Features

‘चिन्ह’ जुनी वेबसाईट व बरंच काही !

‘चिन्ह’ची जुनी हार्डडिस्क स्क्रोल करत असताना अचानक २००८ सालची ‘चिन्ह’ची जुनी वेबसाईट हाती आली. ‘चिन्ह’च्या नव्या वेबसाईटचं तंत्रज्ञान सांभाळणाऱ्या तरुण पिढीतल्या प्रतिनिधींनं ती वेबसाईट पाहून नव्या वेबसाईटमध्ये जुनी वेबसाईट समाविष्ट करण्याचा आग्रह धरला. आम्हीही तो मानला. त्यातूनच ‘चिन्ह’च्या जुन्या वेबसाइटने तरुण पिढीवर काय प्रभाव टाकला असेल याची किंचितशी कल्पना आली. ‘चिन्ह’च्या वेबसाईटचं काम पाहणाऱ्या कनक वाईकर यांच्या लेखातून तर सारंच चित्र स्पष्ट होत गेलं. म्हणूनच ‘चिन्ह’ची जुनी वेबसाईट पुन्हा प्रसारित करण्यामागची भूमिका आणि कनक वाईकर यांचं आत्मकथन असे दोन्ही लेख आम्ही आज एकाच वेळी प्रसारित करीत आहोत.

‘चिन्ह’च्या वेबसाईटची संपूर्ण जबाबदारी आता मी नव्या पिढीकडे सोपवली आहे. कनक वाईकर ही माझी मुख्य सहकारी. ‘चिन्ह’चा पहिला अंक प्रसिद्ध झाला तेव्हा तिचा जन्मही झाला नव्हता. पण ‘चिन्ह’चं दुसरं पर्व सुरु झालं तेव्हा ती औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात जाऊ लागली होती. २००८ साली ‘चिन्ह’ फेसबुकवर आलं. आणि कधीतरी तिच्या हाती ‘चिन्ह’ची एक पोस्ट लागली. त्या पोस्टचा तिच्यावर खूपच परिणाम होऊन ती वाचू लागली. आपल्या कला विषयक जाणिवा वाढवू लागली.

आता अलीकडे म्हणजे २०२१ च्या दरम्यान कनकनं माझ्याशी संपर्क साधला आणि ‘चिन्ह’चं काम करण्याची इच्छा व्यक्त केली. काहीशा साशंक मनानेच तिची निवड केली. कारण तिच्याविषयी मला काही ठाऊकच नव्हतं. ती ‘चिन्ह’च्या फेसबुक फ्रेंडमध्ये होती एवढंच मला माहित होतं. ‘वाचता वाचता’ समूहातले आमचे एक मित्र सुनील सामंत यांनी मात्र तुम्ही तिच्यावर जरूर विश्वास टाका असा मला आग्रह केला. जो मी मानला. आणि नंतर मात्र तिनं ‘चिन्ह’ संबंधात जे काही केलं ते सारं आता तुमच्या समोर आहेच.

‘चिन्ह’चा ब्लॉग. यावर देखील समृद्ध मजकूर उपलब्ध आहे.

खरं सांगायचं तर ‘चिन्ह’चा तिच्यावर एवढा प्रभाव आहे हे मला देखील आधी ठाऊक नव्हतं. त्यामुळेच अनेकदा तिनं लिहिलेला मजकूर किंवा तिनं दिलेले इंट्रो अथवा शीर्षकं वाचून मी थक्क होतं असे. ‘चिन्ह’ची शैली हिनं कधी आत्मसात केली असा मला प्रश्न पडत असे. एके दिवशी तिच्याच खुलाशातून सारा उलगडा झाला.

वेबसाइटमधलं ओ की ठो कळत नसताना किंवा ‘चिन्ह’ची ही वेबसाईट तयार करण्याआधी एकही वेबसाईट मी पाहिलेली नसताना वेबसाईट सुरु झाल्यादिवशी आणि नंतरच्या आठवड्यात देखील ती वारंवार ट्राफिक जाममुळे बंद पडावी हे सारं मला धक्कादायक होतं. पण मला देखील ही वेबसाईट अतिशय आवडत होती. कनक सारख्या अनेकांनाच्या आयुष्याला ती दिशा देणारी ठरली याचाही मला आनंद आहे. म्हणूनच मी ती सीडीमध्ये अगदी जपून ठेवली होती. या वेबसाईटचं काम पाहणाऱ्या आशुतोष मेस्त यानं ती गेल्या आठवड्यात पाहिली आणि ही वेबसाईट अशीच्या अशी दाखवूया असा माझ्याकडे आग्रह धरला. आशुतोष सारखे तरुण तंत्रज्ञ जवळ जवळ पंधरा सोळा वर्षानंतर देखील एखाद्या वेबसाईटचं कौतुक करत असतील तर नक्कीच त्या वेबसाईटमध्ये काहीतरी आहे असं माझ्या लक्षात आलं. आणि म्हणूनच आशुतोषचा तो आग्रह मी लगेचच मान्य केला. आता ती जुनी वेबसाईट या नव्या वेबसाइटबरोबर आता दिसू लागली आहे. तुम्हाला ती कशी वाटते आहे ते कळवायला मात्र विसरू नका.

‘चिन्ह’चा प्रश्नचिन्ह ब्लॉग. यावर कला शिक्षणातील कळीचे प्रश्न मांडले जात होते.

या वेबसाईटवर आता उपलब्ध नसलेले ‘चिन्ह’चे पहिल्या अंकापासूनचे सर्वच अंक येत्या महिन्याभरात याचं वेबसाईटवर उपलब्ध होतील. खरं तर ते पुन्हा उपलब्ध करून देण्यासाठी नव्या पद्धतीने डिझाईन करायचे अशी मूळ कल्पना होती. पण ती खूपच खर्चिक आणि वेळ खाणारी देखील ठरत होती त्यामुळेच ते काम सारखं मागं पडत होतं. आता मात्र आम्ही निर्णय घेतलाय की सर्वच जुने अंक जसेच्या तसे स्कॅन करून या वेबसाईटमध्ये ठेवायचे. त्यामुळे वेळेची आणि खर्चाची बचत होणार आहेच पण पहिल्या तीन अंकांच्या एकेका प्रतीसाठी दोन दोन हजार रुपये देखील मोजण्याची तयारी असणाऱ्या असंख्य वाचकांची फार दिवसाची मागणी पूर्ण होणार आहे.

दुसऱ्या पर्वातील भास्कर कुलकर्णी अंकानं तर अक्षरशः कहर केला होता. गेल्या जवळ जवळ वीस वर्षात भास्कर कुलकर्णी विशेष अंकासाठी फोन आला नाही असा एकही पंधरवडा गेलेला नाही. अगदी अलीकडे आलेला फोन होता साम टीव्हीचे संपादक प्रसन्न जोशी यांचा. त्यांना नकार देताना खरोखरच खूप वाईट वाटलं होतं. पण करतो काय ? त्या अंकाचं प्रकाशन ज्यांच्या हस्ते झालं त्या प्रख्यात साहित्यिक विजय तेंडुलकर यांची स्वाक्षरी असलेली एकच प्रत मजपाशी उपलब्ध होती. बाकीच्या साऱ्या वाचक मित्रांनी अक्षरशः लांबवल्या. त्यामुळे प्रसन्न जोशी यांच्या सारख्या असंख्य वाचकांची आता चांगलीच सोय होईल याची मला खात्री आहे.

‘चिन्ह’च्या जुन्या फाईल्स शोधत असताना अचानक भास्कर कुलकर्णी प्रकाशन सोहळ्यात विजय तेंडुलकर यांनी केलेल्या भाषणाची ध्वनीचित्रफीत माझ्या हाती आली. ती पुन्हा पाहून अतिशय आनंद झाला. ती चित्रफीत आणि प्रकाशन समारंभाचे फोटो ज्यात अरुण कोलटकर, दिलीप चित्रे यांच्यासारख्या भास्कर कुलकर्णी यांच्या जुन्या मित्रांचा देखील समावेश होता. ते सारंच या वेबसाईटमध्ये आता समाविष्ट होईल. असं बरंच काही नव्यानं करायचं ठरवलं आहे. या संदर्भात तुमच्या जर काही सूचना असतील तर जरूर करा. जुन्या वेबसाइटमधल्या असंख्य त्रुटी आम्ही लवकरच दूर करत आहोत.

पुन्हा भेटूच !

*****

सतीश नाईक
संपादक ‘चिन्ह आर्ट न्यूज’

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.