Features

नव्या तंत्रज्ञानानं कलाकृती टिकवता येतात !

गेल्या काही वर्षात तंत्रज्ञानाचा दर्जाच मुसंडी मारली आहे. त्याला कलाक्षेत्रही अपवाद नाही. हाताने केलेल्या कामाची गोडी मशीनच्या कामाला नसली तरी या तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक सकारात्मक बदल करता येतात. थ्री – डी प्रिंटिंग तंत्रज्ञान तंत्रज्ञानाने मात्र आमूलाग्र बदल केले आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर कलाकार आपल्या सोयी करू शकतात याची माहिती या लेखातून शिल्पकार जयदीप यांनी दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे हातचंच काम अमूल्य असलं तरी कलाकृती टिकवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा स्मार्ट वापर करू शकतो. तो करू पाहत नाही हे कलाकार निवडून घेणार आहे.

आमची पिढी म्हणजे बदलाच्या घोड्यावर नाही तर रॉकेटवर आरूढ झालेली पिढी आहे, गेल्या 30 वर्षात ज्या गतीनं  तंत्रज्ञानातले बदल आम्ही अनुभवले आहेत ते थक्क करणारे आहेत. सगळ्याच क्षेत्रात असे बदल झाले असले तरी आत्ता आपण कलाक्षेत्र आणि त्यातून शिल्पकला याबद्दल थोडं बोलूया.

जगात सगळीकडे दगड, धातू, लाकूड, इ. विविध माध्यमांमध्ये अनेक शिल्पाकृती घडवल्या गेल्या आहेत. शिल्पकला / मूर्तिकला म्हटलं की कलाकाराचे हात आणि त्यामागचा विचार या गोष्टी अपरिहार्य आहेत, जवळपास 90 टक्के कामं करताना कलाकारांचे हात वापरले जातात. या क्षेत्रात तंत्रज्ञानाची मदत फार कमी होत होती. पण आता तो काळ हळूहळू बदलतोय आणि या बदलांकडे सजगपणे, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून बघणं ही काळाची गरज आहे.

ज्या गोष्टीचा आणि हातातल्या कलेचा अतूट संबंध आहे तिथं तंत्रज्ञानाचा वापर नेमका कसा करणार ? मी माध्यमांच्या वापराबद्दल बोलत नाही तर प्रत्यक्ष शिल्प निर्मितीबद्दल बोलतोय. संगणकावर शिल्पनिर्मिती ?, होय शक्य आहे. कागदावर झेरॉक्स, प्रिंट करतो तसं  त्रिमिती असलेल्या शिल्पाची प्रिंट करणं ( थ्री – डी प्रिंट ) ? हो शक्य आहे. अरे बापरे !! म्हणजे आता या क्षेत्रात सुद्धा सगळं काम संगणकावर होणार !? म्हणजे आता कलाकारांचं कसं होणार ?? किंवा काही झालं तरी खरी शिल्पकला म्हणजे कलाकाराच्या हातातून घडणारं शिल्प हीच खरी कला बाकी सगळ्या गोष्टी खोट्या. पण हे दोन्ही विचार अर्धसत्य आहेत. ही अशी मानसिकता घेऊन आपण तंत्रज्ञानाचा स्वीकार करूच शकत नाही. शस्त्रानं  वार पण होतो आणि संरक्षण पण होते, आपण त्याचा वापर कोणत्या विचारानं करतो त्यावर सगळं अवलंबून आहे.

दुर्दैवाने आपल्याकडे जे लोक कलाक्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्याकडे नवीन तंत्रज्ञानाची माहिती कमी आहे, आणि ज्यांच्याकडे तंत्रज्ञान आहे त्यांना कलेबद्दल माहिती कमी आहे. नवीन तंत्रज्ञानाबद्दलची माहिती हळूहळू पसरत आहे. पण ही माहिती कला महाविद्यालयातील शिक्षण पूर्ण करून, त्या शिल्पकारानं स्वतंत्र काम करायला सुरुवात केल्यावरच त्याला मिळायला लागते. त्याऐवजी सुरवातीपासून अभ्यासक्रमातूनच ही माहिती सांगितली गेली तर हे तंत्र ज्यांच्याकडे आहे, त्यांच्याशी शिल्पकारांचा नीट समन्वय साधता येऊ शकतो.

डिजिटल मॉडेलिंग, थ्री – डी प्रिंटिंग, थ्री – डी स्कॅनिंग यासारखी तंत्रज्ञानाची नवीन दारं  उघडत असताना त्याच्याकडे पाठ फिरवणं चुकीचं आहे. पारंपारिक शिल्पकला आणि तंत्रज्ञान यांचा समन्वय साधला जाणं खूप महत्त्वाचं आहे. संगणकावर शिल्पनिर्मिती हे शक्य असलं तरी, पेंटिंग करताना येणारे ब्रशचे स्ट्रोक, रंगाचा आणि कॅनव्हास किंवा कागदाचा एकत्रित परिणाम याचं जसं महत्व असतं तसंच शिल्प घडताना मातीकामात येणारा नैसर्गिक पोत (texture), लावला जाणारा प्रत्येक पॅच, कोरण्यांचा स्ट्रोक याचं महत्व असतं. जे संगणकावर पूर्ण शिल्प तयार करताना करणं अवघड जातं, किंवा केलं तरी ते अनैसर्गिक, कृत्रिम वाटतं. त्यामुळे हातानी केलेल्या शिल्पाचं सौंदर्य वेगळचं असतं.

अशा कलाकृती कलाकाराच्या हातून एकदाच घडतात, तशीच्या तशी कलाकृती पुन्हा घडवणं जवळजवळ अशक्य आहे. अशा वेळी थ्री – डी स्कॅनिंग वरदान वाटायला लागतं. बरेचदा अशा झालेल्या कलाकृतीचा साचा किंवा त्याची आणखी एखादी प्रत काढून कलाकार आपल्याकडे ठेवतो सुद्धा. पण पुन्हा त्या काढलेल्या कलाकृतीला ठेवायला जागा लागते, त्याची देखभाल करावी लागते. अगदी खर्चाच्या दृष्टीनं साचा बनवून प्रत काढून ठेवण्या ऐवढ्या पैशात किंवा थोड्याफार जास्त पैशात जर तीच कलाकृती डिजिटल स्वरूपात ठेवता आली तर कितीतरी फायदा आहे. थ्री – डी स्कॅनिंग तंत्रज्ञानानं आपल्याला तीच कलाकृती परत कायमस्वरुपी डिजिटल स्वरूपात ठेवता येते, आणि नंतर गरजेनुसार वेगवेगळ्या आकारात प्रिंट करता येते. यात मूळ मातीकाम केलेल्या शिल्पातील सगळे बारकावे, शिल्पातील भाव, पोत अगदी ९५% जसेच्या तसे प्रिंटमध्ये येतात, हे विशेष.

पूर्वीच्या काळात कलाकारांनी केलेल्या शिल्पांचा साचा ठेवला जात असे. पण काळाच्या ओघात साचा आहे तसा टिकवणं कठीण असतं, त्या साच्यामधून परत शिल्प निर्मिती करताना मूळ कलाकृतीला इजा होण्याची शक्यता असते, या ऐवजी जर तीच शिल्पं स्कॅनिंग करून ठेवली तर किती फायद्याचं ठरेल याचा शिल्पकारांनी सकारात्मक विचार करणं खूप आवश्यक आहे.‌

पूर्वीच्या काळात कलाकारांनी केलेल्या शिल्पांचा साचा ठेवला जात असे. पण काळाच्या ओघात साचा आहे तसा टिकवणं कठीण असतं, त्या साच्यामधून परत शिल्प निर्मिती करताना मूळ कलाकृतीला इजा होण्याची शक्यता असते, या ऐवजी जर तीच शिल्पं स्कॅनिंग करून ठेवली तर किती फायद्याचं ठरेल याचा शिल्पकारांनी सकारात्मक विचार करणं खूप आवश्यक आहे.‌

मी स्वतंत्र काम सुरू केलं तेव्हा प्रत्येक कामातल्या मोबदल्यातून काही रक्कम नवीन मशीन, साहित्य यावर खर्च करत होतो. आता तसाच खर्च या तंत्रज्ञानावर करतोय, घडणारं प्रत्येक शिल्प स्कॅन करून ठेवायला सुरवात केली आहे. या स्कॅनिंगचा आणखीन एक होणारा फायदा म्हणजे अगदी लहान काम करायचं असेल, साधारण 3 – 4 इंचाचं तर ते प्रत्यक्ष करणं शक्य असलं तरी गैरसोयीचं होतं. अशा वेळी तेच काम सहजपणे करता येईल अशा थोड्या मोठ्या मापात करून थ्री – डी स्कॅन करून ते लहान करता येतं. किंवा 6 – 7 फुटांचं शिल्प करायचं असेल तरी त्याचं लहान मॉडेल करून ते मोठं करता येत. काही वेळा असंही होत की शिल्पामध्ये काही तांत्रिक भाग अत्यंत नेमकेपणाने करावे लागतात ( उदा. बंदूक, चाक, मशीन यांचे भाग ). हे करताना हातानं जेवढा सुबकपणा आणला जातो त्यापेक्षा जास्त सुबकपणा आणि अचूकता थ्री – डी प्रिंटच्या साहाय्यानं आणता येते.

******
– जयदीप आपटे
लेखक हे शिल्पकार आहेत.

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.