No products in the cart.
नग्नता, शिल्प आणि काव्य…
प्रख्यात कवी बा. भ. बोरकर यांचा वारसा डॉ. घनश्याम बोरकर यांच्याकडे आला आहे. नाट्य, चित्रपट, संगीत, साहित्य, चित्रकला आदी कलांच्या क्षेत्रात ज्यांचा मुक्त पायरव आहे अशा डॉ. बोरकर यांनी अलीकडच्याच काळात प्रख्यात शिल्पकार सुनील देवरे यांची नग्न शिल्पे पाहून काही कविता केल्या होत्या. त्यातील काही शिल्पांच्या छायाचित्रांसह इथं देत आहोत.
लेखक : डॉ. घनश्याम बोरकर
अश्लीलता हा कोणत्याही लेखाचा,
चित्राचा किंवा इतर
वस्तूचा गुण नसून,
तो फक्त तसा
आरोप करणाऱ्याच्या
मनाचा गुण आहे.
– डॉ. हॅवलॉक एलिस
प्रिय रसिक मित्र-मैत्रिणीनो,
मागच्या वर्षी कोरोनाची पहिली लाट ओसरायाला लागली होती. दुसऱ्या लाटेच्या अफवेने जो धरला नव्हता आणि एके दिवशी सकाळी सुनीलचा अचानक फोन आला.
सुनील म्हणजे सुनील देवरे, एक प्रतिभावंत शिल्पकार. आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्याच्या शिल्पांची प्रदर्शने भरवली गेली आहेत, ज्याच्या शिल्पांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत असा माझा जवळचा मित्र.
सुनील म्हणाला, “डॉक्टर, पुढचे तीन दिवस माझ्या स्टुडियोत या ! ‘नग्नता’ या विषयावर मी काही शिल्पं करणार आहे. न्यूड मॉडेल्स असणार आहेत. तुम्हाला खूप आवडेल. काही कारणे सांगू नका. नक्की या !
“मला नक्की काय आवडेल, असे याला म्हणायचे आहे, हे मला पटकन समजेना. पण प्रत्यक्ष मॉडेलला समोर ठेवून शिल्प साकार होताना माझ्या कलासक्त मनाला आनंद मिळेल असेच त्याला अभिप्रेत असावे, असे म्हणून मी माझ्या मनाचे समाधान केले. मी त्याला म्हटले “अरे, पुढचा आठवडाभर मी माझ्या फॅक्टरीच्या कामात व्यस्त आहे. पुढच्या वेळी जरा अगोदर कळव, मी नक्की येईन.” त्यानंतर, दोन एक महिन्यांनी, मला सुनीलच्या स्टुडियोत जायचा योग आला. तीन चार न्यूड क्ले मॉडेल्स तयार होत आली होती.
सुनील त्याच्या कामात व्यग्र होता. मी जवळ जवळ ३ ते ४ तास, सुनीलची ती शिल्प न्याहाळत बसलो होतो आणि त्याच्या स्टुडियोतच मला त्या शिल्पांवर तीन कविता स्फुरल्या. सुनीलने आणखी काही नग्न शिल्पांचे फोटो मला दोन महिन्यांनी पाठवले ते फोटो पाहून, पुन्हा मला काही कविता स्फुरल्या. सुनीलला जेव्हा मी या कविता वाचून दाखवल्या, तेव्हा तो म्हणाला, “डॉक्टर, तुमच्या कविता मला खूप आवडल्या. मला जे शिल्पात सांगायचे आहे त्यापेक्षा काही थोड्या वेगळ्या आहेत. काही मला अभिप्रेत अर्थ सांगणाऱ्या आहेत तर काही माझ्या शिल्पांना कधी अधिक गूढ, अधिक श्रुंगारिक तर कधी अध्यात्मिक अर्थ देणाऱ्या आहेत. आपण माझी शिल्पं आणि त्यावरची तुमची कविता, असे पुस्तक काढूया का ?”
पण ते तसेच राहून गेले. सुनील त्याच्या व्यावसायिक कामात आणि मी माझ्या कामात व्यस्त झालो. मागच्या वर्षीच्या त्या कविता, आज अचानक सापडल्या. त्याच तुमच्या भेटीला घेऊन येत आहे. नग्नता हा विषय, आपल्या समाजात उघडपणे बोलला जात नाही. पण माणसाच्या आदिम नग्नतेतील सौंदर्य हे अनेक प्रतिभावंत चित्रकार, शिल्पकार यांच्या कलेची प्रेरणा आहे.
“नग्नता पाहताना किंवा अनुभवताना, तुमच्या डोळ्यासमोर उमलणाऱ्या चित्रांची किंवा स्वप्नांची प्रत, ही तुमच्या चित्ताच्या उन्नयनावर अवलंबून असते.
नग्नतेत सौंदर्य आहे, काम आहे, श्रुंगार आहे, सृजन आहे.
नग्नतेचे स्वत:चे असे एक भावविश्व आहे, स्वतःची अशी एक सुंदर देहबोली आहे, स्वतःची अशी यंत्रशक्ती, तंत्रशक्ती आणि मंत्रशक्ती आहे.
“पाहू दे मेघांहून डोळा, सौंदर्य तुझे मोकळे ” अशी हि आदिम, निरागस निर्मळ नग्नता.
कलंकित,पूर्वग्रहदुषित नजरेनं न पाहता, जर तुम्ही रसिकांनी निर्भेळ, निरामय आणि निर्विकार दृष्टीनं ही शिल्पं पाहिली आणि त्यावरील कवितांचा आस्वाद घेतलात तर तुम्हाला नग्नतेतील अनुपम सौंदर्य, लावण्य, सृजनत्व, पावित्र्य आणि मांगल्य नक्कीच जाणवेल.
मला ही शिल्पे जशी भावली, जशी उमजली तशी माझ्या स्फुरलेल्या कवितेत ती उमटली आहेत. तुम्हाला शिल्पं आणि कविता दोन्ही आवडतील, अशी आशा करतो.
दर्पण
होवोनी नग्नविभोर
दर्पणास मी सामोरी
पेटती मी यौवन ज्वाला
दर्पणात कांचनगौरी
आंबाडा माथी झेलत
ते कोन दोन हातांचे
आकार दिसे अवकाशी
त्या त्रिकोणगा योनींचे
गात्री मम पाहत होते
मी प्रमत्ततेची नाती
नेत्रात उमलल्या माझ्या
ह्या स्वयंलुब्धता ज्योती
रेखीव नासिका माझी
सार्थक करिते रूपाचे
रंध्रात श्वास ती घेते
माझ्याच रूपगंधाचे
हे अनाघ्रात मम ओठ
किंचित गुलाबी झाले,
मदनाचा आठव येता
ते स्वत:च उमलून आले
वक्षावर गोलत्रिकोणी
ते संगमर्मरी गाणे
गर्वाने स्फुरती, झुलती
हे उरोज उन्मादाने
किती वळणांचा हा देह,
मी स्वतःच हरवून जाते,
मादक त्या सौंदर्यात
मी धुंद होऊनी न्हाते
कनकांगी, कृश कटि ही
नि घुमट गोल ही श्रोणी
कर्दळीस्तंभ पायात
अन रतिध्वज गौर त्रिकोणी
हे रूप कुणाचे माझे ?
मातीतिल सौंदर्याचे ?
शृंगाराचे ? स्खलनाचे?
गर्भातील नवसृजनाचे ?
दर्पणा सारिता दूर,
प्रतिबिंब हरवले माझे,
शोधिते स्पर्शूनि देहा,
बिंबाशी नाते माझे.
शोधिते स्पर्शूनि देहा,
बिंबाशी नाते माझे.
मज रूप न दिसते माझे
तरी अजून ही “मी” आहे,
हें “अरूप” माझे बघते,
ते रूप कुणाचे आहे?
मग पुन्हा पाहण्या मजला,
दर्पणापुढे मी आले,
आरशात कुणी ही नाही,
मी विस्मित, स्तंभित झाले
ते उरोज, नितंब, चेहरा
वाऱ्यावर विरले होते,
कटि, योनिचे सौंदर्य
पाऱ्यातच खिरले होते.
कटि, योनिचे सौंदर्य
पाऱ्यातच खिरले होते.
तो दर्पण झाला मी का?
का मी ही दर्पण आहे?
दर्पणा समोरि दर्पण,
मग द्रष्टा कोठे आहे?
प्रकाश – स्थिति – कृति खेळ,
उमजला आज मज सार्थ,
जे दिसते, ते ते दृश्य
भोगाच्या अपवर्गार्थ !
Related
Please login to join discussion