No products in the cart.
फक्त शंभर संच उपलब्ध !
‘चिन्ह’ तर्फे ‘नग्नता’ , ‘चित्रसूत्र’ आणि ‘गायतोंडे’ या तीन प्रकाशनांची जी सवलत योजना गेली दोन तीन वर्ष चालवली जाते आहे तिचा आता शेवट जवळ आला आहे. कारण तिन्हींचे मिळून फक्त शंभर एकच संच आता आमच्यापाशी शिल्लक राहिले आहेत. आणि गंमत म्हणजे आता हल्ली अलीकडे ‘गायतोंडे’ आणि ‘नग्नता’च्या एक एक प्रतीलाच मोठ्या प्रमाणात मागणी नोंदवली जाऊ लागली आहे. खरं तर या सवलत योजनेत सहभागी होऊन ‘चिन्ह’ची ही अखेरची तिन्ही प्रकाशनं वाचकांना अत्यंत सवलतीत मिळवता येतात. त्यांना ती सवलतीत मिळावीत या हेतूनेच ती योजना आम्ही जाहीर केली होती. आणि तिला प्रतिसाद देखील मोठ्या प्रमाणावर लाभला होता. पण आता अगदी अलीकडेच मात्र कशी कोणास ठाऊक प्रत्येक प्रकाशनांची वेगवेगळी मागणी नोंदवली जाऊ लागली आहे.
खरं तर या सवलत योजनेत सहभागी होणं वाचकांच्या अधिक फायद्याचं आहे. आम्हाला देखील आता त्यातून काही मिळालं अशी अपेक्षा राहिलेली नाही. अतिशय कष्टानं काढलेली ही प्रकाशनं मात्र जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचावी एवढीच माफक अपेक्षा मात्र आम्हाला निश्चितपणे आहे.
१९८७ – ८८ आणि ८९ या वर्षातले पहिल्या पर्वातले तीन अंक मिळवण्यासाठी आता देखील सातत्यानं फोन येत असतात. ‘निवडक चिन्ह’च्या पहिल्या पर्वाला देखील मोठी मागणी आहे. तीच गोष्ट दुसऱ्या पर्वातील अंकांबाबत. तब्बल तीस पस्तीस वर्षांनंतरसुद्धा प्रारंभीच्या अंकांना सातत्यानं मागणी येणं ही गोष्ट ऐकायला जरी बरी वाटत असली तरी त्या अर्थानं प्रॅक्टिकल मात्र नाही ही वस्तुस्थिती आहे. कारण त्यातून काही एक साधलं जात नाहीये. कदाचित लवकरच आम्ही ‘चिन्ह’च्या वेबसाईटवर सारे अंक उपलब्ध करुन देत असल्यानं कदाचित त्यातून मोठा कला प्रसार साकार होऊ शकेल. पण ही गोष्ट फार पुढची आहे.
आता जे अंक आम्ही अत्यंत सवलतीत उपलब्ध करुन देत आहोत ते सारे या विषयात रस असलेल्यांनी त्वरित मागवून घ्यायला हवे आहेत. अन्यथा जुन्या अंकाच्या बाबत हल्लीच्या वाचकांची जी गत होते आहे तीच गत कालांतरानं त्या वाचकांची होण्याची शक्यता आहे.
‘चिन्ह’च्या अगदी पहिल्या प्रकाशनापासून आम्ही नव्या नव्या तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला. सतत नवे नवे प्रयोग करत राहिलो. आता देखील ‘Chinha Art News’ च्या रुपानं आणि
‘you tube’ चॅनेलच्या द्वारे आम्ही नवी नवी माध्यमं अगदी डिजिटल देखील हाताळतो आहोत. अगदी तरुण पिढीशी देखील कनेक्ट होत आहोत. या साऱ्या धावपळीत जुन्या छापील प्रकाशनांकडं काहीसं दुर्लक्ष देखील होऊ शकतं. ते होऊ नये याच हेतूनं ही आवाहनं अधनंमधनं करीत असतो.
Related
Please login to join discussion