No products in the cart.
कविता व चित्रकला-अभिव्यक्तीचं फुलपाखरू…
कविता वाचत असतांना आशय, भावार्थ, याबरोबरच दृश्यात्मकतेचा अनुभव रसिकांना प्रामुख्याने येतो. कवितेतल्या प्रतिमांमधलं दृश्यरुप आपल्या आजुबाजूला असतं किंवा आपण कधीतरी ते बघितलेलं असतं. कवी अरुण कोलटकरांच्या अनेक कवितांमध्ये दृश्यात्मकतेचा अनुभव येतो. कारण ते चित्रकार होते. चित्रमय प्रतिमा कवितेचा आशय अधिक गडद करतो, असं कविता वाचतांना लक्षात येते. कोलटकरांच्या इमारत, तक्ता, वामांगी अशा काही कविता हा अनुभव देतात.
चित्र दृश्याचं वर्णन करत नाही, ते स्वतः दृश्य तयार करतं, आणि कवितेनं काही सांगायला नको, तिने फक्त असायला हवे. ही कविता आणि चित्रकला याविषयीची मूलभूत विधानं दोन कलाअविष्काराची भूमिका विशद करतात. कविता वाचत असतांना कवितेतील घटना, प्रसंग यांचा अनुभव म्हणजे त्यावर कॅमेरा फिरतोय व आणि आपण त्याचा दृश्यानुभव घेतो, अशी अनुभूती मनावर असते.
कवी ना.धों. महानोंरांच्या कवितेत रानातल्या निसर्गाच्या प्रतिमा अनेकाविध अर्थ घेऊन येतात आणि निसर्गाचं चित्र उभं करतात. झाडाचं हिरवेपण बहरलेपण ही येतं आणि कोरडेठाक झालेल्या शेतीचं चित्रही दुष्काळाची दाहकता व्यक्त करतं. कवितेतून आजूबाजूचं जगण्या-मरणाचंं वास्तव दृश्यकवितेचं रूप घेऊन येतं आणि आपल्याला अस्वस्थ करतं.

चित्रकार प्रभाकर कोलते यांनी सुमती लांडे यांचा ‘कमळकाचा’ कवितासंग्रह वाचून त्यावर चित्र काढली. कविता वाचून झाल्यावर आलेला अनुभव चित्रातून व्यक्त केला. भाषिक अनुभवाला एक प्रकारे दृश्यरुप देण्याचा हा प्रयोग होता. याविषयी कोलतेंनी म्हटले की या कवितांनी कवितेपूर्वी, कवितेदरम्यान आणि नंतरही अनुभवांचा एक परिपूर्ण श्वास दिला. त्या श्वासालाच हे दृश्यरूप दिले. आणि त्यातून हे दृश्यनाद समोर आले. कवितांतून एक अनाहत नाद आपल्याला ऐकू येतो. खरं तर कवितेची लय असते. त्यातून आकाराकडे जाण्याचा मार्ग चित्रकाराला सापडत असावा. तसंच प्रभाकर कोलतेंच्या बाबतीत झालं.

चित्रकार र.कृ. जोशी यांनी अक्षर कवितांचा अनोखा प्रकार कवितेत आणला. कविता कागदावर विशिष्ट पद्धतीने लिहिल्यावर, छापल्यावर त्याचा परिणाम गडद होतो, हे सप्रयोग सिद्ध केले. दृश्य परिणाम म्हणजे काय? याची ही प्रचिती होती. त्यानंतर अरूण कालवणकर, शांताराम पवार, संतोष क्षीरसागर, धनंजय गोवर्धने, म भा परसवाळे, बी जी लिमये, श्रीधर अंभोरे, अच्युत पालव यांनीही हे प्रयोग कवितेत केले.


चित्रकार धनंजय गोवर्धने यांनी दंगल या विषयाची भीषणता कविता चित्रांच्या माध्यमातून व्यक्त केली होती. दंगलपुराण या शीर्षकाचं हे चित्रप्रदर्शन यात काळ्या रंगाचा वापर करून मनावरील भितीची गडदता, त्यांनी चितारली होती. त्याचबरोबर गोवर्धनेंनी ‘काव्यरेखा’ हे कविता चित्राचं प्रदर्शन केलं होतं. त्यात कवितेतल्या बिटविन द लाईन्स मध्ये चित्रांचा आशय पूर्णत्वासाठी केला होता.
सुलेखनकार बी जी लिमये कवितेचा आशय ,भावार्थ अत्यंत प्रभावीपणे सुलेखनातून मांडत असतात,कवी आणि वाचक यांच्यातील आकलनाचे धूसरपण बऱ्याच प्रमाणात ते पुसून टाकतात.जुन्या ,नव्या कवींच्या कवितांचा शोध घेऊन सात्यत्याने ते आपली कलासाधना करत आहेत.

मनाच्या अनेकविध कल्लोळांना वाट मोकळी करून देण्यासाठी उत्कटता म्हणून कलाकृती कागदावर, रंग रेषेच्या रूपाने निथळते तो सारा रूप-अरूपाचा चित्रमय खेळ आपल्याला गुंतवून टाकतो आणि आनंदही देतो. चित्रकार प्रभाकर बरवे म्हणतात चित्रार्थ जिथं दडलेला आहे अशा जागा मला खुणावतात निशब्द संवाद करतात आणि जखडतात. हाच अनुभव चित्रकाराइतकाच रसिकालाही येत असावा बहुधा….!
****
– राजू देसले
‘चिन्ह’चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा
https://chat.whatsapp.com/IgdCKjB4vEsGVz68ljV34n
‘चिन्ह’चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
Related
Please login to join discussion