हितचिंतक आणि हितचिंतक साऱ्यांनाच दिवाळी आणि नव्या वर्षांच्या अगदी खूप खूप शुभेच्छा !
‘ गच्चीवरील गप्पा ‘च्या शंभराव्या कार्यक्रमानंतर घेतलेली विश्रांती आता संपत आली आहे . अर्थात त्या आधीच आम्ही ‘ बीएफएनंतर काय ?’ हा नवा कार्यक्रम सुरु केलाच तो भाग वेगळाच. याही कार्यक्रमाला मिळणारा प्रतिसाद हा आम्हाला चकरावून टाकणारा ठरला आहे. या कार्यक्रमामुळे उपयोजित क्षेत्रातील देखील असंख्य तरुण कलावंत ‘चिन्ह’सोबत जोडले जात आहेत .

आता लवकरच म्हणजे पुढल्या आठवड्यापासून आम्ही ‘ पॅलेट ‘ नावाचा नवा कोरा कार्यक्रम घेऊन येत आहोत. हाही कार्यक्रम दर आठवड्यालाच सादर होणार आहे . पण तो लाईव्ह मात्र नसणार आहे. रेकॉर्डेड असणार आहे . दर बुधवारी सायंकाळी ७ वाजता प्रत्येक व्हिडिओचा प्रीमियर सादर होईल. याही कार्यक्रमात ज्यांच्याकडे काही तरी सांगण्यासारखं आहे असे कलावंत आपल्या भेटीला येणार आहेत . या कलावंताची निवड अर्थातच तात्कालिक घडामोडींवर अवलंबुन असेल हे वेगळं सांगायची गरज आहे का ? वाहिन्या किंवा छापील माध्यमं अथवा समाज माध्यमांवर चर्चेत असणाऱ्या कलावंतानाच प्रामुख्यानं या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं जाणार आहे .

अगदी ताजं उदाहरण म्हणजे . ९० च्या दशकात जेजेत शिकत असताना एका विद्यार्थ्यानं रंगवलेल्या एका पारितोषिक विजेत्या भल्या मोठया तैलरंग चित्राची जेजेच्या व्यवस्थापनानं निष्काळजीपणानं कशी वाट लावली त्याची बातमी आम्ही गेल्याच आठवड्यात ‘chinha art news’ मध्ये दिली होती. ती बातमी अतिशय गाजली. इतकी की कधी नव्हे ते आपला बथ्थडपणा सोडून जेजेच्या तथाकथित अधिकाऱ्यांना त्याची दखल घ्यावी लागली. ज्यांचं ते पेंटींग होतं ते चित्रकार संतोष मोरे आता दुबईत असतात. बातमी प्रसिद्ध होताच त्यांनी आमच्याशी संपर्क साधला. विलक्षण दुखावले होते ते.

ते सांगत होते ‘ दोन वर्षांपूर्वी आई गेली पण तेव्हा देखील रडलो नव्हतो तेव्हडा त्या माझ्या आवडत्या पेंटींगची आताची अवस्था पाहून रडलो. जेजेतलं सर्वात मानाचं समजलं जाणारं डॉली कर्सेटजी अवॉर्ड मिळालं होतं मला त्या पेंटींगच्या वेळी . त्यातलं एक कुठं गेलं ते मला कधी कळलंच नाही. आणि दुसऱ्याची ही अशी अवस्था करुन टाकली या लोकांनी’. अतिशय व्यथित झाले होते ते सारं सांगताना .ते ऐकतानाच या कार्यक्रमाची कल्पना मनात आली आणि पुढल्या आठवड्यातच तो कार्यक्रम निश्चित देखील झाला .
तर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आपण भेटतोय चित्रकार संतोष मोरे यांना , तर दुसऱ्या आठवड्यात आपण भेटणार आहोत आंबेडकरी चळवळ आणि दलित पँथरचे एक प्रमुख कार्यकर्ते अरुण कांबळे यांचे सख्खे बंधू , दादरच्या छबिलदास हायस्कूलचे माजी प्राचार्य आणि आमच्या जेजे स्कूलचे माजी विद्यार्थी चंदू उर्फ चंद्रकांत कांबळे यांना. निमित्त आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या प्रदेश सचिवपदी त्यांची झालेली निवड.
आणखी बरंच काही ‘ चिन्ह ‘ २०२३ आणि २०२४ या वर्षात करणार आहे , पण त्याविषयी पुन्हा केव्हा तरी !
****
– सतीश नाईक,
मुख्य संपादक
chinha.in