Features

योनी स्टुडियोची ‘न्यूड कार्यशाळा’ !

मंदिरांची किंवा सनातन्याची अथवा पारंपरिकतेचा पगडा असणार्‍याची नगरी नाशिक. अशा या नाशिकच्या कला इतिहासात पहिल्यांदाच अतिशय अभूतपूर्व अशी घटना घडली…! योनी स्टुडियोच्या तीन धाडसी आर्किटेक्ट तरुणींनी नाशिकमध्ये प्रथमच अनावृत्त लाईफ चित्रण कार्यशाळा आयोजित केली आणि ती यशस्वीही करुन दाखवली..! नाशिकहून के. नील यांनी पाठवलेला हा वृत्तांत. 

यामध्ये वेगळं काय केलं असं तुम्ही म्हणाल…? बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड विद्यापीठातील ललित कला विभागात देवी देवतांच्या चित्रांची तथाकथित विटंबना (?) केली म्हणून काही गुंड प्रवृत्तीच्या तथाकथित संस्कृती रक्षकांनी केलेला गोंधळ आणि हिंसेची घटना तसेच पुण्यातील अक्षय माळी या तरुण आणि मनस्वी छायाचित्रकाराचं बालगंधर्वला लागलेलं अनावृत्त फोटोंचं प्रदर्शन बंद करुन सर्व कलाकृती उलट्या करायला लावणाऱ्या आणि त्याला धमकी देण्याच्या घटना देखील ताज्या असताना नाशिकसारख्या नगरीत तेही पंचवटीसारख्या मंदिरांच्या, धार्मिक पगडा असणार्‍यांच्या वस्तीत पूर्ण अनावृत्त व्यक्तीचित्रण कार्यशाळा घेऊन ती यशस्वी करण्याचे धाडस नक्कीच आव्हानात्मक होते.

कुणीही संस्कृतीच्या नावाखाली इथं येऊन आक्षेप नोंदवू शकला असता. अशा बाजार बुणग्यांची आणि कलेपासून शेकडो योजने दूर असलेल्या तथाकथित संस्कृती रक्षकांची देशात कमी नाही. या लोकांना कलेचं ज्ञान तसूभरही नसतं. तरीही नको तिथं संस्कृती, धर्म, आस्मिता अशा शब्दांना पुढं करीत कलाकारांनी कसा संस्कृतीला धक्का लावला आहे, हे सांगणारे दीड शहाणे आपल्याकडे कमी नाहीत..! अशा वातावरणात अनेक धोके असताना अत्यंत नियोजनबद्धरित्या गोदानगरीत अनावृत्त लाईफ चित्रण ही दोन दिवसाची कार्यशाळा विनासायास पार पडली. हे नक्कीच कौतुकास्पद…! एका नव्या अनवट वाटेला किंवा कलाप्रवासाला नक्कीच सुरुवात झालीये. एक इतिहास लिहिला गेलाय…!

इथे कॅ. डब्ल्यू. जे. सॉलोमन यांची आठवण येत आहे. लंडनच्या रॉयल अकादमीत शिकून आणि चित्रकलेत सुवर्णपदक मिळवून ते भारतात जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये आले. त्यांनी भारतात पहिल्यांदाच अनावृत्त स्त्री-पुरुष लाईफ मॉडेल समोर बसवून चित्रांकन, शिल्पांकन करण्याचा धाडसी निर्णय घेतला. सॉलोमन हे चित्रकर्मी खरंच आदर्श ठरतात कारण १९१९ साली त्यांनी भारतात न्यूड लाईफ चित्रांकनाला सुरुवात केली. त्यानंतर १०३ वर्षांनंतर नाशिकमध्ये पहिली कार्यशाळा योनी स्टुडिओमध्ये पार पडली. हे सर्व घडायला १०३ वर्ष जावी लागली. मात्र आजही कलेतील अनावृत्ततेकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन १०० वर्षांपूर्वी जसा होता तसाच आहे

असं जर नसतं तर ही कार्यशाळा विनासायास यशस्वी करण्यासाठी इतका ताण योनी स्टुडिओच्या प्रज्ञा, पल्लवी आणि हर्षदा या आर्किटेक्ट तरुणींवर आला नसता. चित्रकर्मी सोडून इतरांना या जागेची कल्पनाही येऊ नये म्हणून त्यांना कमालीची गोपनीयता बाळगावी लागली नसती. जाहीर पोस्टर किंवा बॅनरही त्यांना याच कारणांनी लावता आलं नाही. हे किती दुर्देवी आहे ना..?

आज इंटरनेटमुळे सामाजिक माध्यमं तसंच चित्रपट, वेबसिरीज, जाहिरातपटांतून प्रचंड नग्नता आपल्यावर आदळते आहे. इच्छा असो वा नसो नग्नतेचं अनाहूत दर्शन सर्वांनाच रोज घडतं आहे. अशा काळात कलेतील नग्नता जी स्वच्छ, पवित्र आहे ती कलाकारांच्या कुंचल्यातून अभिव्यक्त होणार असते. तरीही आजच्या मॉडर्न काळात आयोजकांना इतकी काळजी घ्यावी लागावी हे सांस्कृतिक दारिद्रय नव्हे काय… ? कलेतील नग्नतेत अनैतिकता नाही, स्पर्श नाही, व्यभिचार नाही, लज्जा वाटावी असं कृत्य नाही.. तरीही या अभिजात, अभिरूची संपन्न कृतीला अश्‍लील का ठरवलं जातं ? सारेच जण कलेतील नग्नतेला का घाबरत आहेत ? हे कर्मकरंटे कशासाठी विरोध करताहेत ? त्यासाठी अशी कार्यशाळा नाशिकमध्ये येण्यास १०० वर्ष लागतात हे विलक्षण दुर्भाग्यपूर्ण आहे. आणि म्हणूनच या सार्‍या पार्श्‍वभूमीवर योनी स्टुडिओनं आयोजित केेलेला हा उपक्रम नक्कीच स्तुत्य ठरतो यात शंकाच नाही. यासाठी महत्वपूर्ण योगदान देणारे सुलेखनकार नंदू गवांदे यांचंही तितकंच कौतुक करावंसं वाटतं. त्यांनी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी हा इतिहासात नोंद होणारा उपक्रम यशस्वी करून दाखवला.

कलेचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा योनी स्टुडिओनं आयोजित केलेला हा धाडसी उपक्रम नक्कीच सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल. या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व चित्रकारांचं अभिनंदन आणि कौतुक….! यानंतर असे उपक्रम नेहमीच घेतले जातील, अशी ग्वाही याप्रसंगी प्रज्ञा बैरागी आणि त्यांच्या टिमनं दिली. या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी के. के. वाघ कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि ज्येष्ठ चित्रकार श्री. बाळ नगरकर यांनी उपस्थित राहून उपक्रमाचं कौतुक केलं.

उपक्रमात महिला लाईफ मॉडेल म्हणून लाभलेल्या पूनिता अम्मा (नायडू) यांचंही योगदान खूप मोठं आणि न विसरता येणारं आहे. त्यांना या ऐतिहासिक क्षणांचं भागीदार होण्याचं भाग्य लाभलं….! पुनिता अम्मा तुमचे हे योगदान आणि समर्पित भाव नाशिककर कलाकार कधीही विसरणार नाहीत.. एकाच कार्यशाळेत एक स्त्री आणि पुरुष लाईफ मॉडेलच्या देहावरुन जिवंत चित्रांकन विद्यार्थ्यांना करता आलं. त्यांचं शरीरशास्त्र, तत्वेचा पोत (टोन) अस्थी रचना, उभं राहण्याची लय (रिदम), प्रकाश-छाया यांचा अभ्यास करता आला. यामध्ये सहभागी झालेले कलाध्यापक रविंद्र दंडगव्हाळ, प्रविण खोटरे, ऋषिकेश भंडारे यांच्यासारख्या कलावंतांना कलेतून नवीन प्रयोग करता आले यात शंकाच नाही.

योनी हा शब्द उच्चारायला आजही अनेक जण कचरतात. तिथे प्रज्ञा, पल्लवी आणि हर्षदा या तरुणींनी आपल्या कला स्टुडियोचं नावही विलक्षण वेगळं ठेवलं आहे. ‘योनी’ नवनिर्मितीचं आणि सर्जनाचं प्रतीक असतं. त्याद्वारे आईच्या उदरातून नवीन जीव जन्म घेत असतात. भारतीय संस्कृतीत महादेवाची पिंड म्हणजे शिवलिंग आणि त्याच्या भवतीचा भाग म्हणजे पार्वतीचं रूप, हे योनीचं प्रतीक म्हटलं जातं. योनी आणि लिंगांच्या रूपाचं उदात्तीकरण करुन त्याला महादेव म्हटलं जातं. ८४ लक्ष योनी असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा अनेक जीव – रुपातून मानव जन्म लाभतो. त्यातील एक योनी मानव असं म्हटलं जातं. त्या अर्थानं सर्जनाचं प्रतीक ‘योनी’ हे नावही या ग्रुपनं अगदी समर्पकच ठेवलं आहे.

प्रज्ञा, पल्लवी आणि हर्षदा तुमच्यातील एका मैत्रिणीचं अडनाव वॉरियर आहे… खरंच तुम्ही तिघी मैत्रिणी कलेच्या क्षेत्रात अनवट वाटा निर्माण करणार्‍या  वॉरियर – योद्धाच आहात…! तुमच्या पुढील उपक्रमासाठी खूप शुभेच्छा….!

के. नील
नाशिक

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.