No products in the cart.
पिकासो आपला आपला
चित्रकार आणि कला शिक्षक शिरीष मिठबावकर यांनी मागील महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये पिकासोच्या कलाकृतीवर आधारित आगळ्यावेगळ्या प्रदर्शनाला भेट दिली होती. या प्रदर्शनाचं नीटनेटकं आयोजन आणि भव्यता याबद्दल आपण मागच्या भागात वाचलं. या भागात पिकासोच्या चित्रांबद्दलचे मिठबावकरांचे विवेचन वाचता येईल. विद्यार्थी दशेत असताना मिठबावकरांनी प्रा.संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पिकासोच्या कलाकृती समजावून घेतल्या होत्या. त्याचं प्रत्यक्षदर्शन या प्रदर्शनात मिठबावकरांना झालं. आणि पिकासो कलाकार म्हणून मोठा का आहे हेही जाणून घेता आलं. या प्रदर्शनातील असंख्य फोटोज मिठबावकरांनी ऑस्ट्रेलियातून खास ‘चिन्ह आर्ट न्यूज’च्या वाचकांसाठी पाठवली आहेत. आवर्जून बघा.
पिकासोची पेंटिंग्ज पाहतांना वेगळाच अनुभव येत होता. सातत्याने पुस्तकात पाहिलेली पेंटिंग्ज जिवंत होत होती. शतकापूर्वीचे रंग, आकार, विषय, विचार आज सुद्धा स्पष्टपणे स्वतंत्र दिसत होते. पिकासोच्या इलस्ट्रेटीव्ह पेंटिंग्ज बरोबर त्याची अमूर्त पेंटिंग्ज सुद्धा तेवढीच प्रभावशाली आढळली. साध्या विषयांना सुद्धा एका चित्राचे स्वरूप दिले होते. पिकासो बरोबर समकालीन चित्रकारांची चित्रे सुद्धा प्रगल्भ होती. प्रत्येक चित्रकार स्वतंत्रपणे आपल्या विषयातून स्पष्टपणे संवाद साधताना आढळतो. पिकासोच्या कॅनव्हास, प्रिंटस्, पॉटरी, शिल्प, या सर्वावरील रेखांकन, आणि आकार त्याच प्रमाणे रंग यांच्या त्या त्या माध्यमाप्रमाणे एक सूत्रता आढळून येत होती. कलाकृतीचं विश्लेषण करण्यापेक्षा मी प्रत्येक कलाकृतीमध्ये हरवलो होतो प्रदर्शनांत सर्वांत वेगळे प्रेझेंटेशन वाटले ते “Gurnica” या महत्वाच्या पेंटिंगचे व्हिडीओ प्रेझेंटेशन. या प्रेझेन्टेशनमध्ये रेखांकनापासून ते कलाकृती पूर्ण होईपर्यंत सर्व गोष्टींचे (टोन, रंगलेपन ई.) अवलोकन करण्यात आले होते. पिकासोची पेंटिंग्ज पाहतांना अनेक आठवणी आल्या. माझ्या विद्यार्थी दशेतील माझे सगळे शिक्षक आठवले. प्रत्येकाने पिकासो आणि युरोपियन कला वेगवेगळी शिकवली होतो. सर्वांचा सुवर्णमध्य एकच होता. पण पाहण्याचा दृष्टीकोन आणि संवाद वेगळे होते. म्हणून म्हणालो “पिकासो आपला आपला. ”
पिकासो चे ‘The Studio at La Californie’ पेंटिंग १९५६ सालचे. म्हणजे मी त्यावेळेस तीन वर्षांचा होतो. पिकासोची कारकीर्द १९७३ पर्यंत आहे. मी त्या वेळेस Intermediate Painting ला शिकत होतो . आणि इतिहासात पिकासो वाचत होतो, पाहत होतो १९७४, ७५, ७६ पर्यंत कलेचा इतिहास शिकत होतो. पाश्चिमात्य आणि भारतीय कलावंताची ओळख होत असतांना आमची प्रगती होत होती. एन एम . बेंद्रे सर , हेब्बार सर, हुसेन साहब, प्रफुल्ला डहाणूकर मॅम, कोलते सर, सोनावणी सर , पुजारे सर, संभाजी कदम सर, पॉलसर, मृगांक जोशी सर, आरवाडे सर इत्यादी अनेक मातब्बरांच्या कलाकृती जवळून पाहण्याचा योग आला. त्यांच्या बरोबर संवाद करण्याची संधी मिळाली.
आज २०२२ साली ‘पिकासोच्या’ जिवंत कलाकृती पाहून आंतरिक संवेदना जागृत झाल्या. कल्पना नसतांना सुद्धा योग आला. उपरोक्त विवेचन करण्याचे कारण की त्या वेळचे कलाशिक्षण किती जाणीव पूर्वक घडत होते कला इतिहास शिकतांना सारे शिक्षक सतत चित्राकृती करणारे- साकारणारे कला इतिहास शिक्षक लाभले मेलगे सर, रामचंद्र पाटकर सर, शहाणे सर, भागवत मॅडम , आरवाडे सर हे प्रत्येक शिक्षक विद्यार्थ्यांच्या कलाकृतींवर सकारात्मक संवाद करत. सौंदर्यशास्त्र शिकवणाऱ्या संभाजी कदम सरांची एक वेगळी उपस्थिती होती. सहज सोप्या शब्दांत पेंटींगमधील सौंदर्य कसे अनुभवायचे त्यांच्याकडून शिकलो.
आज पिकासोची पेंटिंग पाहतांना संभाजी कदम सरांची प्रकर्षाने आठवण झाली. त्यांचे शब्द आठवले ” अहो, चित्रातील जगात जगण्याचा प्रयत्न करा.” कदाचित शब्द थोडे वेगळे असतील. पिकासोच्या चित्रांतील आकार, रंग, पोत, हाताळणी यांचे एक अनोखे जग होते. मानवी जीवनातील अनेक गोष्टी त्याच्या भावविश्वातून प्रगट होताना आढळतात आणि आपण त्यात जगतो आपल्या विचारांना घेऊन. स्वतः पिकासो एके ठिकाणी म्हणतो की, “Its up to the public to see what it wants to see” पिकासोचा संपर्क अनेक कलावंत, कवी, आणि प्रामुख्याने बुद्धिमान लोकांशी सतत होता. त्यांच्यासोबत त्याची चर्चा निसर्गाचे सत्य स्वरूप आणि त्याने स्वतः सुरु केलेले कलाप्रवाह, त्याची पेंटिंग्ज, रेखांकने, शिल्पे याबाबतीत चर्चात्मक देवाण – घेवाण होत असे. प्रदर्शनांत प्रसिद्ध केलेल्या माहितीत आपल्याला समजते. तत्कालीन विचारवंत आणि कला समीक्षक सातत्याने म्हणतात की, पिकासोचे सभोवतालच्या जगाबद्दलचे त्याचे मत त्याच्या कलाकृतीत आढळते. त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे त्याच्या क्रांतीकारी कलाप्रकाराचे अत्यंत प्रभावी सादरीकरण आणि त्याबद्दल रसिकांचे प्रेम दिसते.
या प्रदर्शनात पिकासोच्या एकूण १३ विभागातून वेगवेगळ्या विभागांतील १०० पेक्षा जास्त कलाकृती प्रदर्शित आहेत. प्रत्येक विभागात समकालीन कला संपन्नता आढळते . पिकासो बरोबर Nottalia Goncharouan , Julio Gonzalez, Witredo Lami, Suzanne Valadon, Maria Helena, Viera da Silva यांच्या कलाकृती आहेत. यांतील बरेचसे आपल्या माहितीच्या पलीकडे आहेत.
पिकासो, चित्र, शिल्प, प्रिंटस्, सिरॅमिक आणि थिएटरचा डिझाइनर म्हणून प्रसिद्ध होता. त्यापेक्षा क्युबिझमचा संस्थापक आणि स्वतःची Avant – garde शैली, त्याचबरोबर अतिवास्तव कलाप्रवाह यासाठी तो जगप्रसिद्ध आहे. पिकासोच्या आयुष्यांत १९०१ साल अत्यंत महत्वाचे ठरताना आढळते. ‘Gustave coquiot’ नांवाचा लेखक , कला समीक्षक, आणि कला संग्राहक त्यांच्या आयुष्यात आला. ” Gustave ” त्याच्या लिखाणामुळे मान्यवर झाला होता . पॅरीस मधील तत्कालीन रंगीत सामाजिक आयुष्याचं त्याला वेड होतं. पिकासो ने या Gustave च पोर्ट्रेट केलं. या पोर्ट्रेटच्या बॅकग्राऊंडला अनेक नृत्यांगना आढळतात. Gustave त्याच्या अनोख्या – अधुनिक पोषाखांत दिमाखदार दिसतो. Gustaveने, Galene Vollaret, paris येथे पिकासोचे पहले प्रदर्शन भरवले . ( Gustav नि प्रसिद्ध केलेल्या तत्कालीन लेखात पिकासोवर एक स्वतंत्र प्रकरण लिहिले.) यात त्याने पिकासोच्या विविध विषयांचे प्रेरणास्रोत काय आहेत त्याबद्दल लिहिले होते. महत्वाचे म्हणजे पिकासोला जीवनातील सगळ्या गोष्टी पहायच्या आहेत. आणि त्यातील सत्यता पडताळून मांडायच्या आहेत. पिकासोच्या कलाकृती पाहतांना, कलेचा मागील प्रवास जर तुलनात्मक पाहिला तर त्याच्या कलाकृतीमध्ये एक आधुनिक भविष्याची ओढ आढळते.
समाप्त
या लेखाचा पूर्वार्ध खालील लिंकवर क्लिक करून वाचा.
*****
– शिरीष मिठबावकर
‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD
‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag
Related
Please login to join discussion